Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नासिर काजमी -Sadanand Dabir

                नासिर काजमी

      दिल में इक लहरसी उठ्ठी है अभी!



.१)   दिल में इक लहरसी उठ्ठी है अभी

.      कोई ताजा हवा चली है अभी....

  गुलाम अलींनी गाऊन अतिशय लोकप्रिय केलेली ही गजल,नासिर काजमी ह्या पाकिस्तानच्या महाकवीची आहे.

मी उर्दू गजलकारांचा परिचय का करून देतोय हे मी ह्या लेखात ओघाओघाने सांगणारच आहे.त्या आधी सुरेश भट "सप्तरंग" संग्रहाच्या प्रस्तावनेत काय म्हणतात ते बघा  _"माझ्या संग्रही आशियाचा महाकवी फैज अहमद फैज व पाकिस्तानचा महाकवी नासिर काजमी ह्यांच्या सा-याच रचना असलेले संग्रह (कुल्लियात) आहेत.

आपण गजल उर्दूतून आयात केली आहे,तर मूळ उर्दू गजल समजून घेण्यात गैर काहीच नाही.मराठी गजल मराठी मातीतून व मराठी संस्कृती घेऊनच उगवली आहे,उगवणार आहे हे खरेच,पण आज ती गजलची चौकट सांभाळून लिहिलेली छंद/वृत्तबद्ध कविता तर होत नाहीय ना? असे वाटते. ह्यासाठी शेर आणि द्विपदी(कवितेची) ह्यातला बारकावा लक्षात यावा म्हणून उर्दूतल्या "क्लासिक" गजल लिहिणा-या महाकवींची गजल पुन्हा बघावी.

 शहरयार वरील लेखात  एक शेर दिला होता,

तू मेरे हमराज था दरवाजे तक शाम के

इसके आगे क्या हुआ पूछा जाए रात से

"संध्येच्या दरवाजा पर्यंत तू माझ्या सोबत होतास,पुढे काय झालं ते रात्रीला विचारायला हवे."

मित्रहो, "पूछा जाए रातसे!" ही कथन शैली गजलची आहे.आपण सवयीने लिहितो  "...त्यानंतर काय झाले कोण जाणे!" आणि नकळत कवितेची कथन शैली अनुसरतो.आपण शेराची द्विपदी करतो.पूछा जाए रात से,मधला बेदरकारपणा म्हणजे गजलवृत्ती. जी शेराला शेरीयत देते.हे बारकावे आपण अनेक चांगल्या उर्दू गजलांच्या वाचनाने न कळता शिकत जातो.असे मला तरी वाटते.असो.

२)नासिर काजमींचे नाव- सैयद नासिर रजा काजमी.जन्म ८डिसें.१९२५भारतात अंबाला(पंजाब)फाळणी नंतर पाकिस्तानला गेले.मृत्यू २मार्च १९७२.जेमतेम ४६ वर्षांचे आयुष्य. त्यांच्या हयातीत एकच संग्रह प्रकाशित झाला.उरलेले संग्रह  व गद्य साहित्य मरणोत्तर प्रकाशित. त्यांनी गजल लेखनात "छोटी बहर"चा खूप सुंदर उपयोग केला.

३)नासिरजींच्या हयातीत प्रकाशित झालेला एकमेव संग्रह  बर्ग ए नै  बर्ग म्हणजे झाडाचे पान,नै म्हणजे बासरी,म्हणजे  झाडाच्या पानांतून सळसळणारा बासरीचा स्वर असा अर्थ झाला.ह्या संग्रहाच्या पहिल्याच गजलचा एक शेर त्याकाळी प्रचंड गाजला.तो असा...

      ऐ दोस्त हमने तर्के मुहब्बत के बावजूद

      महसूस की है तेरी जरूरत कभी कभी

"अरे दोस्ता,प्रेम-विच्छेद होऊन सुद्धा आम्हाला तुझी गरज भासते, कधी कधी."

मला ह्या शेरात गाजण्यासारखं काय आहे? असा प्रश्न पडला.अधिक वाचल्यावर लक्षात आलं तो काळ फाळणीचा होता.नासिर काजमींचा शेर भारत-पाकिस्तान संबंधावर भाष्य करतोय.हा संदर्भ कळल्याशिवाय शेर खास वाटत नाही,कारण त्या काळाचा संदर्भ हरवलाय.

४)हा शेर बघा.   

                थोडा गम भी उठा प्यारे

  .            फूल चुने है,खार भी चुन

खार/ख्वार म्हणजे काटे.अर्थ, "थोडं दुःखही उचल मित्रा,फुलं वेचली आहेत तर काटेही वेच."

मी हा शेर वाचण्याआधी,आठेक वर्षांपूर्वी एक मराठी गजल लिहिली होती.("तिने दिलेले फूल" ह्या २००२साली प्रकाशित संग्रहात आहे.) तिचा मतला

 .         फूल हवे तर काटाही घे

  .        तू दुःखाचा वाटाही घे!

समांतर आशय आहे.खयाल का टकराना म्हणतात.

उर्दूची सहजसाधी कथनशैली मराठीत येऊ शकते, हे सांगण्यासाठी हा शेर घेतला.मराठी गजलेत  काहीवेळा अनावश्यक  अशी आवाजी(Loud) शैली वापरली जाते.

५)ही गाजलेली गजल आहे. 

.     दिल धडकने का सबब याद आया

.     वो तेरी याद थी अब याद आया

आमच्या हृदयाच्या धडधडण्याचं कारण(सबब) आता आठवलं,ती तुझी याद (आठवण)होती--आता आठवलं!

   तुझ्या आठवणीवरच जगतो आहे,असं न म्हणता कवीने खास गजल-अंदाज वापरला आहे.एकाच शेरात याद शब्द तीन वेळा येतो,वेगवेगळ्या छटा घेऊन.मराठीत असा समज आहे की एकच शब्द शेराच्या दोन्ही ओळीत वापरू नये.एका ओळीत सूर्य आला तर दुस-या ओळीत रवी/भास्कर असं वापरावं. हा समज कसा/कधी निर्माण झाला,माहिती नाही,पण चुकीचा आहे.

६) नासिरजींचा एक गाजलेला शेर देतो.

.        वाकया ये है कि बदनाम हुए

.        बात इतनी थी कि आँसू निकला

अर्थात हकीकत तर ही आहे की आम्ही बदनाम झालो,गोष्ट खरोखर एवढीशी होती की डोळ्यांतून अश्रू ओघळला....अश्रू ओघळल्याने आमची दुर्बलता दिसली,आणि आम्ही बदनाम झालो.भावार्थ अनेक प्रकारे घेता येईल.भट साहेबांचा अंदाज वेगळा ते म्हणतात... सांभाळुनी घेती मला,माझी इमानी आंसवे!

  सुरेश भटांचा  एक शेर आठवला,नासिर काजमींच्या शेरावरून.नासिरजी म्हणतात..

उरुज पर है मेरा दर्द इन दिनो नासिर

मेरी गजल में धडकती है वक्त की आवाज

उरुज= चरमोत्कर्ष. अर्थात "नासिर,हल्ली माझ्या हृदयाची वेदना चरम सीमेवर (तीव्रतम) आहे.ते दुःख 

माझ्या गजलेत काळाचा आवाज बनून अवतरतंय."

सुरेश भटांचा अंदाज वेगळा पण आशय समांतर. ते म्हणतात.

माणसांचे दुःख माझे बनत आहे

सोसताना मी नव्याने घडत आहे


माणसांचे दुःख माझे बनत आहे आणि/ चरम दुःखाने माझ्या गजलेत काळाचा आवाज धडधडतोय.

सांगण्याच्या शैली वेगवेगळ्या आहेत,आशय जवळपास जाणारा आहे.खरं तर मला भट साहेबांचा शेर जास्त भावला.तो माणसांबद्दल बोलतो.नासिरजी काळाबद्दल बोलतात. स्वतःच्या दुःखाने सगळेच रडतात.दुस-याच्या दुःखाने ज्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात,तेच त्या जमान्यातले महान कवी असतात.

७)नासिरजी छोटी बहरचा उपयोग खूप सुंदर करतात.छोट्या छंदा/वृत्तात कवीला खूप कमी शब्द वापरता येतात.त्यामुळे शेर सिद्ध होत नाही.केवळ स्टेटमेंट्स होतात.शिवाय गेयता बाधित होते.हे गाजलेले शेर बघा,

.                रात ढल रही है

.                नाव चल रही है


.                बर्फ के नगर में

.                आग जल रही है 

अगदी सोपे शेर  आहेत.पण प्रतिकात्मक आहेत.समीक्षकांच्या मते,दुस-या शेराचा अर्थ असा,आम्ही निष्क्रिय/प्रेतवत झालो आहोत.काही करायची इच्छा व शक्तीच नाहीय.बर्फा सारख्या थंडगार देहात धुगधुगी(आग) आहे,हीच काय ती जिवंत असल्याची खूण.

  छोट्या बहरच्या अवकाशातही विरोधाभास वापरून  शेर किती गोटीबंद करता येतो ते या शेरात बघा.

.         कडवे ख्वाब गरीबों के

.         मीठी नींद अमीरों की

गरीब/श्रीमंतातली दरी!...स्वप्न आणि निद्रा ह्या शब्दांनी विरोधाभास बटबटीत न होता,अंतर्मुख करतो.

८)हिंदी, उर्दू भाषा इंग्रजी शब्दांना खुबीने सामावून घेतात.ही गीतात्मक गजल बघा.पियानो शब्द कसा घेतलाय.

.            बर्फ गिरती रहे आग जलती रहे

.            आग जलती रहे रात ढलती रहे

.            बर्फ के हाथ प्यानो बजाते रहे

.            जाम चलती रहे मय उछलती रहे


  प्रत्येक भाषेची खासियत असते. "सा" प्रत्यय लावून हिंदी उर्दूत अर्थवाही शब्द तयार होतात.चांदसा मुखडा.आपल्याला  "चंद्रासारखा" म्हणावे लागते.ह्यामुळे  नासिरजींचा हा शेर कमी शब्दात कसा प्रत्ययकारी झालाय.

.        तेरे आनेका धोखा-सा रहा है

.        दिया-सा रातभर जलता रहा है

दिया नही,दिया सा कुछ जलता रहा है....ही तरल

अभिव्यक्ती उर्दूत शक्य होते.

९) गुलाम अलींनी गायलेली नासिरजींची एक छोट्या बहरची अप्रतिम गजल आपल्या परिचयाची असेलच.

.                  अपनी धुन में रहता हूँ

.                  मैं भी तेरे जैसा हूँ

वरवर सोपा शेर आहे.ह्यातल्या "तेरे जैसा" मधील तू म्हणजे कोण...प्रेयसी ते परमेश्वर! काहीही अर्थ द्या

शेर तसा फिरतो.

ह्या गजलचा एक गायला न गेलेला शेर देतो.जो मला तरी आवडला नाही.सौंदर्यहीन वाटला.तोही देतो.     

            तेरे सिवा मुझे पहने कौन

.          मैं तिरे तन का कपडा हूँ

होतं असं कधी कधी.

सुरेश भटांच्या गजलचा मतला आठवला.

  हे खरे की जीवघेणा भास होता

. तू पुन्हा येशील हा विश्वास होता

खूप छान गजल आहे. त्यात मध्येच एक विरूप शेर

लिहिलाय.तो असा....

जो मघाशी चावला तो कोण होता?

काय तो ढेकूण होता डास होता?


नासिर काजमी महाकवी होते.सुरेश भट तर मराठी गजलचे खलिफा! ह्यांचे असे शेर सोडून द्यायचे त्यावर बोलायचा खरे तर माझा अधिकार नाही हे मान्य.

१०)गजलेचा शेर आवाजी किंवा आक्रस्ताळी न होताही गारूड करू शकतो.हे नासिरजींच्या गजलेतून आपण घ्यावे.

.        नाव चल रही है

.        रात ढल रही है

ह्या ओळीही वेगवेगळ्या अर्थच्छटांचा पिसारा फुलवत वाचकांवर गारूड करतातच.मराठी काव्यही समृद्ध आहे. नाव चल रही है वरून आरती प्रभूंची कविता आठवली.

दुःख ना आनंदही,अंत ना आरंभही

नाव आहे चाललेली...कालही अन् आजही

उत्तम मराठी कवितेतली,गीतातली  सहजता हृदयाला भिडते....ती मराठी गजलेत का येत नाही?

इति लेखन सीमा.

.                         सदानंद डबीर.

.                          (९८१९१७८४२०)

Post a Comment

0 Comments