🌹 पुस्तक परिचय 🌹
🌹गझलसंग्रह: " आसवांचे हार झाले " 🌹
माझे मित्र आणि आपल्या सर्वांचे आवडते गझलकार श्री रमेश निनाजी सरकाटे यांचा गझल संग्रह "आसवांचे हार झाले " माझ्या हातात पडला आणि मनात विचार आला की, आपणही या संग्रहावर काहीतरी लिहायला पाहिजे, आणि बस्स लेखन सुरु झाले ....!
पोलिस खात्यातील अतिशय रूक्ष, रटाळ व कंटाळवाणी नोकरी, आजूबाजूला वावरणारे कडक शिस्तीतले व वर्दीतले पोलीस दलातले शिपाई आणि तिथे असलेल्या भीतीदायक वातावरणात सुध्दा आपल्यातल्या संवेदनशीलपणाला जपणारा, सांभाळणारा, मोठ्या पदाची व जबाबदारीची नोकरी करतांना सुध्दा सामाजिक भान जपणारा हा माणूस, म्हणजे माझे मित्र गझलकार श्री. रमेशदादा सरकाटे आपला दुसरा गझल संग्रह घेऊन गझल रसिकांपुढे हजर झाले आहेत. त्यांचा पहिला संग्रह " गर्जना " हा सुध्दा खूपच लोकप्रिय झाला होता.
ज्याला कवितेचे बाळकडू आपल्या जन्मदात्या आईकडूनच मिळालेले आहेत असा हा गझलकार, मित्रांमुळेच गझलबद्दल नवीन नवीन शिकायला मिळाले, वृत्त व त्यांची बांधणी, यती आदिंबद्दल मित्रांकडूनच शिकायला मिळाले अशी प्रांजळपणे कबुली देणारा व तज्ञ लोकांकडून मिळालेल्या सुचना अमलात आणून त्याप्रमाणे गझला लिहिणारा आणि ह्या सर्व प्रयत्नामुळेच मी चांगल्या गझला लिहू शकलो अशी प्रामाणिक कबुली देणा-या गझलकाराला आपले गणगोत बेभान झाल्याचा अनुभव जेंव्हा येतो तेंव्हा दूरच्या लोकांची व मित्रांची साथ मला लाभली ....
आप्त बेईमान मजला होत गेले
दूरच्यांची साथ मजला फार आहे...
असे अगदी बिनदिक्कत सांगून जातो, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे तथाकथित नेते मंडळीच ती चळवळ शांत, थंड करण्यास जबाबदार आहेत असे आपले मत अगदी परखडपणे मांडतो व ....
नेते गिरीत सारे भलतेच धुंद आहे
चळवळ निळी तयानी केलीच थंड आहे...
असेही अगदी परखडपणे सांगतो. आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवणारा हा कवी आपल्या सखीच्या आठवणींनी मात्र खुपच हळवा होतो व म्हणतो .....
व्याकुळतेने वाट पाहतो युगे युगे मी
तुझ्याच संगे दोन पावले ठेऊ म्हणतो...
स्मरणी माझ्या घडी घडी तू येते जाते
तुझिया स्वप्नी दोनच पळभर येऊ म्हणतो...
आणि आपल्या सखीसाठी असे अगतिक, व्याकूळ होत जाणा-या या संवेदनशील कवीला जेंव्हा इथले लोक डॉ बाबासाहेबांची शिकवण विसरत चालल्याची जाणीव होते ....
शिकून मोठा जरी जहाला चळवळ तू का विसरत गेला
भलेच अपुले करून वेड्या झटुन भीमजी झिजून गेले...
तेंव्हा बाबासाहेबांनी समाजासाठी केलेल्या महान कार्याची आठवण आपल्या सर्वांना करून देण्यास सुध्दा हा कर्तव्यदक्ष माणूस विसरत नाही .
पोलीस खात्यात मोठ्या पदावर काम करत असतांना सुध्दा हा माणूस आपल्या काळ्या आईला म्हणजेच आपल्या शेतीला व आपल्या शेतकरी भावंडांना विसरू शकत नाही असेही दिसते आणि ....
पावसाळा, बेरकी अन् गारपीटी नेहमी
कास्तकाराच्या घरी का पाचवीला वाढले...
अशा शब्दात शेतक-याचे, त्याच्या हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन करतो तर अशाच वारंवार येणा-या आसमानी, नैसर्गिक संकटांशी झुंज देणा-या शेतक-यांना काय मिळते याचे वर्णन करताना ....
सावकारी कर्ज फेडत काळजीने ग्रासला
ताटवे आश्वासनांचे शासनाने धाडले....
अशा शब्दात शासनाकडून दिल्या जाणा-या अधु-या-अपु-या व तुटपुंज्या मदतीबद्दल आपली चीडही व्यक्त करतांना दिसतो.
खपाटी पोट माझे टेकले पाठीत बापोहो
नसे ना भाकरी आता घरी पाटीत बापोहो...
अशा काळीज भेदून जाणा-या शब्दात शेतकरी असलेल्या माणसाच्या घरच्या परिस्थितीचे वर्णन करतो तर त्याच वेळी ....
जरी असलो कफल्लक ही असे पण स्वाभिमानी मी,
कुणाचे पाय ना बसलो कधी चाटीत बापोहो...
अशा शब्दात आपली स्वाभिमानी वृत्ती, आपला लढावू बाणा देखील हा हळव्या स्वभावाचा कवी व्यक्त करतांना दिसून येतो.
मी आयुष्याला भीतभीतच जगलो आहे, खोट्या खोट्या स्वप्नांना फसलो आहे अशी मनस्वी कबुली देणारा हा कवी मृत्यूला आपला 'संगाती' असे संबोधतो आणि ---
तुला कशाला भिऊ गड्या मी - तू संगाती
बांधुन गाशा आता मृत्यो बसलो आहे ....
अशा प्रकारे अजिबात न घाबरता अगदी मृत्युशी सुध्दा हा कवी गप्पा मारतांना दिसतो, नव्हे त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आपल्या सर्वांना चांगलीच परिचयाची असावी असे मला वाटते.
व्योमगंगा, मंजुघोषा, भुजंगप्रयात, राधा, स्रग्विनी, आनंदकंद, मंदाकिनी, देवप्रिया, वैखरी, कलिंदनंदिनी, मनोरमा, स्वरगंगा, ब्रह्मपुरक, भामिनी, विधाता, विद्युन्माला, लज्जिता, हिरण्यकेशी, अनलज्वाला, सुखराशी, प्रसूनांगी, पादाकुलक, सुरमंदिर इत्यादि वृत्तांमध्ये लिहिलेल्या ९८ गझला या संग्रहात समाविष्ट असून, वृत्तांची नावे, त्यांची लगावली सुध्दा गझलेवर नमूद केलेली आहे. नव्यानेच गझल लिहिणा-या, गझल लेखन शिकणा-यांना या माहितीचा उपयोग होईल अशी अपेक्षा ठेऊन लिहिलेल्या या संग्रहास माझ्या खूप खूप अशा शुभेच्छा......!
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
0 Comments