• गझल प्रभात • (भाग १३० )
![]() |
गझलकारा यशश्री रहाळकर |
🌹सोबत येते🌹
मोठे असले घर की राखण सोबत येते
अमाप पैसा आणि जागरण सोबत येते
आठवणींचा एखादा ढग फुटून जातो
पाऊस आणि तुझी आठवण सोबत येते
लेक रिकाम्या हाती येते माहेरी अन्..
उरले सुरले तिचे बालपण सोबत येते
एखाद्याला नशीब सुद्धा लमाण करते
जन्मभराची केवळ वणवण सोबत येते
मी हाताला पुसते पण तो मनात उरतो
स्पर्शामधले त्याचे गोंदण सोबत येते
वचने, शपथा नकोस मागू प्रेमामध्ये
व्यवहाराचे नाहक दडपण सोबत येते
फक्त पसारा उरतो बाकी भिंतींमध्ये
ती आली की खुशाल घरपण सोबत येते
देखाव्यागत अवघे जगणे सुंदर होते
डोळ्यांमधले त्याच्या दर्पण सोबत येते
इच्छेपोटी नवीन इच्छा जन्मत जाते
अतृप्तीचे कायम सरपण सोबत येते
यशश्री रहाळकर
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments