🌹गझलेच्या प्रेमात पडा..🌹
![]() |
गझलकारा दिपाली वझे |
बरेच चांगले चांगले लिहिणारे साहित्यिक जेव्हा मला भेटतात तेव्हा त्यांना भावलेले माझे सुट्टे शेर व रचनेतले काही शब्द त्यांच्या ओठांवर येतात तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजते की आपण जे काही लिहितो ते वाचकांच्या ह्रदयालाही भिडतंय.
आपणास कौतुकाची थाप देणारे भेटतात तेव्हा लिहिण्याचा उत्साह अजूनच वाढतो. पण जेव्हा मी असे ऐकते की त्यांना गझल आवडते पण ते लिहू शकत नाहीत. काही जण तर गझलेचे तंत्रही शिकलेले आहेत पण त्यांना हवं तसं लिहिता येत नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की मोकळ्या शब्दांना तोलून मापून लिहिण्यात शब्दांचे अर्थच बदलतात. (बुआ आपल्याला हे काही जमायचे नाही, आपण काही त्या वाटेला जायचे नाही.)
मला वाटते ज्यांना कविता लिहिता येते, स्फुरते त्यांच्यासाठी गझल लिहिणे काही अवघड नाही. चारोळी लिहिताना जसे यमक जुळले पाहिजे. पंचाक्षरी, अष्टाक्षरी लिहिताना जशी मोजकी अक्षरे घेतली पाहिजे अगदी तसेच शब्दांवर मोजक्या अक्षरांचे तसेच मात्रांचे संस्कार करायचे असतात. येथे जरा मेंदूचा व्यायाम आहे कारण गझल ही वृत्तात लिहिली जाते.
वृत्तां बद्दल समजून घेऊ
वृत्त साधारण पणे दोन प्रकाराची असतात. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त
मराठी व्याकरणात १९७ अक्षरगणवृत्ते आहेत तसेच ४६ मात्रावृत्ते आहेत.
प्रत्येक वृत्ताची एक लगावली असते.
मनोरमा, मेनका, मंजुघोषा, व्योमगंगा, मंदाकिनी, आनंदकंद, सौदामिनी हे अक्षरगण वृत्तातील प्रचलित वृत्त आहेत.
मनोरमा - गालगागा गालगागा
मेनका - गालगागा गालगागा गालगा
मंजुघोषा - गालगागा गालगागा गालगागा
व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा
मंदाकिनी - गागालगा गागालगा गागालगा गागालगा
आनंदकंद - गागालगा लगागा गागालगा लगागा
सौदामिनी - लगागा लगागा लगागा लगा
एक मात्रा म्हणजे *ल* ची उदा.
क, ख, ग, घ
लघु अक्षरे - कु, खु, गु, घु
र्हस्व अक्षरे - कि, खि, गि, घि
अ प्रत्यय - प्र, द्र, व्र, दृ, नृ
दोन मात्रा म्हणजे *गा* ची उदा.
का, खा, गा, घा
गुरू अक्षरे - कू, खू, गू, घू
दीर्घ अक्षरे - की, खी, गी, घी
अनुस्वार - कं, खं, गुं, घीं
गालगागा
उदा. धावताना, आसवांच्या, आसमंती, जिंकताना
लगागा
उदा. असावे, नसावे, पुसावे, गिळावे
गागालगा
उदा. कोणासवे, पाण्यातले, साकारले, जाऊ नको
गागागा (दोन लघु अक्षरे *लल* म्हणजे *गा* होते)
उदा. भटकंती, चालावे, अडखळले, भिंतीवर
ललल - ल तिनदा
ल + लल - लगा असे होईल
लगा
उदा. नमन, शरण, चरण, गरम, सहज
अता काही जोडाक्षरे पाहू
जेव्हा - जेव् + हा - गागा
नुस्ते - नुस् + ते - गागा
स्वतः - स्व + तः - लगा
विनम्र - वि + नम् + र
उद्धारक - उद् + धा + र + क - गागागा
व्योमगंगा - व्यो + म + गं + गा - गालगागा
सप्तरंगी - सप् + त + रं + गी - गालगागा
आत्मकेंद्रीत - आत् + म + कें + द्री + त - गालगागाल
पक्षी - पक् + शी - गागा
हस्तक्षेप - हस् + तक् + शे + प
आश्वस्थ - आश् + वस् + स्थ - गागाल
पुन्हा एकदा - लगा गालगा
चल नव्याने गीत गाऊ - गालगागा गालगागा
गझलेत घेतले जाणारे अलामत, कवाफी आणि रदिफ काय असते?
उदा. धावले मी, रंगले मी, दंगले मी, जाणले मी
वरील शब्दात ले मी सर्व ठिकाणी आहे
येथील कवाफी - धावले, रंगले, दंगले, जाणले आहे
येथील रदिफ - मी हा शेपटी सारखा कवाफीच्या मागे आहे.
अलामत - कवाफीच्या आधी येणारा स्वर सर्व ठिकाणी अ आहे. त्यामुळे येथील 'अ' ची अलामत आहे.
रदिफ घ्या वा नका घेऊ.
गझलेची रचना करताना अलामत आणि कवाफीचे असणे आवश्यक असते.
मराठी गझलेत पाच, सात, अकरा, तेरा इत्यादी एकी संख्यात शेर लिहिले जातात. त्यातला पहिला शेर ज्याचे उला वा सानी दोन्हीत कवाफी असणारा मतला असतो. मतला म्हणजे मस्तक. मस्तक विनाचे शरीर नसतं तसंच मतल्या शिवाय लिहिलेली रचना गझल म्हटली जात नाही. जेव्हा शेर लिहिताना उला नसून सानीत मात्र कवाफी घेतली जाते.
उला म्हणजे शेराची वरची ओळ
सानी म्हणजे शेराची खालची ओळ
व्योमगंगा वृत्तातील मतला
गालगागा गालगागा गालगागा गा/लगागा
भावनांच्या उंबऱ्यावर झुंझते आहे कधीचे
भेटले ना मी स्वतःला, शोधते आहे कधीचे..
आपला वेळ खर्चल्याशिवाय आणि अथांग प्रयत्नाशीवाय जीवनात काहीच करणे शक्य नसते.
गझल लिहिण्यासाठी मुळात तंत्र शिकणे महत्वाचे असते तितकेच कवीचे मन संवेदनशील असणेही महत्वाचे आहे. जीवनाला प्रत्येक पास्यातून बघताना तुमचा दृष्टिकोन तुम्ही जगापुढे कसा मांडता हे गझलेचे साधक म्हणून स्वतःला तपासणे आवश्यक असते.
एक चांगला गझलकार नुसत्या प्रेम आणि विरहाच्या गोष्टी करत नाही, तो कधी भावात्मक संवाद साधतो तर कधी समाजाला काही प्रेरक, उद्बोधक देऊ इच्छितो. तो स्वतःच्या अनुभवातून शिकतो आणि शिकवतो. भाषा, व्याकरण, वाक्यरचनेच्या अभ्यासाने व खयालाच्या जोरावर उत्तम गझल तयार होते. त्यामुळे खरेतर गझलेला तारेवरची कसरत म्हणतात.
गझलेचा एक शेर म्हणजे पूर्ण कविता.
गांधर्वी वृत्तातील मतला
गागागागा / गागागा
लिहिता लिहिता बोलत जा,
सांगायाचे सांगत जा
गझलेची मांडणी कविते इतकी अवघड नाही. सोप्यात सोपी मांडणी वाचकांना मंत्रमुग्ध करते.
मोठमोठ्या गझलकारांनाही एक पूर्ण गझल लिहायला कित्येक तास, कितीतरी दिवस तर महिनेही लागतात.
अलीकडच्या धावपळीच्या युगात गझल लिहिणे हा धीराचा भाग आहे. शब्दांना तंत्रात बसवून भावनांच्या युद्धात,
जगाला मंत्र देण्याचा निस्वार्थ हेतू म्हणजे गझल होय.
रूपोन्मता वृत्तातील मतला
गागागागा / गागागागा गा
धीराचा तू बांधत जा सेतू
अवघे जीवन निस्वार्थ हेतू
दिपाली वझे
बेंगळूरू
मो. 9714393969
0 Comments