Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मातीच्या भरवशाने 'प्रश्न टांगले आभाळाला' Badiujjama Birajdar

 🌹पुस्तक परिचय 🌹


मातीच्या भरवशाने 'प्रश्न टांगले आभाळाला'


🌹मातीच्या भरवशाने 'प्रश्न टांगले आभाळाला' 🌹



       नितीन देशमुख हे गझलेच्या नभांगणातील एक लखलखतं नाव. ज्यानं आपल्या एकसारख्या तळपत्या प्रतिभेनं वसलंय स्वतंत्र गझलेचं गाव. या गावात आपणास काय काय नाही भेटते, काय काय नाही भिडते. इथं आहेत आठवणी मोरपंखी… इथं आहे गझलेवरील श्रद्धेची पालखी… इथं आहे विविधांगी भावभावनांचा रंगकल्लोळ... इथं आहे काळजातून फुटलेल्या शब्दांचं मोहोळ... इथं आहे आभाळमातीचं आदीम नातं... प्रश्नांचं अव्याहत फिरत राहतं जातं... प्रश्न आभाळाला टांगलेले असले तरी उत्तरं गवसतात मातीवरती... आभाळाचे किती-किती प्रश्न कवेत घेत असते धरती... आभाळाच्या प्रश्नांचा जीव टांगणीला लावणं हा मातीचा नसतो धर्म... त्यांची सोडवणूक करणं हेच असतं तिचं कर्म... प्रश्न कितीही उत्तुंग असले तरी पेरलेल्या जिवाची सल जाणून असते माती... सर्जनाच्याबाजूनं नेहमीच असते धरती... स्वप्नांची पिकं आभाळ भेटीला येतात पत्थराची फाडून छाती... त्यामधूनच फुलत जाते शब्दागणिक गझल... मातीपासून आभाळापर्यंत करत मजल दर मजल…


     नितीन देशमुख हे विदर्भातील एक संवेदनशील, प्रतिभावान गझलकार आहेत. 'प्रश्न टांगले आभाळाला' हा त्यांचा गझलसंग्रह प्रकाशित झालाय्. गझलेचे सारे पारंपरिक संकेत अन् त्यातील तंत्रशुद्धता त्यांच्याजवळ आहेच. त्याबरोबर त्यांनी उघड्या डोळ्यांनी केलेलं समाजाचं निरीक्षण, जीवनाचं आकलनही त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे त्यांची गझल जगण्याला भिडते. आशय अन् विषयाच्या अंगांनं श्रोत्यांना भेटते. अस्सल अनुभवाचं सर्जन जिथं प्रकर्षानं प्रकट होतं तिथं लोकमान्यतेची मोहोर उमटल्याशिवाय नाही राहत. देशमुख यांना याचा सातत्यानं प्रत्यय येतोय. त्यांची गझल स्वतःबरोबरच लोकांशी संवाद साधत असते. लोकांच्या मुक्या व्यथेला गझलेत गुंफणं, दुःखाला गावून बोलकं करणं कंठातला हुंदका मोकळा करणं हीच त्यांच्या गझलेतील गझलियत आहे. महाराष्ट्रातील गावोगावीच्या कविसंमेलनातून, गझल मुशाऱ्यारातून समाजाची सुख-दुःखं नितीन देशमुखांची गझल. वाचत अन् वेचत आलीय्. म्हणूनच तिच्या आशयाचा प्रदेश अनिर्बंध पसयतोय. त्याची मौलिकता दिवसेंदिवस वाढतच चाललीय्.


         त्यांच्या गझलांचा वेगळा बाज आहे. निराळा आवाज आहे. आवाज निराळा असला की त्यातील कंठभूत ध्वनी ऐकणाऱ्यांचे होऊन जातात. त्यातला झंकार दीर्घकाळ स्मरणात राहतो. नितीन देशमुख हे अशा कंठध्वनीचे धनी आहेत. सकस लिहिणं अन् उत्तम गायनानं गझल श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं, या दोन्ही अंगानं त्यांची गझल फुलत, झंकारत आहे. पेज अन् स्टेज दोन्हीकडं त्यांचा बरोबरीनं वावर आहे. ही हातोटी फार कमी गझलकारांना साधता येते. देशमुख यात आघाडीवर आहेत.


        प्रेमभावना हेच यांच्या गझल गाण्याचं, सादरीकरणाचं प्रयोजन आहे. हे प्रयोजन नवतंत्रज्ञानाच्या प्रयोगातून अधिक विकसित होत आहे.


मी गझल का गात आहे

मी तिच्या प्रेमात आहे


            अशी ती प्रांज्जळ कबुलीही ते देतात. ज्याच्या अंत:करणातून प्रेमाचा झरा फुटत असतो. तोच सर्वार्थानं समृद्ध असतो. हे जगण्यावरील सौंदर्याचं सुंदररूप असतं. सुंदर समाजरचनेचं स्वप्न गझलकारांच्या डोळ्यांना आपलसं वाटत आलंय्. या स्वप्नांच्या परिपूर्तीसाठीच त्यांची अखंड गझलसाधना सुरू असते. याच मनोधारणेनं गझलकार नितीन देशमुख यांचं गझल लेखन अन् गायन घडत आहे. ही शब्द-सुरांची सफर त्यांचं सुरेल आयुष्य घडवत आहे. यातला सखोल अर्थ त्यांना आतून जाणवत राहतो. हे सगळं उद्याही असंच अबाधित राहणार आहे. ते कधी अर्थहीन होऊ नाही शकत. याला पुष्टी देताना ते म्हणतात.



आयुष्याचे गाणे गेले जर टिपेला

नश्वरतेला मरतानाही अर्थ असतो



       निसर्गाच्या नीती नियमांना झाडं बांधील असतात. पानगळ झाली म्हणून झाडं कधीच आकांत नाही करत. पानगळीनंतर पुन्हा नव्यानं फुलणं, बहरणं सुरू होतं. याची त्यांना उपजत जाणीव असते. जाणीव परिपक्व असली की कोणत्याही भीतीचं कारण नाही उरत. वरवर पानगळ दिसत असली तरी देठांना अर्थ असतोच. हा अर्थ शाबूत असतो. तो कुणालाही हिरावून नाही घेता येत. देठांच्या अर्थातून पुन्हा समृद्धीची सृष्टी नवं रंगरूप लेवून माणसांच्या दृष्टीला सुखावत असते. पिकलेल्या केसांचीही कथा याहून निराळी नाही. पिकलेल्या केसांनाही असाच अर्थ असतो. पिकलेले केसही प्रगल्भतेचे लक्षण असते. या दोन्ही अर्थांवर देशमुख असा अर्थपूर्ण शेर लिहितात.



पानगळीत देठांनाही अर्थ असतो

अन् पिकलेल्या केसांनाही अर्थ असतो



        'ज्याचे जळते त्याला कळते' बघ्यांच्या गर्दीला याच्याशी काहीच देणंघेणं नसतं. परदुःख नेहमीच शीतल असतं. या जगाच्या न्यायानचं माणसं वागत असतात. जळणाऱ्यालाच विस्तवाच्या झळा जाणवत असतात. हे जळणं, धुपणं एकट्याचंच असतं. त्यात दुसरा कुणी वाटेकरी नाही होऊ शकत. आपण आपली आग प्यायची असते. त्याला इलाज नसतो. परंतु हेही खरं की, ज्वलंत जगणाऱ्यालाच जीवन कळते. कारण यातून तो तावून-सुलाखून निघतो. मोक्याच्यावेळी मैदान सोडणाऱ्यांना पळपुंट्याना जीवनाचा अन्वयार्थ कधीच लावता नाही येत. जीवनातल्या या दाहक वास्तवाकडं देशमुख या शेरातून लक्ष वेधून घेतात.



जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही

जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही



      आज-काल माणूस भौतिकतेच्या भोगापाठी भ्रमिष्ट होवून बेफाम धावत सुटलाय्. या मर्यादित आयुष्यामध्ये त्याला नेमकं हवं तरी काय? हे त्याला स्वतःलाही कळेनासं झालंय्. गळेकापू स्पर्धा अन् जीवघेण्या शर्यतीत तो मश्गुल झालाय्. ही सतत जिंकण्याची हाव त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगणं कठीण आहे. जिंकण्यानं माणूस कधीच अजरामर नाही ठरत. मोठेपणाचा तोरा त्याच्याबरोबरच गळून पडतो. जगज्जेत्या सिकंदराच्या हाती अखेर काय आलं, याचा विचार आज आत्ममग्न झालेला माणूस करायला तयार नाही. नुसती त्याची धावाधाव सुरू आहे. माणसाच्या या वर्मावर मार्मिक भाष्य करणारा देशमुख यांचा शेर असा येतो.



लखलाभ हो तुम्हाला ही हाव जिंकण्याची

मी छान झोप घेतो घरट्यात या सुखाच्या



      'प्रश्न टांगले आभाळाला' या गझलसंग्रहात 'माळेतून निसटलेले मोती' हा एक स्वतंत्र विभाग आहे. या माळेतील निसटलेले मोती असले तरी ते विस्कटलेले मोती नाहीत. त्याची चमक डोळ्यांना दीपावणारी अशीच आहे.



तमाने मागणी केली

दिव्यांची वाटणी टाळा



मी तुला आभाळ देतो

पावसाचे, बघ गड्या तू



माकडांचे बोलणेही रास्त आहे

मानवी उच्छाद, थोडा जास्त आहे



बोलली नाहीच ती पण, खंत नाही

हासली ना, एवढेही खूप आहे



           यासारखे एकटे-दुकटे शेरही आपली पाठ नाही सोडत. वाचक एखाद्या ओळीवर नाचू शकतो, कारण तो शब्दांचे काळीज वाचू शकतो. असे किती तरी अनमोल शेर या माळेतून वाचायला मिळतात. वाचकांची असोशी निरंतर वाढत जाते. वाचक आपसूक म्हणतो- एक वेळा बोल काही, बोल ना अनमोल काही. मेघांच्या डोळ्यात तरळाव्यात दुखऱ्या आठवणी, भेटली ही गझल, भेटता भेटता. टकराव स्पंदनांचा होतो श्वासांच्या विजांचा. अशी मनाची भावव्याकूळ अवस्था होवून जाते. जीवनाचे झाड हलता, दुःख टप टप सांडते. नितीन देशमुख यांच्या गझलांना अशी दुःखाची भरजरी किनार आहे. त्यांच्या गझला जसं व्यथित करतात, सद्गतीत करतात तसं उत्साहितही करतात. त्यांच्या या पहिल्यावहिल्या दमदार गझलसंग्रहाचं गझलप्रेमी खचितच भरभरून स्वागत करतील. याची मला खात्री आहे. नितीन देशमुख यांच्या गझल लेखनास व गझल गायनास माझ्या मनस्वी शुभेच्छा!



प्रश्न टांगले आभाळाला: गझलसंग्रह


गझलकार: नितीन देशमुख


प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे


पृष्ठे:१३६, मूल्य: २५० रू




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

ई-मेल: contact@sabirsolapuri.com

Post a Comment

0 Comments