Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शेराची बांधणी- एक विचारधारा Gazalkara Dr Snehal Kulkarni

 •गझल प्रभात•

शेराची बांधणी- एक विचारधारा


🌹शेराची बांधणी- एक विचारधारा🌹



बेख़ुद देहलवी यांचा एक शेर आहे.


मेरा ख़याल मुझे कामयाब कर देगा

ख़ुदा इसी को ज़ुलेख़ा का ख़्वाब कर देगा

- बेख़ुद देहलवी


यशस्वी शेर म्हणजे सौंदर्याचे स्वप्न...!!


शेर हा एकाच अर्थावर  उभा नसतो त्याला गोमेसारखे अनेक पाय असतात. आणि तो प्रत्येक पाय प्रेमापासून... ते अगदी मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, समाजरचना शास्त्र .... अशा अनेक अंगातून उभारत असतो. अगदी मानसशास्त्रीय दृष्टयाही असे म्हणता येईल की खयाल म्हणजे गझलकाराच्या मनात निर्माण होणारी एक विशिष्ट प्रक्रिया आहे म्हणजे शेर गझलकाराच्या, व्यक्तीमनात सचेतन होत असतो. पण सर्व गझलकारांची व्यक्तिमत्वे एकसारखी असू शकत नाहीत. त्यांची अभिरुची, संस्कृती, विचारधारा,दृष्टीकोन शिक्षण... या सगळ्या गोष्टी भिन्न भिन्न असतात.. त्यांचे काही पूर्वग्रह असतात. या सर्व गोष्टींचा परिणाम...खयाल ते शेराची उत्पत्ती यावर होऊ शकतो, होतो.

   तसेच अभ्यासू रसिकाला शेराच्या पहिल्या वाचनाने जाणीवेत न आलेली आणखी काही सौंदर्यस्थळे दुसऱ्या वाचनात ठळकपणे जाणवतील.. कदाचित एखाद्या खयालाचे, शेराचे काही अंशी असलेले दुबळेपणही लक्षात येईल. एवढेच नव्हे तर शेराच्या खोल खोल अंतरंगात शिरताना आणखी वेगळाच अनुभव येईल.

....म्हणजे शेर रसिक वाचकाला तीन रूपात जाणवणार आहे.

       पहिलं रूप त्याचे वाचन, अवलोकन किंवा श्रवण... म्हणजे मी तो शेर बघितला, वाचला आणि ऐकला हे त्याचे physicical रूप. मग यात त्याचे व्याकरण, शब्दशुद्धी वृत्तानुसार त्याची लय, ताल.. प्रासादिकता, गझलीयत... या सगळ्या गोष्टीनुरुप तो किती परफेक्ट आहे... हे पाहणं आलं.

        आता याच्या पुढे जाऊन येते शेराचे अर्थसापेक्ष प्रतिमांकित... Representational रूप. खयाल मांडण्यासाठी तुम्ही ज्या प्रतिमा, प्रतीकं, रूपकं... यांचा आधार घेतला आहे... त्या दोहोंचा अर्थाअर्थी किती घनिष्ठ संबंध आहे..आणि ते एकमेकांना कसे represent करतात... हे याठिकाणी खूप महत्वाचं ठरतं.

       पुढे ह्या दोन्ही रूपांवर वाचकाच्या, व्यक्तीवैशिष्ट्यानुसार प्रक्रिया होऊन त्याच्या मनोविश्वात शेराचे एक मनोधारी,conceptual रूप तयार होते. त्या शेराबद्दल एक besic concept तयार होतो... त्याचा आणखी पुढे विस्तार होत राहतो.

      म्हणजे आपण म्हणतो त्याप्रमाणे या ह्रदयीचे त्या ह्रदयी होताना....

गझलकार विस्तारलेला खयाल एका शेरात, दोन ओळीत मांडतो.. तिथे त्याला सूक्ष्म रूपात बसवतो.तो  वाचकाकडे ह्रदयांतरीत होतो... आणि त्याच्या विचारधारेनुसार तो पुन्हा विस्तारत जातो. या दरम्यान तो स्वतःबरोबर काय काय वाहून नेऊ शकतो.... यावर त्याचे अनन्यसाधारणत्व ठरत असते.म्हणून...

शेर लिहीत असताना काही मुद्दे कायमस्वरूपी डोक्यात असले पाहिजेत


शेराने रसिकांच्या भावना, विचार आणि इच्छाना एकवटले पाहिजे. गझलकाराच्या व्यक्तीत्वाने जे जे आत्मसात केले असेल, त्याच्या अंतर्मनाला जे प्रतीत झाले असेल तेच त्याच्या कलाकृतीद्वारे, गझलेद्वारे सहजपणे व्यक्त होऊ शकते, तेवढेच तत्व कलारूप घेऊ शकते. त्याच्या पलीकडे जाऊन जे व्यक्त होईल ते कृत्रिम होण्याची दाट शक्यता निर्माण होते. गझल हे वास्तवाचे काव्य आहे आणि टी. एस. इलियट म्हणतात त्याप्रमाणे Poetry is not a turning loose of emotions but an escape from emotions, it is not an expression of personality but an escape from personality....... असे भावना आणि व्यक्तित्वाच्या पलीकडे जाऊन काहीतरी सुतोवाच करणारे शेर ...अस्सल शेर म्हणून अढळपद मिळवतात.


  गझल हा साहित्यप्रकारच असा आहे की तो गझलकाराकडून समग्र व्यक्तित्वाची मागणी करतो. एकांगी विचारधारा तिला मान्य नाही. मुद्दाम काही नाकारून वा स्वीकारून ती आपला प्रभाव पाडू शकत नाही. काही विशिष्ठ संदर्भ व्यक्त करते म्हणून ते त्याज्य आणि अमूकतमुक आपल्या जीवनाशी सुसंगत म्हणून स्वीकार्य.... असा विचार न करता ती केवळ अनुभव प्रतितीशी इमान राखून येते.. तेव्हा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनते. शब्दांशी, खयालांशी, असे इमान राखत येणारे शेर आपोआपच वेगळेपण धारण करतात..गर्दीत उठून दिसतात 

    गझल हा स्वतंत्र, स्वयंभू, स्वयंपूर्ण रचनाप्रकार आहे.गझलकार आपल्याला आलेल्या जीवनविषयक अनुभवांचा, अनुभूतीचा आविष्कार शेरातून कशा प्रकारे करतो यावर त्या शेराचे वजन, त्याची ताकद ठरत असते. त्याच्या लिखाणाच्या शैलीवरून त्याचे वृत्तांवर किती प्रभुत्व आहे आणि हे प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याने किती तपश्चर्या केली आहे...यावर आपोआपच प्रकाश टाकला जातो. अशा प्रकाशाच्या वाटा धुंडाळत येणारे शेर जास्त फील होतात, अपील होतात.


कोणत्याही  कक्षेतून अवतरला तरी शेराचे  आवाहन अधिकतर बौद्धिक असावं . रसिकांना केवळ प्रभावित करून, त्यांची वाहवा मिळवून न थांबता  वास्तवाबद्दलची एक सखोल जाणीव रसिकांच्या मनात निर्माण करून त्यांना अंतर्मुख करण्यातही तो यशस्वी व्हायला हवा.... 

    कोणतीही विचारधारा धारणा निर्भय, विन्मुक्त करून,आपल्या शेरातून शब्दांची नवीन वळणे घेत उमटवणे महत्वाचे.. तरच त्याचा खरा आविष्कार  शेरातून... प्रत्ययास येतो .


मराठी गझलेचे जनक आ. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे...


गझले तुझ्याचसाठी बांधेन राजवाडा

मजला दिली भटांनी ती ही जमीन आहे....


आपल्याला गझलेचा राजवाडा बांधायचाय.. त्या दृष्टीने श्रीमंत सामुग्री एकत्र करा.


डॉ. स्नेहल कुलकर्णी

गारगोटी 

9922599117

Post a Comment

0 Comments