🌹पुस्तक परिचय 🌹
🌹गझलसंग्रह: स्वच्छ हृदयाचे झरे🌹
गझलच्या माध्यमातून मैत्री झालेले माझे एक तरुण मित्र आणि गझलकार श्री एजाज़ शेख यांच्या "स्वच्छ हृदयाचे झरे" नावाच्या गझल संग्रहाची एक प्रत नुकतीच माझ्या हाती पडली आणि " स्वच्छ हृदयाच्या झ-यां " पैकी एक झरा माझ्या अगदी जवळून खळखळ खळखळ असा वहात असल्याचा भास मला झाला. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पुस्तकाच्या पार्सलचे प्लास्टिकचे कव्हर काढल्या काढल्या नजरेस पडलं ते या संग्रहाचं सुंदर असं मुखपृष्ठ ....! रसिकहो, या मुखपृष्ठावरुनच श्री एजाज़ शेख यांचा स्वभाव अगदी साधा, भोळा, सरळसोट पण समजदार असावा असा अंदाज मी बांधला आणि पुस्तक वाचू लागलो. पुस्तक विवरणानंतर माझ्या नजरेस पडली ती "अर्पण पत्रिका" जी एजाज़ शेख यांनी 'अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये, वडिलांची छत्रछाया अगदी लहानपणीच हरवलेली असतांना, त्यांचे व त्यांच्या मोठ्या भावाचे पालनपोषण मोठ्या हिंमतीने करुन आपल्या दोनही मुलांना या देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याचे काम केलेले आहे, अशा आपल्या आईला, म्हणजेच श्रीमती अफसर बानो यांना अर्पण केली आहे. ऋणनिर्देश करतांना आपली पत्नी यास्मिन, सगळे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, साहित्य प्रेमी व गझल रसिकांचा उल्लेख ते आवर्जून करतांना दिसतात. माझे मित्र आणि आणखी एक तरुण गझलकार श्री विशाल राजगुरु यांची सुंदर व यथायोग्य शुभेच्छारुपी प्रस्तावना लाभलेल्या या संग्रहाची पाठराखण केली आहे ती या पुस्तकाचे शीर्षक असलेल्या " स्वच्छ हृदयाचे झरे आहोत आपण " या गझलेने ....!
सुमारे ७९ गझलांचा समावेश असलेल्या या संग्रहातील अगदी पहिल्याच गझलेमध्ये जिथे ते ....
उरली न माणसांच्या देशात माणसे
ही फक्त माणसांच्या वेषात माणसे ....
अशा शब्दांत आपली खंत व्यक्त करतात, आपल्या आसपास वावरणा-या माणसांबद्दल आपले मत अगदी परखडपणे मांडतांना दिसतात, अगदी तिथेच ....
स्वर्गासमान सुंदर होईल ही धरा
जपतील माणसे जर हृदयात माणसे ....
अशा प्रकारचा दुर्दम्य आशावाद सुध्दा मांडून जातांना दिसतात. घरातील विपरीत, बिकट आर्थिक परिस्थितीत घेऊ शकलेल्या जेमतेम शिक्षणामुळे लहानपणीच अंगावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी व त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे पण स्वानुभवातून मिळवलेले व्यवहार ज्ञान यामुळे अधिकच व्यावहारिक झालेले श्री एजाज़ शेख जेंव्हा ....
नेहमी डोळ्यात पाणी ठेवतो
त्यामुळे ओंजळ उताणी ठेवतो ....
दोन मिस-यांचीच आहे जिंदगी
त्यात मी अवघी कहाणी ठेवतो ....
असा शेर लिहून जातात तेंव्हा ते आपण भोगलेल्या, आपण जगलेल्या आयुष्याबद्दलच बोलत असावेत असे वाटून जाते.
मायबापाला बघून वृध्दाश्रमी
हुंदकाही दाटला माझ्यातला ....
तो जरी कडवेपणाने वागला
गोडवा मी ठेवला माझ्यातला ....
