Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

अविनाशपासष्टी " या डाॅ.अविनाश सांगोलेकर यांच्या मराठी गझल संग्रहाचा परिचय Divakar Chaukekar

🌹पुस्तक परिचय 🌹

अविनाशपासष्टी " या डाॅ.अविनाश सांगोलेकर यांच्या मराठी गझल संग्रहाचा परिचय ....


" अविनाशपासष्टी " या डाॅ.अविनाश सांगोलेकर यांच्या मराठी गझल संग्रहाचा परिचय ....

-------- -------- -------- -------- -------- --------- --- 

रसिक हो नमस्कार ,

                        आद्य मराठी गझलसंशोधक आणि ज्येष्ठ गझलकार, माझे मित्र डाॅ.अविनाश सांगोलेकर (पुणे) यांना " अविनाशपासष्टी " या त्यांच्या गझल संग्रहाला आजपावेतो अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या या पुरस्कार प्राप्त गझल संग्रहाचा परिचय आपणासमोर सादर करतो. 

मराठी गझलचे अभ्यासक व समीक्षक, सन १९८० पासून गझललेखन व गझलेचा अभ्यास करणारे, " मराठी गझल - उगम व विकास " ( प्रारंभ ते १९२० ) या प्रबंधिकेसाठी एम्. फिल., आणि त्यानंतर " १९२० ते १९८५ मधील मराठी गझला " हा प्रबंध लिहून पुणे विद्यापीठाची पी.एच्.डी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त करणारे, स्वतंत्रपणे १२ आणि संपादित ११ असे एकूण २३ ग्रंथ सिध्द करणारे, पण स्वत:चा गझल संग्रह प्रकाशित करण्यासाठी ४० ते ४२ वर्ष मनावर संयम ठेऊन फक्त आणि फक्त मराठी  गझलेचा अभ्यास, मराठी गझलेची आराधना करणारे माझे स्नेही आणि मार्गदर्शक डाॅ.  अविनाश सांगोलेकर यांचा पहिलावहिला मराठी गझल संग्रह " अविनाशपासष्ठी " हा थोडा उशीराच माझ्यापर्यंत पोहोचला. अर्थात मी गझलेपासून थोडासा दूर जातोय की काय, अशी शंका आल्याबरोबर त्यांनी माझी चौकशी केली होती आणि " पुण्यात आला असशील,  तर औंधच्या डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या गझल मुशायरा कार्यक्रमास ये " अशी प्रेमळ, काळजी घेणारी विनंतीही केलेली होती. अशा डाॅ. अविनाश सांगोलेकरांच्या गझलसंग्रहाचे परीक्षण करतांना मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. 


                       रसिक हो, अशा या मित्र जोडणा-या माणसाबद्दल, आपल्या मित्रांच्या गझल क्षेत्रातील वाटचालीची आपुलकीने चौकशी करणा-या डॉ अविनाश सांगोलेकर यांच्याबद्दल विशेष प्रेम वाटावे, खास आपुलकी वाटावी अशी एक घटना माझ्या आयुष्यात घडली होती. मराठी गझल लेखनाकडे मी वळालो, आकर्षित झालो व मिळतील तितक्या पुस्तकांचा संग्रह करुन ठेवण्यास सुरुवात केली तेव्हाचा काळ होता हा ....! असेच एकदा एक पुस्तक प्रदर्शन धुळे शहरात भरले होते अन् नेमका मला हव्या असलेल्या पुस्तकांचा एक मोठा खजिनाच मला तिथे सापडला. मराठी गझलेचे समग्र दर्शन घडविणारा " गझलधारा " नावाचा डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी स्वतंत्रपणे संपादित केलेला प्रातिनिधीक गझल संग्रह आणि सुरेश भट उर्फ दादासाहेब यांच्या सहकार्याने संपादित केलेला " काफला " हा मराठीतील पहिला - वहिला प्रातिनिधीक गझल संग्रह मला त्या प्रदर्शनात सापडला आणि जणू काही अलिबाबाची गुहाच सापडल्याचा आनंद मला त्यावेळी झाला. अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे का होईना पण या विद्वान अशा गझलकार मित्राचे मार्गदर्शन मला मिळत राहिल्याची काही वर्षांपूर्वी घडलेली घटना मला आठवली आणि आता " अविनाशपासष्टी " हा संग्रह वाचत असताना जणू काही डॉ.अविनाश सांगोलेकर हे स्वत:च गझलेवर प्रेम करणा-या माझ्यासारख्या  सर्वांनाच हा प्रश्न विचारत असावेत असे वाटले ....


येणार  जाग  केंव्हा ?

विझणार आग केंव्हा                                      


येतो  वसंत  जातो ,                                        

फुलणार बाग केंव्हा,                                      


झाल्या पराक्रमाचा ,                                      

घेणार  माग  केंव्हा ?


                       ...आणि मग या संग्रहातील डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या आणखी गझला वाचत असता एका गझलेने माझे लक्ष वेधून घेतलं आणि लक्षात आलं की ....


लक्षात ठेव, मित्रा !

हृदयात देव, मित्रा !


फुटले कसे गुरुंचे ,

आताच पेव, मित्रा !


अंधार माजलेला ,

तू दीप तेव, मित्रा !


                      ...  गझल क्षेत्रात निर्माण झालेल्या व होत असलेल्या अनेक स्वयंघोषित गुरुंपासून सावध राहण्याचा, जागरुकतेचा आणि मित्रत्वाचा सल्ला ते देत असावेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, समाजात घडत असलेल्या काही अनिष्ट, चुकीच्या व वाईट घटनांमुळे माणसाच्या मनात निर्माण होऊ घातलेली एक प्रकारची मरगळ घालविण्यासाठी ' संतुलनाची कास धरूया ' असा मानस व्यक्त करतांना....


झटकू आता सारी मरगळ !                            

चला उभारू नवीन चळवळ !      

                    

हेवेदावे पुरे जाहले !                                      

मनातली ती काढू मळमळ !         

                 

चिखलफेक ती बंद करूया !                            

नका माजवू कोणी खळबळ  !    

                  

संतुलनाची कास धरूया !                              

पुन्हा जागवू जुनीच तळमळ  ! 


                        .... अशा लयबध्द काफियांचा उपयोग ते करतात,  की जेणेकरुन आपल्या मनातील हा मानस समाजमनापर्यंत वेगाने झिरपत जावा आणि त्याचा परिणाम सुध्दा तितक्याच लवकर नजरेस पडावा  ....!  

                        " अविनाशपासष्टी " या गझल संग्रहाचं मला भावलेलं एक वेगळेपण म्हणजे या संग्रहातील प्रत्येक गझल ही " मक्ता बंद " गझल आहे म्हणजेच प्रत्येक गझलच्या शेवटच्या व्दिपदीमध्ये गझलकार डाॅ अविनाश सांगोलेकर यांनी आपले नाव " तखल्लुस " म्हणून वापरले आहे. कोकण प्रदेशातील आद्य मराठी गझलकार " मरहूम खावर साहेब " यांच्या नंतर मक्त्याचा/तखल्लुसचा वापर इतका प्रभावीपणे करणारे डाॅ. अविनाश सांगोलेकर हेच एकमेव गझलकार असावेत असेही मला वाटते. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संग्रहात प्रत्येक गझलेखाली त्या त्या गझलेच्या वृत्ताचे नाव, गझलेची लगावली, गझलेच्या मात्रा आणि इतर काही महत्वाच्या गोष्टींबाबत दिलेली माहिती गझलेकडे नव्यानेच वळणारांना, गझलेचा अभ्यास करणारांना आणि गझलेवर मनापासून प्रेम करणारांना सुध्दा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे. 

                       बी. ए., एम्. ए., एम. फिल., व त्यानंतर पी.एच्.डी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त करणा-या डाॅ. अविनाश सांगोलेकर यांनी ' वृत्तपत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम ' सुध्दा पूर्ण केलेला आहे. महाविद्यालयात मराठी भाषा शिकविण्याचे पवित्र असे काम करत असतांनाच पी.एच.डी. करणा-या १८ विद्यार्थ्यांना व एम.फिल. करणा-या २१ विद्यार्थ्यांना " संशोधन मार्गदर्शक " म्हणूनही त्यांनी मार्गदर्शनाचे मोलाचे काम केलेले आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून सन १९९८ ते २००० या दोन वर्षात " मराठीतील सामाजिक कविता :  एक चिकित्सक अभ्यास " हा लघु शोध प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि अशी कामगिरी करण्यासाठी आपल्याच एका गझलमध्ये लिहिल्याप्रमाणे .... 


ठेवून दूर वाती !

घेऊ मशाल हाती !


व्यक्तीस थोर आता,

वाटून घे जमाती !


हे भ्रष्ट लोक सारे,

नोटाच फक्त खाती !


"अविनाश " ची गझल रे,

गा जागवून राती !


                      ... मशाल हाती घेऊन समाजाला रात्र रात्र जागवण्याचे जागल्याचे काम ते खूप मेहनत घेऊन करत असतात आणि तरीही ....


हे पूर नेहमीचे, माझ्या नदी किनारी,                

छोटे तशात मी ही, घर थाटले कितीदा,  

            

कौलास भेग जाता, छाती पिटू नको रे,            

माथ्यावरील माझ्या, नभ फाटले कितीदा ...


