🌹"स्त्री जाणिवांच्या संवेदना सक्षमपणे मांडणाऱ्या गझलकारा, निवेदक, मुलाखतकार गझलनंदा: सुनंदा पाटील🌹
![]() |
गझलकारा सुनंदा पाटील |
गझलसम्राट सुरेश भट यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेल्या सुप्रसिद्ध गझलकार सुनंदा पाटील ह्या गेल्या चाळीस वर्षाहून जास्त काळ गझल लिहीत आहेत. त्यांच्या गझलांना मैफिलीमध्ये एकतर "वाह क्या बात है।" अशी उत्स्फूर्त दाद मिळते नाहीतर गझल रसिकांच्या डोळ्याला श्रावण धार नक्कीच लागते. 'गझलनंदा' हे तख्तल्लूस त्यांना भट साहेबांनी दिले तर गझलविश्वाने आदराने व प्रेमाने माई संबोधले. आजच्या काळात गझल रसिकाच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या 'गझलनंदा' व 'सुनंदामाई' या नावाने सुपरिचित असलेल्या गझलकारा अर्थात सुनंदामाई पाटील!
गझलविश्वात पुरुषांची मक्तेदारी होती. या गझलवाटेवर एका स्त्रीने सक्षमपणे पाऊल ठेवावे असा ऐंशीच्या दशकातला तो काळ नव्हता. तरीही फार हिमतीने सुनंदामाई गझलेचा ध्यास घेऊन निरंतर चालत राहिल्या. गझलनंदाचा गझलप्रवास हा आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. माथ्यावर सुख- दुःखाच्या ऊन सावलीच्या झळा सोसत आणि काळजात वेदनांचे काटे टोचलेले असतानाही त्या निरंतर चालत राहिल्या. कित्येक वादळं त्यांच्या पुढ्यात येऊन ठेपलीत, पण त्या कधीही निराश झाल्या नाहीत. त्यांनी एकटीने प्रवास सुरु केला होता, परंतु आपल्या या प्रवासात त्यांनी अनेक सहप्रवासी तयार केलेत. नवोदितांना गझलेचे यथार्थ मार्गदर्शन करून त्यांनी अनेक हात लिहिते केलेत. गझलविश्वास अनेक ख्यातनाम गझलकार देण्यात त्यांचा मौलिक वाटा आहे. "हम निकले थे अकेले और कारवाँ बनता गया।" असे म्हणत माई ही गोष्ट अगदी सहजतेने घेतात. कुठल्याही गोष्टीचे कणभर देखील श्रेय त्या घेत नाहीत . तर जे गझलेचे दान मला भट साहेबांनी दिले, जो वारसा त्यांनी मला दिला तोच मी चालवत आहे असे म्हणत त्या नव्या पिढीला आपल्या जवळील गझलज्ञान मोकळ्या हाताने निरपेक्षपणे देत असतात. वृत्तांवर त्यांची चांगली पकड आहे. त्यांचे प्रभावशाली भाषाप्रभुत्व व व्याकरणशुद्ध, तंत्रशुद्ध लेखन, स्वानुभवातून उत्स्फूर्त आलेले सटीक, आशयघन, उद्बोधक, भावनिक आंदोलनाला वाचा फोडणारे आक्रमक, तर हळव्या जाणिवांना जागृत करणारे संवेदनशील गझललेखन नवोदितांना प्रेरक आहे. नवोदितांना गझललेखनाचे मार्गदर्शन करण्यासाठी सुनंदामाई अनेक कार्यशाळा ऑफलाईन व ऑनलाइन माध्यमातून घेतात. त्यासाठी त्यांनी गझलनिष्ठ प्रतिष्ठान महाराष्ट्र ची स्थापना केली. गझलनिष्ठ प्रतिष्ठानच्या त्या संस्थापक व अध्यक्ष आहेत. नवोदितांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत अनेक ख्यातनाम गझलकार गझलनिष्ठ प्रतिष्ठान मध्ये सहकार्य करतात.
आयुष्याने दिलेले आघात पचवणे सोपे नसते. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना केवळ तीन वर्षांचा नव्या नवलाईचा संसार आणि त्यानंतर दीड वर्षाच्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन त्यांनी केलेली 'एकटीची जीवनवाट ' ही कल्पना करूनच अंगावर काटा येतो. एकट्या बाईला समाजातील मर्कटं सहजासहजी शांतपणे जगू देत नाहीत. कित्येक दूषणं, निंदकांच्या टिका- टिप्पण्यांच्या तिच्या पदराला गाठी बांधलेल्या असतात. ह्याच गाठी नंतर निरगाठी होत निगरगट्ट होत जातात आणि बाई सुद्धा मनाने निगरगट्ट होते. सुनंदामाई सुद्धा अनुभवाने समृद्ध झाल्या. जीवनाकडे व्यापक दृष्टिकोन ठेवून त्या म्हणतात… 'निंदकाचे घर असावे शेजारी' . निंदा नालस्ती मधून माणूस स्वतःच्या चुकांचे आत्मपरीक्षण करत जातो व त्या चुकांची दुरुस्ती करत जातो.
निंदकांची बोलणी कामात आली
तीच ऊर्जा नेमकी पंखात आली
कुंकवाच्या संपण्याने फारसे बिघडत नसावे
रिक्त जागेच्या ठिकाणी घे सुपारी कनवटीला
सुनंदामाई यांनी आपल्या या शेरातून समाजात रिकाम्या कपाळाने जगणाऱ्या अनेक स्त्रियांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. स्वतः च स्वतःची प्रेरणा बनून स्त्रीने कणखरपणे जगले पाहिजे. आजची स्त्री ही अबला नारी नाही तर ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्वाभिमानाने स्वतःचे अस्तित्व निर्माण करून जगणारी सबला नारी आहे. तरीही समाजाने स्त्रियांना आरक्षण दिले आहे संपूर्ण अधिकार आजतागायत दिले नाहीत. पिढ्या बदलल्यात, शतके बदलली तरीही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काही फारसा बदलला नाही. आजही स्त्री पुरुषांच्या निर्मळ नात्याला वेगळे वळण दिले जाते. समाजाचे हे विदारक सत्य मांडणारे सुनंदा माई यांचे 'माझा विचार आहे' या गझलसंग्रहातील काही निवडक शेर इथे नमूद करतेय….
सांभाळले घराला जैसे जमेल तैसे
का शेवटी समजले मी मात्र भार आहे
भावास सोबतीला घेऊन चालले मी
पुसले मला जगणे हा कोण यार आहे?
जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले
तेथे जगावयाचा माझा विचार आहे
मरणे सुद्धा कठीण असताना जगण्याचा विचार मनात घेऊन त्या आयुष्याशी सतत लढत आल्या. संकटांचा सामना कणखरपणे करत असताना एकीकडे त्यांच्या आतली बंडखोर वृत्ती उजागर होते तर दुसरीकडे मनातील हळव्या जाणिवा त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. स्त्री अर्थात सृजनशक्ती या सृजनाच्या नव्या अंकुराचे स्वागत करताना त्या म्हणतात….
आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली
तिच्या पित्याला किमान आता बाई कळली
माझा विचार आहे या संग्रहानंतर 'सावली अंबराची' या दुसऱ्या गझल संग्रहात त्यांच्यातील बंडखोरी अभुवास येते. गझल वाचकांना अंतर्मुख करणारे त्यांचे शेर वैचारिकतेला चालना देतात.
सांग रामाला नको सीतेस टाकू
जानकी येथे पुन्हा जळणार नाही
आत्मविष्कारातून वैश्विकता साधत सुनंदा माईंनी सर्व स्त्री जातीचे वरील शेरातून प्रतिनिधित्व केले आहे. का नेहमी स्त्रियांनीच तडजोड करावी, त्याग, समर्पण द्यावे? का नेहमी स्त्रियांनीच अग्निपरीक्षा द्यावी? रामायणाचा दाखला देत त्या म्हणतात की इतिहास साक्षी आहे की सीता निर्दोष असतानाही तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. प्रत्येक युगात ही अग्निपरीक्षा केवळ स्त्रियांनाच द्यावी लागते पुरुषांना का नाही? गतकाळात जे झाले ते आता यापुढे होणार नाही. स्त्री आता पूर्वीसारखी सोशिक, अबला नारी राहिली नाही तर ती आता पुरुषांची अग्निपरीक्षा घेण्याइतपत सक्षम झाली आहे.
