पुस्तक परिचय
गझलेचे अंगण कुंकवाचे कुंपण
मुकेपणानं आतल्याआत सोसणं हा स्त्री कुळाला चिकटलेला आदिम शाप आहे. स्त्रीनं चार भिंतीतच आपलं जीवन कंठावं तिनं घराबाहेर पडूच नये, अशा प्रकारची तरतूदच पुरूषप्रधान व्यवस्थेनं करून ठेवली आहे. तिच्या कुंकवाचं धनीच तिच्या भोवती कुंकवाचे कुंपण उभारून तिची कुचंबणा करण्याचा राजरोजपणे प्रयत्न करताना दिसून येतो. माणसानं स्त्रीला समजून घेणं हाच तिच्या जगण्याचा इत्यर्थ असतो. त्यातून अंतकरणाला उद्गार मिळतो. त्या उद्गाराचा शब्द घडवणं हेच गझलकाराच्या निर्मितीचे खरे मूल्य असते. या नैतिकतेच्या निर्मिती मूल्यावर अविचल निष्ठा असणारे मनमाडचे ज्येष्ठ गझलकार खलील मोमीन यांचा 'कुंकवाचे कुंपण' हा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. आशय, विषय, मांडणी अन् धाटणी या चारही अंगांनी प्रस्तुत गझलसंग्रह मुखपृष्ठापासूनच वेगळेपणा दर्शवितो. स्त्रीत्वाचा अर्थ अन् मानवी जन्माचे प्रयोजन याचा शोध, वेध घेणारी खलील मोमीन यांची गझल आहे.
मोमीन हे बहुतांशी संवेदनशील, हळव्या मनाचे गझलकार आहेत. निरालय आणि अक्षराई हे त्यांचे दोन कवितासंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाले आहेत. अक्षरावर प्रचंड प्रेम करणाऱ्या या अक्षरनिष्ठ गझलकारानं 'कुंकवाचे कुंपण' हा संपूर्ण गझलसंग्रह स्वतःच्या हस्ताक्षरात छापलं आहे. ही या गझलसंग्रहाची खासियत म्हणावी लागेल. आत्ममग्नतेतून आत्मशोध घेत राहणं, हा त्यांच्या प्रतिभेला लळा आहे. आजच्या काळातही समाजावर पुरुषप्रधान संस्कृतीचे हुकमी वर्चस्व आहे. स्त्रीला हीन दीन लेखणं भावनिक अन् मानसिक पातळीवरून तिचा हेळसांड करत राहणं. तिच्याभोवती कुंकवाचे कुंपण लादून तिची निर्दयपणे कोंडी करणं हे सार्वत्रिक चित्र पाहावयास मिळते. खलील मोमीन यांनी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांबरोबरच कुंकवाच्या कुंपणावरून स्त्रियांच्या जीवन-मरणाचे अनेक जीवघेणे प्रश्न ऐरणीवर घेतले आहेत.
आजकाल सगळीकडे जाणीवपूर्वक द्वेषाचे वातावरण पसरविण्यात येत आहे. कुणाला कुणाशीच काही देणे घेणे नाही. कुणाचा मुद्दा काय आहे. तो किती महत्त्वाचा आहे. हे देखील कुणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. कळीचे मुद्दे तर नेहमीच दाबून टाकण्यात येतात. प्रश्नांची तड न लावता ते पेटवत ठेवण्याचे धोरणच स्वीकारले जात आहे. या दृष्टीकोनातून मोमीन यांचा शेर प्रकाशझोत टाकतोय्.
दाबून टाकताना मुद्दे सदा कळीचे
केलेत साप त्यांनी द्वेषामुळे अळीचे
पूर्वीच्या काळात भाईचारा अबाधित होता. प्रत्येकाच्या ठायी माणुसकीचा झरा वाहत होता. सद्भावना, सौहार्द्र हा मानवी जगण्याचा मूलाधार होता. परंतु आजच्या काळात वाढत्या स्वार्थामुळे मानवामध्ये दानव निर्माण झाला आहे. पूर्वी माणुसकीचे जे बुलंद मनोरे उभारण्यात आले होते. त्याला स्वार्थाचे धक्के देवून ते जमीनदोस्त करण्यात येत आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातील विसंगती गझलकारास व्यथीत करते.
बुलंद होता माणुसकीचा छान मनोरा पक्का
स्वार्थाच्या धक्काने त्याची सुरूच आहे पडझड
कालच्या तुलनेत आजची स्त्री अधिक शिकलेली आहे. पुढारलेली आहे. परंतु भूतकाळात तिने सोसलेल्या वेदना आजही तिच्या मनात घर करून आहेत. स्त्रियांची ही जाणीव छोट्या वृत्तामधील शेरातून प्रत्ययकारी शब्दातून अशा तऱ्हेने अभिव्यक्त होते.
श्वास तेथे आस आहे
वर्तुळाला व्यास आहे
जीवन जगणे ही देखील एक प्रकारची कला आहे. जीवनाला पूर्णतः ओळखून घेण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी नितांत गरज असते. जीवनाच्या अभ्यासात जो तरबेज असतो. त्याची जीवन नौका यशस्वीपणे पैलतीरी लागते. त्यासाठी जीवन जाणून घेणे जरुरीचे असते.
जाणले की खास आहे
ताणले की त्रास आहे
कवी समाजाची दुःखे वेशीवर टांगत असतो. त्याला आपल्या शब्दातून वाचा फोडत असतो. परंतु त्याला त्याचेही जीवन असते. दुःख असते. सल मनात ताजी असते. तेव्हा त्याला आपली व्यथा समाजासमोर मांडवीच लागते. खलील मोमीन यांचा हा शेअर त्या अनुषंगाने खचितच पाहाता येण्यासारखा आहे.
आसवांना पापण्यांचा धाक आहे
नीबना शाई असा मी टाक आहे
जीवनाचा घाट वाकडा असला की व्यथेशी खडाजंगी सुरू व्हायला फारसा वेळ लागत नाही. अनेकदा ही खडाजंगी अपरिहार्य असते. तिच्याकडे पाठ फिरवून भागत नाही. संघर्षाची वाट तर तुडवावीच लागते.
घाट आहे जीवनाचा वाकडा जंगी
त्यामुळे चालू व्यथेशी ही खडाजंगी
जगण्यापासून गझलेला अलिप्त ठेवता येऊच शकत नाही. जगण्याची भलीबुरी प्रतिबिंबे गझलेच्या आरशात उमटतातच. जगण्याने अन् जगाने दिलेल्या अनुभवांचे सगळेच रंग गझलेत उतरतात. खलील मोमीन म्हणतात.
होताच कोंडमारा मदतीस धावणाऱ्या,
त्या धीट अक्षरांचे होतात पाय गझला
लोकशाहीची अवस्था कधी नव्हे इतकी आज विदारक झाली आहे. ज्या लोकशाही प्रणालीचा आपण स्वीकार केला त्या लोकशाहीचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष ऊटसुट लोकशाहीला वेठीस धरत आहे. त्यामुळे लोकशाही हैराण झाली आहे. ती अखेरचे आचके देण्याच्या स्थितीत पोहोचली असल्याचे दिसून येत आहे. ही न थोपवता येणारी बरबादी गझलकारास प्रचंड चीड आणणारी आहे.
ती सावरून साडी हैराण लोकशाही
प्रत्येक पक्ष आहे ओढीत झोळ येथे
अंतर्मुख होऊन विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला विद्यमान राजकीय परिस्थिती अस्वस्थ केल्याशिवाय राहात नाही. खलील मोमीन यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखडपणे कोरडे ओढणारे अनेकविध शेर बिनधोकपणे लिहिले आहेत. वानगीदाखल त्यांचे शेर पाहा.
खालच्या गेले थराला राजकारण
चालले जे त्यास आहे माज कारण
आश्वासने फुलांची आहेत व्यर्थ त्यांची
वाटेत फक्त काटे येतील बाभळीचे
जन्मदात्या बापापेक्षा आपल्या लेकरांवर आईची माया अधिक असते. तिच्या निरपेक्ष मायेला जगात तोड नाही. आपलं लेकरू नेहमीच आनंदात, सुखात राहावं असं तिला मनोमन वाटत राहते. श्रद्धेत प्रेम ओतप्रोत भरलेले असते. त्याचे मूळ माताच असते. प्रेमामुळेच लाभले विठाई. शेर वाचकांचे लक्ष वेधून घेणारा आहे.
श्रद्धेत प्रेम आहे माताच मूळ त्याचे
प्रेमामुळे विठूची झालीच ना विठाई!
खलील मोमीन हे प्रतिभेचे देणे लाभलेले गझलकार आहेत. सतत चिंतनात मग्न राहून उत्तमोत्तम साहित्यकृतींचे सृजन करणे हा त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या काव्यलेखनाची साधना अखंडपणे सुरू आहे. दिव्यत्वाची पालखी खांद्यावर पेलत ते कणाकणाशी, क्षणाक्षणाशी बोलत राहतात.
कुंकवाचे कुंपण: गझलसंग्रह
गझलकार: खालील मोमीन
संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे: १२१ मूल्य: २००₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
0 Comments