                       ...  दु:खाला सामोरे जात असतांना अजिबात खचून न जाता, आपल्या परीने करता येईल तेवढी मदत गरजू लोकांना करावी म्हणजे आयुष्य अर्ध्यावर जरी संपले, तरी धन्यता वाटावी, असे काही क्षण आपल्या गाठीस साठून राहू शकतात अशी सकारात्मक तसेच मानवतावादी भूमिका ते व्यक्त करतात, समजूत काढतांना दिसतात व दिलासाही देऊन जातात. 

                       अनेक संशोधननिष्ठ समीक्षा ग्रंथ, अनेक शोध निबंध, ललित व वैचारिक लेख तसेच विविध प्रतिष्ठित मासिके, विशेषांक, प्रातिनिधीक गझल संग्रह व  नियतकालिके यांमधून काव्यलेखन आणि गझललेखन करणा-या आणि महाराष्ट्रभर शेकडोंच्या संख्येने व्याख्याने देणा-या डॉ.अविनाश सांगोलेकर यांना अनेक मानसन्मान व पुरस्कारही मिळालेले आहेत. महाविद्यालस्तरीय, तसेच विद्यापीठ स्तरीय अनेक जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडणा-या डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी अनेक साहित्यिक व संघटनात्मक पदे देखील यशस्वीपणे भूषविलेली आहेत.


                       " मराठी गझल विश्व " हा मराठी गझले विषयी सर्व काही माहिती देणारा वर्णनात्मक सूचिग्रंथ सिध्द करुन मराठी गझलकारांना एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी एक मार्ग उपलब्ध करून देणा-या डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा मी विशेष ऋणी आहे कारण २००६-०७ साली " गझल वाढदिवसाची " या नावाचे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरच्या मराठी गझलकारांची ओळख करुन देणारं एक ऐतिहासिक, आगळं-वेगळं सदर मी संपूर्ण वर्षभरासाठी एका दैनिकातून चालवले होते. त्यावेळी गझलकारमित्रांशी संपर्क साधण्यासाठी मला ह्या सूचिग्रंथाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला, असेही मी अत्यंत नम्रपणे नमूद करु इच्छितो. या सूचिग्रंथामुळेच मी हाती घेतलेला हा उपक्रम, हे सदर यशस्वीपणे चालवू शकलो. या सदरात एक पुष्प डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित झाले होते. इथे हे नमूद करतांना मला अभिमान वाटत आहे की, या अंकात त्यांची जी गझल प्रकाशित झाली होती, त्या गझलेचा समावेशसुध्दा या संग्रहात करण्यात आला आहे. ती गझल खाली देत आहे. 


शब्दास जागणारा माणूस शोधतो मी!             

निस्वार्थ वागणारा माणूस शोधतो मी!    

       

धावून चाललेला जो तो सुखाचसाठी,               

दु:खास मागणारा माणूस शोधतो मी !   

          

हव्यास जास्ततेचा हा रोग आज झाला,              

थोड्यात भागणारा माणूस शोधतो मी  !      

    

दुष्टांसमोर आहे टाकून मान जो तो,                  

तोफाच डागणारा माणूस शोधतो मी ! 

             

"अविनाश " जाणतो हे आरंभशूर सारे,              

पाठीस लागणारा माणूस शोधतो मी ! 


                        वयाच्या पासष्टीत पदार्पण केल्यानंतर आयुष्यातील  पहिला  गझल संग्रह "अविनाशपासष्टी" या नावाने प्रकाशित करणा-या डॉ. अविनाश सांगोलेकर सरांचे मी मनापासून अभिनंदन करतो व अशीच भरीव साहित्यसेवा, गझलसेवा यापुढेही त्यांच्या हातून घडत राहो, अशा शुभेच्छा त्यांना देतो. 

                        " ग्रंथाली " व्दारे प्रकाशित,  श्रीकृष्ण ढोरे यांनी काढलेले सुंदर असे मुखपृष्ठ लाभलेला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संभाजी उद्यान, पुणे येथे चालत असलेल्या उपक्रमासाठी लिहिलेली अर्पण पत्रिका, कविवर्य अरुण म्हात्रे यांची सुंदर प्रस्तावना  आणि डाॅ. श्रीकृष्ण राऊत, प्रदीप निफाडकर, ए के शेख, ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे, शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि डाॅ शेख इक्बाल मिन्ने या सहा मान्यवरांच्या शुभेच्छा लाभलेला हा संग्रह तमाम गझलवेड्या रसिकांना आवडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. डाॅ अविनाश सांगोलेकर यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व लांबत चाललेलं माझं हे पुस्तक परिक्षणाचं लिखाण संपवतो. 



दिवाकर चौकेकर

गांधीनगर (गुजरात)    

Post a Comment

0 Comments