मला भेटली सावली अंबराची
कशी सांज न्हाली पुन्हा पावसाची
अशा हळव्या शब्दात व्यक्त होणाऱ्या सुनंदा माई नव्या पिढीला आपल्या अनुभवाने, ज्ञानाने समृद्ध करतात तर त्यांच्या नाविन्यपूर्ण खायलांना अशायघनता देण्यासाठी जाणत्या प्रौढत्वाचा तराणा देतात….
नव्या पिढीला खयाल सुचतो नाविन्याचा
अर्थासाठी वृद्ध तराणा सादर करते
याच दरम्यान त्यांचे समकालीन मित्र ,सुरेश भटांचेच शिष्य जेष्ट गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी इचलकरंजी यांच्या सोबत 'गझल : प्रेमऋतूची' हा मुसलसल गझलांचा, प्रेम या विषयावर लिहिलेला १०० गझलांचा संग्रह एक अप्रतिम आणि संग्राह्य गझल संग्रह आहे. प्रेम आणि विरह या दोन्ही भावना अप्रतिमपणे त्या गझलेत मांडतात.
सुनंदामाईंच्या अनेक गझलेची गाणी झालीत. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनीही त्यांच्या गीतांना स्वरसाज चढवला आहे. गझल हा गेय प्रकार. गझल ही वृत्तात लिहिली जाते. प्रत्येक वृत्ताला आपली स्वतःची अंगभूत लय असते. ती लय साधण्यासाठी किंवा गायकाला श्वास घेण्यासाठी प्रत्येक वृत्तात यतिस्थान निश्चित केलेले असते. गझल लिहिणाऱ्याने हे यतिस्थान पाळून गझल लिहिली पाहिजे असे सुनंदा माई म्हणतात. आजकाल बऱ्याच गझलांमध्ये यतिभंग आढळून येतो. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या शेराच्या आशयघनतेनुसार ठीक आहे परंतु नेहमी यतिभंग करून लिहिणे बरोबर नाही. त्या म्हणतात खाऱ्या पाण्यात चहा केला तर तो फुटतोच त्याचप्रमाणे यतिभंग करून लिहिताना वृत्ताची अंगभूत लय बिघडते.
तरही गझल हा प्रकार त्यांना आवडत नाही. त्या म्हणतात इतरांच्या जमिनीवर आपण सात माळ्यांची इमारत बांधूनही काय उपयोग? शेवटी जमीन तर दुसऱ्याचीच आहे. दुसऱ्याची जमीन कसदार करण्यात आपले श्रम व वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपली स्वतंत्र जमीन घेऊन आपली बुलंद पाच शेरांची इमारत बांधावी.
गझलेतील शेर संख्येबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणतात, गझलेतील शेरांची संख्या नेहमी विषम असावी कारण कधी त्या गझलेचे गाणे झाले तर ध्रुवपदासाठी एक शेर वापरला जातो व उरलेले शेर हे अंतरा म्हणून उरतात त्यामुळे गाण्यात योग्य समतोल राखण्यासाठी शेरांची संख्या विषम असावी. कारण काही शेर हे छोट्या बहरातील असतात अशावेळी कडव्यांसाठी दोन शेर देखील वापरले जाऊ शकतात त्यासाठी गझलेच्या शेरांची संख्या ही विषम असावी.
आजच्या स्त्रिया चाकोरीबद्ध गझललेखन करतात का? यावर त्या म्हणतात की,
"मग स्त्रियांनी व्यक्त कुठे व्हावे? लेखणी ही स्त्रियांची जिवलग मैत्रीण आहे. लेखणीच्या माध्यमातून स्त्रिया व्यक्त होतात. लेखनाची विधा कुठलीही असो स्त्रियांनी आपली भावनिक आंदोलनांना वाचा फोडत, समाजासाठी, भावी पिढ्यांसाठी उद्बोधक, प्रेरक लेखन करावे तसेच सर्वसमावेशक विषयावर लिहावे. स्त्रियांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत याचा त्यांनी पुरेपूर वापर आपल्या कल्पना रुंदावण्यासाठी करावा."
