Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तुझ्यासारखी तू Gazalkar A K Shaikh

 🌹 पुस्तक परिचय 🌹




🌹" तुझ्यासारखी तू..!" 🌹


दिवाकर मधुकर चौकेकर तसे धुळ्याचे. एक बुजुर्ग कवी आणि गझलकार. बॅंकेत नोकरी करून ते गांधीनगर, गुजरात येथे स्थायिक झाले आहेत. गझल सागर प्रतिष्ठानच्या संमेलनाला त्यांची उपस्थिती असतेच. गुजरातमध्ये राहून ते माय मराठीची सेवा करत आहेत याचा अभिमान वाटतो. त्यांनी कवितेनंतर गझल लिहायला सुरुवात केली आणि आज ते आपला पहिला गझल संग्रह घेऊन रसिकांच्या दरबारात हजर झाले आहेत. त्या गझल संग्रहाचे नाव आहे "तुझ्यासारखी तू ....!" 


गझलसंग्रह हातात घेतल्याक्षणी समोर येतं ते संग्रहाचं सुंदर मुखपृष्ठ. ते आहे हरीन भट्ट यांचं. मलपृष्ठावर एक सुंदर गझल आहे ती म्हणजे -


खांद्यावरच्या पदराला ती बोटावर गुंडाळत असते 

जणू काय ती ह्या चाळ्यांनी दोन जिवांना सांधत असते ....


मात्रावृत्तातल्या या गझलेमध्ये त्यांनी स्त्रियांच्या जीवनाचं खूप सुरेख चित्रण केलं आहे. म्हंटलं तर त्यांच्या अर्धांगिनीवर गझल बेतलेली आहे, पण ती समष्टीची होऊन जाते, हेच गझलचं वैशिष्ट्य. गझलबद्दल ते म्हणतात- - 


वृत्तामध्ये रदिफ काफिया अलामतीसह योजत जाणे 

सोपी भाषा सहज बांधणी हीच असे हो तिची निशाणी ....


आपण जसे बोलतो तशी गझल व्हायला हवी. सोपे शब्द आणि सहजपणे ती लिहिली जावी. तरच ती रसिकाला कळेल आणि तो तिला दाद देईल. ज्या गझलवरून या संग्रहाला नाव दिलं त्या गझलेतला हा शेर पाहा -


नको तू विचारू कुणासारखी तू 

नसे अन्य कोणी तुझ्यासारखी तू ....


शायरीच्या शामियान्यात इश्श,  दर्द,  इंतजार, विरह, वेदना यासारखे विषय वारंवार येणारच. शब्दांच्या आवर्तनातून भाववृत्ती गडद बनवित जाणे म्हणजे गझल. चौकेकर साहेब तर गझलेशी आपल्या श्वासोच्छ्वासाइतके एकजीव होऊन गेले आहेत. वेदना - दु:ख हा गझलचा स्थायी भाव. पाहा -


वेदनेला ती उराशी माळते 

मी जसा आहे तसा सांभाळते ....


एकाकीपण व प्रियेपासूनच्या दूरतेची अगतिकता, त्याची जाणीव कवी व्यक्त करू लागला की अनुभवांच्या प्रतिमा-चित्रांना आर्ततेचे कातर रंग व्यापून टाकतात, व्याकुळ करतात आणि शब्द हळवे बनून मनाच्या तळाशी स्थिरावतात. 


दुरावा तुझा साहवेना सखे 

तुझ्यावाचुनी राहवेना सखे ....


भावसत्याचा कठोरपणा निमूट स्वीकारण्याचा सोशिकपणा दु:खाच्या विव्हळ आक्रोशापेक्षाही परिणामकारक ठरतो. आपल्या वेदनेचे प्रदर्शन न करता आतल्या आत सोसायचे आणि त्या वेदनेचे कढ भोगतच जीवनाला सामोरे जायचे; हीच माणसाच्या जीवनाची आणि जगण्याची त-हा असते. 


संकटांनी येत जाणे रोजचे झाले इथे 

मी परीक्षा देत जाणे रोजचे झाले इथे ....


कवी आपल्या अनुभूतीचं स्वत्व आपल्या गझलेतून प्रकट करत असतो पण वाचणारा स्वत:च्या भावभावना टिपत टिपत ती गझल वाचत असतो, अनुभवत असतो. मग ती गझल गझलकाराची राहत नाही.ती सा-यांची होऊन जाते, ती वाचणा-या प्रत्येकाची बनते. 


जीवना रे दे मला आधार दे तू 

सानुलासा लाघवी संसार दे तू ....


