Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मुस्लीम मराठी गझलेतील मराठी Gazalkar Badiujjama Birajdar

🌹मराठी भाषा गौरव दिन विशेष 🌹

मुस्लीम मराठी गझलेतील मराठी


🌹मुस्लीम मराठी गझलेतील मराठी🌹



     इथल्या मुसलमानांचा मराठीशी संबंध काय? त्यांना मराठी कुठे बोलता येते? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून मुसलमानांना नेहमीच टोमणे मारले जातात. परंतु वास्तव असे आहे की मुसलमानांचा मराठीशी अन्योन्य संबंध आहे. इथल्या मराठमोळ्या तर हेच मराठमोळ्या मातीत त्यांची पाळीमुळे खोलवर रुजलेली आहेत. मराठी भाषेची त्यांची नाळ घट्टपणे जोडली गेलीय. तेव्हा त्यांना मराठीपासून वेगळे कसे करता येईल. महाराष्ट्रातला बहुतेक मुस्लीम समाज हा खेड्यापाड्यात राहणारा आहे. त्यांची भाषा, त्यांचा पेहराव, त्यांच्या रितीभाती, हिंदू सणवारात असलेला त्यांचा सक्रिय सहभाग यावरून तो वेगळा वाटतच नाही. त्यांचे सर्व दैनंदिन व्यवहार मराठीतून होत असतात. पत्राच्या काळात मुसलमान एकदुसऱ्यांना मराठीतूनच पत्र लिहीत असत.


     मराठी साहित्यात मुस्लीम मराठी लेखकांनी दिलेल्या योगदानाचा इतिहास फार जुना आहे. मुस्लीम मराठी सूफी संतांनी आपल्या रचनांमधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलाय. मध्ययुगीन काळापासून मराठीला जवळ असणाऱ्या दख्खनी भाषेत संतकवींनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक मुस्लीम शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून, कवनातून आपल्या प्रतिभेचा जागर करून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. विजापूरच्या आदिलशहाने मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला होता. त्यांना मराठीचा इतका लळा होता की त्यांनी मराठीतून काव्यनिर्मिती केल्याचे आढळून येते. हे विसरून कसं बरं चालेल? मुसलमानांना मराठी भाषा येत नाही या आरोपात कितपत तथ्य आहे, त्याची तपासणी कोण करणार, हा खरा प्रश्न आहे.


     आधुनिक काळात सूफी संतांची ही परंपरा मुस्लीम मराठी साहित्यिक नेटाने पुढे नेत आहेत. सोलापूरच्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेतर्फे महाराष्ट्रात दरवर्षी अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्यातील मुस्लीम मराठी साहित्यिकांची संख्या अन् त्यांचे मराठी साहित्य लक्षणीय असते त्यांची ग्रंथसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे.


     मुस्लीम मराठी गझलकारांनी 'मराठी' हा शब्द गुंफून गझला लिहिलेल्या आहेत. यावरून त्यांचे मराठी विषयीचे प्रेम व्यक्त होते. मुस्लीम मराठी गझलकार ज्या मैफिलीत सामील होतात. त्या मैफिलीचा नूर वाढत जातो. ती मैफल त्यांच्या कसदार गझलांनी रंगतदार होऊन जाते. रसिक श्रोते त्यांच्या मराठमोळ्या शेरांना भरभरून दाग देत असतात. या गझलकारांचा बोलबाला असतो. कारण त्यांची सच्ची अनुभूती इथल्या मातीतली आहे. इथल्या मातीवर अन् मराठीवर त्यांची अविचल श्रद्धा आहे. त्यांचा इमान शाबूत आहे. ते इथल्या मातीशी कधीच प्रतारणा करू नाही शकत. ज्येष्ठ मुस्लीम मराठी गझलकार बदीऊज्जमा खावर (दापोली-रत्नागिरी) त्यांच्या शेरातून म्हणतात.


माझिया गझला मराठी एकदा ऐकून जा

रंग याही मैफिलीचा आज तू पाहून जा


     आम्ही मायमराठीचा मनापासून सन्मान करतो. आम्हास तिचा अपार अभिमान आहे. आमच्या वागण्या-बोलण्यात मराठीच वसलेली आहे. मराठी शिवाय दुसरा विचार आमच्या डोक्यात येत नाही. आमच्या राहणीत अन् वाणीत मराठीचा गोडवा रुजलेला आहे. मराठी हीच आमची खरी निशाणी आहे. आम्ही हरवलो तरी आमचा शोध आमच्या मराठी वाणीवरूनच लागणार आहे. कारण हीच आमची खरी खरी वाणी आहे. तिचा गोडवा आमच्यावाणीतून कधीच कमी होणार नाही. आमच्या मुखात सदैव मराठीच आहे. मराठीचा आम्हास रात्रंदिन लळा लागलेला आहे. मराठवाणी हीच आमची वाणी आहे. असं कलीम खान (आर्णी-यवतमाळ) त्यांच्या शेरातून म्हणतात.


मुखी माझिया गोडवाणी मराठी

मला शोधण्याची निशाणी मराठी


     मराठीला आम्ही कधीच कमी लेखत नाही. मराठीचा सन्मान हीच आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. ती आपली लाज आहे. तीची लाज राखणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मराठी ही साधीसुधी भाषा नाही. ती इथल्या वैभवाचा ताज आहे. हा ताज आनंदानं, अभिमानानं मिरविणं ही आपल्यासाठी लाखमोलाची गोष्ट आहे. ती आपली माय आहे. आईचा विसर मुलांना कधीच पडू शकत नाही. ती आपली प्रतिष्ठा, तीच आपली निष्ठा आहे. मराठी अधिकाधिक समृद्ध व्हावी, अभिजात वैभवाचा ताज तिनं डोईवर मिरवावा, असं आपल्याला नेहमीच वाटत आलय्. बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबिर सोलापुरी यांचा हा शेअर पाहा.


मराठी खरी आपली लाज आहे

हिच्या वैभवाचा इथे ताज आहे


     मराठी हाच आमचा श्वास आहे, ध्यास आहे. आमचा आचार विचार मराठीतच आहे. आमचं सुखदुःख आम्ही तिलाच सांगतो. आमच्या जाणिवा-नेणिवा आम्ही मराठीतच मांडतो. आमच्या आत्म प्रकटीकरणाचं ती तर प्रमुख माध्यम आहे. मराठीचा सुगंध सर्वदूर पसरावा, तिची कीर्ती दिगंत व्हावी म्हणून आम्ही तिच्यासाठी शब्दांचे राजवाडे बांधत असतो. तिला राजवैभव लाभावा, असेच आम्हाला सदोदित वाटत असते. मायमराठीवरील प्रतिभेची ज्योत अखंडपणे आमच्या मनात तेवत राहते. शब्दांचे राजवाडे आम्ही तिच्यासाठी तर उभारत असतो. मराठीचं गुणगौरव करणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ही संधी आम्ही सोडणार नाही. आम्ही मराठीचा महत्त्वा पूर्णपणे जाणून आहोत. तिची आम्ही अक्षरसेवा करतच राहाणार आहोत. मराठीवरचं प्रेम कुणालाच कसं दिसत नाही, आम्ही मराठी कुठं जाणतो असं ज्यांना वाटत राहतं त्यांनी मराठी भाषेतील आमचं योगदान जरूर जाणून घ्यायला हवं. डॉ. शेख इक्बाल मिन्ने (औरंगाबाद) म्हणतात.


वाटते त्यांना आम्ही कुठे जाणतो मराठी

राजवाडे शब्दांचे आम्ही बांधतो मराठी!


     आम्ही मराठी भाषेचा कधीच द्वेष करत नाही. तिचा अव्हेर होईल असं आम्ही वागत नाही. मराठीची इतकी भुरळ आम्हाला पडलेली आहे की, आमची मातृभाषा जरी मराठी नसली तरी आमच्या शब्दांगणात ज्ञानेश नाचतात. सरस्वतीचा विहार असतो. इतकी आमची मराठी भाषेची जवळीक आहे. मराठीसाठी आम्ही कधीच दूरचे, परके राहिलेलो नाही. आम्ही मराठी वाचतो, मराठी बोलतो, मराठी लिहितो आमचे मराठी असल्याचे आम्ही आणखी कोणत्या भाषेत प्रमाणपत्र द्यायचे. मराठी काव्याचे तितके म्हणून प्रकार आहेत ते सर्वच आम्हाला प्रिय आहेत. आम्ही सगळेच काव्यप्रकार नेकीने हाताळतो, एकीने गातो. आम्हास गीत गझल तर आवडतेच आवडते. ओव्या, अभंग, दोह्यांवरदेखील आमची तेवढीच माया आहे. त्यात दिखावा नाही कुठलाच भेदाभेद नाही. भाषेची तक्रार नाही. मराठीचा कोणताही काव्यप्रकार आम्हास गैर वाटत नाही. सर्वच काव्यप्रकारात आमची लेखणी चालत राहते. वाणी बोलत राहते. मुबारक शेख (सोलापूर) यांचा शेर याच बाबीकडे निर्देश करतो.


गीत गझल-ओवी वा असू दे अभंग दोहे

एकीने गाऊ लागली मुस्लिम मराठी


     मुसलमानांची भाषा उर्दू असल्यामुळे त्यांना मराठी अजिबात बोलता येत नाही. अशा प्रकारचा अपप्रचार वारंवार केला जातो. मुळात उर्दू ही मुसलमानांची भाषाच नाही. ती भारतीय भाषा आहे. केवळ गैरसमजापोटीच असा समज झालेला आहे. मुसलमान आपल्या घरात दख्खनी मराठी भाषाच बोलत असतात हे ठाऊक नसल्यामुळे अज्ञानापोटी मुसलमानांना मराठी भाषा येत नसल्याचा सूर लावण्यात येतो. महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान मराठी मातीशी, संस्कृतीशी इतके एकजीव झालेले आहेत की ते मराठीत बोलू लागले की ते मुसलमान आहेत हे नाव सांगितल्याशिवाय कुणाच्या लक्षात येत नाही. इतकं ते अस्खलित मराठी बोलतात. तरीही इथल्या मुसलमानांना मराठी बोलता येत नाही. अशी ओरड सदान्कदा सुरू असते. याला काय म्हणायचं मुसलमानांना वेगळं पाडण्याचाच हा प्रयत्न नव्हे काय? एजाज शेख (अमरावती) या नव्यादमाच्या युवा गझलकारानं उपस्थित केलेला प्रश्न अंतर्मुख करायला लावणारा आहे.


मी मराठी बोलतो उर्दूसवे

सांगना मग मी कुणाचा वाटतो?


     मुस्लीम मराठी साहित्य हे एकतेला बळ देणारं आहे. इथल्या मराठी मातीशी इमान राखणारं आहे. पूर्वग्रह दृष्टिकोन न ठेवता, ते निर्मळ मनानं समजून घेण्याची खरी आवश्यकता आहे.


बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

sabirsolapuri@gmail.com

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३ 

Post a Comment

0 Comments