• गझल प्रभात • (भाग १३३ )
![]() |
गझलकार चंद्रकांत कदम |
🌹या जिंदगीला मात्र मध्यंतर कुठे?🌹
या भावनांना आपल्या आवर कुठे?
दोघांमधे मग राहते अंतर कुठे?
ये संपवू हृदयातली अस्वस्थता
भेटायचे नाहीच जर नंतर कुठे!
मिळतील मोघम उत्तरे भरपूर पण
बिनचूक माझ्यासारखे उत्तर कुठे?
नाटक सिनेमांच्यामधे असते तरी
या जिंदगीला मात्र मध्यंतर कुठे?
आई हरवता बदलले आयुष्यही
वाकळ हरवली राहिले अस्तर कुठे?
छायेत त्याच्या जग विसावू लागले
माझेच केवळ राहिले अंबर कुठे?
मी राजवाडे बांधले कित्येक पण
माझे स्वतःचे आजही छप्पर कुठे?
नक्की कुण्या दुनिया दिशेने चालली?
समते तुझा नाही कसा जागर कुठे?
अवघ्या जगाचा अन्नदाता मी तरी
दुरडीत माझ्या आजही भाकर कुठे?
लाखो पुढे माना तुझ्या झुकतील पण
दमदार माझ्यासारखी टक्कर कुठे?
करतील जे दु:खास माझ्या बोलके
उरलेत आता भोवती 'शायर' कुठे?
गझले तुझ्या कुठल्यातरी वळणावरी
गवसेल का माझ्यातला 'खावर' कुठे?
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
नांदेड
मो.9921788961
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments