Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मौनातून बोलणारी गझल Badiujjama Birajdar

 🌹 पुस्तक परिचय 🌹




🌹मौनातून बोलणारी गझल🌹


     प्रत्येकाचं मन निराळं असतं, प्रत्येकाचा एकांत वेगळा असतो. मौन अन् एकांत एकजीव झाले की साधनेला प्रारंभ होतो. कधी मौन एकांताशी, कधी एकांत मनाशी आतल्या आत बोलत राहतं. मौनाशी एकाग्रता साधता आली की बोलण्याला, लिहिण्याला आपसूकच खोली प्राप्त होत जाते. जे बोलणं जगाशी नाही तर मनाशी असतं मनातली साठवणूक कागदावर उमटली की कलाकृती, साहित्यकृती आकारास येऊ लागते. सोलापूरचे कालिदास चवडेकर हे तर 'दूर मौनाच्या किनारी' बसून गझलेची साधना करणारे गझलकार आहेत. चवडेकर यांच्या गझलांचा पैस लंबाचवडा आहे. 'दूर मौनाच्या किनारी' या त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या संग्रहात तब्बल ९२ गझला आहेत. ही केवळ संख्यात्मक वाढ नाही तर त्यात गुणात्मक वाढही आहे. पहिल्या वहिल्या इतक्या दर्जेदार गझला देणं ही साधीसुधी गोष्ट नाही. याकरिता शब्दांची अखंड साधना करावी लागते. खयलांचा कठोर रियाज करावा लागतो. गझल कुणावरही उगाच आषक होत नाही. तेवढे मोल ती खणखणीत वाजवून घेत असते. चवडेकरांनी गझलेची मनोभावे साधना केली आहे. हे त्यांच्या गझला वाचताना प्रकर्षानं जाणवत राहतं.


     कालिदास चवडेकर हे जन्मजात विणकर आहेत. धाग्याशी धागा जुळत जावा अन् सुंदर, मनमोहक गझलांचा शेला तयार व्हावा, असाच त्यांचा प्रस्तूत गझलसंग्रह आहे. यात अनेकानेक रंग मिसळलेले आहेत. अनेक वादळे, कैक लाटा पार केल्याशिवाय समृद्ध करणाऱ्या आशयाचि किनारा लाभत नाही. हा किनारा गाठण्यासाठी गझलकारास किती खडतर प्रवास करावा लागला असेल याची प्रचिती त्यांच्या गझलांवरून सहजीच येते. पहिल्या वहिल्या या गझलसंग्रहात त्यांना पन्नास साठ गझलांचा समावेश करता आला असता. परंतु त्यांनी ९२ गझलांची रसिकांना मनसोक्त पर्वणी दिलीय्. वर नमूद केल्याप्रमाणं त्यांच्या गझल निर्मितीचा पैस मोठा आहे. भविष्यातही तो रुंदावत, उंचावत जाणार आहे. 'मुक्त अंबर व्हायचे आहे मला' याची साक्ष मनाला पटण्यासारखीच आहे.


     विणकर हा सुखदुःखाचा ताणाबाणा विणत असतो. हेच तर त्यांच्या जगण्याचं खरं सूत्र असतं. सुखदुःखाच्या व्यामिश्र प्रतिभेतूनच एखाद्या कबीराचा जन्म होतो. कबीर होता येणं हे खऱ्या अर्थानं भाग्याचं द्योतक असतं. चवडेकर म्हणतात त्याप्रमाणं.


जन्मजात मी विणकर ताणाबाणा सुख दुःखांचा

जगता जगता माझा आता कबीर झाला आहे


     संशय हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. संशयाचा मार्ग मुळी विनाशाकडे घेऊन जाणारा असतो. नात्यात संशय निर्माण झाला की नाते पार विस्कटून जाते. विश्वास हा नात्याचा पाया बळकट करत असतो. तर संशय हा पायाच खिळखिळा करत जातो. म्हणून संशयाला जीवनात कधीच थारा देता कामा नये. नातेसंबंध दृढ ठेवण्याबाबतचा संदेश पहा.


नात्यात संशयाला थारा असू नये

इतका कुणी कुणाचा प्यारा असू नये


     प्रत्येक माणसाच्या मर्यादा ठरलेल्या असतात. जगज्जेता असो वा कितीही धुरंधर असो कुणालाच मरण चुकलेलं नाही. इथं अमरपट्टा घेऊन कुणीच जन्माला येत नाही. परतण्याचा प्रत्येकाचा कालावधी ठरलेला आहे. पण हे वास्तव माणसाच्या लक्षात कधी येत नाही. तो अमर असल्यासारखा आपच तोऱ्यात वावरत असतो. कसलीच नीती भीती न बाळगता तो उद्यामपणे जगत असतो. कित्येक साम्राज्यं उदयास आली आणि लयास गेली. हा इतिहास आहे. तिथं माणसाची काय कथा?


कुणी जगज्जेता कोणी असो धुरंधर

कायम नाही येथे कोणी अजय वगैरे


    मानवी मन समजण्या पलीकडची गोष्ट आहे. मन हे इतके जटिल असते की माणसाला स्वतःचाही थांग लागू देत नाही. मनकाबुच्या टप्प्यात लवकर येत नाही. मन कधीही कुठेही सैरावैरा धावू लागते. अशावेळी मनाचा ठावठिकाण गवसणं अवघड होऊन जातं. मन जिद्दी असतं, हट्टी असतं. त्याची समजूत घालता येत नाही. मन अचपळ असते. मन हे चकव्याप्रमाणं असते. ते माणसाला नेहमी चकवत राहतं. मनाचा कितीही पाठलाग केला तरी त्याचा थांग लागतच असं नाही. मनाचा नेमका ठिकाण सांगताही येत नाही, शोधताही येत नाही.


स्वतःचा स्वतःला थांग कुठे

ठिकाणा मनाचा सांग कुठे


     सगळ्यांनाच एक सारखं गृहीत धरता येत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण दुसऱ्यांची असहमती लक्षात न घेता स्वतःशी सहमत होत जातो. इथेच मोठी गफलत होते. यातून अनेक प्रकारच्या गैरसमजुती निर्माण होतात. आपण दुसऱ्यांच्या सहमतीचाही विचार करणे जरुरीचे आहे. पण दैनंदिन जीवनात कसे घडत नाही. 'ग' ची बाधा कधीच सुधरू देत नाही. 'ग' ची बाधा अहंकाराच्या पोटातूनच जन्म घेत असते. दुसऱ्याच्या मनाचा अव्हेर करून आपण आपलेच मत पुढे दामटच राहतो. ही बाब कलहाला वाव देणारी ठरते. म्हणून ती गफलत टाळता आली पाहिजे. हे भाष्य नोंदवताना चवडेकर असा शेर लिहितात.


माझ्याशी मी सहमत आहे

इथेच सारी गफलत आहे


     दुःखाचे मूळ इच्छित असते. जे आपलं नाही ते आपलं समजणं ही व्यथेची सुरुवात असते. तरीही माणसाच्या इच्छा, आकांक्षा, महत्वकांक्षा याला कोणतेही धरबंध नसते. इच्छा मातीत पेरली की ढग बरसतीलच असं नाही. किंबहुना ते सतावू लागतात. ही खरंतर माणसाची सत्वपरीक्षा असते. यापासून वाचण्यासाठी मोह, इच्छा टाळता आल्या पाहिजेत. हे आवर्जून लक्षात घ्यायला हवं. असा आशय प्रकट करणारा एक उत्तम असा शेर गझलकार तितक्याच ताकदीनं आपल्या समोर ठेवतो.


एक इच्छा पेरली मातीमध्ये

अन् सतावू लागले हे ढग पुन्हा


    शेर असो गझल असो वा असो कविता सहजासहजी स्फुरत नाही, सुचत नाही. त्यासाठी त्याला त्याचं देणं द्यावच लागतं. रात्र जागून जाळून काढावी लागते. यातना सहन कराव्या लागतात. जिवंत अन् ज्वलंत अनुभव घ्यावा लागतो. ही अतिशय भयंकर गोष्ट असते. कवितेची वाट खडतर असते. हा प्रवास अनेक वेळा जीवघेणा असतो. कविताही विजेसारखी असते. हे वीज पेलण्याचं सामर्थ्य असावं लागतं. यातनाच शब्दात ओतावी लागते. हे यातनाचं कथन असतं. ही अत्यंतिक कठीण गोष्ट चवडेकरांची लेखणी लीलया पेलते.


गझल कविता शेर सारे

यातनांचे कथन आहे


     चवडेकरांच्या गझला विविधांगी आहेत. त्यात विषयाचा विपुल वैविध्य आहे. त्यांच्या प्रीतीच्या गझलांनाही वेगळी खुमारी आहे. प्रिया बोलत नसली तरी तिचे बोलके डोळेच सारं काही सांगून जातात.


गीत गुणगुणतात कायम बोलके डोळे तुझे

पंख फडकवतात कायम बोलके डोळे तुझे


     गझलकारानं बऱ्याच ठिकाणी इंग्रजी शब्दांचा मुक्त वापर केला आहे. हे इंग्रजी शब्द मात्र खटकत नाहीत. ते मराठी शब्दांशी इतके एकजीव होऊन गेले आहेत की उलट इंग्रजी शब्दांनी मराठी गझलेला हा आधुनिक प्रयोग म्हणता येईल. वानगी दाखल हे शेर पाहा.


ऑनलाइन ग्रस्त दुनिया

आणि घर कोमात आहे


मोजते घटकाच माणुसकी अता

व्हेंटिलेटर व्हायचे आहे मला


     चवडेकरांचे वैशिष्ट्य असं की गझलाबरोबरच त्यांनी हजल हा प्रकारही प्रभावीपणे हाताळला आहे. भविष्यात त्यांच्याकडून स्वतंत्र हजलसंग्रहाची अपेक्षा आहे.


दूर मौनाच्या किनारी: गझलसंग्रह 

गझलकार: कालिदास चवडेकर

रत्नप्रिया प्रकाशन, सोलापूर

पृष्ठे:९२ मूल्य:२००₹




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

sabirsolapuri@gmail.com

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

Post a Comment

0 Comments