Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कवितेकडून गझलेकडे वळतांना Gazalkara Urmilamai Bandiwadekar

🌼 *दिवाळी विशेष* 🌼

कवितेकडून गझलेकडे वळतांना
गझलकारा उर्मिला बांदिवडेकर

🌹 कवितेकडून गझलेकडे वळतांना 🌹


       गझलकार हा मुळात कवी असावा असे आपण बरेचदा वाचतो, ऐकतो आणि ते खरेच आहे. कविता लिहिणा-या ब-याचजणांना गझल लिहायची असते. गझल कशी लिहावी यासाठी विविध साहित्य विविध ठिकाणी उपलब्ध आहेच तसेच अनेक गझल कार्यशाळातून याची माहिती मिळते. 

      आजपर्यत अनेक साहित्यसमुहावर मी पन्नास गझलकार्यशाळा घेतल्या आहेत... या कार्यशाळा घेतांना अनेक गोष्टी जाणवल्या. गझल शिकायची असेल तर गझल साधकाने काही गोष्टीची पूर्व तयारी करायला हवी हे प्रकर्षाने जाणवले. अशी तयारी असली तर गझल तंत्र शिकणे सोपे जाईल यासाठी कवितेकडे सजगतेने बघायला हवे. त्यासाठी अनेक कवींच्या कविता वाचाव्यात बा.भ. बोरकर, गडकरी, शांता शेळके , भा रा तांबे, बालकवी तसेच समकालीन कवींच्या कविताही वाचाव्यात, त्याचा अभ्यास करावा. या कवितातली प्रमाणबद्धता, शब्दसौंदर्य, भावुकता, भावनाभिव्यक्ती , अलंकार, यमक, लय यांचा अभ्यास करून रसास्वाद घ्यावा. केवळ गद्यातील शब्दांची उलटापालट करून लिहिले की कविता होते असे नाही.

       कवितेतील विविध प्रकार जाणून घ्यावे व त्यातील आपल्याला जमणा-या प्रकारात कविताही लिहून पहावी.कवितेत अनेक प्रकार आहेत. मुक्तछंद, अक्षरछंद, वृत्तबद्ध कविता या नानाप्रकारांची माहिती जमवा व जमेल त्या प्रकारात लिहून बघा. भारूड, पोवाडे, अंगाई गीत, भावगीत, भक्तीगीत, प्रेमगीत, निसर्ग कविता, लावणी, हायकू, अभंग, ओव्या असे वेगवेगळे प्रकार वाचा व जमेल त्या प्रकारात लिहून पहा. लक्षात येईल की प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे नियम आहेत ,वैशिष्टये आहेत. त्यातून तुम्हाला कोणत्या प्रकारात गती आहे तेही कळेल व लिहिता लिहिता कवितेत प्रमाणबद्धताही येत जाईल.

      दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याकरण व शुध्दलेखन याकडे लक्ष द्यायला हवे..यासाठी शब्दकोश व व्याकरणाचे पुस्तक अवश्य घ्या,अभ्यासाचा दुसरा सोपा उपाय म्हणजे 1 ली ते 10 वीची बालभारती मराठीची पुस्तके चाळा, त्यात प्रत्येक धडा वा कवितेखाली व्याकरण विभाग असतो. त्यामुळे अगदी सोप्याप्रकारे व्याकरणाची उजळणी होईल. कारण ब-याच गोष्टी विस्मरणात गेलेल्या असतात. व्यंजन, स्वर, अक्षर, शब्द, वाक्य, शब्दाच्या जाती, शब्दसिध्दी , समास , विभक्ती प्रत्यय, कर्तरी कर्मणी भावे प्रयोग, लक्षणा अभिधा व्यंजना शब्दशक्ती इत्यादीची उजळणी होईल

      व्याकरणाबाबत शब्दकोशही जवळ ठेवा. गझलेत चुकीचा शब्द चालत नाही. शब्द चुकला तर लगावली चुकते.
खालील शब्द पहा

शब्द नेहमी असे लिहा..

तु ❎.. तू ✅

खुप ❎.. खूप ✅

चूका ❎.. चुका ✅
एक.. चूक ! अनेक चुका


लगावली नूसार ❎
लगावलीनुसार ✅

सुरूवाती पासून ❎
सुरुवातीपासून ✅

पराकाष्टा ❎ ..पराकाष्ठा ✅

नविन ❎ .. नवीन ✅

काहितरी❎.. काहीतरी

शब्दाशी.. एकवचन
शब्दांशी .. अनेकवचन

आपले लेखन शुध्दच यायला हवे. गझलेत चुकीला जागा नाही.शब्द चुकीचा लिहिल्यास लगावली चुकते.. परिणामी पूर्ण गझल चुकते. बाद होते.
 
चुकून झालं.. चालत नाही.
तेव्हा काळजीपूर्वक लिहावे लागते म्हणून शब्द शुध्दतेसाठी शब्दकोश वापरावा. लेखन शुध्दता मनापासून जपावी.कारण शब्द चुकीचा लिहिलात तर लगावली चुकणार !आणि लगावली चुकली तर गझल बाद होणार. म्हणून आपण लिहिलेला प्रत्येक शब्द अचूक यायला हवा..त्यासाठी निदान सुरवातीला तरी प्रत्येक शब्द.. शब्दकोशात पाहण्याची सवय लावून घ्या.सुरुवातीला कठीण वाटतं..पण ते ते शुध्द शब्द ..नजरेत फिट्ट बसून जातात, हाताला बोटाला तेच वळण पडतं.
आणि मग कधीच..शब्द चुकूनही चुकत नाहीत.
शिवाय शब्दकोशात एकाच शब्दाचे प्रतिशब्दही मिळतात ..जसे...नभ, आकाश, आभाळ, गगन...यातून लगावलीनुसार योग्य तो शब्द निवडता येतो...आपली शब्दचिकित्साही वाढते व शब्दभांडारही वाढतो.

     गझल लिहायची आहे ना मग याबरोबरच सुरेश भटांची गझलची बाराखडी अवश्य वाचा. गझलेतील मतला, शेर, वृत्त, जमीन, मिसरा, रदिफ, काफिया, कवाफी, अलामत वा स्वरचिन्ह , अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, स्वर, व्यंजन, अक्षरे, जोडाक्षरे, मात्रागट, लगावली, लघु गुरू अक्षरे हे शब्द वाचनात येतील व त्यांची माहितीही होईल अधिक शिकण्याची उत्सुकताही वाढेल.

      या पूर्वतयारीनंतर इतरांच्या गझला डोळसपणे वाचा,अभ्यासा, त्यातले रदिफ कवाफी वगैरे ओळखता येतात का बघा, वृत्त ओळखता येते का बघा.. नाही आले तरी नाराज होऊ नका... गझलच्या बाराखडीची पारायणे करा हळूहळू गझलेचे पूर्वज्ञान पक्के होईल. जमलेच तर वाचलेल्या गझलेची लगावली काढून बघा, मात्रागट असले तर शोधून बघा, त्यातला आवडता शेर पुन्हापुन्हा वाचा...त्याचा अर्थ गद्यात लिहून बघा...शेर कसा लिहावा हे कळेल व गझलतंत्र आत्मसात करणे सोपे जाईल.

    एखादी गझल कार्यशाळा करता आली तर बघा. एकदा गझलेचे तंत्र समजले की, निरनिराळ्या वृत्तातून मतला+1शेर असा लिहिण्याचा सराव गझल कार्यशाळेत करून घेतला जातोच..तुम्ही स्वतःही असा सराव करू शकता. चिकाटी सोडू नका ...लगावली गुणगुणत लिहा...जमेल हळूहळू हा विश्वास ठेवा. गझलकार्यशाळेत शिकेपर्यंत ब-याचजणांचा उत्साह टिकून रहातो.पण प्रत्यक्ष लिखाणाची वेळ आल्यावर ब-याचजणांचा उत्साह मावळतो..पण हीच कसोटीची वेळ असते.झटपट गझलकार होण्याची घाई करू नका.सराव करत रहा.हळूहळू गझलेचे बारकावे कळत जातील...जन्मभर गझल शिकण्याचे व्रत सांभाळा..छान चांगले उत्तम अतिउत्तम लिहू शकाल.फक्त थोडा धीर धरा व वृत्त गुणगुणत रहा..ते आत्मसात झाले की तंत्र सांभाळत लिहिता येईल.

    शब्दसंपत्ती तुमच्याकडे असते पण ते शब्द शोधण्याची दृष्टी जोपासावी लागते.बघा...कर...हा शब्द घेतला.आता याच्याशी जुळणारे पुष्कळ यमकात्मक शब्द तुम्हाला सापडतील कख..ते क्ष ज्ञ पर्यतची अक्षरे समोर ठेवा व अर्थपूर्ण शब्द शोधून काढा...बघा
बघा यापुढे र लावून
कर
खर
गर
घर...अर्थपूर्ण शब्द घ्या

णर
लर...हे अर्थपूर्ण नाहीत ते सोडून द्या
छंद म्हणून ...कोणत्याही शब्दाशी जुळणारे अर्थपूर्ण शब्द या पद्धतीने शोधा...असे सुरवातीच्या काळात केलेत तर...या सवयीमुळे पुढे आपोआपच शब्द सहज सुचत जातील..
यमक जुळणारे शब्द तसेच एखाद्या शब्दाचे समानार्थी शब्द शोधणे यांचा सराव झाला व लगावलीत बसणारे शब्द योजता आले तर गझल लिहिणे सोपे होऊन जाते..कारण गझल कोणताही शब्द स्वीकारत नाही तर योग्य जागी तिला हवा असलेला योग्य शब्द मागते.

     सुरवातीला हे जरी फार किचकट वाटत असले तरी जसजशी गझलची गोडी वाढत जाईल या गोष्टी सहज सुलभ वाटतील. एखादा शेर मनासारखा जमला वा मनासारखी गझल जमली तर होणारा आनंद अवर्णनीय असतो.गझलेतील प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असते.त्यामुळे बिंदूत सिंधू आणण्याचा प्रयत्न असतो. जमलेला प्रत्येक शेर रसिकांच्या मनात घर करतो. हे सर्व होण्यासाठी गझल साधना करावीच लागते.झटपट गझलकार होता येत नाही. साधना केली तर गझलदेवता प्रसन्न झाल्याशिवाय रहाणार नाही. नव्यानेच गझल लिहायला शिकणार्‍यांना गझल लेखनासाठी मनापासून शुभेच्छा!

उर्मिला बांदिवडेकर
मो. 9833779457

______________________________
संयोजक: भरत माळी
मो. 9420168806
गझल मंथन साहित्य संस्था
______________________________

Post a Comment

0 Comments