कविता विरुद्ध गजल हा संघर्ष मराठीतच का?
1 उर्दू व्यतिरिक्त,हिंदी,गुजराती,सिंधी,पंजाबी,मराठी ह्या भाषांमध्ये गजलसृजन होतेआहे.कन्नडसह अन्य काही दाक्षिणात्य भाषांतही थोड्या प्रमाणात गजल असावी पण मी त्या संदर्भात फारसे जाणत नाही.हिंदी,उर्दूसह मराठी भाषेतले एकत्र मुशायरे (मिलाजुला मुशायरा) झालेले आहेत,होत असतातही.उर्दू व हिंदी अकादमी तर्फे झालेल्या अशा मुशाय-यात मी सहभागही घेतलेला आहे. विशेष म्हणजे अन्य भाषिक कवी अशा मुशाय-यात गजलसह नज्म (कविता), दोहे सुद्धा सादर करतात.कत्आ (मुक्तक) सादर करतात. हिंदीत गीतही गाऊन सादर करतात त्यात कोणाला काही खटकत नाही.मराठीत मात्र कविसंमेलन वेगळे व गजल मुशायरा वेगळा असे चित्र आहे आणि माझ्या माहिती प्रमाणे हे चित्र फक्त मराठीतच आहे.अन्य भाषांत कवी,कवितांबरोबर,गजल,गीत, दोहे असे अन्य प्रकार लिहितात,सादर करतात,ॲप्रिशिएट करतात.मराठीत कविता लिहिणारे व गजल लिहिणारे एकमेकांचा दुस्वास करतात की काय? असे वाटावे अशी परिस्थिती आहे. साहित्यात गद्य आणि पद्य किंवा काव्य असे दोन मूळ प्रकार आहेत.कविता,गीत,गजल,दोहे इत्यादि अनेक हे काव्याचे प्रकार आहेत. प्रत्येक चांगल्या गीतात कविता असतेच हे वाक्य अनेक जाणकारांनी म्हटले आहे. आज ते वाक्य चांगल्या गजलेलाही लागू पडावे.मग गजल विरुद्ध कविता हा संघर्ष मराठीतच का?
ह्याच प्रश्नाचा मागोवा घ्यायचा आहे.मी कोणी साहित्य संशोधक,प्रा.,पी.एचडी वगैरे नाही.हे आधीच नम्रपणे नमूद करतो. पण एक रसिक वाचक,कवी आहे. गीते व गजलही लिहितो.व ते लिहितो म्हणून मला कुठलाही गंड नाही.
2 मित्र हो कविता विरुध्द गजल, हे या संघर्षाच्या हिमनगाचे फक्त टोक आहे. मूळ संघर्ष आहे तो "पाॅप्युलर पोएट्री"/लोकप्रिय कविता विरुध्द "प्युअर पोएट्री"/शुद्ध कविता.त्यासाठी आपल्याला १९६०सालाच्या आधीपर्यंत जावं लागेल.ती कविता छंद वृत्त,यमक सांभाळून लिहिलेली,पाठांतर सुलभ,थोडी रंजक होती.त्याकाळी साक्षरता व महाविद्यालयीन शिक्षण तुलनेने कमी होते.कवितेचा "वाचक" संख्येने नगण्य होता.कविसंमेलनाला श्रोत्यांची गर्दी असायची,पाडगावकर,बापट करंदीकरांचे काव्य वाचन तुफान लोकप्रिय होते.मर्ढेकरांनी नवकविता आणली होती,मात्र ती छंदोबद्धच होती,त्याची कथन शैली,विषय,प्रतिमा,शब्दकळा हे "नव" होते.उदा. पंक्चरलेली रात्र दिव्यांनी ही प्रतिमा.
दुसरा एक वर्ग होता,जो पाश्चात्य वाङमयाच्या वाचनाने भारलेला होता.भालचंद्र नेमाडे सर तर इंग्रजीचे प्राध्यापक होते.ह्या वर्गाला मराठी कविता जागतिक पातळीच्या तुलनेत खुजी वाटली असावी.नेमाडे,चित्रे,कोलटकर...हा एक वेगळा "क्लास" होता. पु.शि.रेगेंची अल्पाक्षरी कविता बौद्धिक वर्गाने उचलून धरली. नामदेव ढसाळांची दलित कविता दुर्बोध नव्हती पण ती अंगावर येणारी होती जी सामान्य मध्यमवर्गीय रसिकाला झेपणारी नव्हती,त्यांची धाव नारायण सुर्वेंपर्यंतच होती. इकडे ग्रेस हा त्याच्या दुर्बोधतेमुळे त्याच्या शैलीचा,एकांडा शिलेदार होता.
ह्या मंडळींना त्याकाळी रूढ असलेली कविता दखलपात्रच वाटली नाही.छंदवृत्त जुनाट ठरले.फ्री व्हर्स उचलली गेली.अनिलांनी आणलेला मुक्त छंदही,छंदच होता पण जरा मुक्त असा.त्यांनी छंदाची पोलादी चौकट झुगारली पण,लय,ताल कायम ठेवले.मुक्त छंद गद्य नव्हता,हे लक्षात घ्या.ह्या मंडळींनी मुक्त गद्य आणले.त्याकाळतली काही कवींची मतं बघा.
१.कवी लोकप्रिय झाला की संपला.
२.कविता समजली नाही तर पुन्हा वाचा,त्याचा अर्थ समजावून सांगणं हे कवीचं काम नाही
३.मराठीने कवितेचे बघ्ये निर्माण केले.(वाचक नाही)
४.यमक,अनुप्रासादि अलंकार कवितेला मारक आहेत.निर्यमक कविता हवी.वगैरे.
त्याकाळच्या समीक्षेचे दंडकही ब-याच प्रमाणात पाश्चात्य होते. ह्या मंडळींतले बरेच उच्च बुद्धीजीवी होते,अनेकजण प्राध्यापक होते,काही तर इंग्रजीचे प्राध्यापक होते(नेमाडे,ग्रेस).त्यांचा शुद्ध कवितेचा विचार व आग्रह चूक की बरोबर हा प्रश्न आता निरर्थक आहे.पण वातावरण भारलेलं होतं.विरुद्ध बाजू आचार्य अत्रेंनी लावून धरली होती.त्यांनी सत्यकथा पुरस्कृत कवी व कवितेवर टीका केली.पु.शि.रेग्यांच्या "हात,हातावर हात" अशी सुरुवात असलेल्या कवितेचे मराठा वृत्तपत्रात वाभाडे काढले. मात्र जसजशी विद्यापीठे व महाविद्यालये वाढू लागली तसतशी कविता ही प्राध्यापक मंडळीच्या आधीन होत गेली.थोडक्यात ॲकेडेमिक होत गेली.सामान्य वाचक/रसिकांपासून तुटत गेली.सामान्य रसिकांना गदिमा महाकवी वाटायचे,आजही वाटतात ते कवीच नाहीत,असे हे नवे लोक म्हणू लागले.रंजकता हे कवितेचे भूषण न मानता दूषण मानले गेले.हीच कविता विद्यापीठात,शिकवली चर्चिली गेली,मोठी केली गेली कारण विद्यापीठे व समीक्षा प्रा.व डाॅ.मंडळीच्या हातात होती. कुसुमाग्रज,बोरकर, करंदीकर,बापट,पाडगावकर असे बुजुर्ग कवी आपले स्थान राखून होते,नाही असे नाही...पण दुर्लक्षित व्हायला सुरुवात झाली होती.नव्या मंडळींची भावना आपण जगाच्या बरोबर चालायला हवे,पारंपरिक अभिव्यक्तीला चिटकून राहिलो तर जगाच्या मागे पडू अशी असावी.
कारणे काही असोत सर्वसामान्य माणूस कवितेपासून दुरावला,तुटला.हे खरे.कविता एका विशिष्ट बौद्धिक वर्गाच्या ताब्यात गेली.हे मराठीत ज्या प्रमाणात घडले त्या प्रमाणात इतर भाषांत घडले नाही.हरिवंशरायांचा,दबदबा कायम राहिला.मधुशाला उचलली गेली.साहिरलुधियानवी चित्रपट गीते लिहितात म्हणून त्यांना उर्दू साहित्यिकांनी बहिष्कृत केले नाही.हा चुकीचा संघर्ष,दुरावा व दुराग्रह मराठीतच टोकाला गेला.
