Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

बस यूॅंही.....Divakar Chaukekar

 🌹 पुस्तक परिचय 🌹



🌹"बस यूॅंही..... "🌹 



रसिकहो नमस्कार,  

श्री किशोर मंदाबाई दत्तात्रय मुगल यांच्या "बस यूॅंही..... " या हिंदी कवितासंग्रहाचा पुस्तक परिचय आज आपण करून घेणार आहोत. 


गझल लेखनाचा मला जास्त सराव नाही, अर्थात नियमितपणे सराव केला आणि गझलमध्ये स्वत:ला गुंतवून घेतल्यास मी चांगल्या गझला लिहू शकतो याची मला जाणीव आहे, मात्र 'एक ना धड भाराभर चिंध्या' ही माझी सवय कळत असूनही टळू शकत नाही, अशी कबूली काही वर्षांपूर्वी देणा-या श्री किशोर मुगल यांचे (१) एक्कावन्न कविता माझ्याही (२) दिवस निरुत्तर येतो आणि (३) कालिंदीच्या डोहातून हे तीन मराठी कविता संग्रह आणि "बस यूंही... " नावाचा हिंदी कविता संग्रह असे संग्रह प्रकाशित झालेले आहेत शिवाय किशोर मुगल यांनी लिहिलेले विविध काव्यप्रकार, कविता, व्यक्तीजीवन आणि समीक्षा असा एक ग्रंथ कवी, समीक्षक, कथा-कादंबरीकार आणि व्यवसायाने शिक्षक असलेले श्री संजय येरणे यांनी "नामालूम" या नावाने प्रकाशित केलेला आहे आणि अशा रीतीने " समग्र किशोर मुगल " रसिक वाचकांच्या भेटीस येतात. "गझल लेखनाचा मला जास्त सराव नाही" असे केवळ काही वर्षांपूर्वी म्हणणारे श्री किशोर मुगल यांची साहित्य क्षेत्रातील वाटचाल मला निश्चितच कौतुकास्पद वाटली आणि म्हणूनच मी हा पुस्तक परिचयाचा लेख लिहावयास घेतला आहे. त्यांच्या या आधी प्रकाशित झालेल्या सर्व व प्रस्तुत लेखासाठी निवडलेल्या " बस यूॅंही ....." या संग्रहासाठी श्री किशोर मुगल यांचे खूप खूप अभिनंदन आणि मनापासून लाखभर शुभेच्छा ..... ! 


इक तस्वीर हाथ मे लिए घूम रही है 

जिंदगी मुझसा ही आदमी ढूंढ रही है ....


आपल्या आयुष्यावर लिहिलेल्या या ओळींची निवड " नामालूम" असे टोपणनाव वापरणा-या किशोर मुगल यांनी या संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी मोठ्या कौशल्याने केल्याचे दिसून येते. मलपृष्ठावर अमरावती येथील जेष्ठ गझलकार श्री अनंत नांदूरकर 'ख़लिश' यांच्या शुभेच्छा लाभल्यामुळे "बस यूॅंही ..." च्या दर्जाचा अंदाज, पुस्तक न उघडताही रसिकांच्या लक्षात येऊ शकतो असे मला वाटते, तर संग्रहाच्या शेवटी....


होठों ने चूप रहना सीखा

और आंखो ने कहना सीखा ....


ख़ुशबूॅं लेते रहे फ़ूलों से 

संग हवा के बहना सीखा ....


माॅं की तरह मुस्कुराकर 

चूप रहकर सब सहना सीखा ....


अशा शब्दांत आपल्या मनातील भावना व्यक्त करणारे किशोर मुगल एक सच्चे कवी, संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि सभोवताली वावरणा-या समाजाचे एक चांगले अभ्यासक आहेत हे दाखवून देतात, हीच गोष्ट ....


पहले जैसी बात नही अब 

तुम जो मेरे साथ नही अब  ....


रूठ गई है शाम सुहानी 

और रूहानी रात नही अब ....


या सारख्या ओळींमधून, तसेच....


अपना बनाया जा रहा है 

हमको सताया जा रहा है ....


पहले ख़ूब हंसाया हम को

अब रुलाया जा रहा है ....


सारख्या ओळी वाचल्यावर रसिक वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तर दुस-या एका ठिकाणी लिहितांना....


पता नही अब किधर गए वो 

मेरी नज़र से उतर गए वो ....


'नामालूम ' भी कितना मूरख 

हरदम समझा सुधर गए वो  ....


असे समाजाकडून आलेले वाईट अनुभव किशोर मुगल रसिकांसमोर मांडून जातांना दिसतात, तर दुस-या एका ठिकाणी ....


टिमटिमाता दीया दे गया है वो 

और साथमे हवा दे गया है वो ....


दर्द तो बेहिसाब दे गया लेकिन 

शुक्रिया के दवा दे गया है वो  ....


अशा शब्दांत या मतलबी, स्वार्थी समाजाकडून मिळणा-या हीन, हिणकस वागणूकीचाही उल्लेख करतांना दिसतात. 


उत्कृष्ठ अशी निरीक्षण शक्ती लाभलेले किशोर मुगल समाजातील लोक कसे असतात, कसे वागतात याचे अतिशय वास्तव वर्णन, तितक्याच खोचक शब्दांत करतांना दिसतात....


लाल पीले नीले लोग 

कितने है रंगीले लोग ....


गुड से मीठे लगते है 

वास्तव मे जहरीले लोग ....


आणि याच क्रमवारीत नंतर पथरीले, खर्चीले, शर्मीले, चमकीले तसेच बर्फीले लोग अशा टोकदार विशेषणांनी किशोर मुगल या नटरंगी, नवढंगी समाजावरचा आपला राग व्यक्त करतांना दिसतात. अशा प्रकारचे अनुभव आल्यानंतर स्वाभाविकपणे, अगदी नकळतपणे पापण्यांपाशी येऊन थांबलेल्या आसवांबद्दल लिहितांना....


चलो जरासा रो लेते है 

इन आखों को धो लेते है ....


अभी नमी है इन पलकों मे 

सपनों के बीज बो लेते है ....


अशा शब्दांत आपली आशावादी वृत्ती सुध्दा दु:खातही प्रकट करुन जातात. आपल्या समाजासमोर असलेले प्रश्न जर सोडवायचे असतील तर ....


आओ मिलकर सारे हम 

बन जाए किनारे हम ....


कौन सा था कब अपना वक़्त 

हरदम वक़्त के मारे हम ....


तालाब गांव का सूख गया 

समझेंगे कब इशारे हम ....


अशा शब्दांत सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे समाजातील सर्व घटकांना समजावून सांगतांना दिसून येतात, तर दुस-या एका ठिकाणी ....  


नजर है तो नजारे भी होंगे ही 

कुदरत है तो इशारे भी होंगे ही ....


गर उनकी आखोंमे समंदर है 

तो ज़ाहिर है किनारे भी होंगे ही ....


असे आशावादी असलेले किशोर मुगल आपल्या दोन तीन मित्रांसह "व-हाडी मायबोली" नावाचा मराठी व-हाडी कवितांचा मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक कौटुंबिक कार्यक्रम मंचावरून सादर करतात. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र येथे तांत्रिक विभागात " पान्या हातोड्याच्या संगतीत, ५०° सेल्सिअस पेक्षाही अधिक तापमानात काम करत असतांना कविता हाताळणे थोडे कठीणच जाते, पण आनंद मात्र मनमुराद उपभोगता येतो " असे सांगणारे किशोर मुगल प्रेमासारख्या नाजूक विषयाला हात घालतांना ....


जबसे छूटा उनका साथ 

फिरते है बंजारे हम ....


कब तक यूं ही दिल का गम 

सहेंगे उनके सहारे हम ....


गर उनपे ना मरते तो 

कैसे जीते बेचारे हम ....


दुनिया के तो हो गए 

होंगे कब हमारे हम ....


असे लिहून जातात, ज्यामधे त्यांच्या स्वभावाचा हा प्रेमळ, भाऊक पैलू सुध्दा रसिक वाचकांना अनुभवायला मिळतो, तर त्याच वेळी ....


कुछ तो फुरसत पाओ तुम 

चलो ख्व़ाबो मे ही आओ तुम ....


इश्क़ - मुहब्बत,  हिज्र - विसाल 

हमको भी समझाओ तुम ....


क्या करे क्या ना करे हम 

उलझन ये सुलझाओ तुम ....


हर फरमाइश सर आंखो पर 

जो चाहे वो फरमाओ तुम .... 


या शब्दांत अपेक्षा व्यक्त करतांना सुध्दा दिसून येतात.  


" जे सभोवतालातून येतं आणि शब्द रुपात मला व्यक्त करता येतं, स्वत:शी कायम संवाद करत रहायचा, त्या संवादालाच कवितेचं रुप द्यायचं, मी कविता करतो म्हणून कवी आहे की लोक म्हणतात म्हणून कवी आहे, मला माहीत नाही " असे श्री किशोर मुगल स्वत:बद्दल अगदी मोकळेपणाने सांगतात, सोशल मिडीया फेसबुकवर ते आपली कविता प्रकाशित करतात." मी फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह असतो असे म्हणण्यापेक्षा फेसबुकवरच पडलेला असतो" असे स्वत:बद्दल सांगणा-या किशोर मुगल यांचेशी माझे दिवाळीच्या सुटीत बोलणे झाले. "दिवस निरुत्तर येतो" नंतरचा एकही संग्रह माझ्याकडे नाही, असे मी अगदी बोलता बोलता सांगितल्यावर अगदी तातडीने संग्रहांचे पार्सल माझ्याकडे रवाना केले गेले व मी "बस यूॅंही ...." चा परिचय लिहिण्यास घेतला....!


पण एक मात्र नक्की की, "बस यूॅंही ..." वाचत असतांनाच माझ्या मनात गेली अनेक वर्ष दडून असलेली हिंदी कविता लिहिण्याची ईच्छा पुन्हा एकदा जागृत झाली आहे, हे मात्र नक्की, धन्यवाद मित्रा ....!


पुढच्या तीन वर्षांत सेवानिवृत्त निवृत्त होत असलेल्या, उर्जा निर्मिती क्षेत्रात काम करणा-या माझ्या या मित्राला याहूनही सकस साहित्य निर्मितीसाठी, विशेषत: त्याच्या आवडत्या 


"व-हाडी कविता" लिहिण्यासाठी अजून उर्जा मिळत राहो अशा शुभेच्छा देतो व हे लिखाण इथेच थांबवतो .....!



दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात) 


( ताजा कलम  :- हा लेख संपादित करत असतांनाच श्री किशोर मुगल यांच्या " बस यूॅंही...." या कविता संग्रहाला " स्व. जयराम गायकवाड दुष्यंत गझल सन्मान पुरस्कार " जाहीर करण्यात आला आहे अशी आनंदाची बातमी माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. श्री किशोर मुगल यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा ....! )

Post a Comment

0 Comments