जेव्हा एका गझलकाराची गझल समष्टीची होऊन जाते त्यालाच अक्षरवाङमय म्हणतात. इश्कामध्ये अस्वस्थता हाच धर्म, उत्कटता हीच जात आणि प्रतिक्षा हीच वृत्ती. प्रत्येकाला वाटत असतं की माझं प्रेम हे जगातलं पहिलं प्रेम, असं प्रेम कोणीही करु शकणार नाही. प्रेम ही एकमेव निधर्मी अवस्था आहे. तिचा विरह, तिची साद, तिची आठवण हे सर्वस्व होऊन जातं. 


सांगायाला सुध्दा मी हे लाजत नाही 

नयनामधुनी वाहत असते तुझी आठवण ....


प्रेमाच्या तीव्र अनुभवापेक्षा प्रेम कल्पनांचा मधूर विलासच अधिक सहज व प्रबळ असतो. आशेच्या उज्ज्वल काळात अशक्य असे काहीच वाटत नाही. व्यावहारिक दृष्टी ठेवील ते प्रेम कसले ? प्रेमाची पूर्तता कशात असते - 


एक झालो अता

जीव मी श्वास तू ....


कदाचित ते गझलेलाही म्हणत असतील इतके ते गझल या काव्य प्रकाराशी एकरूप झाले आहेत. चौकेकरांची गझल निर्व्याज आहे, हळवी आहे. त्यांची भाषासंपत्ती सहजसुंदर आहे तसेच ती अर्थवाही आहे. त्यामुळे गझलमध्ये दुर्बोधता येत नाही, त्याबरोबरच कृत्रिमताही येत नाही. जिव्हाळा, शब्दांची कोमलता नि अंतर्मुखता हा त्यांच्या गझलचा विशेष गुण होय. टोकाचेही काही अनुभव त्यांनी चित्रित केले आहेत, पण त्यामध्ये गांभीर्य आणि कळकळ दिसते. खरं म्हणजे हृदयाची सारी उत्कटता, आर्तता त्यामध्ये भरलेली दिसते. समाधानापेक्षा अतृप्ती भेदक असते. वास्तववादी जीवनाचे यात दर्शन घडते. मानवधर्म ही प्रेमधर्माचीच अंतिम अवस्था. हा शेर पाहा, या संग्रहातला हा पहिलाच शेर आहे - 


हे एव्हढेच आपण, ठेवू उरात आता 

विसरून वैर सारे, गाऊ सुरात आता ....


तसे पाहता या संग्रहातील गझला आत्मनिष्ठ आहेत, तिच्याभोवती फिरणा-या आहेत. माणसाच्या आयुष्यात संघर्ष असतोच. कष्ट, वेदना, दु:खाचे डोंगर असतातच. तरीही जीवन सुंदर आहे. आशावादी दृष्टीकोनाने उल्हासित झालेली जीवनाची श्रध्दा उराशी बाळगून चौकेकर जगाकडे पाहत आहेत, ते म्हणतात -


उणेपणास सोडुनी 

जमेत ये कधी तरी ....


गझल त्यांची सर्वस्व झालेली आहे. त्यांचे जीवन, जगणे हे गझलमय झालेले आहे म्हणूनच ते म्हणतात -


नाही केली कधी कार्तिकी अन् आषाढी

मुशायरा ही माझ्यासाठी  वारी आहे ....


यामुळे गझलेची त्यांची तपश्चर्या लक्षात येते. त्यांच्या गझल प्रवासाचा मी साक्षीदार आहे. गझल हा कष्टसाध्य प्रकार आहे. हा त्यांचा शेर पाहा -


गझल सुंदरी सहज कुणाला वश होते का ?

खूप गाजले, खूप निघाले  गळणारेही ....


गझल हा तसा बंदिस्त प्रकार आहे. कवितेत कवी म्हणेल तो शब्द कविता स्वीकारते, गझल मात्र तिला हवा तोच शब्द स्वीकारते. तिला मात्रांनी बध्द असेच शब्द लागतात आणि ते कवीला द्यावे लागतात. या मात्रांना  लोक कंटाळतात आणि गझल लिहिणे सोडून देतात, तर कधी गझलच त्यांना कंटाळते, मग तिची आर्जवे करावी लागतात, म्हणावे लागते - 


मी कधी कुठे तुला बोललो निघून जा

मालकी तुझीच गे बैस काळजात तू ....


हा संग्रह त्यांनी आई-वडील आणि सहचारी यांना अर्पण केला आहे. संगीता जोशी यांची सुंदर प्रस्तावना संग्रहाला लाभली आहे. या संग्रहाचं मन:पूर्वक स्वागत ....! 



ए. के. शेख

पनवेल 

-------------------------------------

गझल संग्रहाचे नाव  : "तुझ्यासारखी तू ...!"

गझलकार  :  दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर  (गुजरात) 

संपर्क   :   9723717047

पृष्ठसंख्या  :  80 

प्रकाशन दिनांक  : 10 डिसेंबर, 2016

किंमत  :  रु. 160/= 

Post a Comment

0 Comments