Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल रसग्रहण Sudha Narwadkar

गझल रसग्रहण

सुधा नरवाडकर


कोल्हापूरचे ख्यातनाम गझलकार आदरणीय अशोक जी वाडकर (पवार).. !! अनेक प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय व  राज्यस्तरीय पुरस्काराचे  ते मानकरी आहेत. त्यांची खयाल समृद्ध व दर्जेदार अशी गझल मी निवडली आहे... गझलेतील शब्दसंपदा आणि मांडणी खूप प्रभावशाली आहे म्हणून ही गझल मला अतिशय आवडली...!!

मतला वाचतानाच मला देशातल्या दोन श्रेष्ठ घटना नजरेसमोर तळल्या....!!!!!

मतला असा आहे....


१)युगायुगांची अंधाराची काळरात्र लोपली..

नव दीप्तीची चैतन्याची प्रभा पहा फाकली...!!


शेर वाचत असताना मला कविवर्य वसंत बापटांच्या कवितेच्या दोन ओळी आठवल्या...


"शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट..."!!!


खरोखरच शतकानंतर म्हणजे.

.

सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईनंतर व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ब्रिटिशांनी हळूहळू भारतात पाय रोवले आणि बघता बघता संपूर्ण भारतावर आपल्या गुलामगिरीची पकड घट्ट केली!!!!

.. शिक्षण आणले. नोकरशाही निर्माण केली . त्यानंतर टपालखाते, रेल्वे ,आली.मालाची  वाहतूक ,सैन्य सुलभतेने करता येण्यासाठी..!!!

 त्यानंतर अनेक जुलमी कायदे करून स्वातंत्र्याची गळचेपी केली.अशाप्रकारे भारतमाता पूर्णपणे साखळदंडात बांधली गेली... साऱ्यांची दयनीय अवस्था झाली..!!

 पण अति तेथे माती या न्यायानुसार सत्य अहिंसेच्या मार्गाने आणि क्रांतीच्या मार्गाने जनता पेटून उठली आणि इंग्रज सत्तेविरुद्ध तिने लढा दिला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले...जनतेने पहिली रम्य पहाट पाहिली..

एवढा सारा इतिहास गझलकाराच्या अंधार, दीप्ती, चैतन्य, प्रभा अशा प्रतीकात्मक शब्दांद्वारे  मांडला गेला आहे....!!!

दुसरी घटना मला जाणवली ती म्हणजे हजारो वर्षांपासून भारतातला मूठभर समाज उच्च नीचतेच्या कल्पना दास्यात अडकून  पडला होता. कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य त्यांच्या वाट्याला नव्हते. सुखाशी तर त्यांचे जणू वैरच होते . भाषा असून बोलता येत नव्हते. ज्ञान नसल्यामुळे सर्व भावभावना गोठून गेलेल्या होत्या... पण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून ,मार्गदर्शनातून,ह्या समूहाच्या परिवर्तनाची आनंदाची,,सुखाची ,ज्ञान प्रकाशाची पहाट उगवली..!!


  मेघ वितळले गगन निवळले

क्षितिजावर नवरंग उसळले

प्रतिबिंबित ते होउनी खुलले

भारतभूमी ललाट...!!


२) जुन्या रुढीचे दास्य संपले वेद नवे जीवनी..

क्षितिजा वरती सोन केशरी छान छटा वाटली!!!


वरील दोन घटनांनी देशातील व समाजातील सर्व जुनाट रूढी, परंपरा, जुलमी कायदे ,समाज जाचक नियम ,सारे सारे संपुष्टात आले ,अनेक शतकांचा बंदिवास संपला .भाळाचे दुर्दैव पुसले गेले आणि समाज आणि देशाचा भाग्योदय झाला...!!!


जातिभेद ,उच्चनीचता ,गरीब श्रीमंत, शिक्षित ..अशिक्षित, स्त्रियांचे गौणत्व .. अशा विविध भेदभावांना मूठ माती दिली गेली..!!

आणि मानवतावादी नियम आले.. स्वातंत्र्य ,समता ,बंधुभाव , सर्वांना शिक्षणाची संधी,स्त्रियांचा विकास.. असे न नवीन वेद वाड़्.मय आले.. त्यातल्या ऋचा रचल्या गेल्या...!!.

सर्व दिवस सोनेरी रंग घेऊन उगवू लागले....


आजवरच्या अंधारात

अनंत झाले उल्कापात

एकवटोनी तेज तयाचे

ती मिरज सारे घनदाट...

आज पाहिली पहिली रम्य पहाट!!


नवीन आशेची ,जीवन विकासाच्या संधीची, मानव्याच्या निर्मितीची सुरेख सुंदर पहाट उगवली .घनघोर अंधाराचा नायनाट झाला...!!


नवीन वेद, अंधाराचा नायनाट आणि आशेची सोनेरी पहाट...

मोजक्याच पण मार्मिक शब्दातून  देशाचा झालेला कायापालट, देशात घडून आलेले परिवर्तन गझलकाराने सुंदर रीतीने दर्शविले आहे!!


३) घरट्या घरट्या मधे तेवती ज्ञानरुपी वाती 

काळोखाच्या गुहा उजळती स्नेह ज्योत लावली..!!


ज्यांना आज पर्यंत ज्ञानाची ओळख नव्हती वह्या पुस्तके माहीत नव्हती. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची परवड होती. पण..... महामानवाच्या स्वरूपात ज्ञान सूर्य उगवला काळोखाचे साम्राज्य संपले...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून.. स्त्रियांना स्वत्त्वाची जाणीव होऊ लागली,

अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे याचेही ज्ञान त्यांना मिळाले .!!..थोडक्यात..


फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश...

मनामनातून वाहे ..एक सोनेरी प्रकाश, एक सोनेरी प्रकाश...!!


४) आम्हीच आमच्या भवितव्याची स्वप्ने जोजवली

. दैवावरती कसा हवाला बात नवी छेडली..!!


दुर्बल, अज्ञानी यांच्या हाती जेव्हा ज्ञानाचे शस्त्र येते तेव्हा विकासाचा वारू वेगाने धावू लागतो .नवीन स्वप्ने, नव्या आशा, नवीन ध्येये, वाटेवर हात जोडून उभी असतात ..आत्मशक्ती विकसित होते .हातापायात एक वेगळेच बळ प्रत्ययास येते ..प्रगतीच्या अनेक संधी मनासमोर फेर धरू लागतात .आणि मग... त्या दिशेने वाटचाल सुरू होते...!!

 इतके दिवस दैव ,नशीब अशा विचारांच्याच भोवऱ्यात सापडलेला भारतीय  समाज आता विकास, प्रगती ,हाताच्या रेषांत नसून मनगटात आहे याच्या जाणिवेने जागा होऊ लागला..!!

बहिणाबाईंचे शब्द त्याला पटू लागले..


"नको नको ज्योतिषा नको माझा हात पाहू..!!

माझे दैव मला कये दारी पुन्हा नको येऊ..!!"


ज्ञान माणसाचा तिसरा डोळा आहे म्हणूनच म्हणतात.

..

नहि ज्ञानेन सदृशं पवित्र मिह विद्यते..!!


५) समानतेचा सुटला वारा बंधुभाव मानसी..!!

एक दिलाची एकोप्याची  दिठ नवी लाभली..!!


नव्या उगवलेल्या पहाटेने अनेक सुंदर विचार मौक्तिके दिली.. ज्ञानाची प्राप्ती ,स्वतःत परिवर्तन, समानता ,स्वातंत्र्य ,बंधुभाव, स्व ची ओळख.....!!

तत्पूर्वी समाज वेगवेगळ्या भेदांनी दुभंगलेला होता .माणसा माणसांची मने एकमेकांपासून अलिप्त होती. उच्चनीचतेने येथे कळस गाठला होता...!!

स्त्रियांना पायाची दासी समजले जात होते .त्यांही शिक्षणापासून वंचित होत्या..!!

पण समाजातल्या महापुरुषांनी मानव जीवनाचा कायापालट केला .सर्व समाज एकोप्याने, एकजुटीने बंधुभावनेने बांधण्याचा प्रयत्न केला..!!


"बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो..!!"


अशी स्वप्ने साक्षात उतरू लागली..!!


एकंदरीत सुंदर मांडणी ,समर्पक शब्द योजना, लयबद्ध व दर्जेदार शेर , विचारांना चालना देणारे खयाल... निर्माण झालेले आशादायक, उत्साही वातावरण..सर्वच मनाला भारून टाकणारे आहे......!!



      सुधा नरवाडकर

             नांदेड


___________

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

गझल मंथन साहित्य संस्था 

Post a Comment

0 Comments