. मराठी गजलचा प्रवास
1)मराठी गजलचे वय सुमारे पावणेतीनशे वर्षे आहे,असं कोणी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल?
पण असे म्हणणारे काही अभ्यासक आहेत.ते अमृतराय(१६९८--१७५३) व मोरोपंत (१७२९--१७९४) ह्यांच्या एकदोन रचनांचा हवाला देऊन तसा दावा करतात.मला तो हास्यास्पद वाटतो. गजलच्या वृत्तात त्या रचना आहेत इतकेच.पण सदोष काफिये व प्रत्येक शेराचे परिपूर्ण असणे,शैली, व तग्गजुल (गजलीयत) हे घटक त्या रचनांत नाहीत. माधव ज्युलियनांनी त्या रचनांतली, गजलवृत्ताशी फक्त वृत्त साम्यता दाखवली व तंत्रदोषही दाखवलेत.
कदाचित कोणा अतिउत्साही संशोधकाने पी.एच.डी करताना हा "शोध" लावून मराठी गजल अडीचशे वर्षे जुनी असल्याचे पिल्लू सोडून दिले असावे!त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे.
2)दुसरा टप्पा संगीत नाटकांचा दाखवता येतो.त्याकाळी उर्दू /पारशी संगीत रंगभूमी बहरात होती.त्या नाटकात उर्दू/फारसी गजल गायली जायची.त्या रचना लोकप्रिय होत्या व त्याना उदार रसिकाश्रय मिळायचा.त्या संगीत रचनांवर आधारित नाट्यपदे, काही मराठी संगीत नाट्यकर्त्यांनी आपल्या नाटकात आणली.त्या पदांवर चाल-गझल किंवा वृत्त-गझल असे लिहायची प्रथा होती.पण त्या लेखक/संगीतकारांना गजलची वृत्ते किंवा वैशिष्ट्ये सुतराम माहिती नसल्याने तो प्रकार केवळ चालीचे भ्रष्ट अनुकरण होता. ती मराठी गजल नव्हती.किंवा गजलची सुरुवातही नव्हती.मात्र ह्या सदोष नाट्यपदरूपी गजलाच पुढे कारणीभूत ठरल्या.पण ते बघण्याआधी आपल्याला माधव ज्युलियनांकडे वळायला हवे.
3)माधव ज्युलियन.(२१जाने.१८९४--२९नोव्हें.१९३९) माधव त्रिंबक पटवर्धन,हे पूर्ण नाव.मुंबई विद्यापीठाचे पहिले डी.लिट.इंग्रजी व फारसी भाषेचे प्राध्यापक.फारसीचे विद्वान असल्याने त्यांचा गजल प्रकाराचा अभ्यास होता.तसेच ते छंदशास्त्री होते. निर्दोष छंदवृत्त रचना करण्यासाठी ते आग्रही असायचे.त्यांनी जेव्हा गझल नावाखाली सदोष नाट्यपदे पाहिली तेव्हा त्यांना त्रास झाला.व त्थांनी मराठी नाट्यपदे रचणा-यांना गजल वृत्तं कळावी व रचना करता यावी,म्हणून फारसी वृत्तं मराठीत आणायचे कार्य हाती घेतले.
फाइलातुन फाइलातुन, फाइलुन वगैरे फार्सी वृत्त त्यांना मूळ स्वरूपात येत होतीच.फार्सीचे प्राध्यापक होते ते!
अक्षरगण वृत्तात व फारसी वृत्तात एक फरक असा की अक्षरगण वृत्तात तीन अक्षरांचाच गण असतो.तर फार्सी वृत्तात तीन,चार किंवा पाच अक्षरांचे गण असतात त्यामुळे ती वृत्तं अधिक गायनसुलभ होतात.
ही वृत्तं मराठीत आणण्याचे मोठेच कार्य माधव ज्युलियनांनी केले.लक्षात घ्या की त्यानंरच्या सुरेश भटांपासून अगदी आजच्या नवोदित गजलकारा पर्यंतचे सगळे कवी तेच छंदवृत्त वापरतात.फार्सी वृत्त आणल्यावर ती कळावीत म्हणून त्यांनी काही रचना केल्या त्या गज्जलांजली संग्रहात आहेत.माधवरावांनी फार्सी वृत्त मराठीत चालवून दाखवली इतकंच!त्या काळात रूढ असलेले विषय प्रेम,ध्येयस्तुती,निसर्ग, उपदेश,व्यक्तिवर्णन असेच विषय त्यांनी घेतले.व गजलच्या वृत्तात आणि आकृतीबंधात भावगीते लिहिली.एक कारण आणखी त्यांनी स्वतः नमूद केलेय,ते म्हणजे गजलेचा "एकयमकीपणा".रदीफला ते यमक म्हणायचे. रदीफ तोच तोच येतो.व एका द्विपदीचा(शेर) दुस-या द्विपदीशी (शेराशी) संबंध नसणे ह्या बाबी त्यांना दोषास्पद वाटल्या व त्या मराठीत रसिकमान्य होणार नाहीत रुजणार नाहीत असे वाटले.
