. शहरयार :- उर्दू गजलची दोन भिन्न रूपे
.
![]() |
सदानंद डबीर |
1.शहरयारची आणि माझी ना ओळख झाली,ना प्रत्यक्ष भेट झाली.तरी त्यांच्या एक शेराची अत्यंत हृद्य आठवण आहे माझ्यापाशी,तो शेर असा,
शिकवा कोई दरिया की रवानी से नही है
रिश्ता ही मेरी प्यास का पानी से नही है
ह्या एका शेरामुळे मला शहरयारची शैली,त्यांचे मनोगत,आयुष्याचा विचार ते कसा करत असावेत
ह्या गोष्टी कळल्या.पण त्याबद्दल मी लेखाच्या शेवटी सांगेन.
2. सीने में जलन आँखों में तुफाँ सा क्यूँ है
इस शहर में हर शख्स परेशाँ सा क्यूँ है
मराठी मातृभाषा असलेला,पण उर्दू गजल ऐकण्याचा शौक बाळगणारा एक मोठा वर्ग आहे.त्यांना वरील शेर व गजल,जी सुरेश वाडकरांनी गायलीय,ती माहिती नाही असे होणारच नाही.हांऽऽ
ब-याच मंडळींना या गजलचा शायर शहरयार आहे.हे कदाचित ठाऊक नसेल.शहरयारच्या गजला,गमन, भूमिका,उमरावजान अशा तीन चित्रपटात होत्या.उमरावजान ने तर लोकप्रियतेचा उच्चांकच गाठला.
ह्या गजला ऐकूनच मी शहरयारांचे देवनागरीत आलेले संग्रह, "शाम होनेवाली है", "ख्वाब का दर बंद है" हे घेतले.ख्वाब का दर बंद है,ह्या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
3.शहरयारांचे नाव,अखलख मोहम्मद खान.1936 साली बरैली(उ.प्र.)जिल्ह्यातील एका गावी जन्म. अलीगढ विद्यापीठात विद्यार्थी, मग लेक्चरर,प्रोफेसर व हेड ऑफ द डिपा.अशी कारकीर्द. आपल्या गजलांनी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त शायर. 2008 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातला सर्वोच्च पुरस्कार त्यांना 19सप्टेंबर 2011ला समारंभ पूर्वक देण्यात आला. ख्वाब का दर बंद है याच संग्रहाला.
13फेब्रुवारी 2012ला निधन झाले.साधारण 75वर्षे आयुष्य जगले.
सीने मे जलन....हा शेर वर दिलाच आहे ती गजल गमन चित्रपटातली आहे.
उमरावजान चित्रपटातल्या गजला बहुपरिचित आहेत.तरी दोन शेर देतो.
ये क्या जगह है दोस्तो,ये कौनसा दयार है
हदे निगाह तक जहाँ,गुबार ही गुबार है
"ही कुठली जागा आहे मित्रा कुठले क्षेत्र आहे? नजर पोचतेय तिथवर सगळीकडे धुरळाच धुरळा आहे."
दिल चीज है क्या आप मेरी जान लीजिए
बस एक बार मेरा कहाँ मान लीजिए
"हृदयाचं काय एवढं? तू माझे प्राण घेतले तरी हरकत नाही बस्स फक्त एकदा मी काय म्हणतेय ते मान्य कर".
असे सोपे आणि नाट्यमय शेर शहरयारने लिहिले आहेत.ह्या रचना लोकप्रिय होण्यात खय्यामचे संगीत,आशा भोसलेंचे गायन,रेखाची अदा हे घटक असले तरी मूळ गजलाही सशक्त आहेतच.
शहरयारांचा सिंहाचा वाटा आहे.
4.शहरयार ह्यांच्या गजला ऐकूनच मी त्यांचे,संग्रह विकत घेतले.ह्या संग्रहात मला गंभीर,ॲकेडेमिक स्वभाव वृत्तीच्या शहरयारांची ओळख झाली.शहरयारांची गजल अजिबात सोपी नाही,चटपटीत किंवा दादलेवाही नाही.हे शहरयार भिन्न आहेत.हे दोन कवी वेगळे तर नाही ना अशी शंका यावी इतके.
गजल ही बहुरूपिणी आहे,हे लक्षात घ्यायला हवे.केवळ चटपटीत पॅरॅडाॅक्स साधला व दाद आली म्हणजे तो चांगला शेर असतोच असे नाही.
