🌹 पुस्तक परिचय 🌹
🌹आशयाचा झरा ‘गझलसरा’ 🌹
गझलसरा म्हणजे रसिकजनांना शुद्ध आनंद बहाल करणे होय. चित्त उल्हासित करणारे आशयांचे कितीतरी झरे ‘गझलसरा’ मधून पानोपानी झुळझुळतात. वाचकांना आनंद द्विगुणीत करतात. तद्वतच शेरागणिक अंतर्मुखही करतात. विचार, करायलाही भाग पाडतात. हे चिंतनशील गझलकार विद्यानंद हाडके यांच्या ‘गझलसरा’ या पहिल्याच गझलसंग्रहाचा गुणविशेष म्हणावा लागेल. हाडके हे मुळात कसलेले छायाचित्रकार आहेत. माणूस आपल्या आयुष्यात असंख्य भलेभुरे अनुभव घेत जगत असतो. या अनुभवांच्या व्यामिश्रतेला गझलकार म्हणून हाडके यांनी अतिशय सूक्ष्मपणे चित्रात्मक शब्दशैलीत टिपले आहे. त्यांनी टिपलेले समाजजीवनातील सरूप-कुरूप दृश्ये शब्दचित्रांच्या माध्यमातून समोर येतात. त्यातील विविधरंगी भावाशय परिणामकारतेने कागदावर उतरतो. हा ह्यस्थ आविष्कार आशयाच्या पातळीवर वाचकांना समृद्ध करून जातो ‘गझलसरा’तील कैक सामाजिक आशय संपन्न गझला दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. उत्तम गझलेची हीच तर खासियत असते.
भवतालातील कटू अनुभवांना आकांडतांडव न करता संयतपणे गझलेतून चितारण्याचा हाडके यांनी कसोशीने प्रयत्न केला आहे. हे त्यांच्या गझला वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते. त्यांच्या गझला कल्पना विलासात बिलकुल रममाण होणाऱ्या नाहीत. जगण्यातले जे दाहक वास्तव आहे. त्याचे शब्द चित्रण करण्याची हाडके यांची हातोटी आहे.
बोचणे हा काट्यांचा जन्मजात गुणधर्म असला तरी त्याच्या सोबतीने फुलणाऱ्या फुलांना काटे कधीच बोचत नाहीत. दंश करत नाही. उलटपक्षी ते फुलांची निगराणी करत असतात. फुलांची कोमलता काटे जाणून असतात. ते फुलांच्या दरवळण्याची वाट पाहात असतात. फुलांना झाडांपासून अलग करणाऱ्या हातांना टोचून ते रक्तबंबाळ करतात. माणूस तरी माणसाला एवढे जपतो का? असा माणसाला अंतर्मुख करणारा प्रश्न ते विचारतात.
जपले कधीच नाही इतके कधी कुणाला
तू सांग टोचतो का काटा कुण्या फुलाला
या शेरावरून हाडके यांच्या विचार चिंतनाची सखोलता लक्षात आल्यापासून राहत नाही. आयुष्याला जेव्हा उधाण येते. तेव्हा माणूस आत्मप्रकटीकरणासाठी अगतिक होवून जातो. आतला आवाज त्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही. आविष्कारासाठी त्याला गझलेच्या गावात यावे लागते. गझलेजवळ अंत:करण मोकळे केल्याशिवाय आयुष्याला आलेले उधाण शमत नाही. उरातली आग आणि बाग या दोन्ही गोष्टी फक्त गझलच समजून घेऊ शकते. यावर गझलकाराचा ठाम विश्वास आहे.
आयुष्याला उधाण यावे असे वाटते
अन् गझलेच्या गावी जावे असे वाटते
माणसे दिवसेंदिवस किती धूर्त, लुच्ची बनत चालली आहेत की आपला कोण, परका कोण हे कळतच नाही. मनाचा खुलासा कसा करायचा आजकाल कुणाच्याही भरवसा उरलेला नाही. कुणाच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवावी असा खांदाच दिसत नाही. दगा कुणाचा नाही सगा अशीच आजची अवस्था झाली आहे. सग्या सोयऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा शेर पाहा.
कसा करावा इथे कुणावर विश्वासाचा दावा
जिथे आपला सगासोयरा उलटून चावा घेतो
जो जिंदगीभर जळत राहिला. जिंदगीने जिंदगीभर ज्याला फक्त जाळण्याचेच काम केले. त्याला मेल्यानंतर जाळून उपयोग काय? अखेर विस्तावाच्या हाती काय लागते. तो खऱ्या अर्थाने विस्तवाचाच मृत्यू असतो. अशा प्रकारच्या जगण्या-मरण्याला तत्त्वज्ञानाच्या परिप्रक्ष्येत आणत हाडके यांनी अर्थपूर्ण शेर लिहिला आहे.
जिंदगीने जिंदगीभर जाळल्यावर
काय मग लागेल हाती विस्तवाच्या
वाट्याला आलेले क्षण कोणालाही टाळता येत नाहीत. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपणास सामोरे जावेच लागते. भोवतालात वाढत चाललेल्या कोलाहलातही क्षणांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कोणत्या क्षणाला जीवन संपून जाईल याचा काही नेम नसतो. मानवी जगणेच क्षणभुंगर असल्याने क्षणाक्षणातच मस्त जगून घेणेच श्रेयस्कर ठरते.
क्षणाक्षणाने संपत जाते अपुले जीवन
क्षणाक्षणातच मस्त जगावे असे वाटते
लढण्याआधी जो आपली हार मान्य करतो. पराभूत मानसिकतेतून शस्त्र खाली ठेवतो. तो लढाई कोणतीही असो मैदानातली किंवा जगण्यातली. कधीच जिंकू शकत नाही. हारण्यात सुद्धा जिंकण्याची प्रेरणा दडलेली असते. हार-जीतचा थोडासाही विचार मनात न आणता निकराने लढले पाहिजे. हार खावी लागली तरी ती बरेच काही शिकवून जाते. हे माणसाने चांगल्या तर्हेने ध्यानात त घ्यायला हवे.
मी हारलो असाही, मी हारलो तसाही
माझे प्रयत्न म्हणुनी बेकार होत नाही
‘चले जाव’ ही घोषणा देऊन, स्वदेशीचा लढा उभारून महात्मा गांधींनी इंग्रजांना पार सळो की पळो करून सोडले. सारे आयुष्य वेचून देशाला स्वातंत्र्याचे साम्राज्य बहाल केले. त्यांनी जगास सत्य आणि अहिंसेचे धडे दिले. मात्र त्यांच्यावर नत्थुरामाने गोळ्या झाडून त्यांची जीवन यात्रा संपवून टाकली. गांधीजींचा गोल चष्मा लावला की आजही जागोजागी नत्थुराम दिसू लागतात. त्यांची कमतरता कुठेच भासत नाही. या आजच्या वास्तवावर परखड भाष्य करणारा हा शेर पाहा.
गोल चष्मा मी जराही लावला डोळ्यावरी
राहिली ना मग कुठेही नत्थुरामाची कमी
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अनन्यसाधारण घटना होती. तहानेने व्याकूळ झालेल्या माणसांना अस्पृश्यतेवरून पाणी देण्याचे निर्दयीपणे नाकारणे हे मानवतेला काळिमा फासण्यासारखेच आहे. माणसाला पाणी नाकारणे हा घोर सामाजिक अपराध असल्याचे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. समाजातल्या विषमतेविरुद्ध समता प्रस्थापित करण्याचा हा ऐतिहासिक संघर्ष होता. ज्यांनी अस्पृश्यांना पाणी मिळू दिले नव्हते. तेच आज महाडचा चवदार तळ्यातून पाणी भरतात. हे केवळ बाबासाहेबांमुळे शक्य झाले. या संदर्भात हाडके असा शेर नोंदवतात.
ज्यांनी पिण्यास पाणी नाही दिले कधीही
आता तुझ्या महाडी भरतात तेच पाणी
उंबऱ्याचे दुर्दैव असे की तो ना आत राहतो ना बाहेर. त्याचे राहणे अधांतरिच असते. येणारे जाणारे फक्त त्याला ओलांडत जातात. या पलीकडे त्याला कुठलेच महत्त्व नसते. अशाच प्रकारचे उंबऱ्यासारखे जगणेच एखाद्याच्या वाट्याला येते. आयुष्याला दिलेली उंबऱ्याची उपमा अतिशय चपखल आहे.
ना आत राहिलो ना बाहेरही निघालो
आयुष्य काढले मी हे उंबऱ्याप्रमाणे
आरसा नेहमी सत्त्याची बूज राखत आला आहे. आरसा सत्य तेच दाखवीतो. आरशाला सगळे चेहरे एकसारखे असतात. आरसा रंगरूप दाखविण्यात भेदाभेद करत नाही. हाच त्याचा अपराध असतो का?
सत्य जे आहे तसे तो दाखवी तो
हाच तर अपराध आहे आरशाचा
परखड आणि प्रभावी भाष्य करणाऱ्या गझला विद्यानंद हाडके लिहितात. काळजाला थेटपणाने भिडणाऱ्या गझलावरूनच गझलकाराचा खरा कस लागतो. या कसोटीवर त्यांच्या बऱ्याच गझला उतरतात. हेच ‘गझलसरा’चे प्रमुख बलस्थान म्हणता येईल.
गझलसरा: गझलसंग्रह
गझलकार: विद्यानंद हाडके
प्रकाशक: गझल सागर प्रतिष्ठान
पृष्ठे: ९६ मूल्य: १२०₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments