1. एकाच काळातले कवी,एकमेकांना मनापासून दाद देताना दिसत नाहीत.वरकरणी "वाऽऽवा!" म्हणावे लागते,ती गोष्ट अलाहिदा.माझी समजूत होती की,हा प्रकार फक्त मराठी कवींच्या बाबतीत आहे.आपल्या घनश्याम धेंडेंनी म्हटलेच आहे "जित्या कवीला दाद द्यायची प्रथाच नाही!"पण तसे नाहीय.पाकिस्तानचे महान शायर,दिवंगत कतील शिफाईंचेही असेच मत असावे.आपल्या "तेरे खतों की खुश्बू" ह्या संग्रहाच्या प्रस्तावनेत ते वाचकांना आवाहन करताना लिहितात, "माझे हमदर्द ह्या नात्याने माझ्या लिखाणात काय चांगले आढळले ते जरूर कळवा.मला गौरव वाटेल.माझ्यातल्या उणिवांबद्दल ,ह्यासाठी कळवू नका,कारण त्यातल्या वास्तविक उणिवांबद्दल मला स्वतःला चांगली जाण आहे.आणि माझ्यात नसलेल्या उणिवाही, काही इर्षाळू लोक हा संग्रह प्रसिध्द होण्याआधीच, वेगवेगळ्या मार्गांनी मला कळवतीलच."
2.संपादक प्रकाश पंडितांनी,कतीलजीं बद्दल अशीच गमतीदार माहिती दिलीय. "कुण्या कवीची सवय कशी असते,ह्याबद्दल आपण ऐकलंय.उदा.इक्बाल हुक्का भरून पलंगावर रेलायचे आणि मुन्शीला शेर डिक्टेट करायचे.कुणाला फिरायची सवय,कुणाला चहा,कुणाला मद्य...कतीलजींची सवय वेगळी. ते पहाटे चार वाजता उठायचे.तेल मालिश करून,जोर बैठका काढायचे,घामाघूम झाल्यावर लगेच आपल्या टेबलापाशी येऊन लिहायला बसायचे.आणि नाजूक शेर लिहायचे..ज्यात फुलांचा गंध आणि झ-याचे संगीत असायचे!".....असो.चांगल्या गजला लिहिण्यासाठी मराठी कवींनी आखाड्यात घुमून बघायला हरकत नाही!
3.कतील शिफाई प्रारंभी पारंपरिक शायरी करायचे.शिफा कानपुरी ह्या ज्येष्ठ कवीचा इस्लाह घ्यायचे.कतीलचे मूळ नाव मुहम्मद औरंगजेब,पुढे त्यांनी कतील हा तखल्लूस घेतला व आदर म्हणून गुरूचे नाव लावले व कतील शिफाई झाले. उर्दू मधली ही गुरु शिष्य परंपरा आता क्षीण होते आहे. असाही इस्लाहचा फायदा किती होतो.ह्याबद्दल उर्दू समीक्षक/संपादक प्रकाश पंडित लिहितात.
"लेकिन किसी की इस्लाह या परामर्श तब तक किसी शायर को हितकर सिद्ध नही हो सकते जब तक कि स्वयं शायर के जीवन में कोई प्रेरक वस्तू न हो| लगनऔर क्षमता का अपना अलग स्थान है,लेकिन इस दिशा की समस्त क्षमताएँ मौलिक रूप से उस प्रेरणा के वशीभूत होती है,जिसे 'मनोवृत्तांत' का नाम दिया जा सकता है"
4.कतील शिफाई हे नाव ज्या शेराने मला प्रथम कळले,तो शेर असा
तुम पूछो और मैं न बताऊँ,ऐसे तो हालात नहीं
एक जरासा दिल टूटा है,और तो कोई बात नहीं
अर्थ सांगायला नको इतका शेर सोपा आहे.ह्यातली शेरियत कशात आहे तर, दिल टूटा है सारखी गंभीर गोष्ट शायर,काही खास बात नाही...असा पवित्रा घेऊन सांगतोय.ही शैली शेरियत देते.
मला माझा एक मतला आठवला.
अजून येते मला हासता...गंमत आहे!
जीव जाळुनी येते जगता...गंमत आहे!
अजून इतके सोसल्या,भोगल्यावरही मला हसता येतेय,आणि जीव जाळून जगता येतेय...ही काही गंमत नाहीय! असे न म्हणता कवी कृतक आश्चर्याने गंमत आहे! म्हणतो, ही विपरीत भाषा शैली आहे.
एक जरासं हृदयच तर भंगलं आहे बाकी काही नाही...एक अतिशय गंभीर गोष्ट अगदी नगण्य भासवायची....पण वाचकाला बरोबर कळवायचे.वरील कतीलजींच्या शेरात कदाचित जिने शायरचं हृदय तोडलेय,तिलाच तो सांगतोय....तू विचारावं आणि मी न सांगावं असं काही नाहीय! असो.
5. कतील शिफाईंनी स्वतःच असे लिहून ठेवलंय की सुरुवातीला मी पारंपरिक शायरी लिहायचो,जिच्यात वास्तवापेक्षा,बनावट(कृत्रिम) अधिक असते.मी फॅशन म्हणून शायरी/गजला लिहायचो.
कदाचित मराठीतही अशी परिस्थिती असावी.सध्या गजलची चलती आहे,आपल्या गद्य,छंदमुक्त कवितेला कोणी विचारत नाहीय...चला गजल लिहून बघू.कार्यशाळा आहेतच झटपट शिकवून प्रशस्तीपत्र द्यायला....माझा कार्यशाळेने काही मूलभूत गोष्टी शिकवायला विरोध नाहीय.पण सरधोपट प्रवेशाला विरोध आहे.अभिनयाच्या कार्यशाळेत किंवा महाविद्यालयात शिकून कोणी अभिनेता बनत नाही.पण अशा ठिकाणी पात्रता सिद्ध केल्याशिवाय प्रवेश नसतो.असो.हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.तर फॅशन म्हणून शायरी/सिनेगीते लिहिणा-या कतीलजींचे चंद्रकांता नावाच्या नटीशी दीड वर्षे प्रेमप्रकरण चालले.आणि अत्यंत नाटकी व दुःखद प्रसंगाने संपले.कतीलजी उद्ध्वस्त झाले.ते लिहितात "ही घटना घडली नसती तर मी अजूनही तीच पारंपरिक शायरी लिहित राहिलो असतो.बनावट,फॅशन म्हणून.ह्या घटनेने मी यथार्थाच्या/वास्तवाच्या अधिक जवळ आलो.मी व्यक्तिगत घटनांना वैश्विक रंगात लिहायचा प्रयत्न करू लागलो.ह्या घटने नंतर मी जे लिहिले ते कल्पीत कमी आणि वास्तविक अधिक आहे."
6. परीशाँ रात सारी है,सितारों तुम तो सो जाओ
सुकूते मर्ग तारी है,सितारों तुम तो सो जाओ.
सगळी रात्र परेशान,बेचैन आहे,चांदण्यांनो,तुम्ही निद्राधीन व्हा बरं.सगळीकडे मरण शांतता तरळते (तारी) आहे.चांदण्यांनो तुम्ही निद्राधीन व्हा" जगजीतसिंगजींच्या आवाजात ही गजल ऐका,अनुभवा.
ह्या गजलचा एक शेर देतो.
"तुम्हे क्या आज भी अगर कोई मिलने नही आया
ये बाजी हमने हारी है,सितारों तुम तो सो जाओ"
अत्यंत प्रासादिक आहे.भाषांतराची गरज नाही .पण साध्या शब्दात वेदना कशी भिडते,ते बघा.आपण बोलतो त्या भाषेत गजल लिहायला हवी.हे मी नेहमी सांगतो.पण त्यातली अडचणही ह्या शेराच्या निमित्ताने सांगतो.हे शेर आपण बोलतो त्या मराठीत करून बघू...
चांदण्यांनो तुम्ही तर आता झोपा असा रदीफ होईल.आणि गजलमधलं काव्य,गजलियत,आणि माधुर्य सगळंच संपुष्टात येईल.हास्यास्पद होईल.त्यामुळे आपल्याला संस्कृत प्रचूर शब्दांचा आश्रय घ्यावा लागतो."झोपा" असं न लिहिता,
तारकांनो,व्हा तुम्ही निद्रिस्त आता अशी भाषा वापरावी लागते.जी बोलताना आपण वापरत नाही.
प्रत्येक भाषेची बलस्थानं व मर्यादा वेगवेगळ्या असतात.त्या अशा.
ह्या निमित्ताने मराठी गजलेत साहित्यिक भाषा कशी शिरते व मराठीत सहज लिहिण्यावर मर्यादा कशा पडतात हेही समजले.
7.कतीलजींचा एक मतला आहे...
बज्मे अंजुमसे नजर घूम के लौट आई है
फिर वही मैं हूँ फिर वही तन्हाई है
"चांदण्यांच्या,तारकांच्या मैफिलीत फिरून नजर पुन्हा माघारी वळली आहे,(आणि) पुन्हा तोच मी आहे तोच एकांत आहे."
पुढील शेर आहे...
गुनगुनाती हुई आती है फलक से बूँदे
कोई बदली तेरी पाजेबसे टकराई है
आकाशातून काही थेंब गात-गुणगुणत खाली येताहेत,जणू एखादा मेघ तुझ्या पैजणांना टक्करून खाली कोसळतोय.हा शेर नजाकत व काव्यमयता घेऊन आलाय.पावसाच्या थेंबांची गुणगुण कवितेच्या जवळ जाते.
मराठीत सहसा मुसलसल गजला जास्त आढळतात.
वरील मतल्यात तन्हाईचा जो मूड आहे,तोच पुढे वेगवेगळ्या प्रतिमांद्वारे शेरात येतो.मग मराठी गजलकार शेराचा विचार करत नाही,अशी तक्रार सुरू होते.ती टाळण्यासाठी मराठी गजलकार,वेगवेगळ्या विषयांवर शेर लिहितो.
मतला तन्हाईचा,दुस-या शेरात प्रेम,तिस-यात सामाजिक,चौथ्यात राजकारण असं काहीतरी विनासंदर्भ लिहितात.आणि गजल फसते.कृत्रिम वाटते.असा हा पेच आहे.
उर्दू गजलेत वेगवेगळ्या विषयांवरचे शेर मान्य आहेतच.पण गजलचा मूड एकच ठेवावा लागतो.हे मराठीने लक्षात घेतलेले दिसत नाही.शेर वेगळे असले तरी एका शेरातूनच दुस-या शेराकडे अलगद जायचे असते.उड्या मारत नाही.
8..कतीलजींचा मतला व शेर वर दिलेत. ते बघा.मतल्यात चांदण्यांची मैफिल आहे,म्हणजे आकाश आहे,अदृश्यपणे ती आहे,तिची आठवण आहे.एकटेपण आहे.तर शेरात मेघ आहेत (आकाश!) पावसाचे थेंब आहेत."पैंजणाला" टक्करून म्हणजे पुन्हा ती आहेच,आठवण स्वरूपात.
हे दोन शेर स्वतंत्र, स्वायत्त असूनही अशा क्रमाने येतात की रसभंग होऊ नये.अर्थात हा दोन शेरातला धागा (राब्ता?) इतका सूक्ष्म असतो की प्रत्येक वेळी उलगडून दाखवता येईलच असे नाही.ह्यामुळे उर्दू गजलेत वेगवेगळे विषय असले तरी रसभंग होत नाही.मराठीत ब-याचदा होतो.ह्यावर मराठी गजलकारांनी स्वतःचं चिंतन करायला हवं.असं मला वाटतं.
9.कतीलजींनी हिंदू पुराणकथेतील प्रतिकेही वापरली आहेत.सर्वधर्म समभाव त्यांच्या गजलात आहे.एक गमतीदार शेर बघा.
वो मुसलमान थी,अल्लासे शरमाती रही
और भगवानसे गोरी ने सजन माँग लिया
ती मुसलमान असल्याने अल्लाकडे मागायची तिला लाज वाटली,भगवानाकडे त्या सुंदरीने प्रियकर मागून घेतला! अल्लाकडे 'वर' मागायची प्रथा नसावी!
10.कतीलजी 1919 ते 2001 असे दीर्घ आयुष्य जगले.1994 साली त्यांना पाकिस्तानचा प्राईड ऑफ परफाॅरमन्स उच्च पुरस्कार मिळाला. वीसेक पुस्तके प्रकाशित झाली.2500गीत रचना चित्रपटासाठी लिहिल्या.त्यांच्या गजला दिग्गजांनी गायल्या आहेत.
जगजीतसिंगजींच्या संगीतात लतादीदींनी गायलेली गजल, दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला
जरूर ऐका. यू ट्यूबवर आहे.
11.कतीलजींचे खूप शेर उद्धृत करायचा मोह होतोय पण थांबतो.कारण उर्दू गजलकारांचा परिचय हा आपला उद्देश नाहीय.तर उर्दू गजल जे गारूड करते ते अन्य भाषांना(हिंदी,मराठी सह) अपवादानेच का जमते हे बघायचा आहे. आपण हे बघितले की फॅशन म्हणून,चांगली गजल लिहिली तरीही तिच्यात ते गारूड नसते.जेव्हा तुमचे दुःख तुमचेच असते,आणि खरे असते...तेव्हा गजल वश होते.कदाचित कवीला ती किंमत चुकवावी लागते.
उर्दूत गजल बोलल्या इतकी सोपी लिहितात,तसे मराठीत केले तर हास्यास्पद होते.प्रत्येक भाषेच्या मर्यादा व सामर्थ्य वेगळे असते आणि शेराच्या मिस-यांमध्ये जसा राबता असतो,अगदी तसा नाही,तरी एक सूक्ष्म राबता एका गजलच्या दोन शेरांमध्ये असतो.हे समजले तरी आपली गजलची जाण वाढेल. तसे होवो!......आमेन!.
0 Comments