• गझल प्रभात • (भाग ११६ )
![]() |
गझलकार प्रा.सुभाष मगर |
🌹नवा इतिहास घडवावा🌹
वसा सावित्रिज्योतीचा असा रक्तात मिसळावा
जिजाऊ च्या तुम्ही लेकी नवा इतिहास घडवावा
फुलांचे हार गुंफावे जसे नाजूक हातांनी
तशी तलवार फिरवावी तसा पट्टाहि फिरवावा
भरारी उंच घे गगनी तुझे कर्तृत्व झळकू दे
तुला पाहून दुनियेने तुझा आदर्श गिरवावा
नको राहूस अबला तू नको होऊस बिजलीही
दिव्याची ज्योत होऊनी तुझा तू मार्ग उजळावा
असो सामान्य ललना वा असो तू रूपगर्वीता
शिलाचा दागिना ल्यावा शिलाने देह सजवावा
कुणाची माय तू कंन्या कुणाची बहिण तू पत्नी
अशा रेशीम धाग्यांचा रुपेरी गोफ गुंफावा
तुझ्या हृदयात पान्हा पण तुझ्या डोळ्यांत पाणी का ?
कसा हा जन्म नारीचा कुण्या व्याख्येत बसवावा !
सुगंधी हो अगरबत्ती जळावे होऊनी पणती
प्रसंगी आग होऊनी उभा अन्याय जाळावा
कुठेही ना अराजकता कुठे नारीस ना भीती
असा स्वप्नातला भारत अता सत्यात उतरावा
प्रा. सुभाष भि. मगर
मो. ९४२२९४९७८२
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments