Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मराठी गजल म्हणजे सुरेश भट Sadanand Dabir

  "मराठी गजल म्हणजे सुरेश भट"

मराठी गजल म्हणजे सुरेश भट


1)  माझ्या वाचनात आलेली काही  माहिती मी स्मरणातून देत आहे ती अशी की,सुरेश भटांनी पहिली गजलसदृश रचना,"का मैफलीत गाऊ" ही १९५४ साली (विद्यार्थी असताना)लिहली होती.ती गजलच्या आकृतीबंधातली कविता होती,असे त्यांनी म्हटलंय. "शेवटी" शीर्षकाची "खरी,व बरी" गजल आपण २०मे १९५७ रोजी लिहिली असे त्यांनी एके ठिकाणी नमूद केलंय.एका अर्थाने २०मे१९५७ हा "ख-या व ब-या" मराठी गजलचा प्रारंभ मानायला हरकत नसावी! म्हणजे मराठी गजल पंचाहत्तर वर्षांची झाली!

     सुरेश भटांनी गजल आणली तेव्हा मा.जूलियन प्रणित गजलचा अस्त होऊन २०/२२वर्षे उलटली होती.भटप्रणित गजल वेगळी व नवीन होती.पुढे भटांच्या प्रेरणेतून,अनुकरणातून,मार्गदर्शनातून काही कवी गजल लिहू लागले.त्यांच्यासमोर एकमेव आदर्श भटांचाच होता.लिहिण्याचे वळण तेच राहिले आणि  मराठी गजल म्हणजे सुरेश भट  हे समीकरण तयार झाले. ते साहजिकच होते.पण इतके की भटसाहेबांच्या निधनानंतर (१४मार्च २००३) नंतर ज्या शोकसभा झाल्या त्यात काही मान्यवरांनी असा सूर लावला की आता मराठी गजल संपली!  कोणी म्हणाले की  "मराठीत गजल फक्त सुरेश भटांनी लिहिली,बाकीच्यांनी लिहून पाहिली!"

खरं तर सुरेश भटां नंतरच्या गजलकार कवींवर हा अन्याय होता.भटांनी रुजवलेले गजलचे अमृताचे रोपटे इतके कमकुवत नव्हते की लगेच मान टाकेल.आज त्या रोपट्याचा वृक्ष झालेला आपण बघतोय.

   आयुष्य छाऽन आहे,

   थोडे लहान आहे!    हा मतला असलेली माझी छोट्या बहरची एक गजल, "आनंद भैरवी" ह्या संग्रहात आहे.(सोमनाथ प्रकाशन.२९मे२०११). ही गजल गेली अनेक वर्षे यू ट्यूबवर सुरेश भटांच्या नावे फिरते आहे!किमान सहा लिंक्स आहेत.तक्रारी करूनही काही झाले नाही.कारण मराठी गजल म्हणजे सुरेश भट.हे समीकरण.

  भटांच्या गजल शैलीत, ..आयुष्य छान आहे बसत नाही. पण मराठी गजल भटांचीच मानली जाते.असो.

2) सुरेश भटांच्या शेरातले तरल भावकाव्य.

    ह्या लेखात आपण भटांचे काही तरल व काव्यमय शेर बघणार आहोत.रूपगंधा पासून ते सप्तरंग ह्या भटांच्या हयातीत निघालेल्या सर्व संग्रहात हा तरल काव्यमय धागा आढळतो. रूपगंधा व रंग माझा वेगळा संग्रहात जास्त. एल्गार पासून भटांची गजल अधिक रोखठोक किंवा loud होत गेली.तरल शेर कमी होत गेले,पण येत राहिले.भटांच्या एल्गार पासूनच्या, "स्व" च्या दुःखाच्या प्रकटीकरणाच्या,आवाजी शैलीचेच जास्त अनुकरण झाले.तरल शेर त्यामानाने दुर्लक्षित राहिले.असे निवडक शेर आपण बघू.

  त्याआधी "तरलता" म्हणजे काय हे बघू. तरलता म्हणजे नाजुक,मुलायम शब्दकळा नाही!   भटसाहेब ज्याला "शब्दखोरपणा" म्हणायचे ते नाही.

तरलता म्हणजे असे सौंदर्य/काव्यमयता की जी 'जाणवते' पण 'दाखवता' येत नाही! थोडक्यात गजल किंवा शेरातले "कवितापण!"  हा शेर बघा,

कोवळ्या लावण्यगंगेच्या मिठीमाजी बुडालो 

बावरे पाते जिवाचे काप-या श्वासात हाले! 

(रूपगंधा) कोवळ्या शृंगाराचा अनुभव तितक्याच कोवळ्या व तरल शब्दात आला आहे. "कोवळ्या लावण्यगंगेच्या", कोवळेपण तर आहेच पण गंगा ह्या शब्दाने पावित्र्य पण आहे.रेशमी मिठीत हरवलो असे म्हटले नाहीय. ती गंगा आहे,म्हणून 'बुडालो' म्हटलंय.कोवळ्या हे विशेषण "लावण्यगंगा" व मिठी ह्या दोन्हीला लागू पडते,व दोन मनोहर अर्थच्छटा खेळवते. जिवाचे बावरे पाते व कापरे श्वास हे शब्द नवथर शृंगारातली थरथर अचूक टिपतात.जणू लावण्यगंगेच्या प्रवाहावरच्या नाजूक तरंगांची जाणीव शब्दाविना करून देतात.ही तरलता!

    दुसरा शेर बघू.एल्गार संग्रहातला आहे.तो असा...

 एक रान श्वासांचे एक रान भासांचे

 भिरभिरे कुण्या रानी,विद्ध पाखरू माझे?

कदाचित हा शेर पटकन आठवणार नाही.पण मतला खूप प्रसिद्ध आहे. तो असा "का म्हणून मी आता शब्द आवरू माझे/त्या विराट सत्याशी बोलणे सूरू माझे."

   तरलता बघण्याआधी एक तांत्रिक माहिती.ही गजल मात्रिक छंदात,भृंगावर्तिनी लयीत आहे.

6-6-6-6 एकूण २४मात्रा. पहिल्याच ओळीत "भिरभिरे कु"...  "ण्या रानी"  असं झालंय.काही स्वयंघोषित गजलगुरु यतिभंगा विषयी फार स्तोम माजवतात,त्यांनी बघावे.यतिभंग हा नगण्य दोष मानला जातो.जर लय अबाधित असेल तर दोष रहात नाही. वरील मिस-यात यतिभंग दोष नगण्य आहे.तेव्हा कृपया नवोदित गजलकारांना चुकीचे शिकवून घाबरवू नका.आधीच मराठीत गजलतंत्र अवघड आहेच.त्यात भर घालू नका.हा यतिभंग भटांनाही मान्य होता/असावा.

  आता शेराकडे वळू.एक रान श्वासांचे...हा शेर तरल आहेच पण "व्यामिश्र" आहे.एक रान श्वासांचे,एक रान भासांचे ह्या प्रतिमा कळल्या सारख्या वाटतात,पण निश्चित अर्थबोध पटकन होत नाही.ते शब्द प्रासादिक नाहीत.पण तरल आहेत.श्वासांचे रान ही प्रतिमा ग्रेसच्या कवितेसारखी गारूड करते.श्वास हा व्यक्तीशी निगडीत---वस्तुस्थिती आहे. तर भासांचे रान, म्हणजे मायावी जगत म्हणता येईल.जे सत्य नाही,त्यालाच भास म्हणतात.आणि विद्ध पाखरू म्हणजे,दुःखाने जायबंदी झालेला मी,किंवा माझे अस्तित्व.(अस्तित्व अशासाठी म्हटले की भटसाहेबांना आत्मा मान्य नव्हता.)एक शारीर सत्य,श्वास,तर एक कल्पनांचे मायावी विश्व,(भास,भासांचे रान.) आणि ह्या दोन्ही रानात भिरभिरणारे मानवाचे जखमी (विद्ध) अस्तित्व! असा एक अन्वयार्थ निघू शकेल.शक्यता अनेक आहेत.ह्या व्यामिश्रतेमुळेच, हा शेर म्हणजे गजलेतली कविता आहे.गजल प्रासादिक हवी,पण काही शेर असेही असू शकतात.आणि ते त्याज्य नसतात.तर रसिकाची कसोटी बघतात.रसिकांनाही आपला आकलन स्तर वाढवायला सांगतात.

3)    हा शेर बघा.संग्रह आहे.."रंग माझा वेगळा" शेर असा.     

व्यर्थ हा तुझा रसरूपगंधांचा अभिसार

.वेच तू वा-यावरी माझे अभागी श्वास

काही कळले? ह्या शेरात तू हे संबोधन कोणासाठी आहे?प्रेयसी,निसर्ग,परमेश्वर, नक्की कोण? आणि माझे श्वास अभागी का आहेत? पुन्हा  ते वा-यावर वेचायचे कसे? हे प्रश्नच गैरलागू ठरावेत इतका हा तरल सुंदर शेर आहे.अर्थ वाचकाने त्याला हवा तसा घ्यावा.ही गजलेतली कविता आहे.आणि बहुरूपिणी गजल अशीही असू शकते.ही गजलच नाही असा ओरडा करण्याचे कारण नाही.

मी(माझे श्वास) अभागी का ह्याचे उत्तर वाचकाने आपल्या अनुभवाने द्यावे.कवी सांगत नाही."तू" संबोधन प्रेयसी साठी घेतले तर,तिच्या रसरूपगंधांचा अभिसार, तिचे भुलवणे व्यर्थ आहे,कारण तो अभागी आहे.प्याला ओठांपर्यंत यावा,पण ओठाला लावण्या पूर्वीच फुटून जावा असे त्याचे नशीब आहे. 

तो अभागी आहे,ती मात्र रसरूपगंधांना उधळते आहे.

हे "नियत" दुःख आहे,म्हटलं तर सा-या मानवजातीचे.

ह्या शेराचे सौंदर्य संदिग्धतेत दडलेले आहे. मात्र केवळ प्रासादिकतेची झापडं ज्यांनी लावली आहेत,त्यांनी ती बाजूला ठेवायला हवीत.

 4)  आता एल्गार संग्रहातला शेर बघू. शेर असा आहे..

नाही म्हणावयाला आता असे करू या

प्राणात  चंद्र ठेवू  हाती  उन्हे  धरू या

हा शेर भावकवितेच्या अंगाने जाणारा आहे. बरेच गायक ही गजल गातातही.एका गायकानेच मला ह्या शेराचा "निश्चित अर्थ" काय असे विचारले.मी सांगण्याचा प्रयत्न केला,पण ना मला सांगता आला,ना त्याला कळला! मला हा शेर कळला नाही असेही नाही.पण सांगू लागलो तर अर्थ निसटला!

दंवाचा थेंब फुलाच्या पाकळीवरच मोती असतो.उचलू गेलो तर हाती येत नाही.झाले तर बोटच ओले होते.म्हणून तर तरल! म्हणून तर ही कविता आणि गजल म्हणजे कवितांची कविता.

 5)         "झंझावात" संग्रहातला हा शेर बघा...

या दुपारी मी कुणाला हाक मारू

ओळखीचे चेहरे वितळून गेले!

चेहरे "वितळून गेले" हे तरल एक्सप्रेशन आहे. विसरून गेले,हरवून गेले कळतं.चेहरे वितळले म्हणजे काय?

मतल्यात जवळून/वितळून हे काफिये आहेत.शेरात "हरवून" चालणार नाही म्हणून वितळून  घेतले,हे भटांच्या बाबतीत संभवत नाही.

   "या दुपारी" शब्दांनी ऊन्ह, उष्णता सूचित होते.उन्हाने  वितळून जाते   ते मेण.

