Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मुहम्मद अल्वी-एक बंडखोर शायर Sadanand Dabir

 .        तुडा मुडा है मगर खुदा है

.        इसे तो साहिब सँभाल रखिये

.  मुहम्मद अल्वी एक बंडखोर शायर                          

                                 

मुहम्मद अल्वी.   एक बंडखोर शायर
     लेखक:सदानंद डबीर.

.                           

१)साहित्य अकादमी पुरस्काराने सम्मानित दिवंगत उर्दू शायर मुहम्मद अल्वींचा  परिचय आज करून घेऊ. अत्यंत तरल आणि बिनधास्त शैलीचा हा शायर.

कधी गजलेत इतके मिश्किल शेर लिहायचा की हा शायर गजल प्रकाराचीच  खिल्ली उडवतोय असे वाटावे.उदा.

.              एक आँख से कानी है

.             गजल अदब की रानी है

हा मतला असलेली गजल हजलच्या अंगाने जाते.

काही शेर बघा

.              बन्दर अपना दादा है

.              बिल्ली शेर की नानी है


.              अब के दिसंबर में सर्दी

.              दिल्ली से मँगवानी है


.               मार्च में थोडी-सी गर्मी

.               शिमला पर भिजवानी है


असं वाटतं की अल्वी गजल प्रकाराचीच मिश्किलपणे खिल्ली उडवताहेत. एक  आँख से कानी है हे 

दाखवताहेत. पण ह्याच हजलचे तीन चार शेर अंतर्मुख करणारे आहेत.दोन शेर देतो...

.               खुशी बिदेसी है तो क्या

.               गम तो हिंदुस्तानी है

अनेक अर्थाच्या छटा आहेत.तसाच हा एक शेर बघा जो मी आजवर विसरू शकलो नाही...

.              इसमें तो तुम हँसते हो

.              ये तस्वीर पुरानी है

आज तर तू हसणंच विसरला आहेस.त्याची कारणं काही असोत.आपापलं दुःख आहे,व्याधी आहेत परिस्थिती आहे...तो तपशील कवी देत नाही.जुन्या गोष्टी आवरताना,एकाएकी जुना फोटो कोणाच्या हाती पडावा....आणि त्याने म्हणावं "अरे तू चक्क हसतो आहेस...हा फोटो जुना आहे"  ही तरल शैली.फापटपसारा टाळून नेमका आशय येतो आणि अंतर्मुख करतो.मनात राहून जातो.

२)कवितेत काय सांगितलं आहे,हे महत्त्वाचं(कथ्य) की कसं सांगितलंय ते महत्वाचं? हा न संपणारा वाद आहे.नंदकिशोर आचार्य म्हणतात अल्वी असे कवी आहेत की ज्यांना काय आणि कसं ह्या दोन रकान्यात विभागताच येत नाही.तसे काही समीक्षक त्यांना 'अंदाजे बयाँ के शायर' मानतात.

पण आचार्य म्हणतात त्यांचा अंदाजे बयाँ तर आहेच पण   वे ऑफ सीईंग   वेगळा आहे.नजरियाँ वेगळाय.

अनुभूती वेगळी नाही तर अनुभव घेण्याचा ढंगच इतरांच्या पेक्षा वेगळा आहे.जो मलाही ह्या वरील

"इसमें तो तुम हँसते हो" शेरात जाणवला.

३)अल्वींचा एक शेर खूप गाजला.त्यावर उर्दूच्या अनेक समीक्षकांनी भरभरून लिहिले.मी आधी हा शेर उधृत केलाय,पण पुन्हा लिहितो.आधी मतला मग शेर देतो.

.             साया साया राह में बिखरा हुआ

.             एक चेहरा जा-ब-जा बनता हुआ

अर्थात रस्त्यावर जागजागी सावल्या विखरून पडल्या आहेत,आणि (सावल्यांनी)  जागोजागी एक चेहरा तयार झालाय...बनलाय.साधा मतला आहे.न कळण्यासारखे किंवा गूढ असे काही नाही.आता शेर.

.              दूर तक बेकार-सी इक दोपहर

.              इक परिन्दा बेसबब उडता हुआ

समीक्षकांनी हा शेर डोक्यावर घ्यावा असे ह्यात काय आहे? बघू या.

i)शेराच्या पारंपरिक कल्पनांना हा शेर उडवून लावतो.म्हणजे उला मिस-यात प्रस्तावना व सानी मिस-यात उत्कट व नाट्यमय शेवट असे काहीच नाहीय.इथे कथ्य व कथन शैली वेगवेगळ्या नाहीत तर एकरूप झाल्या आहेत. 

ii)अतिशय साध्या शब्दांत "बेकार" दुपारीचे चित्र येते

आणि नंतर एकदम "अकारण (बेसबब) उडणा-या पक्ष्याने" त्या चित्रात हालचाल होते.आता हा बेसबब/अकारण, शब्द बदलून बघा.उंच उडणारा,पंख पसरलेला,संथ उडणारा....शेरियत येत नाही.हा बेसबब शब्दच ह्या ओळींना शेर बनवतो. बेकारसी शब्दाला वेगळे परिमाण बेसबब ने येते.पक्ष्याचे अकारण उडणे,निरर्थक जगण्याचे सूचन करते.

iii)शेराला सबब (कारण)देणारा शब्द  बेसबब असावा हाही एक विरोधाभास!हीच तर गंमत आहे.

 iv)गजलच्या एका नव्या शैलीला अल्वींनी जन्म दिलाय.असा अभिप्राय समीक्षकांनी दिला.एका स्थिर

शब्दचित्रात अचानक हालचाल निर्माण करायची आणि त्या अनपेक्षिततेतून गजलीयत निर्माण करायची तीही अर्थाच्या अनेक छटा निर्माण करून.

हे अल्वींनी प्रथम केले.

४)अल्वींचा जन्म एप्रिल १९२७ साली अहमदाबाद (गुजरात)आणि मृत्यू जाने.२०१८ अहमदाबादलाच.

जवळपास नव्वद वर्षांचे दीर्घ आयुष्य ते जगले.

"खाली मकान","आखिरी दिन की तलाश","तीसरी किताब","चौथा आस्मान","रात इधर उधर रोशन" हे संग्रह प्रकाशित. पैकी चौथा आस्मान ला साहित्य अकादमी पुरस्कार. 

 बहुतेक चौथा आस्मान मध्ये त्यांचा एक दोहा होता

"एक अच्छा भविष्यवक्ता भेजो..."असा.तो विवादास्पद ठरला.व १९९४साली जामा मशिदीच्या इमामने फतवा काढून त्यांना काफिर ठरवले.पुढे इस्लामिक स्कूल अहमदाबादनेही  ह्यावर टीका केली.नंतर काही ओळी पुस्तकातून गाळल्या गेल्या.

  ह्या लेखाच्या शीर्षकात जो शेर आहे तो पण खूप धीट अभिव्यक्ती आहे.आपण ब-याचदा घर आवरतो आणि जुन्या वस्तूंची अडगळ काढून टाकतो.तेव्हा सुद्धा एखादी जुनी वस्तू ठेवतो उदा.कंदील! कधी वीज गेली तर असावा.त्यावर शायर म्हणतो "तोडका मोडका असला तरी हा खुदा आहे.(कधी कामाला येईलही!) साहेब ह्याला सांभाळून ठेवा.

खुदाला एका मुसलमान शायराने तोडका मोडका म्हणावे,ही मोठीच बंडखोरी आहे.

गालिब म्हणाला होता,स्वर्गाची हकीकत (वास्तव)आम्ही जाणतो पण  दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है   अल्वींची बंडखोरी त्याहूनही

डायरेक्ट आहे!सरळ सरळ आहे.

"खुदा" शीर्षकाची एक नज्म(कविता) पण आहे.त्यात

आल्वी म्हणतात  खुदा,घर की बेकार चीजों में रक्खी हुई/एक बेकार-सी लालटेन है!"

  शेरामध्ये अगदी साळसूदपणे तिरकसपणा कसा आणायचा ह्यात अल्वींचा हात कोणी धरणार नाही.हा शेर बघा...

.           "मुँहजबानी कुर्आन पढते थे

.           पहले बच्चे भी कितने बूढे थे

हा उपहास आहे पण अत्यंत निर्विष आहे.शेर सरळ सोपा आहे.अर्थ द्यायची आवश्यकता नाही. 

 ह्याच गजलचा एक शेर असा

.            एक परिंदा सुना रहा था गजल

.            चार छः पेड मिलके सुनते थे

गावात एखादा शायर असायचा चार लोक ऐकायचे.

आज बेसुमार वाढलेल्या शायरांवर  उपहास तर नाही ?

५) हा शेर बघा.  _रोज अच्छे नही लगते आँसू _

.                     खास मोकों पे मजा देते है!

रोज रडणा-याला रडत राऊत म्हणतात!कधी तरी खास मोका असेल तर अश्रू "मझा" देतात,ही गजल वृत्ती. कवी अश्रूंचे मोल नाकारत नाही.त्याना अडवा असेही सांगत नाही.खास मौके कोणते हे प्रत्येकाने आपापले ठरवावे.

  उर्दू गजलची कथनशैलीच गजलीयत देते.मराठी गजलेत ती कमी पडते.ह्या शेरावरून भटांचा शेर आठवला,तो देतो.भट साहेब म्हणतात....

 .         आले रडू तरीही कोणी रडू नये

.          कोणीच आसवांच्या हाती पडू नये!

भट साहेब उपदेश करतात,संदेश देतात...दुःख दाबून टाकायला सांगतात,जे सोपे नाहीय.

आल्वी सलगी दाखवतात,अश्रूंचीही मझा आहे पण खास प्रसंगी,असं म्हणतात.

एखाद्या गोष्टीकडे बघायचा जो दृष्टीकोन/नजरियाँ 

असतो त्यातून गजलवृत्ती दिसते.मराठीने गजलवृत्ती 

आत्मसात करायला हवी.

इथेच एक स्पष्ट करतो ही दोन कवींची तुलना नाही किंवा भटसाहेबांच्या शेराला कमी लेखत नाहीय.हा दोन संस्कृतीतला फरक आहे. 

६)कवी सुद्धा समाजाचा एक घटक असतो.तो काही केवळ कल्पनांच्या राज्यात जगत नसतो.सामाजिक भान असलेला हा शेर बघा.

उला मिसरा आहे  

.        तुम लोग अपनी मौत भुलाए हुए तो हो

शेर ॲप्रिशिएट करायचा असेल तर उला मिसरा वाचून रेंगाळावं. तुम्ही आपलं मरण विसरून बसला आहात...फिलाॅसाॅफीकल वाटतो.अंदाज बांधा की आता शायर सानी मिसरा काय सांगणार.माझा अंदाज....मौत तो आएगी और सब ले जाएगी. असं काहीतरी असेल.

आता सानी मिस-यासह शेर बघा.

.         तुम लोग अपनी मौत भुलाए हुए तो हो

.         इक रोज देखना कफन आए गा चीन से

हा सामाजिक आशयाचा शेर आहे. चीनच्या स्वस्त  वस्तू आपली बाजारपेठ काबीज करताहेत,अगदी आकाश कंदीलापासून पतंग सुद्धा चीन इथे विकतो.

तात्कालिक फायदा म्हणून आपण त्यांना उदार आश्रय देतो.दीर्घकालीन विचार करता हे आपल्या उद्योग धंद्याचे मरणच आहे.जे आपण विसरलो आहोत.

    शायर उद्वेगाने म्हणतोय...एक दिवस तुमचे    उद्योग मरतील आणि तेव्हा कफन सुद्धा चीन मधूनच येईल.

हा अन्दाजे बयाँ थेट वार करणारा आहे,आणि इतका तरलही आहे की पटकन कळूच नये.अर्थ कळला की वर्मी लागावा.इथे कवी आदब सांभाळत नाही,आप लोग नाही म्हणत,तुम लोग! कथनशैली (कहन)आणि कथ्य (आशय) एकजीव होणे ते हे.आणि हे आल्वींचं वैशिष्ट्य मानलं जातं. 

७) रात के तीन बजा चाहते है

.    अब कुछ शेर हुआ चाहते है

कवीला कविता सुचते येथपासून ते कविता शब्दरूप

घेते तोपर्यंतचा काळ अत्यंत अस्वस्थतेचा असतो.हे अल्वींनी अत्यंत साधेपणाने पण प्रत्ययकारी पणे सांगितले आहे. 'केव्हाचा तळमळतो आहे' हे वाक्य  न लिहिता सारी तळमळ "रात के तीन बजा चाहते है"

मध्ये आलीय.ह्यातली सूचकता कवितेची आहे.विरोधाभास नसूनही हा शेर दाद घेतो.साधे सरळ विधानच  रात्रीचे तीन वाजू बघताहेत,आता काही शेर होऊ बघताहेत!    हे प्रांजळ पारदर्शी विधान कवीचीच नाही तर सा-या कवीकुळाचीच अस्वस्थता शब्दरूप करताहेत.म्हणूनच ह्या ओळी विधान न राहता शेर होतात.

८)अल्वींची एक सहा शेरांची गाजलेली गजल आहे.5,7,9..अशी शेरांची संख्या विषम असावी असे मराठी गजलगुरु हिरीरीने शिकवतात.त्याला काही आधार मला तरी सापडला नाही.अनेक दिग्गज कवींनी समसंख्येचे शेर असलेल्या गजला लिहिल्या आहेत.आधुनिक उर्दू गजलेने तर मिनिमम 5शेरांचा नियम कधीच मोडीत काढून चार शेरांची गजल मान्य केलीय असो.अल्वींच्या गजलचे काही शेर.....

.         दिन में परियाँ क्यूँ आती है

.         ऐसी घडियाँ क्यूँ आती है

हा गमतीशीर शेर आहे.दिवास्वप्नात रममाण होण्यावर ही मिष्किली आहे.

 .        अपना घर आनेसे पहले

.         इतनी गलियाँ क्यूँ आती है

हा खूप चिंतनशील शेर,सोपा असला तरी अनेक अर्थ 

सुचवतो.

.         बाहर किसका डर लगता है

.         घर में चिडियाँ क्यूँ आती है

अन्य पक्षी सहसा घरात येत नाहीत,चिमण्या येतात.

   पण कवी येथे रूपकाचा आधार घेतोय.चिडियाँ 

म्हणजे भेदरलेल्या मुली असे घेतले तर,कवी समाजाचं विदारक वास्तव सांगतोय,हे स्पष्ट होतं. 

शेवटचा मक्त्याचा शेर आहे....

 .       "आल्वी" कब्रों तक जाने मे

.        भूल भुलैयाँ क्यूँ आती है

साधे सोपे शेर आहेत.शब्दांची आतषबाजी नाही,चमत्कृती नाही,लाऊडनेस नाही,अभिनिवेश नाही...थोडक्यात शेराला दादलेवा करण्यासाठी कुठलीही क्लृप्ती नाही.तरी शेर परिणाम करतात

मनाचा ठाव घेतात.कारण आल्वींची अत्यंत प्रांजळ,पारदर्शी व  प्रसंगी मिश्किल कथनशैली होय.

९) शेवटी आल्वींची एक पूर्ण मुसलसल गजल देतो.

पाऊस,वादळ,घरांची पडझड,महापूरात गाव वाहून जाणे...आणि शेवटचा ट्विस्ट अनुभवा.

मौजे =लाटा,दरिया =नदी साहिल =किनारा हे शब्दार्थ लक्षात ठेवा.


.         क्या कहते क्या जी में था

.          शोर बहोत बस्ती में था!


.          पहली बूँद गिरी टप् से

.          फिर सब कुछ पानी में था!


.          छते गिरी घर बैठ गए

.          जोर ऐसा आँधी में था


.          मौजे साहिल फाँद गयी

.          दरिया गली गली में था


.         मेरी लाश नही आयी है

.         क्या इतना भारी मैं था?


.         आखिर तूफाँ चला गया

.         देखा तो बाकी--मैं था


.         छोड गया मुझको "आल्वी"

.         शायद वो जल्दी में था!

मो.आल्वी नावाची व्यक्ती वाचली,पण "आल्वी " नावाचा कवी व्यक्तीला सोडून गेला!.त्या महापुरात

आल्वींमधला कवी मेला. 


१०)मित्र हो,आपल्या खूप चांगल्या प्रतिक्रिया अभिप्राय माझ्यापर्यंत येताहेत धन्यवाद.लेख आवडतात आम्हाला अजून वाचावे वाटत असताना लौकर संपतात...अशी लेखकाला आवडणारी तक्रारही आहे काहींची.पण मला वाटते कुठे थांबायचे हे कळले पाहिजे. हवेसे वाटतानाच थांबावे.मी तूर्तउर्दू गजलकारांचा परिचय थांबवून मराठी गजलकडे वळणार आहे.भेटू पुढच्या ब्लाॅग वर.

आपला लोभ असाच असू द्या. 🙏

.                    सदानंद डबीर. 9819178420

.                    ¤¤¤¤¤¤¤¤

Post a Comment

0 Comments