Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

उर्मिला: जाणिवांनी ओतप्रोत भरलेल्या शेरांचा खजिना Archana Devdhar

🌹 पुस्तक परिचय 🌹



उर्मिला: जाणिवांनी ओतप्रोत भरलेल्या शेरांचा खजिना


     अनेकांच्या गझलगुरू असलेल्या आदरणीय उर्मिलामाई बांदिवडेकर यांचा *उर्मिला* हा गझलसंग्रह हाती आला आणि त्यातल्या आशयघन गझलांचा आस्वाद घेता घेता जे मनात दाटलं ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

   आयुष्यात अनेक गोष्टी योगायोगाने घडत असतात तशीच माझी आणि माईंची भेट गेल्या वर्षी रत्नागिरीत एका काव्य महोत्सवादरम्यान झाली आणि त्यांच्याशी मैत्री कधी जुळली ते कळलंच नाही. खरं तर माई माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, साहित्यिक वाटचालीच्या दृष्टीने आणि एकूणच ज्येष्ठ-श्रेष्ठ अशा पण खूप पूर्वीपासून ओळख असलेल्या दोन मैत्रिणी भेटाव्यात तशा प्रकारे आमची भेट घडली आणि त्याचं रूपांतर गाढ मैत्रीत झालं. आता चार दिवस एकमेकींशी वार्तालाप झाला नाही तर चुकल्यासारखं वाटतं अशा स्वरूपातलं आमचं नातं आहे!

   आदरणीय माईंचा 'उर्मिला" हा गझलसंग्रह एप्रिल २०२१ मध्ये प्रकाशित झाला आणि हल्लीच माझ्या हाती त्याची प्रत आली. त्यातील १०१ गझलांमधले विविध विषयांना स्पर्श करणारे शेर म्हणजे एकेक टपोरा मोती आहे हा अनुभव संपूर्ण पुस्तक वाचताना येत राहतो.

हातचे राखून जगता येत नाही असं एका शेरात म्हणणाऱ्या आदरणीय माई खरोखरच त्यांच्याकडे मार्गदर्शन घेणाऱ्या साधकांना हातचं काही राखून न ठेवता ज्ञानदान करत असतात त्यामुळे केवळ तसा शेर लिहून न थांबता त्याप्रमाणे त्या आपल्या साधकांशी वागतातही हा अनुभव अनेकांनी घेतला असेल.

  गझलेच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या गझल मंथन या संस्थेला आणि गझलेचं वेड जोपासणाऱ्या साधकांना हा संग्रह त्यांनी अर्पण केला आहे.माईंची गझल म्हणजे गझलेचं एक संयत स्वरूप असा गौरव पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे गझलकार आदरणीय भूषण कटककर सर (बेफिकीर) यांनी केला आहे. योगेश वैद्य, शरद देवराय, रत्नाकर जोशी, आदरणीय शरयूताई शहा, अनिल कांबळे सर, सुनेत्रा जोशी, विष्णू जोंधळे इत्यादी मान्यवरांच्या शुभेच्छा या संग्रहात समाविष्ट आहेत.

   आदरणीय उर्मिलामाई आपल्या मनोगतात म्हणतात की त्या आयुष्यात गझलकडे खूप उशिरा वळल्या पण या काव्यप्रकाराने त्यांना खूप आनंद आणि समाधान मिळवून दिलं. जिवाभावाची मैत्रीण असलेल्या या गझलने दरजन्मी त्यांना श्वासाइतकी सोबत करावी असं त्या म्हणतात.

   प्रत्यक्ष गझल संग्रहाच्या अंतरंगात शिरल्यावर आपल्याला एखाद्या जादूच्या नगरीत गेल्यासारखं वाटतं.

   आदरणीय माईंचा संपूर्ण गझलसंग्रह वाचताना आढळलेलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रोजच्या जीवनातले साधे सोपे विषय हाताळत त्यांनी खयालांमध्ये गाठलेली उच्च कोटी!प्रत्येक शेर वाचताना.. अरेच्चा, हे तर आपण रोजच अनुभवत असतो,पाहत असतो असं आपल्या मनात येत राहतं.


रोज असे हे घडते आहे

तेच दुःख पाखडते आहे


कोणी नाही नडले इतके

मीच स्वतःला नडते आहे


    हे दोन्ही शेर वाचले की जाणवतं की खरंच, कित्येकदा आपला भिडस्त स्वभाव, आतल्या आत कुढत राहण्याची, दुसऱ्यांसाठी झटण्याची आपली सवयच आपल्याला नडत असते पण या गोष्टी शेरात गुंफण्याचं कसब माईंसारखी प्रतिभावंत व्यक्तीच साधू शकते!

    आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक चांगली वा वाईट गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते आणि त्या सर्व गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहिलं तर आपलं आयुष्य अधिकाधिक फुलत जातं हे सांगणारी माईंची अनलज्वाला वृत्तातली गझल हेच सांगते..


सौख्याच्या आशीर्वादाने फुलता येते

दुःखाच्या आशीर्वादाने फुलता येते


विवेकबुद्धीच्या जात्यावर दुःख दळावे

जात्याच्या आशीर्वादाने फुलता येते


   किती आशयसंपन्न शेर आहेत हे!आपलं दुःख नको इतकं उगाळत बसणाऱ्या लोकांना यातून जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची उमेद यातून नक्कीच मिळू शकेल!

     अवतीभवती अती वेगाने उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारती पाहून आपण फक्त तिरस्काराने भरलेली वाक्य फेकून मोकळे होतो पण अशी एखादी उंच इमारत हाच माईंच्या गझलेचा विषय होतो तेव्हा आपण अचंबित होतो..त्या इमारतीच्याही काही भावभावना आहेत, समस्या आहेत हे आपल्याला जाणवतं...


कुठे सुखाचे वाहे वारे कुठे विखरते सुख वाऱ्यावर

नियतीच्या साऱ्या खेळांना टिपते आहे उंच इमारत


  इमारतीचं रूपक घेऊन माईंनी त्या इमारतीचं भवताल आणि त्यात राहणाऱ्या माणसांवरच जणू भाष्य केलं आहे.

  जीवनात आपल्याला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडतेच असं नाही.आपल्या मनातल्या सुप्त इच्छांची पूर्तता करण्यासाठी अनेकदा खोट्याचा आधारही घेतला जातो..खरं तर ती आपली स्वतःचीच फसवणूक असते हे सांगणारा माईंचा शेर पहा..


जगाचे सोड, हृदयाला फसवता येत असते का?

असे विसरायचे म्हणुनी विसरता येत असते का?


  असं शेरातून विचारणाऱ्या माई


इयत्ता ओळखायाला हवी आहे तुझी तुजला

पुढे वर्गात जगण्याच्या ढकलता येत असते का?


 असं म्हणत स्वतःची प्रत आणि पत राखणं निव्वळ आपल्याच हातात आहे असा संदेश शेरातून देतात!

    आपल्या मनाचा एक कप्पा फक्त आठवणींनी भरलेला असतो. काही आठवणी सुखद, काही दुःखद, काही बोचऱ्या असल्या तरी जीवनात सकारात्मक विचार करण्याची वृत्ती असली तर माईंसारखी निष्णात गझलकारा लिहून जाते..


तुझ्या स्मृतींचा हर्ष दाटतो मनात इतका

आनंदाचा मंच वाटते तुझी आठवण


झुळुक सुखाची घेउन येते नेहमीच ती

सुखस्वप्नांचा मंच वाटते तुझी आठवण


   केवळ आपल्या दुःख आणि वेदनांचा पाढा गात बसणाऱ्या माणसांना यातून काहीतरी संदेश नक्की मिळेल, आयुष्याची चांगली बाजू जपायची प्रेरणा मिळेल असं वाटतं!

  उडदामाजी काळेगोरे या न्यायाने जगात नाना प्रकारची माणसं वावरत असतात, त्यात निष्ठुर स्वभावाचीही अनेक माणसं भेटतात हेच सांगताना माई म्हणतात..


खडूस इतका स्वभाव असतो एखाद्याचा

नावालाही कधीच अश्रू ढळला नाही


   अवतीभवती घडणाऱ्या अनेक गैर गोष्टी उघड्या डोळ्यांनी आपण पाहत असतो पण त्याबद्दल काही बोलताही येत नाही अशा मनाच्या हतबल अवस्थेचं वर्णन करणारा माईंचा हा शेर पहा..


कुणाची भाकरी कोणी पळवते ठकवुनी त्याला

भडकली भूक, आगीला कुठे घेऊन जाऊ मी?


  सभोवती नानाविध लोकांची गर्दी आहे पण त्यात माणूस म्हणून किती जण जगतात हा प्रश्न आहे.


येतात लोक काही, जातात लोक काही

गर्दीत माणसांच्या माणूस मात्र नाही


 हे माईंसारख्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षण असलेल्या व्यक्तीलाच जाणवू शकतं.

 पोटची मुलगी सासरी जाताना आईच्या हृदयात गलबलून येतं ती अवस्था मांडताना माईंच्या लेखणीतून हा शेर उतरतो..


कुणास भरवू घास सुखाचा आता बाळे

भरल्या डोळ्यांनी छळछळले तू गेल्यावर!


  द्वेष,मत्सर,असूया या गोष्टींची विपुलता हल्ली सगळीकडे फार दिसू लागली आहे हे सांगणारा। माईंचा हा शेर किती चपखल आहे.…


डोळ्यांमधले सागरपाणी भरकटलेले

जग दिसते हे जिकडेतिकडे कडवटलेले


  गुलाबाचं फूल कितीही अप्रिय असले तरी अपल्याभोवतीचे काटे सांभाळतच झाडावर डोलत राहतं त्याप्रमाणे नकोसं असलं तरी आपलं दुःख जपतच आपण वाटचाल करत राहतो हे सांगणारा माईंचा शेर किती सुंदर आहे.


शेवटी झालेच माझेही गुलाबासारखे

आपल्या काट्यांस प्रेमाने जपाया लागले


    माईंसारखी सशक्त शब्दांची पुंजी जवळ असणारी गझलकारा गझल हेच आपलं आयुष्य असं न म्हणाली तरच नवल. गझलेने जीवनात दिलेला आनंद शब्दात मांडताना माई म्हणतात..


ही गझल झुलवून नेते दूर झोपाळा जसा

दूरवरचे चंद्रही हातात याया लागले


 कोणताही कलाकार आपल्या कलेत, छंदात पूर्णत्त्व मिळालं असं म्हणत नाही, यातून त्या कलाकाराची नवनवीन गोष्टी शिकण्याची तळमळ दिसून येते. माई शेरात म्हणतात..


किती प्रशंसा मिळे तरीही अजून मन हळहळते

मनासारखे मनास लिहुनी बघता आले नाही


  आदरणीय माईंची विविध वृत्तांवरची जबरदस्त पकड पाहून अचंबित व्हायला होतं. त्यातून त्यांची या वयातही जपलेली अभ्यासू वृत्ती दिसून येते.


मुलींवर व्याख्याने झाली, प्रशंसाही मोठी झाली

मुलीच्या प्रगतीसाठी पण कधी झटता आले नाही


 खरंच मुलीच्या जन्मापासून भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर अहमहमिकेने चर्चा होतात, कधीमधी मुलींच्या कौतुकाचे सोहळेही झडतात पण अजूनही समाजात मुलीला असलेली निकृष्ट वागणूक आणि तिला त्यातून बाहेर काढून प्रगतीपथावर कसं नेता येईल यासाठी कुणी फार झटताना दिसत नाही.एक ज्वलंत सामाजिक प्रश्न या शेराच्या माध्यमातून हाताळला आहे असं मला वाटतं.

  अगदी खरं सांगायचं तर माईंच्या गझलसंग्रहातील प्रत्येक शेराचा आस्वाद चवीचवीने घ्यावा असेच आशयाने ओतप्रोत भरलेले त्यांच्या गझलांमधले शेर आहेत पण कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून थांबते. जाता जाता माईंचा हा शेर उल्लेखिल्याशिवाय थांबवत नाही..


जगी श्रीमंत कोणीही नसे माझ्यापरी येथे

तुझ्या या प्रेमखजिन्याची मला किल्ली गवसल्यावर


  मला वाटतं माईंचं गझलप्रेम या शेरातून चपखलपणे व्यक्त झालं आहे.

   आदरणीय माईंची गझलप्रतिभा उत्तरोत्तर अशीच झळाळत राहो आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या सुंदर सुंदर शेरांचा आस्वाद घ्यायची संधी मिळो हीच त्यांना शुभेच्छा! माईंच्या बाबतीत चार ओळी लिहिल्याशिवाय राहवत नाही....


शब्दधनाची अक्षयसरिता तिच्या मुखी वाहते

शेरांमध्ये सटीक आशय युक्तीने मांडते


गझलेसाठी वेळप्रसंगी अहोरात्र जागते

मार्गदर्शनासाठी अविरत सजगपणे धावते


शिस्तीसाठी कठोर तितकी हृदयाने कोमला

गझलेसोबत कवितेचेही विद्यालय उर्मिला!


   माईंच्या श्रीमंत साहित्यप्रतिभेला त्रिवार वंदन.


गझलसंग्रह: उर्मिला 

गझलकारा: उर्मिला बांदिवडेकर 

प्रकाशक: गझल मंथन प्रकाशन 

मूल्य: १६० ₹

पृष्ठे: १२०



अर्चना देवधर

रत्नागिरी 



Post a Comment

0 Comments