🌹पुस्तक परिचय 🌹
🌹" वृत्तबध्द कविता ते गझल ( तंत्र आणि मंत्र ) 🌹
रसिक मित्र हो नमस्कार,
मी करुन दिलेले पुस्तक परिचयाचे लेख आपण वाचत आहात, ते आपणांस आवडत आहेत व तशा प्रतिक्रिया देखील आपण पाठवत आहात हे पाहून माझे लेखन सार्थकी लागत असल्याचे समाधान वाटते आहे व त्या आनंदातच आजचे हे पुढचे पुष्प आपणासमोर सादर करतो आहे.
कोकणासारखा हिरवागार निसर्ग लाभलेल्या परिसरात मुळ गाव असलेले, कोकणातच जन्म झालेले, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मसुरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग )आणि मालवण येथे घेतलेले, नोकरी निमित्ताने मुंबईत आलेले व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले, कवितेच्या वेडापायी माझ्याशी ओळख झालेले पण अजून पर्यंत एकदाही प्रत्यक्ष भेट न होऊ शकलेले माझे मित्र गझलकार श्री विजय जोशी (विजो) यांचा पाच पुस्तकांचा संच नुकताच मिळाला आणि अगदी साहजिकच मला सर्वात जवळ असलेल्या विषयावर लिहिलेलं "वृत्तबध्द कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)" या संदर्भ ग्रंथावर काहीतरी लिहावं अशी एक आंतरिक भावना निर्माण झाली.
" एक गझलकार हा मुळात एक चांगला कवी असावा लागतो " असे म्हणतात आणि या गोष्टीचा प्रत्यय मला या पुस्तकाचे प्रत्येक पान उलटत असतांना येत होता. कविता म्हणजे काय ? हे सांगत असतांना, 'आपल्या आधीच्या पिढीतल्या तसेच इतर मान्यवर कवींच्या कविता आपण वाचल्या पाहिजेत, सर्व प्रकारात लिहिलेल्या कवितांचा अभ्यास करायला हवा, कविता चालीत म्हणायला शिकलं पाहिजे, कविता गुणगुणायला हव्यात आणि मगच वृत्तामध्ये कविता लिहायला सुरुवात केली पाहिजे' असे श्री. विजय जोशी जेंव्हा सांगतात तेंव्हा हा असा मोलाचा सल्ला ते स्वत:ला आलेल्या अनुभवातूनच देत असावेत असे अगदी सहजपणे लक्षात येते आणि हे काही प्रमाणात का होईना पण अगदी खरे आहे.
शाळेत शिकत असतांना पाठ्यपुस्तकातील मान्यवर कवींच्या कविता या लयीत लिहिलेल्या असायच्या म्हणून त्या पाठ होत होत्या आणि अशा एका लयीत म्हणण्याच्या सरावामुळेच पुढे वृत्तबध्द कविता व त्यानंतर गझलचा अभ्यास सुरु केला असेही ते मनापासून सांगतात.
हा संदर्भ ग्रंथ वाचत असतांना सारखे सारखे असे जाणवत होते की, श्री. विजय जोशी हे एक " हाडाचे शिक्षक " आहेत आणि तसे असणेही अगदी साहजिकच आहे म्हणा, कारण त्यांचे आई आणि वडील हे दोघेही शिक्षकच होते आणि " शिकवण्याचे हे बाळकडू त्यांना त्यांच्या आई - वडिलांकडूनच मिळत गेले असावे " इतके हे पुस्तक सूत्रबध्द व शिस्तबध्द पध्दतीने रसिकांसमोर सादर करण्यात आले आहे असे दिसून येते.
अक्षरच्छंद, छंद, वृत्त, गझल, मुक्तछंद अशा सगळ्याच प्रकारात कविता लिहिता आली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन करण्यासही श्री.विजय जोशी विसरत नाहीत. कवितांचे विषयसुध्दा वेगवेगळे असावेत, प्रेम किंवा निसर्ग याशिवाय अन्य विषयांवरही कविता लिहिता यायला पाहिजेत. त्यासाठी इतरांच्या कविता वाचणे, अवांतर वाचन करणे आवश्यक आहे असेही ते सांगतात. मराठी व्याकरण, -हस्व-दीर्घ यांचा काटेकोर अभ्यास करण्यासाठी एखादे व्याकरणाचे पुस्तक व एखादा मराठी शब्दकोश संग्रही ठेवण्याचा आग्रही सल्ला सुध्दा ते देतात. आजकाल रूढ होऊ लागलेल्या प्रथेप्रमाणे, मनात आलं, टाईप केलं आणि "पोस्टलं" असं करु नये, तर आपली कविता १०/१२ वेळेस कागदावर लिहून काढावी, असंख्य वेळा ती वाचून काढावी, नंतर स्वत:लाच ती भावते का ? हे पहावे आणि जर ती भावत नसेल तर कवितेवर पुन्हा पुन्हा संस्कार करावेत असा मोलाचा तसेच महत्वाचा पण सबुरीने वागण्याचा सल्लाही ते देऊन जातात. कविता लेखनाबरोबरच सादरीकरणासाठी अभ्यास, सराव करावा असा सल्ला द्यायला सुध्दा ते विसरत नाहीत व हे कवितेचा एक अभ्यासक या नात्याने मी आपल्यासमोर मांडतो आहे असेही ते बोलून दाखवतात.
