Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

नवी मुंबईचे गझलकार Divakar Chaukekar

🌹 पुस्तक परिचय 🌹



🌹नवी मुंबईचे गझलकार 🌹
(भाग १) 


रसिक हो नमस्कार, आगळ्या वेगळ्या गझल संग्रहांचा परिचय करुन देण्याच्या मालिकेत आज मी निवड केली आहे "नवी मुंबईचे गझलकार " या ज्येष्ठ गझलकार श्री ए के शेख सर यांनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक गझल संग्रहाची. 


मराठी गझलच्या इतिहासात या आधी मराठी गझलांचे काफला, कारवा आणि विदर्भाची गझल हे प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित झालेले आहेत तसेच फक्त गझलेचे असे काही गझल विशेषांक सुध्दा निघालेले आहेत. 


"नवी मुंबईचे गझलकार" या संग्रहात नवी मुंबई या भौगोलिक क्षेत्रात राहणा-या २२ नवोदित तसेच ज्येष्ठ गझलकारांच्या प्रत्येकी ४ याप्रमाणे ८८ गझलांचा समावेश करण्यात आलेला आहे.


आकाशी रंगाच्या पार्श्वभूमीवर एका सुंदर अशा मोरपीसाचे चित्र असलेले परेश पंडित यांचे मुखपृष्ठ लाभलेला हा संग्रह नसीमा फाऊंडेशन,पनवेलच्या श्री समीर शेख यांनी प्रकाशित केला आहे तर गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट आणि तमाम मराठी गझलकारांना हा संग्रह आदरपूर्वक अर्पण केलेला आहे. अशा प्रकारचा संग्रह काढावा ही कल्पना ज्येष्ठ गझलकार, गझल समीक्षक व गझलेचे अभ्यासक डॉ. राम पंडित सर यांची असून सदर संग्रहाची प्रस्तावना सुध्दा त्यांचीच आहे. 


नव्या जुन्या गझलकारांच्या इतक्या मोठ्या संख्येत एकत्रित केलेल्या रचना एकसाथ वाचायला मिळण्याची संधी या प्रातिनिधिक संग्रहामुळे गझल रसिकांना मिळाली असून हा सुध्दा एक छान प्रकारे जुळून आलेला योग आहे असे मला वाटते. 


प्रातिनिधिक स्वरूपातील या संग्रहात एकूण ८८ गझलांचा समावेश असला तरी गझलांचे विषय वेगळे आहेत, रंग वेगळे आहेत व हेच या संग्रहाचे एक वैशिष्ट्य आहे असेही म्हणता येईल.  


" प्रेम हा गझलचा मूलभूत विषय; यात प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी, ईश्वर-भक्त, आई-वडील-संतती, मित्र-मैत्रिणी अशा समग्र नात्यांतील प्रेम भावाचा अंतर्भाव होतो. याच अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी विषयही गझलेत दाखल होतात असे विश्लेषण आदरणीय डाॅ. राम पंडित सर त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत केला आहे. तसेच वरील सर्व विषयांना हात घालणारे काही उल्लेखनीय असे शेर या संग्रहात सापडतात असे मत सुध्दा डाॅ राम पंडित सरांनी मांडले आहे. त्यामुळे विविध भौगोलिक विभागात मराठी गझलचा विकासात्मक प्रवास कसा होतो आहे हे या संग्रहाने कळू शकेल. अशा प्रकारे अन्य गझल केंद्रांचेही संग्रह निघणे गरजेचे आहे. 'विदर्भाची गझल' च्या धर्तीवर मराठवाड्याची गझल, कोकणची गझल असे प्रातिनिधिक गझल संग्रह निघणे गरजेचे आहे असे आपले मत आणि आपली अपेक्षा डाॅ राम पंडित सर यांनी या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे.  


संग्रहाच्या मलपृष्ठावर, 'गझलकार गझल लिहितो म्हणजे काय ?' या विषयावर या संग्रहाचे संपादक व ज्येष्ठ गझलकार श्री ए के शेख सर यांचे त्यांच्या खास शैलीत लिहिलेले मनोगत वाचावयास मिळते व ते गझल रसिकांनी हा संग्रह विकत घेऊन वाचावे असे माझे मत असल्यामुळे ते मनोगत इथे न देता खुद्द रसिकांनीच ते वाचावे असे आवाहन मी करतो आहे.  


भुजंगप्रयात, मंजुघोषा, आनंदकंद, व्योमगंगा, देवप्रिया, वीरलक्ष्मी, वैखरी, कल्याण कलिंदनंदिनी, आकाश, बागेश्वरी, सुकामिनी, मंजुघोषा - व्दिरुक्ती, ब्रह्मरूपक, कामक्रीडा, मनोरमा + श्री, विभावरी, वियदगंगा, माल्यश्री, स्त्रग्विनी, मेनका, कल्याण + नगणिका, नगणिका - व्दिरुक्ती, सुरनिम्नगा, सती + रुपोन्मता, आदि वृत्तांमध्ये या २२ गझलकार मित्र मैत्रिणींनी लिहिलेल्या ८८ गझलांचा परिचय लेखाच्या पुढील म्हणजेच भाग २ व भाग ३ मध्ये करुन देण्याचे आश्वासन देतो, या संग्रहाला शुभेच्छा देतो व लेखाच्या ह्या पहिल्या भागाचे लेखन इथेच आटोपता घेतो ...! 




दिवाकर चौकेकर, गांधीनगर 


----------------------------------



गझल संग्रहाचे नाव  : 'नवी मुंबईचे गझलकार' 

संपादन  :  ए के शेख, पनवेल 

प्रकाशक  : समीर शेख 

मुद्रण   : अदबी प्रिंटिंग प्रेस, भायखळा, मुंबई 

अक्षररचना : सौ. स्वाती बोडके 

मुखपृष्ठ   :  परेश पंडित 

मूल्य     : रु.१००/= 


    

Post a Comment

0 Comments