Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलांचा खजिना: दीवान- ए-मीना Badiujjama Birajdar

 🌹 पुस्तक परिचय 🌹




🌹गझलांचा खजिना: दीवान- ए-मीना🌹


     सृजनाच्या पातळीवर गझलेचे भावशिल्प कलात्मकतेने साकारणे म्हणजे जणू शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. कारण गझल लिहिणे तसे जोखीमीचे आणि जिकिरीचे कठीणतम काम आहे. केवळ सरळसोट द्वीपदी रचने म्हणजे गझल सृजन नव्हे. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन गझल या विधेत प्रवेश करावा लागतो. अनेक प्रकारच्या अवघड, अनवट दिव्यातून गझलेची वाट शोधावी लागते. ही वाट विनासायास कधीच गवसत नाही. त्यासाठी प्रतिभेचे कसब पणाला लावावे लागते. गझल हा आत्म्याचा हुंकार असतो. ती निर्मिकास अस्वस्थ करणारी अंत:स्थ सृजनशीलता असते. त्यात वाग्मयीन मूल्यभाव ठासून भरलेला असतो. गझलेच्या एकेक शेरातून याचा वाचकांना प्रत्यय येत असतो. पिंपरी चिंचवडच्या ज्येष्ठ गझलकारा  सौ. मीना संजय शिंदे यांचा यापूर्वी प्रकाशित झालेल्या ‘स्पंदन’ काव्यसंग्रहातून, ‘ह्दगत’ गझलसंग्रहातून, ‘गझल रुपेरी’ या सीडीमधून त्यांच्या आशयुक्त रचनांनी वाचकांना, श्रोत्यांना भरभरून आनंद दिला आहे. त्यांच्या गझलांचे उस्फुर्त स्वागत आणि कौतुकही झाले आहे. त्या प्रतिसादाच्या बळावरच त्या आता दीवान-ए-मीना हा वैशिष्ट्यपूर्ण गझलांचा खजिना घेऊन रसिकांच्या दरबारात दाखल होताहेत. हे स्वागतार्ह बाब आहे.


     ‘दीवान-ए-मीना’ हा मराठीतील महिला गझलकरांपैकी पहिला वाहिला परिपूर्ण दीवान असल्याने त्याचे अधिक अप्रूप आणि कौतुकही आहे. गझलवाङ्मयात याची विशेषत्वाने ऐतिहासिक, नोंद होईलच, याविषयी शंका बाळगण्याचे मुळीच कारण नाही. परिपूर्ण दीवान लिहिण्यासाठी परिपूर्ण प्रतिभेचे देणे लाभणे तितकेच आवश्यक ठरते. मीना शिंदे यांना हे प्रतिभेचे देणे लाभले आहे. त्यांच्या ‘दीवान’ मध्ये विषयाचे, आशयाचे, व्यासंगाचे, प्रयोगाचे, प्रयोजनांचे विपुल प्रमाणात वैविध्य असल्याने हा दीवान गझल शौकिनांच्या मनावर निश्चितपणे आपली नाममुद्रा उमटवेल, असा विश्वास वाटतो.


     दीवान आविष्कृत करण्यासाठी त्याचे नियम,  अटी, व्याकरण बारकाव्यानिशी आत्मसात करावे लागते. वेगवेगळ्या वृत्तांसह रदीफ मध्ये वापरण्यात येणाऱ्या अक्षरांचे शेवटपर्यंत सूत्रबद्ध पद्धतीने पालन करावे लागते. तरच तो खऱ्या अर्थाने दीवान ठरतो. मीना शिंदे यांनी या तांत्रिक बाबींचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. हे त्यांच्या रचनांवरून स्पष्टपणे दिसून येते. मीना शिंदे या गझल विधेवर मन:पूत प्रेम करणाऱ्या गझलकारा आहेत. 


     गझल हा संवेदनाचा आविष्कार असतो. गझल जन्मते कशी अंतरातून कशी उमलते. ती नजरेतून कशी झरते. अधराला कशी भिडते. तिला सुबोध संवादाचं रूप कसं येतं. गझलेच्या निर्मितीची प्रक्रिया कशी घडत जाते. हे या शेरावरून सहज लक्षात येते.


नजरेला भिडता नजर गझल होते

अधरांना भिडता जधर गझल होते


     जिथे अहंकार गळून पडतो तिथे गझल मंदिरासारखी उभी असते. निर्मोही वृत्तीनं लिहिलेली गझल प्रहर बनते. तिचा आपल्याला अष्टौप्रहर ध्यास लागतो. अंतकरणाच्या गाभ्यातून उमलणारी गझल दीर्घकाळ ओठांवर रेंगाळत राहते. एवढी परिणामकारकता त्यात असते. हा शेर त्याची साक्ष देतो.


अहंकार नसतो जिथे तिथे मंदिर

निर्मोही बनता प्रहर गझल होते


     काळजाला काळजीचा शाप लाभला की अंतरीच्या वेदनाला कोणत्याही स्थितीत टाळता येत नाही. मनात सल ताजी असली की रचनेत सैलपणा येत नाही. ती अस्सल साहित्यकृती ठरते. काळजातून फुटलेली गझल रसिकांच्या काळजाला थेट भिडल्याशिवाय राहत नाही.


काळजाला काळजीचा शाप का?

अंतरीच्या वेदनाचा ताप का?


     अशा कितीतरी प्रश्नांकित शेरांच्या ओंजळी मीना शिंदे यांनी रसिकांच्या पदरात टाकल्या आहेत. वृक्षतोड झपाट्याने वाढत चालल्यामुळे रानेवने, जंगले उजाड होत आहेत. पक्षांची निवासस्थाने असणारी झाडे जमीनदोस्त होत चालली आहेत. त्यामुळेच बेघर झालेले पक्षी आता माणसात मिसळत आहेत. माणसांच्या पंगतीला बसत आहे. शहरातही धिटाई त्यांच्या अंगवळणी पडू लागली आहे. पक्षांवरील हा आगळा वेगळा शेरही प्रस्तुत दीवानमध्ये वाचावयास मिळतो.


घेतात पंगतीला माझ्या बसून पक्षी

शहरातली धिटाई शिकले कुठून पक्षी


     सभोवताली माणसांचा माणसांची चिकार गर्दी झालेली आहे. माणसाला मोकळा श्वास घेणे ही दुरापास्त होऊन बसले आहे. वाढत्या गर्दीत घरदार हरवले आहे. परिणामी घरातले सणवारही हरवले आहेत. असा मीना शिंदे यांचा अनुभव आहे. तो शेरात मुखर करताना त्या लिहितात. 


गर्दीत माणसांच्या घरदार हरवले माझे

माझ्या घरात सगळे सणवार हरवले माझे


     आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. तरी स्त्रियापासून स्वातंत्र्य दूरच आहे. त्यांच्याकडे बघण्याचा पुरुषसत्ताक समाजाचा दृष्टिकोन अजून बदललेला नाही. तिला अनेक प्रकारचे पाश छळतच असतात. तिच्याकडे बाई म्हणून तऱ्हे तऱ्हेच्या नजरा असतात. चोहीकडून तिची कोंडी करण्यात येते. हे आजचे वास्तव्य नाकारता येत नाही. 


माझेच पाश मजला छळती तऱ्हे तऱ्हेने

बाई म्हणून सारे बघती तऱ्हे तऱ्हेने


     जिवाचे रान करून आई-वडील पोटच्या मुलांचे संगोपन करत असतात. त्यांना कैक खस्ता खाव्या लागतात. पण त्याचे फळ मात्र त्यांना मिळत नाही. वृद्धपणी त्यांची मुलांकडून हेळसांड होत राहते. त्यांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांची वृद्धाश्रमात रवानगी करता येते. कलियुगातले हे सार्वत्रिक चित्र आहे. 


वृद्धाश्रमात आई-बाबा सोडून दिले कैक मुलांनी

तरी मिरवती कलियुगाची व्यथा बोचरी आनंदाने


     ही व्यथा प्रत्ययकारी शब्दातून उद्गारीत करण्यात आली आहे. आजच्या दुनियादारीत मैत्रीचे स्वरूप पार बदलत चाललेले आहे. मैत्रीला वैरभावाचे ग्रहण लागले आहे. ही वैरभावना झुगारून दिल्याशिवाय निष्कलंक मैत्र भावना उजागर होऊ शकत नाही. मैत्रीवरचा हा शेर लक्ष वेधून घेणारा आहे. 


वैरभावना तुझ्या मनाची झुगारून बघ मित्रा

निष्कलंक ही मैत्र भावना चितारून बघ मित्रा


     मीना शिंदे यांनी समाजभान जपत समाजाच्या दुःखाला वाचा फोडताना विसंगतीवर, वैगुण्यावर तिखट प्रहार केले आहेत. ते अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाहीत. त्याचबरोबर त्यांनी प्रेमाच्या अनेक विध भावभावना हळुवारपणे, तरलतेने अभिव्यक्त केल्या आहेत. त्यात भातुकलीच्या खेळापासून, ऋतू मिलनाचा, लाजवेडी रात्र, कातरवेळीचा कातर स्वर, चंदनी देहाचा दरवळ, हसणारा पौर्णिमेचा चंद्र, पहाट ओल्या दवात न्हाली गझल रुपेरी, यासारख्या प्रीत श्रृंगाराच्या धुंद करणाऱ्या मस्त गझला मीना शिंदे यांनी लिहिल्या आहेत. वानगीदाखल हा त्यांचा हा शेर पाहा. 


प्रेम असल्याचा पुरावा सांगणारा धागा

केशरी झाला फुलाला ओवणारा धागा


गझलसंग्रह: दीवान-ए-मीना

गझलकारा: मीना संजय शिंदे

प्रकाशक: गझलपुष्प 

पृष्ठ: १९६ मूल्य: २२५ रुपये




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)




Post a Comment

0 Comments