Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मराठी गझलेच्या वाटेवरचा मैलाचा दगड :"आमची गझलसाद" Ashok Wadkar

          🌹मराठी गझलेच्या वाटेवरचा मैलाचा दगड : 

                       "आमची गझलसाद" 🌹

        --------------------------------------------------------

     .       



      गझलेच्या वृत्ताचा अठराव्या शतकात प्रथमतः अजाणता प्रयोग करणा-या अमृतराय (इ.स.१६९८-१७५३) व मोरोपंत (१७२९-१७९४) या आद्य कवी द्वयांपैकी मोरोपंतांचा जन्म कोल्हापूरनजिकच्या पन्हाळा येथील. दोघांच्याही या रचना एकाच गझलवृत्तातील आहेत. ह्या मराठी वृत्तास मोरोपंतांच्या "रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी" या रचनेमुळे "रसना" असे नामाभिधान लाभले. अशा मराठी गझलेच्या ऐतिहासिक परिसरात गझलेचा प्रचार व प्रसार करण्यात "गझलसाद" हा कार्यक्षम समूह अग्रेसर आहे. समूहात बव्हंशी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील गझलकार व गझलरसिकांचा समावेश आहे.


      गझलसम्राट सुरेश भटांच्या दमदार प्रयत्नामुळे मराठी साहित्य विश्वात गझल विधेची दमदार वाटचाल सुरू झाली आहे. अनेक प्रथितयश व नवोदित कवी गझलेच्या संवादात्मक गुणवैशिष्ट्यांनी प्रेरित होऊन गझल लेखनाकडे वळत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून गझलसंग्रह प्रसिद्ध होण्यात लक्षणीय वाढ होते आहे. अशा पार्श्वभूमीवर कोल्हापूरस्थित 'गझलसाद' या समूहाने पाचव्या वर्धापन दिन व गझलसम्राट भटांच्या नव्वदाव्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेला "आमची गझलसाद" हा प्रातिनिधिक गझलसंग्रह लक्षवेधी ठरेल यात शंका नाही. संग्रहात इंग्रजी वर्णमालेनुसार डॉ.दयानंद काळे, डॉ.दिलीप पां.कुलकर्णी, प्रा. नरहर रामचंद्र कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, श्रीराम ग. पचिंद्रे, प्रविण पुजारी, अरुण सुनगार व अशोक म. वाडकर या आठ गझलकार व सौ.मनिषा रायजादे-पाटील, सारिका पाटील, डॉ. सुनंदा शेळके व डॉ.सौ. संजीवनी तोफखाने या चार गझलकारा यांच्या प्रत्येकी अकरा गझला गझलकाराच्या परिचयासह समाविष्ट केल्या आहेत. सर्वसाधारणतः प्रातिनिधिक संग्रहात अधिकतर दोन -तीन गझलांचाच समावेश केलेला आढळतो. हे सर्वच उत्तम गझलकार विविध व्यवसायातील व भिन्नलिंगी कमीजास्त वयोगटातील असून त्यांची आर्थिक, सामाजिक, भावनिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे संग्रहाचे पान-न्-पान वैविध्यपूर्ण गझलांनी समृद्ध व वाचनीय असे झाले आहे. साहजिकच गझलकारांच्या अनुभूती, प्रवृत्ती-अभिव्यक्तीची ढोबळमानाने वाचकांस ओळख  होऊ शकते. हे प्रस्तुत संग्रहाचे वेगळेपण मराठी गझलेच्या इतिहासात निश्चितच अधोरेखित होईल असे आहे.


सदर गझलसंग्रहास गझलसम्राट भटसाहेबांच्या प्रत्यक्ष दीर्घ परिपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ होऊन त्यांचेकडूनच ज्यांना "गझलनंदा" असे  नामाभिधान प्राप्त झाले आहे अशा, गेली ४०-४२ वर्षे गझललेखन व मार्गदर्शन करणा-या, नामवंत गझलकारा दस्तुरखुद्द प्रा.सुनंदा पाटील यांची अभ्यासपूर्ण व निरीक्षणात्मक तपशीलवार प्रस्तावना लाभली आहे. बाराही गझलकारांसंबंधी त्यांनी आपली डोळस निरीक्षणे नोंदवली आहेत. 