हा शेर वाचतांना गझलकार श्री एजाज़ शेख यांच्यावर लहानपणी झालेले चांगले संस्कार तर रसिकांच्या लक्षात येतातच पण आयुष्यातही ते त्या संस्कारांचे पालन अगदी कसोशीने करत आहेत हे सुध्दा आपल्या लक्षात येते. आपल्या सभोवती वावरणाऱ्या मतलबी, फटकळ आणि चिकित्सक अशा माणसांबद्दल बोलतांना ....
या .... जरासे वापरा, नंतर बघा
मी किती खोटा खरा, नंतर बघा ....
घ्या चहा आधी गरीबाच्या घरी
तो कडू किंवा बरा, नंतर बघा ....
आजही एजाज़ नाही वेगळा
दु:ख माझे पांघरा, नंतर बघा ....
असे अगदी साध्या व सरळ शब्दांत जगाकडून तसेच आपल्या माणसांकडून मिळालेल्या हिणकस अशा वागणुकीबद्दल बोलतांना दिसतात, त्याच वेळी अगदी सौम्य अशा शब्दांत त्यांना फटकारतांनाही दिसून येतात. तिथेच पुढच्याच गझलेत ....
कळस गाठायला निघतात सगळेजण
तरी गाठू कुठे शकतात सगळेजण ....
जिथे खेळायला काही मिळत नाही
तिथे माणूस वापरतात सगळे जण ....
अशा "वापरुन फेकून देण्याच्या" ( Use and throw ) माणसाच्या वृत्तीवर भाष्य करतांना दिसून येतात.
लहानपणापासूनच आपल्याला आपले वडील बघायला सुध्दा मिळाले नाहीत या जगातल्या सर्वात मोठ्या, आभाळाएवढ्या दु:खाची आठवण श्री एजाज़ शेख आपल्या हृदयात जपून ठेवतांना ....
ह्या मौनामध्ये सुध्दा दडली किंकाळी आहे
ही गझल वगैरे नाही दु:खाची पाळी आहे ....
मी जन्म घेतल्यापासुन आईच पाहिली कारण
आई जमिनीवर आहे बाबा आभाळी आहे ....
असे लिहून, मी सावलीत असुनही गारवा मिळत नाही तसेच अद्यापही मी स्वत:ला मनसोक्त भेटू शकलो नाही अशा शब्दांत आपले दु:ख व्यक्त करतात, तर ....
चंद्र दिसल्यावर जगाची ईद होते
तू मला दिसल्या क्षणाची ईद होते ....
हिंदु मुस्लिम बौध्द किंवा शिख इसाई
जो मला भेटेल त्याची ईद होते ....
अशी मोठ्या प्रेमाने, प्रचंड सकारात्मकतेने, माणुसकीने व जगण्याची उमेद घेऊन लिहिलेली गझल लिहिणारे एजाज़ शेख जेंव्हा ....
नाव माझे खोडले त्या मैफिलीतून
जात माझी वाटते लक्षात आली ....
हा असा किंवा ....
नाव एजाज़ वाचले त्यांनी
आणि म्हंटले, जहाल रक्ताचा ....
असा कडवटपणा, जातीयवादी, धर्मव्देष दाखवणारा, अनुभव व्यक्त करणारा शेर लिहितात तेंव्हा रसिकांचे मन सुध्दा दु:खी होऊन जाणार एवढं मात्र नक्की ....!
पुसदा जि. अमरावती (महाराष्ट्र) हे मुळ गाव असलेले, अकोला येथे डाक सहाय्यक (Postal Assistant) म्हणून नोकरीस असलेले, (१) स्व.जयराम गायकवाड गझल गौरव पुरस्कार - २०२३, (२) काव्य रसिक मंडळ, डोंबिवली यांचा कै अनिल साठ्ये स्मृति सर्वोत्कृष्ट गझल संग्रह पुरस्कार - २०२३ आणि (३) मला माझ्या महाविद्यालयीन जीवनात, मराठी हा विषय शिकवणा-या प्राध्यापिका यांच्या नावाने दिला जाणारा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा कै सुहासिनी इर्लेकर पुरस्कार -२०२२, (४) सिंधू वैभव साहित्य समूह, कणकवलीचा कै मधुसूदन नानिवडेकर काव्यसंग्रह पुरस्कार -२०२३, (५) तितिक्षा इंटरनॅशनल पुणेचा उत्कृष्ठ ग़ज़ल संग्रह पुरस्कार २०२३, (६) कवितेचे घर शेगांव बु. जि. चंद्रपूर यांचा बापुरावजी पेठकर ग़ज़ल सन्मान २०२३, (७)इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर च्या वतीने देण्यात येणारा स्व .विठ्ठलराव बोबडे आणि कुसुम कमलाकर काव्य पुरस्कार २०२३, (८) कवी ग़ज़लकार विनायक कुलकर्णी पुरस्कृत स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी (तात्या) जवळेकर स्मृती तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार पेठ सांगली २०२३, (९) अंकुर साहित्य संघ अकोला यांचा २०२२ वर्षीचा उत्कृष्ठ ग़ज़ल संग्रह पुरस्कार तसेच (१०) स्व. लक्ष्मणराव जेवणे गजल अंकुर पुरस्कार २०२४, आदी पुरस्कार मिळवणारे, " स्वच्छ हृदयाचे झरे " नावाने आपला पहिला गझल संग्रह प्रकाशित करणारे, 'माझे तुटके फुटके लिखाण' हेच माझे या पुस्तकाविषयीचे मनोगत आहे असे सांगणारे, अधिकाधिक वास्तविक व जीवनाभिमुख लिहिण्याचा प्रयत्न केलाय अशी प्रांजळ कबुली देणारे, आयुष्यात कधीही प्रत्यक्ष भेट न झालेले पण वाचून तसेच ऐकून माहिती असलेले आणि आता या पुस्तक रुपाने मला भेटलेले गझलकार श्री एजाज़ शेख यांच्या " स्वच्छ हृदयाचे झरे " या पहिल्या वहिल्या गझल संग्रहाबद्दल अजूनही बरंच काही लिहावं असा वाटणारा मोह सध्या आवरता घेतो व पुन्हा एकदा या गझल संग्रहाबद्दल लिहिण्याचे आश्वासन मी माझ्या रसिक वाचकांना देतो.
" स्वच्छ हृदयाचे झरे " हा गझल संग्रह, गझल क्षेत्रातील एक दर्जेदार, उत्कृष्ट आणि म्हणूनच संग्राह्य गझल संग्रह झाला असून यातील प्रत्येक गझल आणि गझलचा प्रत्येक शेर वाचनीय आणि प्रभावी झाला आहे कारण श्री एजाज़ शेख यांनी आपले अनुभव मांडतांना आपला जीव त्यात ओतलेला आहे, असा मला आलेला अनुभव रसिकांना सुध्दा आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो.
श्री एजाज़ शेख यांचे ईदबद्दलचे शेर आपण या आधी पाहिलेलेच आहेत आणि म्हणून आता .....
यासाठी नजर घराला कोणाची लागत नाही
अंगणात तुळशीसाठी मी स्थान ठेवले आहे .....
असे सांगणा-या श्री एजाज़ शेख यांचे विठुमाऊलीवर लिहिलेले हे काही शेर आपल्यासमोर ठेवतो ....!
(१) त्या वाटेने आयुष्याची गझल निघावी माझी
ज्या वाटेने विठ्ठल रखुमाई आलेली आहे ....
(२) पुढच्याला मागे खेचुन वारीला जाणा-यांनो
तुमच्यासुध्दा पाठीशी कुठलाच विठोबा नाही ....
(३) स्वत:मधेही संचारु दे सदगुण थोडे
सत्कर्माने ज्याचा त्याचा विठ्ठल होतो ....
श्री एजाज़ शेख यांच्या " स्वच्छ हृदयाचे झरे " या गझल संग्रहाला तसेच त्यांच्या उज्वल भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व शुभाशीर्वाद देतो. सर्व रसिक वाचकांना आषाढी एकादशीच्या आणि ईदच्या शुभेच्छा देतो व माझे लांबत चाललेले हे लिखाण इथेच थांबवतो ....!
दिवाकर चौकेकर
गांधीनगर (गुजरात)
0 Comments