एका गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे कोकणातील माणसं साधीभोळी असतात, त्यांच्या काळजात शहाळी भरलेली असतात तर जिभेवर फणसाचे गोड गोड गरे असतात असा एक छान अनुभव ते देऊन जातात असे मला श्री.विजय जोशी यांचे बाबतीत सांगावे वाटते.
मात्रा, त्या मोजण्याचे नियम, वृत्त विषयक संकल्पना, मात्रा वृत्त, वृत्तात लिहितांना घ्यावयाची काळजी, मात्रा जुळवण्यासाठी -हस्व-दीर्घाची घेतली जाणारी सुट, यति याबाबतची उदाहरणांसहितची माहिती इथे दिलेली आहे, मात्र गरज आहे ती फक्त ही माहिती वाचण्याची व तिचा अभ्यास करण्याची....!
अक्षरच्छंद रचना म्हणजे काय ? अक्षरगण वृत्त यांची उदाहरणांसह माहिती दिल्यानंतर गझल, गझलेचे तंत्र, गझलेचे वृत्त, यमक, अंत्य यमक, अलामत याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. विविध वृत्तांची माहिती, गझलेची वृत्त लगावलीसह अनेक उदाहरणे दिलेली असल्यामुळे नव्यानेच गझलेचा अभ्यास सुरु करणारांना हा अभ्यास ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल असा मला विश्वास वाटतो.
मुक्तछंद काव्य रचना, कविता तसेच गझल सादरीकरण सुंदर व्हावे यासाठी विशेष काळजी घ्यावी. इतरांचे साहित्य सुध्दा वाचले पाहिजे तसेच त्यावर अभिप्राय देणे सुध्दा आवश्यक आहे असे सांगतांना, अशा वाचनातून आपण कुठे आहोत ? काय लिहित आहोत ? साहित्य क्षेत्रात काय चालू आहे ? कसं लिहिलं जात आहे ? याची माहिती आपल्याला मिळते व आपल्या विचारात आणि लिखाणातही त्यामुळे प्रगल्भता येत जाते असे श्री विजय जोशी सांगून जातात.
विजो यांचे हे पुस्तक म्हणजे नवोदित कवींसाठी एक अमुल्य असा संदर्भ ग्रंथ आहे. गेल्या वर्षभरात या पुस्तकाची एक हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपून, आता दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
या दिशादर्शक पुस्तकासोबत विजो यांचे अन्य चार कविता संग्रह सुद्धा प्रकाशित आहेत. विजो नवोदित कवींसाठी वृत्तबद्ध कविता आणि गझल संबंधी तंत्र शिकविणाऱ्या कार्यशाळा घेत असतात. राज्यात, राज्याबाहेर, देशात परदेशात विजो यांचे अनेक विद्यार्थी आज उत्तम प्रकारे वृत्तबद्ध कविता लिहिताना दिसतात. अनेक साहित्यिक संस्थांवर विजो सक्रिय कार्यरत आहेत. साहित्यातील अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे. 'काव्यगुरू' या उपाधीने विजो सन्मानीत आहेत.
'वृत्त बद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)'अशा प्रकारच्या एखाद्या संदर्भ ग्रंथाची गरज आहे असा विचार माझ्याही मनात अनेक वेळा डोकावून गेला होता. श्री. विजय जोशी यांनी नेमका माझ्या मनातला हाच विचार ऐकला असावा व या ग्रंथाची निर्मिती केली असावी असेच मला आता वाटू लागले आहे आणि म्हणूनच अशा प्रकारची आवश्यक ती सर्व माहिती साध्या, सोप्या व सरळ शब्दांत करुन देणा-या श्री. विजय जोशी यांना शुभेच्छा देतो, नवोदितांना या ग्रंथाचा उपयोग व लाभ व्हावा अशी आशा व्यक्त करतो व माझे हे पुस्तक परिचयाचे हे लिखाण इथेच थांबवतो .....!
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
मो. 9723717047.
0 Comments