ती  ओळखीची माणसे मेणाची होती.लेचीपेची होती कणखर नव्हती.असे सूचित करायचे आहे का? तो शेणामेणाचा आहे,असा एक वाक्प्रचार बोली भाषेत रूढ आहेच. चेहरे वितळून गेले ही कल्पना हा शब्दप्रयोग भटांच्या प्रतिभेचे सामर्थ्य अधोरेखित करते. शेराला तरल काव्यमयता देते आणि गजलियतही!

6)आता सप्तरंग हा भटांच्या हयातीतला शेवटचा संग्रह. 

त्यातला हा शेर बघा...

फसवून मी स्वतःला फसवायचे किती?

नुसतेच सावल्यांना बिलगायचे किती?

ह्या शेराची पहिली ओळ साधी आहे.प्रस्तावना आहे.

दुसरी ओळ मनाला चटका लावणारी आहे. सावली म्हणजे  nothing substantial. काहीही ठोस नाही,पण आहे.ही ओळ वाचल्यावर फसवणूक अधिकच गडद,गहिरी होते.ह्या सावल्या अतृप्त इच्छांच्या आहेत,की स्वप्नांच्या की आठवणींच्या? काहीही असो.ही जीवनाने (म्हणजे आपणच की) स्वतःची स्वतःच केलेली फसवणूक आहे. कारण हे जगणेच क्षणभंगुर आहे. 

7)   आता भटांचे काही तरल शेर टिप्पणी न करता देतो.

● दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी

.    कधीच गाणे मला तुझे शिंपडून गेले.

.      (नभास झोके, गाण्याने शिंपडणे.)

●अताच रक्तात आठवांनी शहारुनी किलबिलाट केला,

गडे पुन्हा आज डोळियांची तुझ्याकडे पालखी निघाली!

(आठवांचा किलबिलाट,डोळ्यांची पालखी.)

● तू उन्हाची कोवळी भोळी कळी

.    का तुला अंधार माझा सापडे.

(उन्हाची कळी,अंधाराचे "सापडणे")


असो मुद्दा इतकाच की,तरल भावकवितेच्या अंगानेही गजल लिहिली जाऊ शकते.तेही ह्या बहुरूपिणीचे एक रूप आहे. खुद्द भटसाहेबांच्या गजलेत हे तरल,काव्यमय रूप एल्गार पासून कमी होत गेले.व आवाजी(loud) बाज वाढत गेला.पण शेवटच्या सप्तरंग संग्रहातही तो बाज होता.पूर्णपणे नष्ट झाला नाही.

8)   तरल आणि भावकवितेच्या अंगाने जाणारे शेर, गजल, असू शकते, ह्याचा जणू काही विसरच पडला आहे, अशी आजची बव्हंश मराठी गजल आहे.तसे होऊ नये हे सांगण्यासाठी हा लेख लिहिला.जरा काही तरल लिहिले की काही मंडळी  "ही कविता आहे,गजल नाही...  असे म्हणून नवोदितांना घाबरवतात.त्यांनी भटांचे असे शेर बघावेत.आणि नाउमेद होऊ नये.

   आवाजी गजल हे सुद्धा बहुरूपिणी गजलचेच रूप आहे.त्यात काही वावगे नाही.आवाजी गजल ही मुशाय-यात दाद घेण्यासाठी असते.तिथे तरल गजल चालत नाही.तरल गजल शांतपणे वाचायची असते.


9) लेखाच्या ह्या पहिल्या भागात आपण भट साहेबाच्या गजलातली तरल काव्यमयता बघितली.लेखाच्या पुढील म्हणजे दुस-या भागात आपण भटांच्या गजलेतली दार्शनिकता किंवा तत्वचिंतनात्मकता बघणार आहोत. गजल मध्ये दार्शनिकता बोजड न होता,लिरिकल कशी होते तेही बघू या.

      तूर्तास इतकेच. इति लेखनसीमा. 

.           सदानंद डबीर.9819178420 

Post a Comment

0 Comments