🌹 पुस्तक परिचय 🌹
"नवी मुंबईचे गझलकार"
( भाग-२ )
रसिकहो नमस्कार,
"नवी मुंबईचे गझलकार" या प्रातिनिधिक गझल संग्रहाचा परिचय करुन देणा-या लेखाचा भाग १ आपण गेल्या सोमवारी वाचला असेलच. आज आपण या संग्रहात ज्यांच्या गझलांचा समावेश करण्यात आला आहे त्यापैकी काही गझलकारांच्या गझलांचा आढावा घेऊयात.
कळंबोलीला राहणारे गझलकार श्री सतीश अहिरे यांना संग्रहात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळालेले आहे. आपल्या प्रत्येकाचे पहिले आणि परमदैवत असते आपली आई. माय, मां, मम्मी, अम्मा किंवा मदर अशा कुठल्याही नावाने हाक मारली तरी आईबद्दलची प्रेमभावना तीच असते व हीच भावना शब्दात मांडतांना - -
बोचता काटा कधी पायात माझ्या
आसवांना ढाळणारी माय माझी ....
अशा शब्दांत आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम व्यक्त करुन जातात तर जेव्हा त्याच मुलांकडून चुक होते तेंव्हा - -
वागतो जेव्हा कधी काळी चुकीचा
कान माझे ओढणारी माय माझी ....
असे कान ओढून मुलाला शिस्त लावणा-या, पुन्हा अशी चुक करु नये म्हणून चांगले संस्कार करणा-या आईबद्दल बोलतांना दिसतात. आई नंतरचे दुसरे दैवत देव असते. घोर वेदनांनी त्रासलेलं असतांना, आता या जगात आपलं म्हणावं अस कुणीच राहिलेलं नाही याची जाणीव झाल्यावर देवाचा धावा करताना - -
प्रभु घोर वेदनांचा कर अंत, धाव आता
दे मज दया करुणा अन् प्रेम, पाव आता ....
अशी देवाची विनवणी श्री सतीश अहिरे करताना दिसून येतात तर आपल्या सखी बद्दलची भावना व्यक्त करताना - -
घे जरा तू हात हाती भेटताना
लाज थोडे लाघवी मग बोलताना ....
काय होते हे मला मी काय सांगू
भान सारे विसरतो तुज पाहताना ....
तर आपल्या पुढच्या गझलेत सखीबद्दलच्याच भावना व्यक्त करताना - -
सखीला कधी ठेच ही लागताना
मला घाव तो दाह अन् वेदना दे ....
अशी जिवाला जिवाची ओढ, खरे प्रेम अन् खरी वासना देण्याची मागणी ते करताना दिसतात.
संग्रहात या नंतर आपल्याला भेटतात नेरुळ येथे राहणारे, मराठी साहित्यात पदवी मिळवणारे व दैनिक रामप्रहर या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कर्तव्य बजावणरे गझलकार श्री संदीप दशरथ बोडके. एका वृत्तपत्रात काम करत असल्यामुळे सामाजिक विषयांशी त्यांचा संबंध येणे अगदी क्रमप्राप्त व साहजिक असल्याचे त्यांच्या गझला वाचल्यावर जाणवते. या समाजात वावरत असताना - -
माणसाच्या क्रूरतेने, वाट पुरती रंगलेली
फाटलेले सभ्यतेचे, मुखवटे पाहात होतो ....
समाजाने लाखो वार केले असल्याचा अनुभव आल्यानंतरही झालेले घाव तसेच उरी वाहात नेणारा हा तरुण गझलकार पुढे म्हणतो की - -
संचिताचे भोग मजला भोगलेची पाहिजे
वेदनेच्या स्वागताला जागलेची पाहिजे ....
नेत्र भरले आसवांनी तार माझी छेडिता
वाहिले डोळे तरी मज हासलेची पाहिजे ....
आणि मग समाजात वावरत असतांना आपल्या सखी बरोबर धुसफूस ही होणारच आणि मग अशावेळी काय करावे हे नेमके सुचत नसतांना - -
क्षमा मागतो मीच 'संदीप' वेडा
तरी प्रीत भोळी मला आकळेना ....
असा मक्त्यासह लिहिलेला शेर लिहून मनाचा मोठेपणा दाखवतो. धावणा-या गलबतासाठी किनारा, स्वत:साठी निवारा व जीवनाला सावरण्यासाठी सहारा मागत असतांना - -
'जा कुठेही, घे भरारी,' अंतरात्मा सांगतो
ताकदीने पंख पसरुन, पेलणारा पाहिजे ....
अशी आपल्या मनात असलेली एक छोटीशी अपेक्षा सुध्दा व्यक्त करुन जातो.
गझल लिहिण्यासाठी आधी चांगला कवी असणे गरजेचे असते असे नेहमीच बोलले जाते आणि मग गझल लिहायला सुरुवात केली तरी तो कवी कवितेला विसरत नसतो हा सगळ्यांनाच आलेला अनुभव. सीबीडी-बेलापूर इथे राहणा-या ज्येष्ठ गझलकारा उर्मिला बांदिवडेकर ताई यांची 'कविता' हा रदीफ वापरुन लिहिलेली ही गझल बघा - -
काळजाला भावणारा राग कविता
दर्वळे दिनरात ती फुलबाग कविता ....
जीवनाच्या दरवळाचे हवन चाले
शब्दसमिधा वाहिल्या मी याग कविता ....
आणि मग दिनरात पाना - फुलांनी दर्वळणारी, बहरून गेलेली फुलबाग आठवल्यावर - -
तुझेच शब्द, शब्द मी, जपूनिया फुलापरी
सुरेख ओवते तयास, कुंतलात माळते...
सदाफुलीपरी सदा, फुलायचे असे मला
नि मोगराच तू बरा, जुई उगीच लाजते ....
अशा शब्दांत आपल्या मनात आलेला प्रेमभाव मोकळेपणाने व्यक्त करुन जाताना दिसतात आणि मग कलिंदनंदिनी वृत्तात लिहालेल्या या लयबध्द अशा गझलेचा जन्म होतो आणि आपल्या मनातले भाव प्रकट केल्यानंतर - -
काही तरी आहे मनी ते बोल ना
आता नको ते घोळ आणि झोल ना ....
या पावसाने काय हे केले असे
डोळ्यात पाणी, आड गेले खोल ना....
अशी आपली अवस्था झालेली असल्याचे सांगत असतानाच - -
तू उभी पावसाच्यामधे
मन तुझे कोरडे ठक्क का ?
गर्द काळोख लाभे मला
चांदणे मग तुझे झक्क का ?
असे आपल्या जोडीदाराच्या मनात आलेले प्रश्न चक्क, हक्क, टक्क, ठक्क, लक्क आणि झक्क असे समउच्यारी व स्वाभाविक लय असलेले शब्द काफिया म्हणून वापरुन आपण गझलेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे हे उर्मिलाताई दाखवून देतात.
संग्रहात यानंतर आपल्या भेटीस येतात त्या एम.ए., एलएलबी, एलएलएम झालेल्या, पनवेल येथे राहणा-या व पेशाने वकील असलेल्या छाया गोवारी. वकीली क्षेत्रात काम करतांना "पुरावा" फार महत्वाचा असतो, मग ते पुरावा मागणे असो वा पुरावा देणे असो, त्यानुसार - -
तेच अपराधी जरी माहीत त्यांना
सभ्यतेचे मागती माझ्या पुरावे ....
सांग त्यांना माफ करताना मना तू
मी किती अन् काय ते विसरून जावे ....
असे माफी, पुरावा या सारखे कायदेशीर, न्यायालयीन भाषेत वापरले जाणारे शब्द वापरुन गझल लिहिताना दिसतात, तर दुस-या एका गझलेत....
बोल तू हासून माझ्याशी जरासे
कालचे देऊ उद्या आपण खूलासे ....
समजते आता तुझ्या मी वेदनांना
हे नको बोलून देऊ तू दिलासे ....
असे अगदी स्पष्टपणे सांगतांना सुध्दा दिसून येतात. तर आपलेच गाव परके झाल्यावर, मदत मागायची ती कुणाकडे ? आपल्या व्यथा वेदना सांगायच्या त्या कुणाला ? हे व असे असंख्य प्रश्न समोर असतांना ....
घावावरीच होती हे रोज घाव आता
घेऊ कुठे कळेना मदतीस धाव आता ....
सांगू कशा कुणाला, माझ्या व्यथा अशा या
परके मला कसे हे माझेच गाव आता ....
अशा शब्दांत जिथे आपली अगतिकता व्यक्त करतांना दिसतात तिथेच ....
रुतले कितीक काटे विसरून सल उरीचे
मागे न परतण्याचा केला ठराव आता ....
असा कुठल्याही परिस्थितीत मला मागे परतायचे नाही व हा आपला दृढ निश्चय असल्याचे व्यक्त करतांना सुध्दा दिसून येतात.
रसिक हो, 'नवी मुंबईचे गझलकार' या प्रातिनिधिक गझल संग्रहाच्या पुस्तक परिचय लेख भाग १ मध्ये दिलेल्या आश्वासनानुसार या संग्रहातील काही गझलकार मित्र - मैत्रिणींच्या परिचयाबरोबरच त्यांच्या गझलांचा परिचयही आज करुन दिला आहे. उर्वरित मित्रांच्या गझलांचा परिचय पुढील भागात करुन देणार आहेच पण आता घेऊयात थोडी विश्रांती व परत भेटूयात पुढच्या आठवड्यात .....!
दिवाकर चौकेकर
गांधीनगर
------------------------------
गझल संग्रह : नवी मुंबईचे गझलकार
संपादन : ए के शेख, पनवेल
प्रकाशक : समीर शेख
मुद्रण : अदबी प्रिंटिंग प्रेस, भायखळा, मुंबई
अक्षर रचना : सौ स्वाती बोडके
मुखपृष्ठ : परेश पंडित
मूल्य : रु.१००/=
0 Comments