🌹 पुस्तक परिचय 🌹
🌹गझलसागराचा
आशय 'किनारा'🌹
अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गझलकार संदीप वाकोडे हे जगण्याच्या सच्च्या अनुभूतीसह 'किनारा' हा ताजातवाना, दखलघेण्याजोगा गझलसंग्रह घेऊन गझलरसिकांच्या भेटीस येताहेत. गझल सागराचा हा आशयसंपन्न किनारा आहे. पुष्कळवेळा सागराचा अदमास हा किनाऱ्यावरूनच येत असतो. हा 'किनारा' गझलरसिकांना खचितच सुखावणारा आहे. तसेच अंतर्मुख करायला लावणारा आहे.
संदीप वाकोडे हे नुसते गझल लिहिण्यापुरते मर्यादित नाहीत. तर गझलेचा मळा सदैव फुलत राहावा, बहरत राहावा. त्याची उत्तरोत्तर उन्नती व्हावी, याकरिता जे उपक्रम राबण्याची जी तळमळ अन् आवश्यकता असते. ते उपक्रम यथाशक्ती राबविणारे सक्रिय गझलकार दलित साहित्य चळवळीतील खंदे कार्यकर्ते आहेत. गझलसम्राट सुरेश भट यांची गझलेची बाराखडी शिकत ज्या गझलकारानं गझलेचं तंत्र आत्मसात केलय्. त्या गझलकाराची गझलेच्या चळवळीविषयी दुसरी काय भूमिका असू शकते. ही गझलेवरील खरी निष्ठा आहे.
गझलेस मी केले जसे अर्पण मला
जगण्यास सुंदर भेटले कारण मला
अशी त्यांची मनोभावना आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून आजतागायत 'ती' प्रिया, प्रियतमा, प्रेयसी, सखी, साजणी हीच गझलेचा मोठा अवकाश व्यापत आलीय्. 'ती'च्यावर भरघोस गझला लिहिल्या जातातच. परंतु वेगवेगळ्या विषयांवरील गझलांमध्ये देखील शेरातूनही 'ती'चं दर्शन घडत राहतं. प्रेमविषयक गझलांची आपल्याकडे मुळीच कमतरता नाही. मात्र याला संदीप वाकोडे हे अपवाद ठरावेत. ते पानं-फुलं, चंद्र-ताऱ्यांशी नाही बोलत. कल्पनेच्या भराऱ्या नाही घेत. तळागाळातल्या माणसांशी, त्यांच्या वेदनांशी त्यांचं नातं घट्ट आहे. म्हणून ते माणसांशी बोलतात. माणसांची गझल लिहितात. प्रेमशृंगाराची लडिवाळ साद त्यांची गझल नाही घालत. उपाशीपोटी प्रेम नाही करता येत. हे वास्तव त्यांना ठावूक आहे. ते म्हणतात...
प्रेमकविता तुझी सांग ऐकू कशी
पोट म्हणते मला, भाकरी पाहिजे
संदीप वाकोडे यांचं सामाजिक भान अतिशय प्रगल्भ आहे. ते जगाकडं भाबडेपणानं नाही तर निधडेपणानं बघतात. संविधानाची महत्ता अन् अनिवार्यता अधोरेखित करत राजकारणातील कोडगेपणावर कोरडे ओढतात. मुखवट्यांवर तुटून पडतात. अधिवेशनातल्या घोषणांची अन् बातम्यांची खिल्ली उडवतात. अंधश्रद्धेवर प्रहार करतात. बेबंध, धर्मांध वाचाळांची झाडाझडती घेतात. दंगलीत रक्तात न्हालेल्या गावाची कैफियत मांडतात. झुंडशाहीची, गुंडशाहीची निर्भर्त्सना करतात. लोकशाहीत लोकांची मुस्कटदाबी करणाऱ्या हुकूमशाहीचा निषेध नोंदवतात. बेगड्या देशभक्तीचा खरपूस समाचार घेतात. शेतकऱ्यांच्या व्यथेचा सत्तेला जाब विचारतात.
या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत राहिलाय्. शोषणाचं सूत्र बदलतं मात्र चक्र नाही थांबत. शेतकऱ्यांचा सातबारा हा केवळ त्याच्या वावराचा सातबारा नसतो तो त्याच्या यातनांचा गोषवारा असतो. त्यावरही कर्जाचं डोंगर चढत जातं. याचं धोरणकर्त्यांना वैषम्य नाही वाटतं. बळीराजाला आपल्या न्याय हक्कांसाठी जीवाच्या आकांतानं रस्त्यावर उतरावं लागतं. रक्त सांडावं लागतं. आत्महत्या कराव्या लागतात. परंतु सत्तेच्या गुर्मीत असलेल्या सत्ताधीशांना पाझर नाही फुटत. बळी कितीही कमजोर झाला, त्याच्या मागण्या रास्त असल्या तरी 'हम करे सो कायदा' या हुकूमशाही प्रवृत्तीनं त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. अशा उद्दाम सत्तेला गझलकार रोखठोक इशारा देतो.
गुर्मीत कोणत्याही वागू नकोस सत्ते
कमजोर तू बळीला समजू नकोस सत्ते
---
उद्दाम हिटलरांची झाली अखेर दैना
जाणीव ठेव याची विसरू नकोस सत्ते
सोसण्यालाही शेवटी मर्यादा असते. व्यवस्थेविरुद्धचं आक्रंदन चव्हाट्यावर मांडावं लागतं. व्यथांचा जाब विचारावा लागतो. काळ्याकभिन्न छाताडावर उजेडाचे ठसे चितारावे लागतात. त्यासाठी मूठ आवळावी लागते. जिंकणं किंवा हारणं हा जगाचा निकष असूच शकत नाही. स्वतःला झुंजत ठेवणं अपरिहार्य असतं. पावलोपावली नव्यानं 'एल्गार' पुकारत चालत राहणं हाच तर जिवंतपणा असतो. संदीप वाकोडे हे अशा जिवंत मनाचे गझलकार आहेत. समाजजीवनातील कितीतरी दाहक प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीत सामावून घेतलंय्. म्हणूनच त्यातून ठिणगीगत एकेक शेर बाहेर पडतो.
जाब व्यथांचा विचारू चला
हात आपले उगारू चला
शेतकऱ्यांवरील, कष्टकर्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांचे शेर धारदार होत जातात. गझलेसाठी जिवाचं रान करणारा हा गझलकार आहे. माणूस जोपर्यंत माणूस असतो तोपर्यंत त्याच्यातली माणुसकी शाबूत राहते. एकदा का तो मुखवटाधारी झाला की, मग खोट्यांची सत्ता आलीच म्हणून समजा. नीतिमत्तेची जराही चाड नसलेली माणसंच कोणत्याही स्तराला पोहोचतात. कोणत्याही पदावर जाऊन बसतात. येनकेनप्रकारेन पैसा मिळवणं अन् पैशातून सत्ता प्राप्त करणं हेच त्याचं एक कलमी कार्यक्रम होऊन बसतं. समाजकारण असो वा राजकारण मानवी चेहराच जेव्हा मुखवटा धारण करतो तेव्हा दुसरं काय होतं.
मुखवट्याला जपू लागलो
मग नव्याने खपू लागलो
---
घेतल्यावर पुढारीपणा
योजना ओरपू लागलो
धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. धर्म घरात खुशाल पाळावा. उंबऱ्याबाहेर पडल्यानंतर धर्माला गोचिडाप्रमाणं चिटकून राहता कामा नये. आपापल्या धर्मानुसार घरात आचरण करण्याची मुभा संविधानानं प्रत्येकालाच दिलीय्. तेव्हा उगाच सार्वजनिक ठिकाणी धर्माचं स्तोम माजवू नये. तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ, अशा फालतू श्रेष्ठत्वावरूनच आजवर मोठ्या प्रमाणात रक्तपात घडलाय्. धर्माच्या नावाखालीच माणसाचं अनन्वित शोषण झालंय् हा या देशाचा इतिहास आहे. याची नादान माणसाला जाणीव करून देताना गझलकार वाकोडे म्हणतात.
तो उगा आणला आज चौकात तू
धर्म आपापला जो घरी पाहिजे
---
सत्य इतिहासातले हातात हे आले
माणसांनी माणसांना मारले आहे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतीनं सामाजिक संघर्षात रमाई देखील अग्रेसर होती. तिनं विस्तव लेवून वादळाचा संसार केला. ती खूप काही देऊन गेली. खूप काही शिकवून गेली पण बोलली काहीच नाही. तिच्या अजोड त्यागाची महती विशद करणारी एक नितांत सुंदर वास्तवाला भिडणारी 'रमाई' ही गझल या संग्रहात आहे.
लेवून विस्तवाचा शृंगार तू रमाई
केलास वादळाचा संसार तू रमाई
प्रस्तुत संग्रहात पहिली गझल 'उद्देश' शीर्षकाची आहे तर समारोपाची गझल 'बुद्ध पाहिजे' अशी आहे. यावरून संदीप वाकोडे यांचा उद्देश स्पष्ट आहे की, आज युद्धाची नाही तर बुद्धाची खरी गरज आहे. युद्ध देशादेशातील असो वा माणसामाणसातील असो. युद्ध कुणालाच परवडण्यासारखं नाही. तेव्हा भाईचारा, सर्वधर्मसमभाव, सद्भावना, शांतता ही तथागत गौतम बुद्धानं सांगितलेली मौलिक तत्वं अंगीकारण्याशिवाय आजच्या घडीला तरणोपाय नाही. वैरत्वाला मूठमाती दिल्याशिवाय शांतता प्रस्थापित होऊ नाही शकत. ही महत्त्वाची बाब सगळ्यांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवी.
वैरभाव मारण्या, बुद्ध पाहिजे
या जगास तारण्या, बुद्ध पाहिजे
गझलसंग्रह: किनारा
गझलकार: संदीप वाकोडे
समग्र प्रकाशन, तुळजापूर
पृष्ठे: ९४ मूल्य: १५०₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
sabirsolapuri@gmail.com
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३
0 Comments