Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सुरेश भटानंतर गझलेची वाटचाल Badiujjama Birajdar

🌹सुरेश भट स्मृतीदिन विशेष🌹

सुरेश भटानंतर गझलेची वाटचाल🌹


🌹सुरेश भटानंतर गझलेची वाटचाल🌹



     सुरेश भट यांनी तनमनधन अर्पण करून गझलेची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. गझल लिहिणारी युवा पिढी आणि मजबूत फळी निर्माण केली. गझल या काव्यप्रकारास त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान केले. मराठी साहित्यात गझलेचा दबदबा निर्माण केला. गझलेला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आले. परंतु गझलेच ही भरभराट काही विघ्न संतोषींना खूपत होती. त्यानुसार त्यांनी खोडसाळ, तथ्यहीन भाकिते करायला सुरुवात केली. सुरेश भटानंतर गझलेचे भवितव्य काय? गझलेची वाटचाल कशी होणार गझलेला किती तरुण आपलेसे करतील? गझलेच्या चळवळीला ओहोटी लागल्याशिवाय राहणार नाही. गझल हा तंत्रानुगामी प्रकार असल्याने तो इतिहास जमा व्हायला फारसा वेळ लागणार नाही. अशा प्रकारची पूर्वग्रह दूषित टीका टिप्पणी होतच राहीली. परंतु सुरेश भट यांना आपल्यातून जावून इतकी वर्षे झाली तरी आजही गझल आपल्या शक्तिशाली, प्रभावशाली जोरावर ठामपणे उभी आहे. तिची लोकप्रियता वारेमाप वाढत चालली आहे. तिचा वांग्मयीन वैभवाचा परिघ विस्तारत चालला आहे. याकडे कोणासही डोळेझाक करता येणार नाही. 


     सुरेश भटांच्या नंतरच्या गझलेच्या वाटचालीचा विचार करत असताना अनेकानेक सकारात्मक, ऊर्जात्मक, दर्जात्मक बाबी ठळकपणाने समोर येतात. सुरेश भटांनंतरच्या गझलेच्या उत्कर्षाची वाटचाल अजिबात थांबलेली नाही. गोठलेली नाही उलट ती अत्यंत दमदारपणे, वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात गझल ही विधा मोठ्या प्रमाणात लिहिली जात आहे. विशेषतः युवापिढी गझलेकडे आकर्षित होत आहे. भटांच्या बाराखडी अनुरूप लिहिली जात असलेली तंत्रशुद्ध गझल संपूर्णतः मराठमोळीच आहे. तिचा तोंडवळा, रंगरूप निर्लेप, निर्दोष असेच आहे. म्हणूनच ती महाराष्ट्रात सर्वांगाने, सर्वार्थाने भरभरून प्रकट होऊ लागली आहे. बहरू लागली आहे. त्यामुळे तिच्या भवितव्याची चिंता करण्याचे मुळीच कारण नाही. नव्याने व्यक्त होणारे गझलकार नव्या जीवन जाणिवा त्यांच्या गझलेतून जोरकसपणे मांडत आहेत. शेराच्या केवळ दोन ओळीतून जीवनाचे मर्मस्थान, तत्वज्ञान स्पष्टपणे व्यक्त होत असल्याने रसिकांना गझल अत्यंत जवळची, जिवाभावाची वाटू लागली आहे. गझल लिखित स्वरूपात असो वा मौखिक स्वरूपात असो अन्य काव्य प्रकाराच्या भाऊ गर्दीत उठून दिसत आहे. तिला मिळणारी रसिकांची, समीक्षकांची प्रचंड दाद गझलेच्या उज्वल भवितव्याचा फैसला करणारीच ठरत आहे.


     सद्यस्थितीत लिहिली जात असलेली मराठी गझल उर्दूप्रमाणे केवळ इष्क, जाम प्रणय, प्रेम, शृंगार, प्रीती, आसक्ती यांच्या भोवतीच कल्पनेचा पिंगा घालणारी नाही. प्रणयी युगुलांच्या शृंगाराची आरती करणारी नाही. तर ती समग्र समाजभान व्यक्त करणारी आहे. ती आत्ममग्न नाही. स्वतःच्या कोशात बंद नाही. सर्व सामान्याच्या दुःखाला आपले दुःख मानणारी त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारी ही गझल आहे. ती स्वतःच्या समस्यांना, वेदनांना स्वतःच्या घर अंगणात कुरवाळीत बसणारी नाही. वैयक्तिक बाबीपेक्षा ती वैश्विकतेवर अधिकाधिक भर देणारी ही गझल आहे. इथल्या तळागाळातल्या माणसाच्या रोजच्या मूलभूत जगण्याशी त्याच्या सुखदुःखाशी तिचं जिवंत नातं आहे. दुःख, वेदना इथून तिथून एकच असते. तिची जात निराळी नसते. म्हणून गझल समग्रदुःखाला समभावाने सामोरे जात असते. ज्या काव्यातून निखळ माणुसकीचा, करुणेचा गहिवर दाटलेला असतो. तेच काव्य सर्वकालिक ठरते. गझलेतून तर माणुसकीला शिरोधार्य मानणारे कितीतरी शेर आपल्याला भेटत राहतात. आपल्याला वेळोवेळी अंतर्मुख करत राहतात. काही शेर तर वर्षानुवर्षे आपला पाठलाग करत राहतात. गझलेच्या आशयसंपन्नतेच्या अभिव्यक्तीचे हे सामर्थ्य असते. मग अशी सशक्त गझल इतिहास जमा कशी काय होऊ शकते? किंबहुना लोकमान्यतेची मुद्रा तिच्यावर सातत्याने अंकित होत आहे. गझल दिवसेंदिवस सर्वमुखी होत चालली आहे. ही वस्तुस्थिती नाकारण्यात फारसा अर्थ नाही.


     निव्वळ वासना, आसक्ती, मोह, विकार यापेक्षा तमाम मानवजातीवर प्रेम करण्यात परमानंद असतो. हा उदात्त आशय व्यक्त करणाऱ्या गझला आज प्रामुख्याने लिहिल्या जात आहेत. सुरेश भटानंतर लिहिली जात असलेली गझल आशय, विषय कल्पनेतील नावीन्यपूर्णता, मांडणीतील थेटपणा, घाटणीतील वेगळेपणा, अभिव्यक्तीतील परिणामकारकता आदी बाबतीत कुठेही तसूभरदेखील कमी पडत नाही. तिची मोठ्या दिमाखाने वाटचाल सुरू आहे. उदयोन्मुख गझलकार जिज्ञासू, यासंगी, कष्टाळू, उत्साही, सजग असल्या कारणाने गझलेचे खरे स्वरूप, तिच्या तंत्राने युक्त असलेल्या आकृतिबंध, नियमावली, लगावली, व्याकरण,शुद्धलेखन व परिभाषा प्रकटीकरणाची प्रभावी शैली आदी गोष्टी बारकाईने समजून घेऊन तांत्रिक अंगाने परिपूर्ण गझल लिहीत आहेत. अलीकडच्या काळात नव्या दमाच्या गझलकारांच्या गझलांना विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या गझलविषय उपक्रमातून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, विविध दर्जेदार दिवाळी अंकातून बऱ्यापैकी स्थान मिळू लागले आहे. हे त्याचेच द्योतक आहे. 


     सुरेश भटांनी एकेकाळी अत्यंत विपरीत परिस्थितीत मोठ्या धैर्याने, जिद्दीने, अथक परिश्रमाने मराठी मातीत रुजवलेल्या गझलेच्या रोपट्याचा आज डेरेदार वृक्ष बनला आहे. ही सुखावणारी, हुरूप वाढवणारी गोष्ट आहे. सुरेश भटानंतर प्रकाशित झालेले प्रातिनिधिक गझलसंग्रह आणि त्यातील गझलकारांच्या गुणात्मक वाढ म्हणजे गझलेचा पसारा किती अफाट पसरला आहे. याचा हा जिवंत पुरावाच म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे अनेक गझलकारांच्या स्वतंत्र गझलसंग्रहाचे होत असलेले नियमित प्रकाशन सोहळे आणि त्यांना प्राप्त होणारी गझलचाह त्यांची उत्स्फूर्त दाद आणि प्रसिद्धी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अलीकडे तर मराठी गझल संग्रहांना शासनाच्या नवलेखक अनुदान योजनेतून महाराष्ट्रात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशनासाठी अनुदानही देण्यात येत आहे. गझलेला चालना देणारा हा सकारात्मक बदल आहे. याचे सर्वांनीच स्वागत करायला हवे.


     पूर्वीपेक्षा विद्यमान काळात मराठी गझल अधिक व्यापक आणि वेधक झालेली आहे. याचे प्रमुख कारण असे की, ताज्या दमाचे तडफदार प्रतिभावंत गझलकार गझलेत विविध प्रकारचे आगळे वेगळे प्रयोग करू लागले आहेत. गझल, द्विभाषा गझल, दीवान, छोट्या आणि मोठ्या वृत्तांच्या स्वतंत्र गझला, यासारखे अनेक अभिनव प्रयोग होताना दिसून येत आहेत. पारंपारिकतेला फाटा देवून नवनव्या रदीफ, काफियांचा चोखंदळ वापर सर्रासपणे करण्यात येत आहे. यापूर्वीच्या गझलकारांमध्ये ही नावीन्यपूर्ण प्रयोगशीलता दिसून येत नव्हती. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की इतर भाषा आणि प्रादेशिक बोली भाषांमध्ये देखील विपुल प्रमाणात गझला लिहिल्या जात आहेत. 


     अन्य कोणत्याही काव्यप्रकाराच्या तुलनेत गझलेतील गेयता बावनकशी असते. इथे प्रत्येक अक्षरावर काटेकोर नियमांचे, सक्त तंत्राचे खेळणारे असतात. शब्दावर, छंदशास्त्रावर हुकमी पकड असल्याशिवाय तंत्रशुद्ध गझलेचे सृजन करताच येत नाही. अत्यंत अवघड नियमाचे, बंधनाचे शिवधनुष्य पेलून अर्थपूर्ण रचना यशस्वीपणे साकारणे यातच गझलकाराचे खरे कसब असते. केवळ कवितेच्या फॉर्मात द्विपदी लिहिणे म्हणजे गझल होत नाही. जिकिरीच्या दिव्यातून गेल्याशिवाय गझलकारास आशयसंपन्न अभिव्यक्तीची वाट गवसत नसते. हल्लीच्या नव्या पिढीतले गझलकार हे तयारीचे आहेत. ते गझलेचे नीतिनियम, कायदेकानून कोळून प्यायलेले आहेत. म्हणूनच ते काळाच्या कसोटीवर टिकणारे गझल सृजन करीत आहेत. गझलेशी इमान शाबूत राखून रसिकांना पूर्णपणे आश्वस्त करणारे हे गझलकार आहेत. सुरेश भटानंतरची ही खूप मोठी उपलब्धी आहे. भागवत बनसोडे म्हणतात त्याप्रमाणे


तू न आता एकला मागून आला काफला

तू दिल्या वाटेवरी दादा निघाला काफला


     हे गझलेच्या विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे. एवढीच अपेक्षा!




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी) 

Post a Comment

0 Comments