साधारण १९२० मध्ये जुलियनप्रणित गजल आली.रविकिरण मंडळाच्या काही कवींनी ती लिहिली.पण पुढे १९३७च्या आसपास मा.ज्युलियनांनी जाहीर केले की "सुनीत(साॅनेट ह्या इंग्रजी कवितेवरून) व गज्जल हे प्रकार एक टूम होती व ती आता संपली आहे.नंतर १९३९ साली मा.ज्युलियन निधन पावले. माधव जूलियनांनी फारसी वृत्तं मराठीत आणली व ती यशस्वीपणे चालवून दाखवली,तसेच गजल ह्या काव्यप्रकाराची ओळख मराठीला करून दिली हे मोठे श्रेय त्यांना द्यायला हवे.परंतु गजलचा आत्मा जो तगज्जुल/गजलीयत आणि त्याचे सामर्थ्य त्यांना ओळखता आले नाही.त्यामुळे तो काव्यप्रकार त्यांनीच बाद करून टाकला.
4)त्यानंतर येतात ते सुरेश भट! सुरेश भट (१५ एप्रिल १९३२--१४मार्च २००३) सुरेश भटांना साधारण ७१वर्षांचे आयुष्य लाभले.अमरावती व नागपूरात त्यांचं बालपण व महाविद्यालयीन जीवन गेले.त्यांच्या मुसलमान मित्रांकडून त्यांना गजलची ओळख झाली.व त्यांनी स्वतः प्रयत्न पूर्वक तंत्रशुद्ध गजल समजून घेतली व चुका करत पण स्वतःला दुरुस्त करत गजल विधा हस्तगत केली.त्यांना गजल ख-या अर्थाने वश झाल्यावर जेव्हा त्यांनी जूलियनांची गज्जलांजली पुस्तक वाचले तेव्हा हे चोपडे हातात धरण्याच्या लायकीचे नाही! अशी त्यावर टीका केली.मराठीत तंत्रशुध्द व मंत्रसिद्ध गजल आणण्याचे व रुजवण्याचे श्रेय सुरेश भटांनाच जाते.काही समीक्षक (तिरकसपणे) माधव जूलियनांनी आणलेल्या गजल प्रकाराचे पुनरुज्जीवन केले असे म्हणून भटांचे श्रेय कमी लेखण्याचा प्रयत्न करतात ते योग्य नाही.मात्र फारसी वृत्त मराठीत आणण्याचे श्रेय एक छंदशास्त्री म्हणून जूलियनांचे आहे हे मान्य!
गजल हे सुरेश भटांनी मिशन /जीवन कार्य मानले. छंदावृत्तात निर्दोष लिहू शकणारा कवी दिसला तर त्याला गजल संदर्भात मार्गदर्शन केलं.प्रचंड पत्रव्यवहार केला.नवोदितांची होसलाअफजाई केली .चुकला तर प्रसंगी वाक्ताडनही केलं.गजलसाठी भांडले,मराठी सारस्वतांनी,टीकाकारांनी केलेली अश्र्लाघ्य टीका पचवली.
जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो.
हा त्यांचा शेर अगदी सार्थ आहे.
5) सुरेश भटांचा पहिला संग्रह रूपगंधा(१९६१) हा मुख्यतः कविता संग्रह.त्यात बहुधा तीनच गझला आहेत.दोन गाजल्या,मल्मली तारूण्य माझे व पूर्तता माझ्या व्यथेची
त्यांचा गाजलेला संग्रह रंग माझा वेगळा (मार्च १९७४,मौज प्रकाशन). १९८० पासून भटांनी रंग माझा वेगळा,हा गझल सादरीकरणाचा कार्यक्रम तिकीट लावून सादर करायला सुरुवात केली.
एल्गार (१९८३) झंझावात (१९९४) सप्तरंग (२००२) हे त्यांचे,त्यांच्या हयातीत निघालेले संग्रह.
6) एव्हाना तरुण कवी गजलकडे वळू लागले होते. भटांनी मेनका मासिकात गझलिस्तान सदर सुरू केले.त्यांचा मार्गदर्शनपर लेख व नवोदितांच्या गजला असे स्वरूप होते.पुढे भट पुण्याला आले,त्यांच्या भोवती अनेक नवोदित तरूण कवींचा गोतावळा जमला,भट मुक्तहस्ताने इस्लाह करायचे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले गजलकार पुणे परिसरात तयार झाले.गजल चळवळ आकार घेऊ लागली.
7) साधारण 2000 सालच्या आगेमागे,मुंबई, औरंगाबाद,पनवेल...अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गजल लेखन,मुशायरे होऊ लागले.वेगवेगळे ग्रुप्स तयार झाले.महाराष्ट्र गजलमय व्हायला सुरुवात झाली.सर्व ठिकाणची माहिती मला उपलब्ध नाही.मात्र मुंबईत डाॅ.राम पंडितांनी उर्दू अकादमीच्या सहाय्याने उर्दू-मराठी एकत्र मुशायरे सुरू केले.त्याचा खूप चांगला परिणाम झाला.
"पाण्यात दिवे सोडावे" हा स्वरचित गजल सादरीकरणाचा कार्यक्रम २००२ ते२००५ ह्या काळात झाला.त्यात सदानंद डबीर,मनोहर रणपिसे,ए.के शेख व ललिता बांठिया आपापल्या गजल सादर करायचै. ह्या कार्यक्रमात गजलसंबंधी माहिती देऊन श्रोत्यांचे प्रबोधनही व्हायचे.महाराष्ट्रभर कार्यक्रम झाले. साहित्य अकादमीसह अनेक संस्थांनी हा कार्यक्रम ठेवला होता. काही वेळा ह्या कार्यक्रमात
गायक माधव भागवतांचे गजल गायनही व्हायचे.
8)मराठी गजलचा हा पायाभरणीचा काळ होता.अनेकांनी अनेक प्रकारे हे कार्य केले.सर्व संस्था व व्यक्तींची नावे देणे शक्य नाही.व अनवधानाने काही नावे राहिल्यास संबंधित मंडळी नाराज होतात.तसेच तेव्हा आजच्या सारखे व्हाटस अप,यूट्यूब प्रकार नसल्याने सर्व माहिती एकत्रित उपलब्धही नाही.
प्रारंभीच्या काळापासूनच गजलला विरोधही सुरू झाला.चेष्टा झाली,टर उडवली गेली,भटांवर तर गजल म्हणजे "भटांचा भटारखाना" अशी अश्लाघ्य व पातळी सोडून टीका झाली. गजलचे मराठी कवितेवर आक्रमण? ह्या विषयावर परिसंवाद झाला,तोही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात!
ह्या सर्वांना तोंड देऊन,सुरेश भटांनी लावलेले गजलरूपी "अमृताचे रोपटे" रुजत होते इतकेच नाही तर जोमाने वाढत होते.
आज जो गजलरूपी वृक्ष दिसतोय त्याचे रोप भटांनी लावले आहेच,त्याचबरोबर अनेक ज्ञात अज्ञात कवींनी,रसिकांनी,गायकांनी,कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिले आहे.
गजलकार कवी म्हणून थोडेसे का होईना माझेही योगदान आहे व त्या काळचा मीही एक साक्षीदार आहे. मला सुरेश भटांचे मार्गदर्शन लाभले,पहिल्या संग्रहाला प्रस्तावना लाभली दोनतीन का होईना प्रत्यक्ष भेटी झाल्या,खूप पत्रव्यवहार झाला...ह्याचा रास्त अभिमान आहे.
9)भटांच्या प्रकृतीच्या तक्रारी होत्याच.त्याला त्यांनी कधीच जुमानले नाही. बेदरकारपणा रक्तातच होता.त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.१४ मार्च २००३ रोजी वयाच्या केवळ एकाहत्तराव्या वर्षी ह्या महान कवीचे निधन झाले.
अनेक शोकसभा झाल्या.अनेक कवींनी आपली भावना गजलेतून,शेरातून प्रकट केली.त्यात माझीही एक कत्आ होती.
अंत्ययात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे
धूळही रस्त्यातली त्या गायला लागेल रे
तो कवी होता न साधा एक झंझावात तो
शब्द सांभाळून त्याचा न्यायला लागेल रे!
10) हम अकेलेही चले थे,जानिबे मंझिल मगर
. लोग आते गये कारवाँ बनता गया!
हा शेर भटांच्या बाबतीत अक्षरशः खरा ठरला.सुरुवातीला पाच दहा कवी होते पुण्याचे,नागपूरचे....पाचाचे पन्नास झाले पन्नासचे पाचशे झाले....आज हजार बाराशे कवी गजल लिहित असावेत असा अंदाज आहे.
मराठी सारस्वतांचा सावत्रभावही सुरूच आहे.गजलची स्वतंत्र संमेलने होत आहेत.आता एल्गार गझल संमेलनही अमळनेरला साहित्य संमेलनापूर्वी होऊ घातले आहे.
हा मराठी गजलचा प्रवास आहे. आजच्या मराठी गजलचा प्रथम उद्गाता,सुरेश भट ह्यांच्या गजलेवर पुढील लेखात लिहिण्याचा मानस आहे.
. इति लेखनसीमा.
. सदानंद डबीर./९८१९१७८४२०
0 Comments