Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

रसिकांच्या अंतरंगात ओल पेरणारा ....' निवडुंग ' Gazalkara Dr Snehal Kulkarni

🌹 पुस्तक परिचय 🌹




🌹रसिकांच्या अंतरंगात ओल पेरणारा ....' निवडुंग '🌹


 रूजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो 

निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही 


    प्रतिभावंत गझलकार दत्तप्रसाद जोग यांचा

 ' *निवडुंग* ' गझलसंग्रह दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केला अन् लक्षात आलं या निवडुंगाने तर काळजात खोलवर ओल पेरलीय अन् मग अनाहुतपणे लेखणी उचलली गेली. खरंतर मराठी गझलक्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या, अद्भुत गीतरामायणाचा अप्रतिम हिंदी अनुवाद करण्याची क्षमता असलेल्या त्यांच्या लेखणीवर मी भाष्य करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे पण ..त्यांच्या शब्दांतून काळजात झिरपलेला ओलावा आपोआपच पाझरू लागलाय .


मी कधी न केला दावा मी बरा आहे  

एवढा विश्वास ठेवा मी खरा आहे 


...सत्यतेची अशी हमी जेव्हा मनोगतातच मिळते तेंव्हा गझलसंग्रह वाचण्यापूर्वीच मन सकारात्मकतेचा हुंकार देऊ लागतं .मनोगतात त्यांनी गझलेविषयीची जे प्रामाणिक मत, जी भावना मांडली आहे ती निश्चितच गझलेला पोषक , नवोदितांना प्रेरणादायी आहे .प्रसादजींचे मार्गदर्शक सुप्रसिद्ध गझलकार प्रशांतजीं वैद्य म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच प्रसादजींची लेखणी कालौघात टिकणारी आहे कारण ती ...


काळाच्या ओघात बुडू दया आधी गाथा सगळ्यांच्या 

असेल वारस कुणी तुक्याचा तर त्याची तरणारच ना ..! 


असे अजरामर शेर सहजी लिहून जाते .

त्यांची गझल आपल्याला 

..नेणिवेकडून.. जाणिवेकडे 

आभासाकडून ...वास्तवाकडे 

स्वप्नातून.. सत्याकडे ..

असा उलटा प्रवास करायला भाग पाडते आणि माझ्यामते हेच त्यांच्या लेखनीचे यश आहे .भाषा , शब्द , लय , ताल , नाद ...या निकषांवर त्यांची गझल सर्वोत्कृष्ट आहेच ..पण मधुरता व प्रासादिकता ..जो साहित्याचा आत्मा आहे तो त्यांच्या गझलेत आपसूक उतरल्याचा जाणवतो .काव्य शृंगारून त्यात या आत्म्याची प्रतिष्ठापना करुन गझल खऱ्या अर्थाने जिवंत करण्याची कला शारदादेवीच्या कृपेने त्यांना साधलीय ..असं हा गझलसंग्रह वाचताना पदोपदी जाणवतं आणि त्यामुळे त्यांची गझल रसिकांच्या मनावर आपली नाममुद्रा उमटवते .

      नुसतेच तालासुरात शब्द आले म्हणजे रसनिष्पत्ती होत नाही तर त्या शब्दांनी सूचित केलेला अर्थ , भाव... नाविन्याने , विविध वलये निर्माण करत रसिकांच्या मनःपटलावर आदळत राहिला तर होणारी रसनिष्पत्ती उच्च दर्जाची असते .प्रसादजींचे अनेक शेर वाचताना ही अनुभूती येते .बघा ....


पायघडयांच्या अभ्यासाने इतके कळले आहे 

स्वाभिमानही त्या जागी अंथरला जाऊ शकतो 


नक्की मी मातीला माझ्या घट्ट पकडले आहे 

नक्की मी आभाळाला आवडला जाऊ शकतो 


तळाशी खोल डोहाच्या मला जाण्यात आहे रस 

तुझीही हौस भागव तू मला पाण्यात बघण्याची 


दरफलक पाहून इथला वाटले क्षणभर मलाही 

मीच का बाजार माझा मांडला अद्याप नाही 


देहामधल्या आठवणींचे थर सांभाळत उडला तो 

निघतानाही या आत्म्याच्या माथ्यावरती भार किती 


      त्यांच्या गझलविष्कारात चराचरातील समस्त जिवांच्या जिवीताचे, जीवनमानाचे प्रतिबिंब पडलेले जाणवते.यासाठी सूक्ष्म अवलोकन शक्ती , निर्व्याज सर्जनशीलता, प्रचंड व्यासंग हवा .अभ्यासांती अहंकार गळत पडत जाऊन ज्या साहित्यिकाजवळ विशुद्ध अनुभूती राहते तोच अखिल विश्वाला असे विन्मुक्त शब्दरूप देऊ शकतो...जे वाचून रसिक /श्रोता अंतर्बाह्य हेलावून जातो .हे निसर्गाशी तदाकार होणं पहा ...