नवोदितांना गझल लेखनाचे मार्गदर्शन करताना माई म्हणतात,
"नवोदितांनी गझल लेखन करताना वृत्त, लय, लगावली समजून घेत तंत्रशुद्ध गझल लिहिली पाहिजे. आधी गझलेच्या शरीरशास्त्राचा योग्य अभ्यास करून मग आत्मनुभूती घेतली पाहिजे. तंत्राचा योग्य अभ्यास झाल्यावर गझलेच्या अशायघनतेकडे लक्ष दिले पाहिजे. गझलेच्या नियमानुसार तसेच व्याकरणशुद्ध लेखन करावे. यतिभंग भाषेची तोडफोड, उगाच नको त्या ठिकाणी सवलती घेऊन लिहू नये. अशांनी कविता लिहावी. गझल मात्र तंत्र शुद्धच असायला हवी."
गझलेचे भरभरून दान भावी पिढीला समर्पित करणाऱ्या गझलनंदाचा गझलानंदी जीवनप्रवास आता जाणून घेऊया!
प्रा. सुनंदा गिरीश पाटील! माहेरच्या सुनंदा दीक्षित त्यांना सर्वजण प्रेमाने नंदू म्हणायचे. आज बँकेची निवृत्त आधिकारी (उपप्रबंधक) आहे असलेल्या सुनंदामाई यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९५७ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या गावात झाला. त्यांचे वडील लक्ष्मीकांत आनंदराव दीक्षित व आई शकुंतला लक्ष्मीकांत दीक्षित यांनी संयुक्त कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आपल्या मुलांना शिकवले. घरची सामान्य परिस्थिती असल्याने त्यांना विज्ञान शाखेत जाता आले नाही परंतु जे आपल्या वाट्याला आले त्यात जीवापाड मेहनत घेऊन त्या जिद्दीने शिकत राहिल्या. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण चामोर्शी येथे झाले. त्यानंतरचे एम . ए . पर्यंत नागपूरला, बी. एड. चंद्रपूरला तर एम. एड. अकोला येथे झाले. त्यांनी सर्व शिक्षण सुवर्णपदक व गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवून पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण लेडी अमृताबाई डागा महाविद्यालय नागपूर येथे घेतले. त्यांना गाणे ऐकण्याची व गुणगुण्याची फार आवड होती. भट साहेबांचे, मलमली तारूण्य माझे, केव्हा तरी पहाटे ही त्यांची आवडती गाणी होती. त्यांची लय त्यांनी लक्षात घेतली. वृत्ताचे ज्ञान असल्याने त्या वृत्तबद्ध व लयबद्ध कविता लिहू लागल्या. त्यांचा काव्यसंग्रह 'शब्द सुरांच्या रेशिमगाठी' प्रकाशित झाला. त्या सुरेश भट यांना तो भेट देण्यास मैत्रिणीसोबत धंतोली येथील भटांच्या घरी गेल्या. माई गझल १९७८/७९ पासूनच लिहित होत्या. भट साहेबांची भेट झाल्यावर सुनंदामाई यांना "तू गझल उत्तम लिहू शकतेस असे सांगितले" तेव्हापासून त्या भट साहेबांकडे नियमितपणे गझल लेखनाचे धडे घेण्यास जाऊ लागल्या. पुढे कालांतराने सुरेश भट यांच्यासोबत अनेक मैफिलीमध्ये त्यांनी गझल सादरीकरण केले. तसेच अनेक गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले आहे.
सुनंदामाई यांची आजच्या काळात विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. 'रंगरास', 'शब्द सुरांच्या रेशिमगाठी', 'तू आणि मी', 'भक्ती काव्य', 'भक्ती सुधा', 'ठेवा (स्त्री गीते)' 'मी शिळा होणार नाही', 'कवितेचे कवडसे' हे काव्यसंग्रह तर 'या वळणावर' हा कथासंग्रह 'स्थलांतर' ही कादंबरी तसेच 'माझा विचार आहे', गझल 'प्रेमऋतूची', 'सावली अंबराची' हे तीन गझलसंग्रह तर मराठी गझल : स्वअध्ययनाची अंकलिपी
गझल संग्रहासोबत प्रकाशित आहे.
जुलै १९८२ मध्ये गिरीश दत्तात्रय पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तीन वर्षांच्या संसारात अचानक गिरीश यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. दीड वर्षाच्या मुलाला घेऊन त्या माहेरी आल्या. गिरीशजी यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी त्यांना नागपूर येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचे नियुक्ती पत्र मिळाले होते परंतु लहान बाळाला सांभाळायला कोणी नसल्याने त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून गडचिरोली येथे भारतीय स्टेट बँकेत क्लर्क ची नोकरी केली. त्यावेळी बँकेत ३६ जणांच्या स्टाफमध्ये त्या एकट्याच महिला कर्मचारी होत्या. त्यांना अनेकदा टिका टिप्पण्यांचा सामना करावा लागला. सुनंदामाई जिद्दी होत्या त्या बँकेची उच्चपदाची परीक्षा पास झाल्या. बँकेत त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे त्यांना बढती मिळत गेली. तसेच अनेक महत्वपूर्ण प्रकल्पात त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना 'बेस्ट वर्कर' हा महत्वाचा पुरस्कार मिळाला. त्यांना राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर च्या हस्ते शासनाचा 'गुणवंत कामगार' व 'महाराष्ट्र कामगार भूषण' पुरस्कार मुंबई येथे मिळाला. चेन्नई येथे क्वालिटी सर्कल पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महाराष्ट्र शासन हे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. किरण बेदी सोबत दिल्ली येथील शिखर परिषदेत त्या उपस्थित होत्या.
बँकेच्या कामा सोबतच त्या बँकेच्या नियोजित वेळेच्या नंतर नवीन निर्मित गडचिरोली जिल्ह्यात महाविद्यालयात भूगोल विषयाचे/शिक्षण शास्राचे अध्यापन कार्य करत असत. त्याच काळात त्या बँकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे तसेच गडचिरोली परिसरातील विविध कार्यक्रमांचे निवेदन उत्कृष्ट रित्या करत होत्या. उत्कृष्ट निवेदक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अखिल भारतीय नृत्य नाट्य महोत्सवात तसेच विविध कार्यक्रमात त्यांनी आजतागायत १००० हून अधिक कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन केले. त्या मुलाखतकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक नामवंतांच्या महत्वपूर्ण मुलाखती घेतल्या आहेत.
गडचिरोली येथे नोकरी करत असतानाच डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या सोबत आदिवासी समाजातील स्त्रियांना प्रशिक्षित करण्यासाठी त्या कार्य करत असत. त्यांना प्रबोधन करण्यासाठी विविध गाणी, नाट्य संहितेचे त्या लेखन करत. तसेच महिलांना बचतीसाठी बँकेच्या विविध योजनांची माहिती देत असत. महाराष्ट्र शासनातर्फे प्रौढ साक्षरता विभागात प्रेरक वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची निवड तत्कालीन शिक्षण मंत्री मा. वसंतराव पुरके यांच्यातर्फे करण्यात आली होती. प्रौढ साक्षरता विभागात काम करताना त्या प्रौढांसाठी विविध कथा, कविता, गाणी सोप्या भाषेतून लिहीत असत. शालेय शिक्षण समिती मार्फत त्यांची बालशिक्षण अभ्यासक्रम येथे निवड झाली होती. तसेच त्या शिक्षण मंत्रालय मुंबई यांच्या दोन वर्षे सदस्य होत्या.
त्यांना साहित्य क्षेत्रात, बँकिंग सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्रात विविध सन्मानाचे पुरस्कार मिळाले. त्यात नॅशनल सजेशन समीट नवी दिल्ली विशेष सन्मान पुरस्कार डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते मिळाला. गझल सन्मान दिग्दर्शक राजदत्तजी यांच्या हस्ते वाई येथे मिळाला. राष्ट्रीय झिरो माईल स्टोन समाजभूषण पुरस्कार नागपूर २०१८ मध्ये मिळाला, गझलदीप प्रतिष्ठानचा उ. रा. गिरी साहित्य सन्मान पंडित भीमराव पांचाळे यांच्या हस्ते मिळाला. कलाविष्कार संस्था भगोरा यांचा 'गझलरत्न पुरस्कार' असे ४५० हून अधिक ख्यातनाम पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.
सुनंदामाई पाटील यांना त्यांच्या समृद्ध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीस अनेक हार्दिक शुभेच्छा!
निशा डांगे-नायगांवकर
8329065797
0 Comments