Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गरज नसते Gazalkar dr Shivaji Kale

• गझल प्रभात •(भाग १०० )
गरज नसते
गझलकार डॉ शिवाजी काळे 


🌹गरज नसते🌹



पुराव्यांची गरज नसते, तपासाची गरज नसते
मनाचा खून झाल्यावर निकालाची गरज नसते

कधी अंधार पडला तर स्वतःच्या आत उतरावे
स्वतःला शोधण्यासाठी उजेडाची गरज नसते

बरोबर त्याच जागेवर फुले पडतात सवयीने
फुलांना वा मला तू रोज दिसण्याची गरज नसते

कधी ठोठावले तर मी उघड तू दार शब्दांचे
मला प्रत्येकवेळी या निवाऱ्याची गरज नसते

बटांशी खेळताना तो सहज माहोल ओळखतो
परत फिरण्यास वाऱ्याला नकाराची गरज नसते

जशा येतात जन्माला तशा पळतात वेगाने
जणू या सुप्त इच्छांना सरावाची गरज नसते

धुनी तो काळजामधली निरंतर ठेवतो धुमसत
शिवाला पेटण्यासाठी निखाऱ्याची गरज नसते

डॉ. शिवाजी काळे

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments