Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मुस्लीम मराठी महिला गझलकारांची आगळी वेगळी गझलानुभूती Badiujjama Birajdar

 🌹जागतिक महिला दिन विशेष 🌹

मुस्लीम मराठी महिला गझलकारांची  आगळी वेगळी गझलानुभूती


मुस्लीम मराठी महिला गझलकारांची
आगळी वेगळी गझलानुभूती



     प्रेयसीबरोबर लडिवाळ स्वरात केलेला संवाद म्हणजे गझल होय. अशी सर्वसाधारणपणे गझलेची व्याख्या करण्यात येत होती. परंतु हा संवाद एकतर्फीच होत होता. प्रेयसी प्रियकराशी काहीच बोलत नव्हती. त्याचे मुख्य कारण म्हणजे ती गझल लिहीत नव्हती. आता महिला गझलकारांनी ही पारंपारिक व्याख्याच बदलून टाकली आहे. गझल वर्णभेद, वर्गभेद, लिंगभेद करत नाही. अलीकडच्या काळात महिला गझलकाराही विपुल प्रमाणात गझला लिहू लागल्या आहेत. त्यांचे शेर शेरास सव्वाशेर ठरत आहेत. प्रियजनांबरोबरच समाजाशीही वेगवेगळ्या विषयांवर महिला गझलकारा मोकळेपणाने व्यक्त होऊ लागल्या आहेत. गझलेतील सौंदर्यभाव महिला गझलकाराशिवाय कोण जाणू शकतो? त्या केवळ हळुवार भावभावनाच नजाकतीने व्यक्त करतात, असे समजण्याचे कारण नाही. वादळाला पदरात बांधून परंपरेचे जोखड उलथून टाकण्याची कणखरता त्यांच्या गझलांमधून दिसून येते. याला मुस्लीम मराठी गझलकारादेखील मुळीच अपवाद नाहीत. गझल हा आता केवळ पुरुषांचा काव्यप्रकार राहिलेला नाही हे त्यांनी साधार सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या गझलेतील विषय वैविध्य विस्तृत आहे. मुस्लीम मराठी महिला गझलकारांची आगळी वेगळी गझलानुभूती लक्षवेधी आहे. त्यांचे लेखन गझलवांग्मय समृद्ध करणारे आहे. मुस्लीम मराठी महिला गझलकारा प्रामुख्याने प्रा. फातिमा मुजावर (पनवेल) आणि अनिसा शेख (दौंड) अर्जुमनबानो शेख (चंद्रपूर) मेहमूदा शेख (पुणे) शबाना मुल्ला (नवी मुंबई) रझिया जमादार, निलोफर फणीबंद (अक्कलकोट) आदींचा समावेश आहे.


     स्त्रीच्या जगण्याची वाट कधीच साधी सरळ नसते. त्यात काटे, धोंडे, खळगे भरलेले असतात. पुढ्यात आलेल्या प्रसंगाला तोंड देत तिला संसाराशी हातमिळवणी करावी लागते. संसाराची सर्कस ओढताना तिला वारंवार तारेवरची कसरत करावी लागते. संसार आणि समाज यांच्या विचित्र कोंडीत ती सापडलेली असली तरी ही जगण्याला धीरोदात्तपणे सामोरे जाते. दुःखाला गोंजारत अश्रू वाहण्यात जीवनाचे सार्थक नसते. हे तिला ठाऊक असते. म्हणून ती जगण्यातील उमेद कधी मावळू देत नाही. कुचंबणा होत असली तरी ती जीवनाचा प्रवास हसत मुखाने करत असते. जगणे आणि जगवणे हेच तिच्यासाठी अपरिहार्य ठरते. प्रा. फातिमा मुजावर या त्यांच्या शेरातून नेमकेपणाने व्यक्त होतात.


काटे,धोंडे, खळगे आणिक तप्त चराचर

संसाराची सर्कस आणिक ती तारेवर


     पुरुषप्रधान समाजात वर्षानुवर्षे स्त्रीला ‘चूल आणि मूल’ या बेड्यांनी बांधून ठेवण्यात आले होते. स्त्री फक्त गुलाम आहे. तिने तिचे दास्यत्व गप्पगुमानाने पाळले पाहिजे. तिने चार भिंतीत जिवंन कंठावे, असा समाजाचा अलिखित नियम होता. कालची स्त्री अधिक सोशिक होती. सोसणे हेच तिचे प्रारब्ध होते. परंतु वाढत्या शिक्षणाच्या प्रसारामुळे तिने विविध क्षेत्र पादाक्रांत केली. ती पुरुषांच्या तुलनेत कांकणभरदेखील कमी नाही. तिला आत्मसन्मानाची तीव्रतेने जाणीव झालेली आहे. ती आता न्याय्य-हक्काची मागणी करू लागली आहे. समानतेचा पुकारा करू लागली आहे. शिक्षणाच्या सामर्थ्याने तिच्या हातातल्या बेड्या आता गळून पडल्या आहेत. ती मुक्तपणाने, आत्मविश्वासाने प्रकटू लागली आहे. स्त्रीच्या आजच्या स्थितीवर अनिसा शेख यांनी भाष्य नोंदवले आहे.


प्राक्तनाने बांधलेल्या बेगडी बेड्या

शिक्षणाने सर्व बेड्या तोडते आहे


     आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके लोटून गेली. परंतु इथल्या सामान्य जनतेच्या जगण्यात तीळमात्र देखील फरक पडलेला नाही. त्याचे जीवनमान उंचावण्याऐवजी घसरणीलाच लागले आहे. स्वातंत्र्यानंतर राज्यव्यवस्थेने लोकशाहीची प्रणाली स्वीकारली. लोकांच्या उत्कर्षासाठीच शासन आहे, असे वारंवार सांगितले गेले. पण लोकांसाठी लोकशाहीच आता धोक्याची घंटा ठरू पाहात आहे. भ्रष्टाचाराने व्यवस्था पूर्णपणे पोखरली गेली आहे. विकासात्मक योजनांची घोषणा करण्यात येते. दुर्दैवाने त्या लोकांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. त्यातला वाटा लाटण्यासाठी दलाल टपून बसलेले असतात. या योजना मधल्यामध्येच जिरवून टाकण्यात येतात, त्या नेमक्या कुठे गेल्या आहेत कळतसुद्धा नाही. हीच लोकशाहीची खरी शोकांतिका ठरत आहे या वास्तवाकडे अर्जुमन शेख यांनी लक्ष वेधले आहे.


आल्यात योजना पण गेल्या कुठे कळेना

लाटावयास वाटा जो तो तयार येथे


     मैफल म्हटले की, सजने, सवरणे आणि त्याचं गुंतून जाणे आलेच. सुरांच्या मैफलीत सुखांची लयलूट असते. त्यात जीव रमून जातो. मात्र हीच मैफल आसवांची, दुःखाची, वेदनेची असेल तर कहर होऊन जातो. जगण्यावर शोककळेची पुटे चढत जातात. वेदनेचे जहर प्राशन केल्यानंतर यापेक्षा वेगळी अवस्था वाट्याला येऊ शकत नाही. हीच आसवांच्या मैफलीची दुःखद भैरवी असते. समाजजीवनात घडणाऱ्या अशा कैक भल्याबुऱ्या घटना गझलेचा विषय होतात.  त्यातून मनाला स्पर्श करणाऱ्या साहित्यकृती निर्माण होत जातात. अर्थात याची झळ गझलकाराला सोसावी लागते. मेहमूदा शेख यांचा हा मतला याकडे निर्देश करतो.


आसवांच्या मैफलीने आज केले हो कहर

ती म्हणाली आज थोडे वेदनेचे हो जहर


     स्त्री शक्तीचे रूप विराट आहे. ती लढाईचे मैदान सोडून मधूनच पळ काढत नाही. ती प्रत्येक संकटाचा कणखरतेने मुकाबला करत असते. ती संसाराची ओझे नेटाने पेलत असते. काबाडकष्ट तिच्या अंगवळणी पडलेले असते. याविषयी फारशी कुरकुर न करता ती संसाराला हरघडी सावरण्याचा प्रयत्न करते. संकटावर मात करण्याची तिने आधीच तयारी करून ठेवलेली असते. तिला कितीही वादळाची भीती दाखविली तरी ती कधीच कोलमडून पडू शकत नाही. जगण्यावरची तिची निष्ठा अढळ असते. शबाना मुल्ला यांनी एका संघर्षरत महिलेची शौर्यगाथा गझलेतून उलघडून दाखविली आहे. 


नको तू दाखवू भीती मला त्या वादळाची

तयारी खूप केलेली अनोख्या संकटाची


     स्त्री सुखाने कधी हुरळून जात नाही. दुःखाने खचून जात नाही. तो कोणत्याही काळात जगण्याला भिडत जाते. तिची ही चिकाटी, सचोटी वाखाणण्याजोगी आहे. काळानुरूप पडणारी तिची पावले जीवनाची वाट प्रशस्त करत जातात. तिला काळ कवेत घेता येतो. ती कधीच माघार घेत नाही. जीवनात कितीही संकटे आली तरी सामर्थ्याची ढाल घेऊन ती सदैव संघर्षरत राहते. स्वतःला घडवत राहते. हेच तिचे खरे रूप आणि शक्ती आहे. रझिया जमादार यांचा शेर त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.


सुखदुःख या देहाला मढवत गेले

काळासोबत मीच स्वतःला घडवत गेले


     नदी आणि स्त्री यात फारशी तफावत नाही. नदीसारखीच स्त्रीसुद्धा नितळ प्रवाहित असते. भोवतालचे विकार आणि द्वेष उदरात घेऊन दोघांनाही निर्मळपणे वाहता येते. वेदना वाहती असली की जीवन आपोआप रुंदावत जाते. त्यात अडसर येत नाही. स्वतःला वाहते ठेवता आले की त्यात साचलेपणा येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. नदी आणि स्त्री आजवर पाळत आलेत. दोघीतले हे साम्य निलोफर फणीबंद यांनी त्यांच्या शेरातून टिपले आहे.


नदी पाहून दिसते साम्यता इतकी मला कायम

तिलाही वाहता येते,मलाही वाहता येते


     मुस्लीम महिला गझलकाराही आता मोठ्या प्रमाणात तंत्रशुद्ध गझला लिहू लागल्या आहेत. त्यांनी सोललेल्या अनुभवलेल्या जाणिवा त्यांच्या विविध शेरांमधून व्यक्त होत आहेत. त्यातील वेगळेपणा ठळकपणाने नजरेत भरणारा आहे. गझल रसिकांसाठी, अभ्यासकांसाठी हा एक मौलिक ठेवा आहे.



बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी) 

भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३

Post a Comment

0 Comments