🌹पुस्तक परिचय 🌹
![]() |
गझलवर्षा’त चिंब करणाऱ्या ‘गझलयात्री |
‘गझलवर्षा’त चिंब करणाऱ्या ‘गझलयात्री’
सुरेश भट यांनी गझलेची चळवळ सुरू केली तेव्हा महिला गझलकारांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच नगण्य होती. परंतु गझलेच्या आकृतिबंधात शिगोशीग भरलेल्या भावसौंदर्यामुळे गझललेखनाकडे महिला वर्गाचा कल दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालला आहे. गझलेच्या पुरेशा तंत्राचा नीटपणे अभ्यास करून महिला नजाकतीने आज गझला लिहीत आहेत. अभिव्यक्तीच्या प्रभावी प्रकटीकरणासाठी महिलांना कवितेपेक्षा गझलच अधिक जवळची वाटू लागली आहे. जिवलगाशी हितगुज करावे, मनातले बोलावे असा संवादीस्वरूपात गझलेतून व्यक्त होणाऱ्या महिला गझलकारांची संख्या लक्षणीयरीत्या विस्तारत चालली आहे. ‘गझलवर्षा’ आणि ‘गझलयात्री’ हे महिलांचे दोन स्वतंत्र प्रातिनिधिक गझलसंग्रह प्रकाशित झाले, हे त्यांचेच द्योतक आहे. गझल वाङ्मयात वैशिष्ट्यपूर्ण गझलांची मौलिक भर घालणाऱ्या या महिला गझलकारांचे स्वागत केले पाहिजे.
कविता रसिक मंडळी ‘करम’-आधार फाऊंडेशन तर्फे भूषण कटककर, उमेश कोठीकर यांनी ‘गझलवर्षा’ तर गझलमंथन प्रकाशानातर्फे जयवंत वानखडे यांनी ‘गझलयात्री’ हे खास महिलांचे प्रातिनिधिक गझलसंग्रह संपादित केले आहे. ‘गझलवर्षा’ या प्रथम गझलसंग्रहात ५५ महिलांच्या ११० गझलांचा तर ‘गझलयात्री’ या दुसऱ्या गझल संग्रहात १३६ महिलांच्या गझलांचा अंतर्भाव आहे. या दोन्ही गझलसंग्रहातून भिन्नभिन्न आशयाभिव्यक्तीच्या भरगच्च गझलांच्या मैफलीचा मनसोक्त आनंद रसिक जनांना लुटता येतो. तसेच पुरुष गझलकारांच्या आणि महिला गझलकारांच्या गझल लेखनाची स्वतंत्रपणे तुलनात्मक मीमांसादेखील अभ्यासकांना करता येऊ शकते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही महिला प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे विशेष महत्त्व आहे.
पूर्वी दिवाळीअंकातून, मासिकातून, दैनिकातून महिला जीवनाशी निगडित ‘चूल आणि मूल’ सासर-माहेर, तिला सोसावे लागणारे अतोनात कष्ट, तिची होत असलेली अवहेलना, हतबलता, सोशिकता, यासारख्या पारंपारिक विषयांची कवितेतून चाकोरीबद्ध मांडणी करण्यात येत होती. गझल हा भावभावनांचा प्रकटीकरणाचे एक दणकट माध्यम आहे. ही बाब अनुभवाने लक्षात आल्यानंतर डिजिटल, संगणक युगाचे नवे भान बाळगून पुढ्यात येणाऱ्या नवनव्या आव्हानांना बदलत चाललेल्या समस्येचे निरनिराळे पदर महिला भूमिकेतून गझलेतून उत्कटतेने आविष्कृत करत येत आहेत. बदलत्या काळानुरूप नव्या भानाची, सजगतेची जाणीव सभोवतालाबरोबरच काळाला करून देण्यात येत आहे. हे परिवर्तनात्मक रूप निश्चितच गझलेला अधिक समृद्ध करणारे आहे. त्यामुळे महिला गझलकारांना नाके मुरडण्याचे कारण नाही. तद्दन गद्यप्राय मुक्तछंदाच्या नावाखाली भरमसाठ कविता पाडणाऱ्या कवींच्या भाऊ गर्दीत महिला भगिनी गझलकारांनी लिहिलेल्या या छंदोबद्ध, तंत्रशुद्ध गझलांचा अभिनव प्रवाह गझल सागराला विशाल करणारा आहे. त्याचे वेगळेच अप्रूप वाटावे.
गझलवर्षा
कवितेकडून गझलकडे वळलेल्या माधुरी चव्हाण-जोशी यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ वाटावा असाच आहे. ‘गझलवर्षा’ या गझलसंग्रहाचे प्रतिनिधित्व करणारा हा शेर पाहा.
सोंगट्या बदलून जेव्हा डाव दुसरा मांडला,
जागली माझ्यात फिरुनी जिंकण्याची लालसा
गझलेची ही खासियत आहे की गझल कधी हार पत्करत नाही. ती निरंतर जिंकण्याची लालसा निर्माण करते. शेराच्या अवघ्या दोन ओळीत एका संपूर्ण कवितेचा प्रत्यय असतो. गझल आणि कविता हाच यातला फरक आहे. गझल लेखनात प्रतिभेला नवनवे धुमारे फुटतात. शेरागणिक नवा बहर फुलतो, आशयाच्या पानांनी फांदी बहरते. त्यामुळे गझल कसदार बनते. स्वाती यादव म्हणतात त्याप्रमाणे
आत खोलवर बरेच काही तुटते आहे
पान नवे पण फांदी वरती फुटते आहे
गझल शब्दांना आत्मविश्वासाचे बळ पुरते. जगाच्या धाकात न राहता, शरण न जाता, माणसांना बदलण्याची धमक रक्तातून येते. रडत कुढत न बसता, जखमांना सुगंधित करून बदलाचे वारे रक्तात भरू हे आत्मबळ आणि इच्छाशक्तीचा संचार यामिनी दळवी यांनी त्यांच्या शेरातून असा केला आहे.
माणसांना बदलण्याची धमक या रक्तात ठेवू
चल जगाला आज आपण आपल्या धाकात ठेवू
भावनिक, वैचारिक, सामाजिक, परिवर्तन अशा सर्वच स्तरावर महिलांची गझल आता निर्भयपणे बोलू लागली आहे.
गझलयात्री
या दुसऱ्या प्रातिनिधिक गझल संग्रहात काळानुरूप तीन भाग करण्यात आले आहेत. यात तीन कालखंडातील तीन पिढ्यांच्या गझला वाचावयास मिळतात यावरून गझलेचा बदलत जाणारा आलेख तफावतींसह समोर येतो. नव्या शैलीतून नाविन्यपूर्ण प्रतीके, रूपके, प्रतिमांतून केलेली मांडणी, धाटणी चित्त वेधून घेते. समाज माध्यमातून व्यक्त होणाऱ्या महिला गझलकारांच्या यात प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या गझल लेखनाला आधुनिकतेची झालर आहे. भूतकाळ विसरून नव्या युगाला सामोरे जाण्याची, नवी प्रश्न समजून घेण्याचा ध्यास त्यांच्या प्रतिभेला लागलेला आहे. नव्या प्रवासातील या गझलयात्री आहेत. गझल म्हणजे त्यांच्या आशा आकांक्षेला मिळालेले जणू पंखच आहेत. नवीनतम खायालांच्या उंच अंबरात झेप घेण्यासाठी त्या उत्सुक आहेत. स्नेहलता झरकर-अंदुरे यांचा शेर याची साक्ष देतो.
आशेला पंख मिळाले विशाल अंबर दिसता
चाकोराला सोडून थोडे उडून घ्यावे म्हणते
काल कितीही कूस बदलत असला तरी महिलेच्या कष्टप्रद जगण्याचे तिच्या शोषणाचे वेगवेगळे रूप समोर येतेच. पण बाई कधीच डगमगून जात नाही. जगताना रस्ता चुकला, वाटा खचल्या तरीही ती मनातून खचत नाही. खडसर वाट तुडवत तिचा प्रवास मात्र सकारात्मकतेने सुरूच असतो. स्वतःच्या आकाक्षांना मारत ती घर-अंगण फुलत राहते. बाईपणाच्या कर्तृत्वाची कहाणी अनिसा शेख यांनी गझलेतून शब्दांकित केली आहे.
जगताना जर चुकला रस्ता खचल्या वाटा
खळग्यानाही तुडवत चालत असते बाई
तर्हेतर्हेच्या जुलमाची धग सोसून बाई सूर्यासारखी प्रखर बनत चालली आहे. सूर्यालाच प्राशन केल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. तिला आता कोणत्याही धगीचे जराही भय राहिले नाही. तिच्या तेजाळ जगण्यातली प्रखरता प्रकट करणारा प्रिया कौलवार यांचा शेर पाहा.
प्रखर झाले तुझ्या इतकी तुला प्राशून मी सूर्या
अता कोण्या धगीचे भय जराही राहिले नाही
त्याच त्या दुःखांच्या ओझ्याखाली दबून जाणे महिला गझलकरांना मंजूर नाही. जुन्या रूढी प्रस्थांना दूर सारून, परंपरेचे रिंगण भेदण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे. केवळ गर्हाण्यांचे पाढे व्यवस्थेसमोर वाचत बसण्यात त्यांना रस नाही. नवी दिशा चोखाळण्याची उर्मी त्याचा हुरूप वाढत आहे. नव्याने शोध घेण्यासाठी ती पुढे सरसावत आहे. महिलांना दिशा दाखविणारा अनोखा शेर सरिता गोखले यांनी लिहिला आहे.
माझे मला नव्याने शोधायला हवे
काहीतरी अनोखे जाणायला हवे
निसर्गासह तारुण्यसुलभ भावभावनांचे, तो आणि ती नाते संबंधाच्या हळुवार भावनांच्या बहुरंगी गझला ‘गझलयात्री’ मधून वाचावयास मिळतात. गझलवर्षा आणि गझलयात्री या दोन्ही महिला प्रातिनिधिक गझलसंग्रहात चांद्यापासून बांद्यापर्यंत नव्या जाणिवेने अतिव्यक्त होणाऱ्या गझलकारांची संख्या उल्लेखनीय आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या गझल सृजनाची गझलविश्वात सांगोपांग चर्चा होणे अपेक्षित आहे.
गझलवर्षा, गझलयात्री: महिला गझलकार संग्रह
प्रकाशन: पृथ्वीराज, गझलमंथन
पृष्ठे: १९२ मूल्य: २०० रु.
पृष्ठे: १४४ मूल्य: २००रु.
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३
0 Comments