3 भटांचा पहिला संग्रह(रूपगंधा/1961) तसा पारंपरिक कवितेचा होता,त्यात तीन गजला होत्या.त्या संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तो दिलीप चित्रेंच्या संग्रहाबरोबर विभागून.(असे वाचल्याचे स्मरते)ह्याचा अर्थ वातावरण इतके बिघडले नव्हते.समोतल राखला होता.
पुढे रंग माझा वेगळा संग्रह आला बहुसंख्य गजला असलेला.त्याला पु.लं.ची प्रस्तावना व साक्षात गानसरस्वती लता मंगेशकरांची भलामण लाभली.पु.लं.नी प्रासादिक कविता संपली नसल्याचे म्हटले,त्यांनी नव्या कवितेलाही वाईट म्हटले नाही तर नवी कविता डोळ्यांवाटे रसिकांपर्यंत पोचते तर अन्य कविता कानांद्वारे पोचते...असा मौलिक फरक सांगितला.पुढे भटांनी गजलचा प्रचार प्रसार करायचे जीवनव्रत स्वीकारले.अनेक कवींना मार्गदर्शन केले,गजलची बाराखडी प्रकाशित करून वाटली.तोपर्यंत लोक साठोत्तरी नीरस कवितेला,जीवन पराङमुख व अहंमन्य वृत्तीला कंटाळले होते. ती कविता त्यांना भिडतच नव्हती.अशा वातावरणात गजल उचलली गेली.त्यातली प्रासादिकता,शब्द लालित्य,काफिया येताच होणारा स्फोट,विरोधाभास,उपरोध,उपहास,त्यातली जीवन सन्मुखता लोकांना आवडली.त्यात भटांचे बिनधास्त कलंदर व्यक्तिमत्व,गजल गाऊन सादर करायची पद्धत,ह्या सर्वांनी गजल माहोल तयार झाला.एकट्या सुरेश भटांचा,तिकीट लावून केलेला गजल सादरीकरणाचा कार्यक्रम हाऊस फुल्ल होऊ लागला आणि साहजिकच गजलला विरोध सुरू झाला.अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन,गजलला भटांचा भटारखाना असे हिणवले गेले.रंग माझा वेगळाची पहिली आवृत्ती मौज प्रकाशनाने काढली होती हे विशेष!(१९७४साली).
4 होता होता हा विरोध इतका वाढला की १९८८ साली ठाण्याला,अ.भा.मराठी साहित्य संमेलनात(अध्यक्ष वसंत कानेटकर) एक परिसंवाद झाला,त्याचा विषय होता गझलचे मराठी कवितेवर आक्रमण होत आहे का? असा काहीतरी.
ह्या परिसंवादात अक्षयकुमार काळेंनी गजलची व सुरेश भटांची बाजू लावून धरली.अन्य वक्ते व त्यांचे मुद्दे मला उपलब्ध झाले नाहीत.पण शंकर वैद्य सर परिसंवादाचे अध्यक्ष होते व त्यांनी आक्रमण नसून मराठी काव्याचे दालन समृद्धच होईल असा आशावाद व्यक्त केला होता.
हा सर्व वृत्तांत ठीकच आहे,मुद्दा असा की गजल विरुद्ध कविता हे वातावरण कसे पद्धतशीरपणे तापवले जात होते ते लक्षात घ्या.अशा विषयावर साहित्य संमेलनात परिसंवाद होऊच कसा शकतो? आणि हे फक्त मराठीतच होते.अन्य भारतीय भाषांत कविता व गजल सुखाने एकत्र नांदत होते.
5 उर्दूतही केवळ गजल लिहिणारे शायर (गजलगो), आहेत नाही असे नाही पण त्यांचे प्रमाण नगण्य आहे.एकदोन टक्के असावे.तर मराठीत केवळ गजल लिहिणा-या कवींचे प्रमाण बरेच अधिक म्हणजे २५/३० टक्के असावे. कविता गजलचा संघर्ष मराठीत तीव्र होण्याचे हेही एक कारण असावे.
6 सुरेश भट उच्च प्रतिभा लाभलेले कवी होते,पण मराठी सारस्वतांनी त्यांची अवहेलना केली,त्यांचा संताप होणे साहजिक होते.सुरेश भट अधिकाधिक आक्रमक झाले.त्यांनी प्रसंगी कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही,त्यांचा उग्र स्वभाव...उर्मट वाटावा असा झाला,अर्थात ती बेधडक कलंदर वृत्ती,वर्तनशैली त्यांनाच शोभायची.इतर काहींनी भटांच्या ताकतीची प्रतिभा नसताना,त्यांच्या वर्तनशैलीचे अनुकरण केले. त्यामुळे एकूणच गजलकारांवर अहंमन्य व उर्मटपणाचा आरोप झाला.आम्ही गजल लिहितो म्हणजे कोणीतरी विशेष आहोत,असा गंड किंबहुना तशी प्रतिमा तयार झाली.व इतर कवींचा रोष त्यांनी ओढवून घेतला.
वाईला झालेल्या गजल संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून(२००६) डाॅ.राम पंडितांनी इशारा दिला होता की गजल हा कवितेचा एक फाॅर्म आहे.आपण गजल लिहितो म्हणजे कोणी विशेष आहोत असे समजू नका.
हा उर्मटपणाही एक कारण असावे संघर्षाचे.
7 मराठीत तंत्रशुध्द व मंत्रसिद्ध गजल सुरेश भटांनी आणली व रुजवली.गजल चळवळच उभारली.ते कविता,गीत,गजल असे सर्व प्रकार स्वतः लिहायचे. संग्रह काढताना कवीने फक्त गजल संग्रह न काढता,कविता, गीत असे अन्य प्रकार थोडे तरी घ्यावे असे सांगायचे.त्यांनी स्वतःच्या संग्रहात हे पाळले.
तसेच गजलचे स्वतंत्र मुशायरे करू नका,कवी संमेलनातच भाग घ्या,तिथे गजल सादर करा,चांगली गजल हटकून बाजी मारेल.स्वतंत्र गजल संमेलनाला भटांचा विरोध होता.भटांना गजल मुख्य प्रवाहापासून तोडायची नव्हती.गजल ही कविताच आहे. खरे तर पाच किंवा अधिक कवितांची कविता आहे.असे त्यांनी लिहिले आहे.
पण गजल "चळवळ" झाल्यावर भलेबुरे परिणाम अपरिहार्य होते.भटांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून गजलसागर प्रतिष्ठानने पहिले गजल संमेलन मुंबईला २००१ साली घेतले.कविता व गजल मध्ये इथून दरी वाढायला सुरुवात झाली.सुरेश भटांच्या हयातीत हे संमेलन झाले,पण ते अध्यक्ष नव्हते,कारणे काहीही असोत.अन्य कोणी कवी/गजलकार/साहित्यिकही अध्यक्ष नव्हते.तर गायक भीमराव पांचाळे,(गजलसागर प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा) स्वतःच अध्यक्ष होते!
2001ते आजवर साधारण आठनऊ संमेलने झालीत.पहिल्या संमेलनापासून अन्य कवींची व संस्थांची स्वाभाविक प्रतिक्रिया हीच होती की,आता गजलकारांनी स्वतंत्र संमेलनेच घ्यावीत. कविसंमेलनात किंवा साहित्यसंमेलनात,गजलकारांना बोलावण्याचे कारणच काय?
दुसरीकडे गजलकारांचं म्हणणं की साहित्य संमेलनात आमंत्रित कवींना गजल वाचायची अनुमती दिली जात नाही.
ह्या वादाला अंत नाही.एकदा दरार पडली की दरी व्हायला वेळ लागत नाही.वेगळा सुभा थाटल्याने असावे कदाचित पण गजल संग्रह किंवा काही गजला असणारे काव्यसंग्रह महत्त्वाच्या पुरस्कारांपासून दूर ठेवले गेले.
8 सर्वात महत्वाचा पुरस्कार साहित्य अकादमीचा.
मी काही मान्यवर ज्येष्ठ कवी,समीक्षकांशी काही वर्षांपूर्वी बोललो होतो.त्यातले काही पूर्वी साहित्य अकादमीवर होतेही.काव्यसंग्रहाच्या पुरस्कारासाठी गजल काव्यसंग्रह का ग्राह्य धरले जात नाही,हा माझा प्रश्न होता.प्रथम मला उत्तर मिळाले की गजलचे "जाॅनर" वेगळे आहे.
मी सांगितले की हिंदी,उर्दू,गुजराती भाषांतल्या साहित्य अकादमी पुरस्कृत संग्रहात, नज्म/कवितांच्या जोडीला गजलही असतात.जर ह्या भाषांमध्ये गजलचे "जाॅनर" वेगळे नाही,तर मराठीतच ते वेगळे कसे? ह्यावर काहीतरी गुळमुळीत उत्तर देऊन माझी बोळवण केली गेली.
मराठीतल्या महत्वाच्या कवी,समीक्षकांनी गजलला अजूनही मनोमन मान्यता दिलेली नाही.हेच खरे कारण आहे.गीतकारांना जसे कवी म्हणून कायम डावलले गेले,तोच न्याय आता गजलकारांना लावला जातो आहे.
ह्याचेही एक कारण असे की मान्यवर समीक्षक गजल संग्रहावर काही लिहितच नाहीत.कदाचित तांत्रिक बाबींबद्दल पूर्ण ज्ञान नसणे हा एक मुद्दा असू शकतो.दुसरे असे की गजल हे प्रासादिक काव्य असल्याने ते, ये हृदयीचे,ते हृदयी जाते.समीक्षकांना त्यावर काही विद्वतजड मल्लीनाथी करायला वाव नसतो.समीक्षाच नाही,परिणाम स्वरूप गजल काव्य संग्रह दुर्लक्षिले जातात.
9 मराठीतले गजलकाव्य संग्रह,राज्य सरकारच्या व साहित्य अकादमी पुरस्कारासाठी का ग्राह्य धरले जात नाहीत? हा प्रश्न गजलसाठी काम करणा-या संस्थांनी,शासनाकडे व साहित्य अकादमीकडे धसास लावायला हवा.
10 काही गजल संस्था, गजल संग्रहाला पुरस्कार देतात,काव्यसंग्रह पुरस्कारांत गजलला डावलल्याने असेल कदाचित आता,त्यांची अट असते की संग्रहात गजल व्यतिरिक्त इतर काव्य प्रकार नसावेत.
मला वाटते अमुक इतकी संख्या गजलांची असावी हे ठीक.किंवा किमान दोन तृतियांश गजला असाव्यात असा नियम ठीक आहे.पण संग्रहात अगदी ९९गजला व १ कविता असली तरी संग्रह स्पर्धेतून बाद करायचा हे मला तरी पटत नाही.अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.मतभिन्नता असू शकते ती मान्यच.
11 अ.भा.म.साहित्य संमेलनात अधूनमधून निमंत्रित कवींनी कविसंमेलनात क्वचित गजला सादर केल्या आहेत.नाही असे नाही.परंतु तो अपवाद.एरवी ही दरी वाढतच चालली आहे. स्वतंत्र गजल संमेलने होत आहेत, कदाचित होत राहतीलही!
पण हा गजल /कवितेचा मराठीतला संघर्ष लौकरात लौकर संपावा अशी प्रार्थना करू या.कारण अंतिमतः हे मराठी काव्यासाठी हितकारक नाही.
12 एक खुलासा आवश्यक आहे. वर नव कविता प्रकारावर लिहिले आहे ते सर्व साधारण निरिक्षण आहे.कुठल्याही कवीवर वैयक्तिक टीका टिप्पणी नाही.मला स्वतःला अरूण कोलटकर,कवी म्हणून खूप आवडतात,श्रेष्ठ वाटतात.ग्रेस पूर्ण आकलन होत नसले तरी त्यांची कविता माझ्यावर गारूड करते.मात्र त्याचबरोबर सुरेश भटांसह अन्य अनेकांची गजलही आवडते. मला वाटते ख-या रसिकाची हीच वृत्ती त्याला निरोगी रसिक बनवते.
आपण चांगले रसिक व्हायला काय हरकत आहे?
इति लेखनसीमा.
. ● सदानंद डबीर,९८१९१७८४२०.
. ¤¤¤¤¤¤¤
0 Comments