Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मराठी भाषा संवर्धनात गझलेचे स्थान कोणते Gazalkar Badiujjama Birajdar

🌹मराठी भाषा संवर्धनात गझलेचे स्थान कोणते?🌹

मराठी भाषा संवर्धनात गझलेचे स्थान कोणते
गझलकार बदीऊज्जमा बिराजदार



     मराठी भाषेच्या संवर्धनात गझलेचे स्थान मानाचे आहे. तिचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. मराठी भाषेला विकसित करण्यात गझलेची मोठी भूमिका आहे. गझलेची शब्दकळा मराठी भाषेचा लळा लावणारी आहे. तिला समृद्ध करणारी आहे. गझलेतील शब्दप्रधानता भाषेची प्राधान्यता प्रकट करणारी असते. भाषेचे देखणेपण तिचे सौंदर्य हे गझलेतूनच फुलत असते. भाषेशी गझलेची नाळ घट्ट बांधलेली असते. गझलेने मराठी भाषेला अत्यंत उत्कट, उत्कृष्ट आणि उत्स्फूर्तसा भावाविष्कार प्रदान केला आहे. गझलेमुळेच भाषेची उत्तकटता मनाला स्पर्श करते. खोलवर जावून भिडते. मराठी मातीच अस्सल सुगंध गझलेतून दरवळत असल्याने मराठी भाषा सुवासिक बनत चालली आहे. मराठी भाषासंवर्धनात गझलेने गगनभरारी घेतल्याचे सुस्पष्टपणे दिसून येते.


     मराठी भाषेची यथायोग्य जडणघडण, मराठी संस्कृतीचा, प्रकृतीचा परिचय करून देण्यासाठी गझल हा काव्यप्रकारच अधिक पोषक, पूरक, तारक आहे. याविषयी तीळमात्र शंका बाळगण्याचे मुळीच कारण नाही. मराठी भाषेला, साहित्याला लाभलेली गझल ही लाख मोलाची देणगी आहे. गझल या काव्यप्रकारामुळेच मराठी साहित्य बहुश्रुत बनले आहे. मैफलीत गझलेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त, प्रचंड प्रतिसादावरून ही बाब सहजतेने लक्षात येते. गझलेला दिवसेंदिवस प्राप्त होत जाणाऱ्या वाढत्या प्रतिष्ठेमुळे मराठी भाषा अधिकाधिक रसिकाभिमुख होत चालली आहे. हे नाकारून चालणार नाही.


     आज महाराष्ट्रात सर्वत्र गझलमय वातावरण आहे. मराठी भाषेत कवितेची परंपरा फार मोठी आहे. हे मान्यच आहे. गझल हा मराठीत अलीकडच्या कालखंडात रूढ झालेला काव्यप्रकार आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, कवितेच्या तुलनेत गझलेला मिळणारी प्रतिष्ठा, प्रसिद्धी कित्येक पटीने अधिक आहे. मराठी भाषेत आणि जनमानसात गझलेने आपल्या अंगभूत शक्तीने तिचे सन्मानाचे स्थान बरकरार ठेवले आहे. जे काम कवितेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे करता आले नाही. ते काम गझलेले अत्यंत अल्प कालावधीत चोखपणे पार पाडले आहे. गझल या तेजस्वी काव्य प्रकारामुळेच मराठी भाषेला झळाळी प्राप्त झाली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


     मराठी भाषा संवर्धनात गझलेचे स्थान दिवसागणित भर भक्कमच होत जाणार आहे. गझलेत रसिकांना आपल्याकडे खेचून घेण्याची उत्स्फूर्त ताकद आहे. गझलेचा आवाका विस्तीर्ण असल्या कारणाने त्यात विषयाची, आशयाची आणि प्रयोगशीलतेची अजिबात कमतरता नाही. गझल अनेकविध अनुभवातून,  जाणिवातून प्रकट होत जाते. भाषेची म्हणून जी काही वैशिष्ट्ये असतात. भाषेची संस्कृती असते. प्रकृती असते. तिचा रुबाब असतो. सौंदर्यस्थळे असतात. लहेजा, नजाकत असते. यासारख्या सगळ्या जमेच्या बाजू गझलेच्या आकृतिबंधातून मुकर होत असतात. त्यामुळे सहाजिक भाषेचा प्रभाव वाढत जातो. भाषेला वैभव’ सौष्ठव प्राप्त होत जाते. आणि म्हणूनच भाषा संवर्धनाच्या कार्यात गझलेचे स्थान अत्यंत वरच्या क्रमांकाचे आहे. गझलेत शब्दांचा वारे माप वापर करता येत नाही. प्रत्येक अक्षरावर अचूकतेचे बंधन असते. वृत्ताच्या, तंत्रांच्या अनुषंगाने गझलेत येणारे शब्द अचूक असतात. प्रतिमा आणि प्रतीकांची भाषा सूचक असते. शब्दांच्या खोगीर भरतीला शेरात कुठेही जागाच शिल्लक नसते. व्याकरणदृष्ट्याही शब्द शुद्धच असतात. म्हणजेच गझल ही भाषा शुद्धीची चळवळच आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.


     भाषेची सगळीच अवधाने तंतोतंत पाळत गझल सर्वांगाने प्रकट होत जाते. गझलेतील अनेक प्रकार, विविध वृत्ते, चमकृती, त्यातील भावसौंदर्य, नादसौंदर्य, अर्थसौंदर्य, भाषेची नजाकत आणि गोडवा वाढविणारे असते. रसिक गझलेकडे विशेषत्वाने आकर्षित होत जातात. गझलेकडे आकर्षित होणे म्हणजेच त्या भाषेला आपलेसे करण्यासारखेच असते. गझल लिहिण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी आहे. प्रत्येकाच्या प्रतिभेचा वकूब निराळा आहे. अशा तऱ्हेने भाषा संवर्धनात गझलेचे आविष्कारण करता येऊ शकते. यावरून गझलेचा पैस आणखी विस्तारला जाऊ शकतो. गझलेचे स्वरूप हे संवादी असल्याने ती मनामनाला जोडते. भिडते. गझल ही भाषेची वाहक असल्याने भाषा रसिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवावी, हे उत्तरदायित्व गझल नेहमीच पेलत असते. गझल रसिकाभिमुख होणे म्हणजेच त्या भाषेचा स्वीकार होणे होय. मराठी भाषा संवर्धनात गझलेचे नेमके स्थान कोणते याचा सर्वार्थाने विचार करताना ही बाब लक्षात घेणे अपरिहार्य ठरते. रसिकांशी हितगूज करणारी गझल ही भाषेतील भाव-भावनांचे प्रकटीकरण प्रकटीकरण करत असते.


     लिखित आणि मौखिक दोन्ही स्वरूपात गझल भाषेचे संवर्धन करत असते. अदान प्रधानाच्या माध्यमातून भाषेच्या संवर्धनाचा परीघ रुंदावत ठेवते. गझल हा अत्यंत काटेकोर आणि गोळीबंद काव्यप्रकार असल्याने तो सशक्त आणि प्रभावी आहे. काळ कितीही बदलत गेला तरी आव्हानांचे स्तर वाढत गेले तरी गझलेवर मात्र कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होणार नाही. गोठवणारा आघात होणार नाही. गझलेच्या भवितव्यास कोणत्याही प्रकारचा धोका संभावत नाही. गझल सदासर्वकाळ, सदाबहार, जिवंत, रसरशीत राहणार आहे. कारण गझल हा काव्यप्रकार वृत्तबद्ध आणि गेयतेने ओतप्रोत भरलेला आहे. लय, ताल आणि सूर तर तिचा प्राण आहे. त्यामुळे हा काव्यप्रकार कधीही कालबाह्य ठरू शकत नाही.


     काळाची स्थित्यंतरे घडत असली तरी गझल कधीच कोमेजून जाऊ शकत नाही. नवनवीन आव्हाने समर्थपणे पेलत भाषेला विकसित करत गझलेची दमदार वाटचाल कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने गझल सम्राट सुरेश भट यांनी त्यांच्या शेरातून व्यक्त केलेला विश्वास सार्थ वाटल्याशिवाय राहत नाही.



कोटी कंठातून माझी वैखरी घेईल ताना

शब्द हा एकेक माझा वेचुनी घेतील सारे



हा मराठी वैखरीच्या अमृताचा पूर आहे

हा फिरंग्यांच्या गटारी वाहणारा माल नाही



     भाषेचे संवर्धन आणि भाषेचा सन्मान यापेक्षा वेगळा काय असू शकतो. सुरेश भट यांनी त्यांच्या गझलांमधून मराठी भाषेला सदाबहार वैभव मिळवून दिले आहे. गझलेच्या अभिव्यक्तीत भाषेचा सुडौल तिची नजाकत, गझलियत अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवत आली आहे. उर्दू भाषेतील नजाकत मराठी भाषेत येऊच शकत नाही. असा हकनाक डांगोरा पिटणारे महाभागही बऱ्याच ठिकाणी आढळून येतात. परंतु मराठी गझलांमध्ये नजाकत किती ठासून भरलेली असते हे सुरेश भटांच्या या दोन शेरांवरून सहज लक्षात येते. 


     शेर पहा:


अत्तराचा गंध येई अंतराला सारखा!

का तुझ्या हातात आहे मी रुमालासारखा?



शब्द तान्हेलेच माझे! प्यास कोठे भागली?

शोधितो आहे कुणाच्या मी स्वराला सारखा?



     वानगीदाखल दिलेले हे दोन शेर वाचल्यानंतर उर्दू भाषेतील नजाकत मराठी भाषेत येऊच शकत नाही,  असे म्हणण्याची कुणाची बिशाद आहे? लेखनाच्या आणि सादरीकरणाच्या दोन्ही पातळ्यांवर भाषासंवर्धनाच्या संदर्भात सुरेश भटांनी त्यांच्या अस्खलित अस्सल मराठमोळ्या गझलांनी मराठी भाषेला उत्तुंग वैभव आणि लख्ख प्रभाव मिळवून दिला आहे. हे कुणासही मान्य करावे लागेल.


बदीऊज्जमा बिराजदार 

(साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३ 

Post a Comment

0 Comments