🌹पुस्तक परिचय🌹
🌹सदानंद रामधरणेंचे
" स्वप्न " 🌹
या लेखाची सुरुवात कशी करावी हाच माझ्यापुढे पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न होता. वास्तविक मी यापूर्वी माझ्या अनेक मराठी गझलकार मित्रांचे परिचय करुन देणारे लेख लिहिलेले आहेत, अनेक मराठी गझल संग्रहांचा परिचय करुन देणारे लेख सुध्दा लिहिलेले आहेत आणि त्या त्या गझलकार मित्राला, त्या त्या गझल संग्रहाला शुभेच्छा देऊन मी त्या सर्व लेखांची सुरुवातही केली होती, पण आज ज्या गझल संग्रहाची निवड मी परिचय करुन देण्यासाठी केली आहे त्याचे गझलकार आज आपल्यात नाहीत आणि महत्वाचे म्हणजे तो संग्रह देखील त्यांच्या काही जिवलग मित्रांनी, त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्या निधनानंतर प्रकाशित केलेला आहे.
" स्वप्न " असे नाव असलेल्या या गझल संग्रहाचे प्रकाशन करणा-या सदानंदजींच्या त्या सर्व निस्वार्थ मित्रांना, त्या निस्पृह चाहत्यांना त्यांनी दाखवून दिलेल्या या ख-याखु-या मित्र प्रेमाबद्दल मी अगदी "सलाम" करतो, गझलकार कै. सदानंदजी रामधरणे यांना विनम्र अभिवादन करतो आणि हाती घेतलेले हे कार्य पूर्ण करण्याकडे मार्गक्रमण करतो.
ज्यांची आणि माझी आयुष्यात कधीही भेट झाली नाही, ज्यांना कधीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ऐकण्याचा योग देखील आला नाही, पण ज्यांना इतके प्रेम करणारे मित्र लाभले, ज्यांच्या गझला मी दिवाळी अंक तसेच प्रातिनिधीक गझल संग्रहांमधून वाचत आलो, असे सदानंदजी रामधरणे हे निश्चितच भक्ती मार्गात रममाण झालेले एक कुटुंबवत्सल, प्रेमळ, शांत, समाधानी व आनंदी व्यक्तिमत्त्व असावेत अशी माझी आता खात्री झाली आहे .....!
आपल्या वेदनांना जी गझल भावली, आधार देण्यासाठी जी गझल पुढे सरसावली, संकटात आणि दु:खात काहिली काहिली होत असतांना वृक्ष होऊन सावली झाली तीच गझल .....
बेताल जीवनाचा होऊन आरसा,
प्रतिबिंब दावतांना रागावली गझल ....
दु:खात आप्त सारे सोडून चालले,
घेता कवेत मजला भारावली गझल ....
अशा गझलेच्या अनेकविध रुपांची अनुभुती सदानंदजी आपल्याला गझलेतून देऊन जातांना दिसतात.
दु:ख माझे कुठे नवे होते,
जीवनाच्या सुखासवे होते ....
असे सांगत सदानंदजी, जिंदगीच्या सुन्या समयी सोडून गेलेले माझे सारे आप्त, नातेवाईक मला माझ्याजवळ हवे होते असेही अगदी मनापासून सांगून जातात.
माणसाच्या जीवनात आज प्रचंड असा तणाव आहे, इथे खरे असे काहीच नाही उलट सगळा फक्त बनावच आहे. लोक चांगले वागण्याचा संकल्प सोडतात पण तेच तो संकल्प मोडतात कारण तोच त्यांचा स्वभाव आहे असे सांगून सदानंदजी म्हणतात की .....
गाळतात घाम येथे पोटात आग ज्यांच्या,
विस्तवात चालण्याचा त्यांना सराव आहे ....
आणि या सारख्या शेरामधून समाजात बघावयास मिळणारे विदारक वास्तव सुध्दा ते मांडून जातात.
सदानंदजींचे वागणे, बोलणे तसेच चालणेसुध्दा अगदी साधे, सरळ आणि मर्यादेत असायचे असे त्यांना ओळखणारी, नेहमी त्यांच्या संगतीत, अवती भवती असणारी मंडळी सांगतात. 'आता तुमचा गझल संग्रह येऊ द्या' असं जेंव्हा ही मंडळी त्यांना आग्रहाने सांगायची तेंव्हा ....
सोंग पैशाचे कुणाला आणताही येत नाही,
आपुली अडचण जगाला सांगताही येत नाही ....
संकटांची मालिका ती लागते पाठीस जेंव्हा,
प्राक्तनाचे भोग सारे टाळताही येत नाही ....
ज्ञान ज्यांचे थोर असते नम्रता तेथेच असते,
धुंद गर्वाने जगाला भारताही येत नाही ....
ही त्यांची एक अतिशय आवडती अशी गझल ते सादर करत आणि या गझलेतून ते जणू काही आपली व्यथा, आपले दु:खच मांडत असावेत असे वाटून जायचे.
समाजात वावरत असतांना आपल्याच गणगोताकडून, आपल्याच भाईबंदांकडून मिळणारी हिणकस वागणूक, येणारे कटू तसेच कडू अनुभव आणि लुटण्याची वृत्ती जी बहुदा आपल्या सगळ्यांनाच अनुभवाला येते, तेंव्हा ....
अपुल्याच बांधवांना जपण्यात जन्म गेला,
त्यांचीच रोज सेवा करण्यात जन्म गेला ....
नात्यास ओढ असते प्रेमात भेटण्याची,
गर्वात रोज त्यांचा जगण्यात जन्म गेला ....
माझेच भाग्य जेंव्हा ऐसे फुलून आले,
माझ्यावरीच त्यांचा जळण्यात जन्म गेला ....
अशा शब्दांत ते आपली व्यथा मांडून जातात आणि त्याच वेळी....
या हृदयीचे त्या हृदयाला कळले होते,
नाते अपुले जन्माचे ते जुळले होते ....
बागेमध्ये चुळबुळ झाली पानफुलांची,
स्पर्श तुझा झालेला त्यांना कळले होते ....
अशा प्रेमळ, कोमल अन् हळुवार शब्दांत सदानंदजी आपल्या प्रेम भावना सुध्दा व्यक्त करतात ....
चंद्र आता मावळाया लागला,
प्रेमिकांना तो छळाया लागला ....
नाव माझी बघ किना-या लागता,
तो किनारा ढासळाया लागला ....
प्रेम केले खूप मी तू जाणते,
हा "सदा" आता कळाया लागला ....
अशी सहज प्रेमभावना व्यक्त करणारी आणि मक्त्यासह लिहिलेली एक "तरही" गझल सादर करतांना दिसून येतात.
अशा नाजूक आणि वैयक्तिक, खाजगी आयुष्यात आलेल्या अनुभवांवर गझला लिहिणारे सदानंदजी सामाजिक तसेच वर्तमानात समाजासमोर असलेल्या ज्वलंत अशा प्रश्नांवर भाष्य करतांना सुध्दा दिसून येतात ...
काखेत शस्त्र त्यांच्या ओठात राम आहे,
लोकांत नाव मोठे वृत्तीच वाम आहे ....
अन्याय सोसती जे दाबून ओठ अपुले,
नेत्यावरीच अजूनी विश्वास ठाम आहे ....
अशा शब्दांत आपले मत अगदी परखडपणे अन् बिनधास्तपणे मांडणारे सदानंदजी ....
कष्टात रोज ज्यांचा शेतात दिवस जातो,
पदरात आज त्यांच्या नुसताच घाम आहे ....
अशा शब्दांत देशभरातील शेतकरी बांधवांच्या व्यथा, त्यांचे दु:ख मांडायला सुध्दा सदानंदजी विसरतांना दिसत नाहीत.
एकंदरीत आयुष्यात अनुभवास येणा-या जवळपास सर्वच भावभावना तसेच सर्वच विषयांवर, सर्वच प्रश्नांवर सदानंदजींनी गझला लिहिलेल्या आहेत असे दिसून येते.
अशा या आपल्या कुटुंबावर, आपल्या मित्रांवर व आपल्या समाजावर अगदी मनापासून प्रेम करणा-या सदानंदजींचे दि. १० फेब्रुवारी, २०२१ रोजी कोरोना काळात निधन झाले.
त्यानंतर पनवेल येथील ज्येष्ठ गझलकार, गुरुवर्य श्री ए के शेख सरांच्या पुढाकारातून त्यांच्या गझल गृपच्या मंडळींनी प्रकाशित केलेल्या " स्वप्न " या गझल संग्रहात सदानंदजींच्या एकूण ७२ गझलांचा समावेश करण्यात आला. आनंदकंद, मंजुघोषा, व्योमगंगा, विद्युल्लता, भुजंगप्रयात, देवप्रिया, मनोरमा, मेनका, वियदगंगा, कलिंदनंदिनी या जवळपास सर्व गझलकारांना आवडणाऱ्या वृत्तांबरोबरच कल्याण, सिंहलेखा, हिरण्यकेशी, वीरलक्ष्मी, वैखरी, प्रमाणिका, लज्जिता, स्त्रग्विनी, आनंद, भामिनी, मरालिका आदि सहसा न लिहिल्या जाणा-या वृत्तांमधेही त्यांनी गझला लिहिलेल्या आहेत असेही दिसून येते.
दिनांक ४ जून, २०२३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात एकाच वेळी १० पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आल्यानंतर माननीय श्री ए के शेख सरांनी काही संग्रह माझ्याकडे पाठवले आणि पुस्तक परिचय करुन देणारा हा लेख लिहिण्याची संधी मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ....!
पनवेल गझल गृपच्या त्यांच्या इतर सर्व मित्रांचे देखील खूप खूप आभार आणि कौतुक आणि कै.सदानंदजी रामधरणे यांच्या गझलमय आणि भक्तिमय स्मृतीला अभिवादन करुन, मला त्यांचे आवडलेले काही शेर लिहून लांबत चाललेला पुस्तक परिचयाचा हा लेख इथेच थांबवतो .... !
आठवणींचा सुटला दरवळ तू आल्यावर,
आयुष्यातील सरली मरगळ तू आल्यावर ....
तुला पाहिले की बरे वाटते,
तुझे प्रेम मजला खरे वाटते ...
संतास त्रास दिधला छळले किती जणांना,
जगतास संत तरिही देऊन ज्ञान गेले ....
नात्या नात्यांमध्ये होते भांडण केव्हा केव्हा,
मतभेदांना जाऊ विसरुन जपुया अपुली प्रीती....
असा खेळ नशिबाचा चाले,
हवे दान ते पडतच नाही ...
मानवाचा जन्म हा ज्याने दिला,
ईश्वराचे मान त्या आभार तू ....
असा आपल्यांनीच का घात केला,
कसे आज फिरलेत वासे घराचे ....
धान्यास मोल नाही गरिबांस रोज लुटती,
करतात जे दलाली त्यांनाच भाव आता ....
अंतरीच्या भावनेची गझल होते,
दु:ख भरल्या यातनेची गझल होते ...
ते रूप ईश्वराचे हृदयात साठवाया,
बघ व्दार या मनाचे उघडेच ठेवतो मी ....
शेतक-यांची साद ढगांच्या कानी जावी,
करण्या आबादानी यावा माझा पाऊस ....
" स्वप्न " मराठी गझल संग्रह
गझलकार - सदानंद रामधरणे
संपादन : गझलकार श्री ए के शेख, पनवेल
प्रकाशक : महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत : रुपये २००
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
0 Comments