कुठलीही रोपे नियती फेकून कुठेहीं देते 

जन्माने जाई असते नशिबाने बाभळ होते 


छिन्नीला सामोरा जा पाषाणी ठेवत छाती 

हे दैव ढेकळांमधुनी मूर्तीला घडवत नाही 


मुळांनो आज मातीचा तुम्ही अंदाज बांधावा 

उन्हाने तापल्यानंतर किती देईल ओलावा 


मिळून सगळे उचलत होतो एक साखरेचा कण 

किती चांगले होतो जेव्हा मुंग्या होतो आपण 


रात्र , चांदणे , समुद्र , लाटा विसरुन दूर निघाल्यावर 

चपलेमध्ये हुळहुळणारे वाळूचे कण असणारच 

  

     अनेक शेरांची बैठक पूर्णपणे वैचारीक आहे .ते वाचल्यावाचल्या आपण आत्ममग्न होतो आणि मग आपला निर्मळ आत्मा स्वतःलाच काही प्रश्न विचारु लागतो ,योग्य निकषांवर स्वतःची चाचपणी करू लागतो .अशा प्रकारचे शेर निश्चितपाणे आपल्या मनाची धारणा बदलण्याचा प्रयत्न करतात , आपली स्वतः वरची , माणसांवरची, माणुसकीवरची श्रद्धा टिकवून ठेवण्याचे काम करतात जे समाजहितासाठी उपयुक्त असते .


तिथे तुला कळतील माणसे 

जिथे दुःख झाडाचे कळले  


बेत उद्या परवाचे कळले 

मूर्त्या कळल्या साचे कळले 


एक धोरण पाळ आता 

चाळ होणे टाळ आता 


फक्त होतील हात काळे पण इजा होणार नाही 

कोळसे झालेत त्यांचे काल जे होते निखारे 


           साहित्याचे असे अनोखेपण जपूनही साध्या सरळ भाषेत रसिकांच्या काळजाला हात घालण्याची सचोटी त्यांना साधलीय .प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करणारे त्यांचे काही शेर पहा 


आज ठेंगणे झाले हे आभाळ मला 

जवळ घेउनी म्हणालीस बाळ मला 


अद्याप तुझे आयुष्या हे खेळ समजलो नाही 

परक्यांना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही 


कधीही पांगळे नाते पुढे खेचायचे नसते 

बरोबर न्यायचे माणूस कलेवर न्यायचे नसते .


छानसे देऊन कारण एकमेकांना 

विसरतो आहोत आपण एकमेकांना 


आपल्या घरातच आपण मग उपरे उपरे होतो 

कुठलेही नाते जेव्हा हाताला लागत नाही  


....आणि काही अलवार शेर 


पुन्हा बेचैन मी कारण तुझे बोलावणे आले 

तुला भेटायचे म्हणजे स्वतःला रोखणे आले 


तुला सहज विचारले खरेच मी हवा तुला 

उशीर लागला तुला हसून हो म्हणायला 


ती भेट तिची निशिगंधी ..निश्वास तिचे ते अत्तर 

भेटून कुणाला केव्हा इतका दरवळलो नाही 


तू नसतानाची संध्या अनुभवणे सोपे नसते 

ती कातर कातर असते अन् काजळकाजळ होते 

अहा ....


         सौंदर्य आणि आनंद या दोन्ही गोष्टींचा मिलाफ त्यांच्या गझलेत झालेला दिसून येतो त्यामुळे तिचा शुद्ध आस्वाद घेणे सहज शक्य होते ..मूलतः साहित्यिकाचा जो स्वभाव असतो तो त्याच्या साहित्यात निश्चितपणे प्रतिबिंबीत होतो असतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं .प्रसादजींचा विनम्र , प्रांजळ स्वभावाचा प्रभाव त्यांच्या शब्दांवरही पडलेला जाणवतो .दिव्य प्रतिभाशक्ती आणि विनम्रता यांच्या सहयोगाने निवडुंग गझलसंग्रह उत्तरोत्तर अधिकाधिक उंच आणि अधिकाधिक सखोल होत गेला आहे .

...आणखी काय लिहू ? 


     प्रशांत वैद्य सरांची

 प्रस्तावना , वैभव जोशी सरांचा समारोप , बेफिकीर भूषण कटककर सर आणि नितीन देशमुख सरांचा चार ओळीत अवकाश रेखाटण्याचे सामर्थ्य असलेला शुभेच्छा संदेश ......या सर्वांनी ' *निवडुंग* ' ..वर अभिजात साहित्याचे शिक्कामोर्तब केले आहे .

       तुम्हीहीं या साहित्याकृतीचा जरूर जरूर आस्वाद घ्या .....

 



डॉ. स्नेहल कुलकर्णी

गारगोटी (कोल्हापूर)

मो. 9922599117 

Post a Comment

0 Comments