हे बहुरूपिणीपण कवितेचेही असते.गदिमांची गीतात्मक कविता,आरती प्रभूंच्या अनवट वाटा, ग्रेसची बहुसंख्य वाचकांना दुर्बोध वाटणारी पण गारूड करणारी कविता...अनेक रूपे.
तशीच गजलची अनेक रूपे आहेत,हे लक्षातच न घेतल्याने कदाचित मराठी गजल एकसुरी होत गेली का?असो.
5.शहरयारांचे काही शेर बघू.
रुह का बोझ तो उठता नही दीवाने से
जिस्म का बोझ,मगर देखिये ढोये कैसे
शब्दशः 'आत्म्याचं वजन तर पेलवत नाहीय पण वेडा शरीराचा बोजा कसा वाहतोय बघा!'
आत्मा निर्गुण निराकार असल्याने त्याचे काहीच वजन नसते/नसावे.पण आत्म्याची संकल्पना सुद्धा आपल्याला पेलवत नाही मात्र देहाचे लाड पुरवणे,देहाचीच चिंता करणे, थोडक्यात देहाचा बोजा आपण आनंदाने हिरिरीने उचलत असतो.
6.दरिया के पास देखो,ये कौन खडा हुआ है
ये कौन तिश्-ना लब हे,पानी से डर रहा है
दरिया म्हणजे नदी,तिश्-ना लब म्हणजे तहानेला.हे कळलं की अर्थ सोपा आहे.नदी जवळ उभा राहून कोणी तहानेला आहे.कारण तो पाण्यालाच घाबरतोय.हा वाच्चार्थ झाला.पण लक्षणार्थ अनेक प्रकारे होऊ शकतो.आपल्याला मुक्त जगावे वाटते,पण तसे करण्याची हिंमत होत नाही.असे म्हटले तर...शेरातला "ये कौन" म्हणजे आपण सगळेच होतो.
आदमी की तरह मिले,कुछ अच्छे सच्चे काम करे
ये इल्म अगर हो इन्सां को,कब कैसे मरनेवाला है
अर्थात माणूस माणसाला माणसारखा भेटेल,वागेल जर...त्याला आपण कधी आणि कसे मरणार आहोत ही विद्या (इल्म) अवगत झाली तर!
आपण मी आणि माझे ह्यातच अगदी स्वार्थाने जगतो.
रोज कोणी ना कोणी मरताना पाहूनही आपण अमर असल्यासारखे वागतो.
या शेरात तात्विक विचार कमालीच्या साध्या शब्दात मांडला आहे.
जुस्तजू तेरे अलावा भी किसी की है हमें
जैसे दुनिया में कहीं कोई तेरा सानी है
जूस्तजू म्हणजे शोध.
" तुझ्या शिवाय आम्ही अजून कोणाला तरी शोधतोय,जणू ह्या दुनियेत तुझ्या बरोबरीचा कोणी आहे!" हा शेर तसा परमेश्वराला उद्देशून आहे.पण उर्दूची ही खासियत आहे की काही खयाल प्रेयसीलाही लागू पडतात आणि परमेश्वरालाही!.
7.आता एका अगदी वेगळ्या, खरे तर मला तरी दुर्बोध, अशा गजलचा मतला ऐकवतो.
इस जगह ठहरूँ या वहाँ से सुनूँ
मैं तेरे जिस्म को कहाँ से सुनूँ
जिस्म म्हणजे शरीर.शब्दशः अर्थ असा "या जागी थांबू की,तिथून ऐकू?मी तुझ्या देहाला कुठून ऐकू?_ आणि मला तेवढाच कळला आहे.भावार्थ जाणवतोय पण सांगता येत नाही.पण तुझ्या शरीराला ऐकायची कल्पना इतकी अनवट आणि अस्पर्शित अनोखी आहे की मी तर अवाक झालो.
ही कल्पना नुसती अमूर्त नाही,तर अति-तरल आहे.आवाज/शब्द/संगीत ऐकणे आपल्या आवाक्यात येते,पण जिस्म/देह कसा ऐकणार?
वरवर जिस्म शब्दाने हा शेर प्रेयसीला उद्देशून असावा असे वाटते.पण कदाचित हा शब्द भासात्मक विश्वाला उद्देशून आहे का? त्या निर्गुण निराकाराचे अस्तित्व विश्वात भरून उरले आहे. म्हणजे हे विश्व त्याचा देहच आहे.आणि विश्वाची निर्मिती ॐकाराच्या नादातून झालीय! म्हणून त्या निराकाराच्या देहाला(!) कुठून ऐकू हा प्रश्न तर नाही ना?
काय मंडळी माझी मल्लीनाथी ऐकून डोकं गरगरायला लागलं ना? म्हणून म्हटलं की उमरावजानच्या गजला लिहिणारा,शहरयार पुस्तकात अगदी भिन्न स्वरूपात भेटतो.
गजल सहज कळली पाहिजे,संप्रेषित झाली पाहिजे
प्रासादिक हवी...ह्या सगळ्या गोष्टी शहरयार उडवून लावतो आणि शेर लिहितो.शेर आहेच.आणि शहरयारचा तो "अपना शेर" आहे.तो समजण्या साठी
वाचकही प्रगल्भ हवा. मला शेर कदाचित कळला नसेल,पण वाचता क्षणीच त्याने माझ्या मनबुद्धीचा ताबा घेतला.मी इतकी वर्षे झाली तरी हा शेर विसरू शकलो नाही.
बहुरूपिणी गजलचे हेही एक रूप!
8.शाम होने वाली है...ह्या संग्रहातले दोन शेर.
तू मेरे हमराह था दरवाजे तक शाम के
इसके आगे क्या हुआ पूछा जाए रात से
ह्यातली सर्वात विलोभनीय फ्रेज आहे ती म्हणजे "शाम का दरवाजा". संध्येच्या दारापर्यंत तू माझ्या सोबत होतास.पुढे मी एकटा झाल्यावर काय झाले
हे रात्रीला विचारायला हवे!
शाम का दरवाजा...आयुष्याची सांज.कल्पना करा एखाद्या व्यक्तीला त्याचा आयुष्यभराचा साथी (पती/पत्नी) सोडून गेली आहे.त्यानंतर काय झाले हे ती
दुःखाची रात्रच जाणते.कळण्या/सांगण्या पलीकडच्या बधीर अवस्थेचे सूचन आहे.
पूछा जाए रात से...ही कथन शैली गजलची आहे.नंतर काय झाले कोण जाणे...असे म्हटले तर ती कवितेची शैली होईल.
ह्या गजलचा शेवटचा शेर असा आहे.
हाँ मुझको भी देख जीने की लत पड गयी
हाँ,तूने भी कर लिया समझौता हालात से
तुझ्या शिवाय जगूच शकणार नाही...वगैरे म्हणणं
किती तकलादू असतं. "होय,मलाही बघ जगण्याचं व्यसन (लत) जडलं.आणि तूही जगण्याशी समझोता केलास.इथे दोन्ही मिस-यांची सुरुवात "हाँ" ने होते.त्यातून एक ठामपणा दिसतो.मॅटर ऑफ फॅक्ट
म्हणतात तशी ही कथनशैली आहे.
9.शहरयार ह्यांच्या ह्या वेगळ्या आशय/विषय/शैली
ह्यांची झलक आपण पाहिली.त्यांना 1987 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. व 2008
सालचा ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार, 19सप्टेंबर 2011 रोजी समारंभ पूर्वक देण्यात आला.त्यानंतर काही महिन्यातच 13फेब्रुवारी 2012 रोजी त्यांचे
निधन झाले.
मी लेखाच्या सुरुवातीला जो शेर दिलाय,
शिकवा कोई दरिया की रवानी से नही है
त्यासंबंधी माझी हृद्य आठवण सांगून समारोप करतो.
10. मी 2008/9 साली कुसुमाकर मासिकात (संपादक शाम पेंढारी) गजल गुंजन हे सदर लिहित होतो.ते संक्षिप्त स्वरूपात लेख होते.त्यावर अधिक अभ्यास करून उर्दू व मराठी गजलचा तौलनिक सौंदर्यवेध घेता येईल असे वाटले.ग्रंथालीच्या सुदेशजीं समोर मी हा प्रस्ताव मांडला त्यांनी पुस्तक काढायचं मान्य केलं.मग मी उर्दू गजलकारांचा अभ्यास सुरू केला.
प्रत्येक शायरचे शेर निवडले.पुन्हा पुन्हा चाळणी लावून निवडक शेरच पुस्तकासाठी निवडले.कारण किती शेर देणार,शेवटी पृष्ठ संख्या सांभाळायची होती.
