• गझल प्रभात •
🌹तरी रिकामी म्हणते ओंजळ🌹
क्षणभंगुर हे जीवन पण मग किती घालते येथे गोंधळ
भरुभरुनी ते सुख भोगते तरी रिकामी म्हणते ओंजळ
गाफिल राहू नको माणसा सजग असावे इथे नेहमी
कधी कधी ते संकट सुद्धा रूप घेउनी येते सोज्वळ
केव्हाही जा लांबुन माझ्या शेतातिल ती हद्द दावते
घट्ट रोउनी पाय उभी ती बांधावरची वेडी बाभळ
विसरलीस तू मला सखे अन निघून गेली क्षणात एका
तुझ्या सुगंधी परी स्मृतींची मनात चालू असते वर्दळ
दुःख न काही आहे मजला खात्रीने तू सांगतेस पण
गालावरती आला कुठुनी सांग मला हा काजळ ओघळ
कितीक दिवसा पासुन होता दुर्लक्षित तो पडला येथे
घाव सोसले टाकीचे अन पूजनीय मग झाला कातळ
जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments