Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दळदार अक्षरातील, नाजुक नजाकतीची गजल- कुंकवाचे कुंपण Gazalkara Pratibha Jagdale

पुस्तक परिचय

दळदार अक्षरातील, नाजुक नजाकतीची गजल- कुंकवाचे कुंपण
गझलकारा प्रतिभा जगदाळे 


दळदार अक्षरातील, नाजुक नजाकतीची गजल- कुंकवाचे कुंपण




गजलकार खलील मोमीन यांचा “कुंकवाचे कुंपण” हा सुंदर असा गजलसंग्रह वाचला. तो पाहता क्षणीच त्याच्या सुंदरतेची कल्पना आली होती. या संग्रहाचे बाह्यरंग तर सुंदर आहेच, परंतु अंतरंग त्याहून सरस असे आहे. या संग्रहाची एक नाही तर अनेक वैशिष्ट्ये आहेत.

पहिले म्हणजे याचे मुखपृष्ठ मोमीन सरांनी स्वतः केलेले आहे. पुस्तक उघडल्यानंतर आपल्या दृष्टीस पडते ते सुंदर हस्ताक्षर. यातील सर्व गजल सरांनी स्वत:च्या सुंदर, दळदार अक्षरात लिहिलेल्या आहेत. या पुस्तकात, टाईप केलेले अक्षर कुठेही सापडणार नाही. मग ते मुखपृष्ठ असो वा मलपृष्ठ. पुस्तक उघडल्यानंतर आधी आपण त्या अक्षरात हरवून जातो. सरांना सुंदर अक्षराची दैवी देणगी लाभलेली आहे.

गजल वाचण्याचा मोह असतोच. परंतु त्या अक्षरांना ओलांडून आपण पुढे जाऊच शकत नाही. आधी डोळे भरून ती अक्षरे न्याहाळतो आणि नंतर गझल कडे वळतो.

गजलेचे तंत्र सांभाळून लिहिलेल्या, निरनिराळ्या वृत्तातील, अतिशय कसदार, दर्जेदार गजला या संग्रहात वाचायला मिळतात. गजलेतील उत्कटता, संवेदनशीलता, प्रेम, प्रेमभंग या सर्व भावभावनांचे हुंकार या संग्रहातील शेरांमध्ये निदर्शनास येतात. 


पाखरांनी घेतले का त्या नभाला वाटुनी?

धर्म आम्ही वाटले हे पाडुनी त्याला चरे


या पहिल्याच गजलेतून सर्वधर्म समभाव प्रकट होतो. यापुढील गझल सुद्धा अशाच सर्वसमावेशक आहेत. या संग्रहातील गजलांमध्ये, गजलेसाठी जे प्रेम, विरह, व्याकुळता आवश्यक असते ते सर्व आलेले आहे. त्याबरोबरच जे काही वावगे वाटते त्याच्यावर सरांनी ताशेरे ओढलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी कौतुकही केलेले आहे.


सही चालते ना कुणाची कशीही

खरे मोल आहे इथे त्या ठशाला 


गजलेचे वैशिष्ट्य म्हणजे एका शेरात, म्हणजे दोन ओळीत खूप मोठा अर्थ दडलेला असतो. या दोन ओळींची एक कविता असते. ती सार्वभौम नि स्वतंत्र असते. संपूर्ण कवितेत कवीला जे बोलायचे असते, ते गझलकार या दोन ओळीत सांगत असतो. त्याची अभिव्यक्ती या दोन ओळीतून प्रकट होत असते. कसदार शेरांच्या सौंदर्याने नटलेली ही गजल, तिची नजाकत काही वेगळीच असते.

या पुस्तकात छोट्या-मोठ्या बहरातील एकूण 108 गजला आहेत. सरांची एक खासियत आहे की त्यांचे रदीफ फार वेगळे आणि अफलातून आहेत. सर म्हणतात की, मी कुणाची कॉपी करत नाही, त्यांचे जे रदीफ आहेत त्यामध्ये वैविध्य आहे. जो शब्द आपल्याला आठवणार नाही किंवा सहसा सुचणार नाही, जो शब्द आपण क्वचित वापरतो, तो सरांच्या गजलेचा रदीफ असतो. या गजलांमध्ये अक्षराची पुनरावृत्ती दिसून येते. त्यामुळे गजलेला लय प्राप्त होते. त्या त्या वेळी असे शब्द सूचणे हे पुन्हा आश्चर्य. यासाठी प्रचंड साधना आवश्यक असते आणि अर्थातच यातील गझल वाचताना ती प्रत्येक शेरातून अनुभवास येते.

सर सांगतात मला आता, कुठले वृत्त घ्यावे, हा प्रश्न पडत नाही किंवा याचा विचार करावा लागत नाही. त्यामुळे वृत्ताची चिंता नसते. ते सहज जमते. कारण तेवढा सराव झालेला आहे. आता मी फक्त आशयाचा विचार करतो. त्यात मात्र मी तडजोड करत नाही त्यामुळे परिपूर्णतेचे समाधान मिळते.

गजलेचा मतला वाचूनच सरांच्या या साधनेची प्रचीती येते.


अभ्यास जीवनाचा सांगा कसा करू मी

इतिहास नासलेला त्याला कसे स्मरू मी

जातोच तोल थोडा भूगोल चाळताना

मी नागरीक छंदी शास्त्रास का वरू मी


अशा आशयघन रचना या संग्रहात वाचायला मिळतात.


लाभली नाहीच त्याला स्वस्थता

व्यग्रता ग्रासून आहे सारखी


शीर्षकाची गजल सुद्धा तितकीच सुंदर आहे. शीर्षकातच किती मोठा अर्थ दडला आहे.

या संग्रहातील गजलांच्या विषयांमध्ये विविधता आहे. यात राजकारणावर, नेत्यांवर, पुढार्‍यांवर परखडपणे भाष्य केलेले आहे. त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. त्याबरोबरच देशप्रेमाच्या, बंधूभावाच्या अनेक गजला यात वाचायला मिळतात.


जीवनाच्या पाळल्या ज्याने अटी

लागल्या त्याच्याच मागे कटकटी


किंवा हा शेर


म्हणू नकोस ते कसे कधी मला जमायचे

फुला समान वाग तू जमेल घमघमायचे


त्याबरोबरच हा एक मला आवडलेला शेर,


मान्य वेदनाच ही उन्हासमान पोळते

ताप सोस सावली बनून थंडगार तू


निरनिराळे रदीफ वापरून अतिशय दर्जेदार शेर लिहिणे ही सरांची खासियत. अगदी अचंबा वाटावा असे रदीफ या संग्रहात आहेत. उदा. “जंगी” हा रदीफ वापरून एक सुंदर गजल केलेली आहे. 

जे नव्याने गजल लिहीत आहेत त्यांच्यासाठी हा गजलसंग्रह खरोखरच खूप उपयुक्त आहे. रदीफ, काफिया, अलामत त्याबरोबरच आशय वगैरे अनेक गोष्टी या संग्रहात अभ्यासता येतील. आशयगर्भ, बहारदार अशा गजल आणि त्याही सुंदर, देखण्या, रेखीव हस्ताक्षरात हा दुग्धशर्करा योग येथे जुळून आलेला आहे.

संस्कृती प्रकाशनने हा सुंदर संग्रह प्रकाशित केला आहे. प्रकाशक सौ. सुनीताराजे पवार यांनी हा संग्रह अगदी सरांच्या हस्ताक्षरात, अगदी जसा आहे तसा प्रकाशित केला आहे. हे प्रकाशक म्हणून त्यांचे कौतुक आहे. प्रकाशकाचा कुठेही हस्तक्षेप नाही.

इथे अनेक शेर देण्याचा मला मोह होतो आहे. परंतु नाईलाजाने हात आखडता घ्यावा लागतो आहे. जे जे आपणाशी ठावे, ते इतरांशी सांगावे, वाचकांना अनेक शेर आस्वादासाठी द्यायचे आहेत. परंतु ज्यांना अप्रतिम अशा बहारदार गजलांचा रसिकतेने आस्वाद घ्यायचा आहे, त्यांनी हा संग्रह वाचावा असा मी आग्रह धरते.

असा हा सुंदर गजलांचा खजिना लुटून आपण त्या सर्वांचा आस्वाद घ्यावा. त्या नक्कीच आपल्या पसंतीस उतरतील, याची खात्री देते आणि शेवटी सरांचे दोन शेर देऊन थांबते.


चार खांदे देत ते नेतील तेथे शेवटी

त्या तिथे नाहीच ना काहीच नेण्यासारखे


आणि हा दुसरा शेर

 


जायचे जगातुनी शिकून कायदा अटी

साक्ष द्यायला तिथे असे काळ शेवटी




सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे

सांगली

_____________________________

गजलसंग्रह- कुंकवाचे कुंपण 

गजलकार- खलील मोमीन

प्रकाशक- संस्कृती प्रकाशन, पुणे 

मुखपृष्ठ- खलील मोमीन

मूल्य- २००

_______________________________

संयोजक: भरत माळी

मो. 9420168806

गझल मंथन साहित्य संस्था

_____________________________ 

Post a Comment

0 Comments