शहरयारचे दोन तीनच संग्रह उपलब्ध होते.पण त्यातूनही अनेक शेर मिळाले.ते पुन्हा पुन्हा वाचून फक्त 12/15 शेर निवडले जे शहरयारची ओळख(पहचान) करून देणारे होते.त्यात हा शेर आवर्जून घेतला कारण मला तो खूप वेगळा आणि अपिलींग वाटला.
शिकवा कोई दरिया की रवानी से नही है
रिश्ताही मेरी प्यास का पानी से नही है!
हा तो शेर.
ह्या शेराचा शब्दशः अर्थ असा, "नदीच्या प्रवाहाबद्दल
माझी काहीच तक्रार नाहीय. (कारण) माझ्या तहानेचे/तृष्णेचे काही नातेच (ह्या) पाण्याशी नाहीय".
शहरयार म्हणताहेत, माझी प्यास अलौकिक आहे.ह्या
पाण्याने शमणारी नाही.
नदी लौकिक आहे,म्हणजे काय तर,पैसा,कीर्ती....
सन्मान, पुरस्कार,लौकिक यश,हे सगळं. ज्याला
आपले तत्वज्ञान अशाश्वत माया म्हणते ते सर्व.
तर अलौकिक तृष्णा म्हणजे चिरंतनाचा वेध, स्वतःचा शोध,अंतिम सत्याला गवसणी घालायचा अथक प्रयत्न.
इथे कवी त्या मायारूपी नदीला,मृगजळ किंवा खोटी भ्रामक, अस्तित्वहीन म्हणत नाही.ती असू दे
आणि आपली रवानी,म्हणजे प्रवाह बदलत राहू दे.
माझी काही तक्रारच नाहीय असे म्हणतोय.कारण त्याची तहान ह्या पाण्याची नाहीच.तर तक्रार कसली?
हा शेर मला फार भावला.त्याच्यावर गारूड गजलचे ह्या पुस्तकात मी लिहिले.शेर कायम स्मरणात राहिला.
11.आधी सांगितल्याप्रमाणे 19 सप्टें.2011 रोजी शहरयार ह्यांना ज्ञानपीठ पुरस्कार समारंभ पूर्वक देण्यात आला. त्या कार्यक्रमाचा वृत्तांत यथावकाश
दूरदर्शनने दाखवला.योगायोगाने माझ्या पाहण्यात आला.मी टीव्ही लावला तेव्हा पुरस्कार प्रदान झाला होता.प्रमुख अतिथी अमिताभ बच्चन ह्यांचे भाषण
संपत आले होते. ते झाल्यावर,शहरयारना बोलण्याची विनंती केली गेली.त्यांना लंग कॅन्सर होता.कमालीचे अशक्त झाले होते,केमोथेरपीने केस उडाले होते.पण
आवाज व्यवस्थित होता.मी माझ्या आवडत्या शायराला ऐकण्यासाठी सरसावून बसलो.
तीन चार मिनिटंच बोलले,तसं औपचारिकच.नंतर एकदम म्हणाले
"आखरी में,मैं सिर्फ एक शेर कहना चाहता हूँ, वो शेर जो मेरी पूरी बात,मेरी जिंदगी... आपके सामने रख देगा."
मी सावध झालो.मरणाच्या दारात उभा असलेला तो प्रतिभावान शायर फक्त एका शेरात आपल्या जीवनभराचे सार सांगणार होता.मी शहारलो, थरारलो.
काय असेल तो शेर,जुनाच की नवा आजच लिहिलेला?
आणि इतक्यात शहरयारचा शेर, शब्दरूपात त्यांच्या आवाजात ऐकू आला तोचशेर ....
शिकवा कोई दरिया की रवानी से नही है
रिश्ताही मेरी प्यास का पानी से नही है
मित्र हो,माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.मला काही सुचत नव्हते,मी अवाक झालो होतो.
त्या क्षणी,फक्त क्षणभर का होईना,मी आणि शहरयार
कुठल्यातरी अलौकिक पातळीवर एकरूप झालोय.असा मला भास झाला.
त्यानंतर पाच महिन्यातच म्हणजे 13फेब्रुवारी 2012 साली,शहरयार निधन पावले.माझ्यासाठी राहिली ती,ही एक आठवण.
त्यांच्या स्मृतीला आदरपूर्वक अभिवादन.प्रणाम.
. ¤¤¤¤¤
. सदानंद डबीर. 9819178420.
0 Comments