शिवाय गझलनंदांनी भावलेल्या आवर्जून उद्धृत केलेल्या प्रस्तावनेतील शेरांपैकी प्रत्येक गझलकाराचे हे कांही उल्लेखनीय शेर --


  पणतीस विझवुनी ते जपतात का दिवा

     पोटात स्त्री जिवाला मारायचे किती

                       -- डॉ. दयानंद काळे


  शेर प्रत्यंचेस तीरासारखा

    लावलेला चाप असते ही गझल

               -- डॉ.दिलीप कुलकर्णी


   वेदना आतून जेव्हा गावयाला लागते

   लेखनीमधुनी गझल उतरावयाला लागते

                  .            -- नरहर कुलकर्णी


 जगण्यास माझे माझिया इतकेच आहे सांगणे

    तारा जरी तुटल्या तरी सोडू नको झंकारणे

                    -- प्रसाद माधव कुलकर्णी

  झोळीत जीवनाच्या भिक्षा कशी मिळेना

    ही फाटकीच आहे अन् लोक ते शहाणे

                                -- श्रीराम ग. पचिंद्रे


 बघ तुला जमले कधी तर माणूस हो तू

    लाभते शांती मनाला मोह सारा सोडल्यावर

                        --सौ. मनिषा रायजादे-पाटील


  आधार मी दिलेला ज्या मत्त वादळाला

    ते नाव आस-याची बुडवेल ज्ञात नव्हते

                               -- सारिका पाटील 


  होईल नाव ओठी लक्षात ठेव मित्रा 

    स्वत्वास जाळणारा अमरत्व प्राप्त करतो

                            -- प्रवीण शरद पुजारी


  सामान्यांच्या भावभावना मांडत गेले

    म्हणून माझ्या रसिकांनाही भिडल्या गझला

                          -- डॉ.सुनंदा सुभाष शेळके


  वळणावरती भल्याभल्यांची कशी बोबडी वळते

    जसे बोलतो तसे चालणे इतके सोपे नसते

                            -- अरुण सुनगार (सूर्य)


   वृक्षतोड मानवा कशास सांग ही

     आश्रयास धावले वनात चांदणे

                   --डॉ.सौ.संजीवनी तोफखाने


  जलऐन्यावर झिळमिळणारे ताराझुंबर

    नभधरणीचा संगम घडतो तू दिसल्यावर

        -- अशोक म. वाडकर 


निखील कुलकर्णी यांनी चितारलेले गझलसंग्रहाचे मुखपृष्ठ व मांडणी कलात्मक असलेने तसेच निर्मिती कसदार असल्याने संग्रह अत्यंत देखणा व संग्राह्य झाला आहे. 


विस्तृत प्रस्तावनेच्या शेवटी गझलनंदा म्हणतात-  "सुरेश भटांच्या गझलेमधील सामर्थ्यस्थळे स्वीकारून, पचवून, ग्रहण करून त्यात आपली वेगळी भर टाकणारे गझलकार १९८० ते २०००च्या आसपास समोर आले. त्याच लोकांनी पुढल्यांना मार्गदर्शन केलेले असल्याने सुरेश भट यांचा वारसा सांगणारे हे सर्व गझलकार आहेत, यात शंका नाही. या सर्वांची गझल कमी अधिक प्रमाणात वर्तमानकालीन, सामाजिक, राजकीय वास्तवाचा वेध घेते आणि त्या वास्तवाची अभिव्यक्ती अस्सल मराठमोळ्या स्वरुपात करते. 'आमची गझलसाद' हा प्रातिनिधिक गझलसंग्रह मराठी गझलेच्या वाटेवरचा मैलाचा दगड ठरेल."


लेखक : अशोक म. वाडकर

कोल्हापूर

मोबा. ७०२०० ११४०८

-----------------------------------------------------------------           

    पुस्तकाचे नाव : आमची गझलसाद 

                (प्रातिनिधिक गझलसंग्रह)

    प्रकाशक : गझलसाद, कोल्हापूर

    पृष्ठे : १६४, मूल्य : २०० रुपये

------------------------------------------------------------------


संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

गझल मंथन साहित्य संस्था

___________

Post a Comment

0 Comments