🌹पुस्तक परिचय 🌹
🌹परिपूर्ण शायरीचा दिवान-ए-ऄके🌹
पनवेलचे ज्येष्ठ गझलकार ऄ.के. शेख यांच्या पहिल्या 'अमृताची पालखी' या दिवानच्या यशस्वी प्रयोगानंतर आता ताज्या टवटवीत गझलांचा 'दिवान-ऄके हा दुसरा दिवान मुंबईच्या शब्दान्वय प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. गझलसंग्रह आणि दिवान यांच्यातील मूलभूत तफावत ढोबळमानाने अशी दर्शविता येऊ शकते की, अनेकविध गझलांच्या समुच्चयाला गझलसंग्रह म्हणतात. ज्या गझलसंग्रहात गझलमधील मुळाक्षरातील सगळ्या अक्षरांनी बांधलेल्या गझला असतात. दिवानमध्ये अ पासून अ: पर्यंत क पासून ज्ञ पर्यंतची सर्व मुळाक्षरे असतात. यातील साऱ्याच गझलामधील रदीफमध्ये निर्धारित शब्दांचे अखेरचे अक्षर म्हणून आणण्यात जाणीवपूर्वक प्रयत्न गझलकारास करावा लागतो. त्यालाच 'गझल दीवान' असे संबोधण्यात येते. दीवाण म्हणजे गझलकाराच्या गझलांचा परिपूर्ण प्रवास असतो. त्याला 'मूकम्मल सफर' म्हणतात.
पूर्वीच्या काळात गझलसंग्रह प्रसिद्ध करण्याऐवजी दीवान प्रसिद्ध करण्याचा रिवाज होता. या दीवानालाच शायराचे नाव जोडलेले असायचे. जसे की दीवाने-ए-मीर, दीवान-ए-गालिब, दीवान-ए-दाग. गझलसंग्रहास वेगळे शीर्षक देण्याचा प्रघात नव्हता. अलीकडच्या काळात मराठीमध्ये ही दीवान प्रसिद्ध होऊ लागले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. गझलसंग्रहाच्या तुलनेत दीवान पूर्ण करणे अत्यंत जिकिरीचे आणि जोखमेचे काम आहे. इथे अभ्यासोनी प्रकटावे लागते. गझलकारांची शब्दांवर, छंदावर, वृत्तावर, तंत्रावर हुकमी हुकुमत असावी लागते. दीवान पूर्णत्वास नेणे हे कोण्या येरागबाळाचे काम नव्हे. विलक्षण प्रतिभेचा भाग काढतच दीवान आपल्या परिपुर्ततेची वाटचाल करत असतो. यात खऱ्या अर्थाने शायराच्या प्रतिभेचा, व्यासंगाचा, अभ्यासाचा, बहुश्रुततेचा कस लागत असतो. चिकाटी अन् सचोटीची कास धरूनच कसोटीला उतरावे लागते. लेखणीत कस असल्याशिवाय सकस लेखन घडत नाही.
प्रस्तुत 'दीवान-ऄ-के' मध्ये जवळपास चाळीस वृत्तांचा अंतर्भाव आहे. बारा मात्रांच्या आनंद, कादंबरी अशा वृत्तापासून क्रीडा या बेचाळीस मात्रांच्या गझलांचा समावेश आहे. एकूण २०७ गझलांचा हा समुच्चय आहे. दीवान परिपूर्ण होण्यासाठी त्याची परिश्रमपूर्वक परिपूर्ती करण्यात आली आहे. या दीवानमध्ये विषयांचे मोठे वैविध्य आहे. प्यार, प्रणय, मुहब्बत, इश्क, मीलन विरह आदी सारख्या प्रेमविषयक भावभावनांची बरेच रेलचेल आहे. शिवाय राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, नैसर्गिक, वांग्मयीन, सणावार अशा विभागवार विषयांची मुक्त पखरण आहे. प्रस्तुत गझल दीवानचा भूमीपट विस्तीर्ण असल्या कारणाने त्यात बहुविध विषयांची तजेलदार नजाकतदार लागवड झाली आहे. ही मोहक, वेधक, विलोभनीय सृजनशीलता मनाला परमानंद देणारी आहे. उन्नत अवस्थेकडे घेऊन जाणारी आहे. किती मोहरावे, किती बहरावे अशी रसिक मनाची अवस्था होऊन जाते.
मानवी जगण्यातील गच्च ओल्या भावभावनांचा एकूण एकजिनसी अर्क गझलेच्या एकेक शेरातून पाझरत राहतो. गझल अस्सल अनुभूतीचे विकसित दालनच रसिकांसमोर खुले करते. गझल हाच ऄकेंचा श्वास अन् ध्यास. त्यांनी गझलेला वाहून घेतले आहे. त्यांच्यापाशी या वयातही अजून खूप काही लिहिण्यासारखे, सांगण्यासारखे आहे. गझल त्यांच्यासाठी अक्षरांची, भावनांची पालखी आहे. त्या पालखीचा भोई होण्यातच त्यांना धन्यता वाटते. ते म्हणतात.
अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी
गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी
सजणीचा गाव जवळ असला तरी तो दूरचा वाटत राहतो. दूरत्वातून जवळीक निर्माण होऊ शकत नाही. याचा अनुभव प्रियकराला आलेला असतो. सजणीच्या अशा गावाचा फारसा उपयोग नसतो म्हणून तो म्हणतो.
जवळी असुनी दूर किती
तू सजणीचा गाव नको
ही दुनिया दररोज नवेनवे रंग उधळत असते. दुनियेचं दिसणं अन् असणं यात मोठी तफावत असते. दुनियादारीचा भरवसा देता येत नाही. इथे व्यवहार महत्त्वाचा असतो. मुखवट्याच्या या दुनियादारीत भोळसटपणाला फारसा अर्थ नसतो. याचा अनुभव गझलकारासही येतो.
व्यवहारी दुनियेने मज व्यवहारी केले
वेडाभोळा मजला म्हणतात कुठे आता
उपाशी पोट पाप-पुण्याचा विचार कधीच करत नाही. माणसाला छळणारी भूक एक आदिम जखम आहे. एक प्रकारचा शाप आहे. हा शाप भाळी घेऊनच माणूस वावरत असतो. ऄके म्हणतात ते काय खोटे नाही.
रिक्त पोटाला भुकेचा गांजणारा शाप आहे
काय आता पुण्य आणिक काय आता पाप आहे
राजकारणाशी माझा संबंध काय? असं म्हणून चालत नाही. जो नागरिक मतदान करतो त्याचा राजकारणाशी संबंध असतोच असतो. जनहिताची जाणीव असलेला नेता निवडण्याचा अधिकार लोकशाहीने आपल्याला बहाल केला आहे. जीवनात सुख-शांती मिळवायची असेल तर मतदानाचे पुण्य आधी मिळवावे लागते. मतदानाचा चमत्कार मी काय आता वर्णावा असं म्हणत ऄकेंनी चक्क मतदानाची गझल लिहिली आहे.
मतदानाची गझल तुम्हाला मी ऐकतो आहे
महत्त्व त्याचे पूजे इतके तुम्हा सांगतो आहे
ऄकेंची खासियत अशी की ते ज्या पद्धतीनं सामाजिक अंगानं प्रभावीपणे व्यक्त होतात त्याचप्रमाणे प्रेम जगतातल्या तरल, हळव्या काळजाला साद घालणाऱ्या गझलाही तितक्याच उत्कटतेनं लिहितात. प्रभावी अभिव्यक्तीचा हा शेअर पाहा.
मी कोरले तुझेच नाव काळजावरी
तू पाहिलास अंत कालचीच गोष्ट ही
श्रावण कुणाला आवडत नाही. गझलकाराचे श्रावणाशी जिव्हाळ्याचे नाते असते. श्रावण हा भावविश्व व्यापून टाकणारा असतो. तिच्यासोबत श्रावणात भिजणं हा एक आनंददायी, अनुपम सोहळा असतो. श्रावणसर घेऊन यावी, हळुवारपणे बरसून जावी असं ऄकेंनाही वाटते.
मळभ मनी भरलेले माझ्या हुरहूर मज तू येण्याची
श्रावणसर होऊन ये आणिक हळुवारपणे बरसुन जा
दिवाळी हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण. त्याच्यावर कुणालाच मालकी सांगता येत नाही. तो प्रजेचा, राजाचा, गरीबाचा, श्रीमंताचा सगळ्यांचा आहे. म्हणून भारतीय उत्सव परंपरेत सर्व सणांमध्ये दिवाळीचं स्थान आगळे वेगळं आहे. प्रेमाची, स्नेहाची पणती लावून ज्योतीचा हा सण सर्वांनाच साजरा करता येतो. ऄकेंच्या शेराचा हा मतिथार्थ आहे.
आनंदाचा सण हा दीपावलीचा सण हा
हा सण तर सर्वांचा तुमचा अमुचा सण हा
ऄके आईची जगन्मान्य प्रतिमा प्रकट करायलाही विसरत नाही.
देव गुरू शिक्षक मैत्रीणही असते आई
व्यापून सारे काळिज बाकी उरते आई
गझलकाराच्या लेखन वळणावरून, शैलीवरून त्यांची स्वतःची ओळख निर्माण होत असते. दुर्बोधता, क्लिष्टता टाळून ऄके सहज साधी-सोपी गझल लिहितात. सहजता, प्रासादिकता हीच त्यांच्या गझल सृजनाची ठळक ओळख आहे.
दीवान-ए-ऄके: गझल दीवान
गझलकार: ऄ.के. शेख
शब्दान्वय प्रकाशन, मुंबई
पृष्ठे:२२७ मूल्य:३००₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments