Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गदागदा हलवणारी गझल: 'तुकोबाच्या कुळाचा वंश' Badiujjama Birajdar

🌹पुस्तक परिचय 🌹



गदागदा हलवणारी गझल: 'तुकोबाच्या कुळाचा वंश'



    गझल या काव्यप्रकारात अंगभूत शक्ती असल्यानं गझलकार मैफलीत रसिकाचं आपसूकच लक्ष वेधून घेतो. रसिक कानामनाच्या ओंजळीत अनेक शेर सोबत घेऊन जातात. काही शेर तर काही केल्या त्यांची पाठच सोडत नाहीत. हे गझलेचं सामर्थ्य आहे. म्हणूनच युवा प्रतिभेला गझलेचं सौंदर्य आकर्षित करू लागलाय्. गझलेचं हे सौंदर्य जगण्यातल्या माणूसपणाचं सौंदर्य असतं. अलीकडच्या काळात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण गझलसंग्रह प्रकाशित होताहेत. त्यामुळे मराठी काव्याचं दालन अधिकाधिक सकस होत चाललंय्. हे सुचिन्हच म्हणावं लागेल.


     आजच्या काळातील प्रतिभावंत युवा गझलकार संतोष विठ्ठलराव कांबळे यांचा 'तुकोबाच्या कुळाचा वंश' हा बहुपेढी गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय्. त्यातील संतोषची गझल आपणास किती रूपात, किती विरूपात, किती स्वरूपात भेटते... पावसात पेटते... ज्वाळात फुलते... सर्वसामान्यांचा हुंकार व्यक्त करते... दुर्बलांचे शोषण करणाऱ्यांच्या खरपूस समाचार घेते... वंचितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटते... जीवघेण्या सामाजिक विषमतेवर, विसंगतीवर तुटून पडते... दांभिकते विरुद्ध त्वेषानं, जोशानं आवाज बुलंद करते... शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी हळहळते... मुजोर व्यवस्थेवर आसूड ओढते... स्त्रियांना सोसाव्या लागणाऱ्या दुःखानं सद्गदित होते... सुनेचा छळ मांडणाऱ्या सासूला खडेबोल सुनावते... पोरीच्या बापाच्या लाचारीने कमालीची अस्वस्थ होते... विदूषकाच्या पापण्याआड दडलेली सल उकलते... भारत अन् इंडियात राहणाऱ्या लोकांमधील मूलभूत तफावत स्पष्ट करते... लोकशाहीची मूल्ये बेदरकारपणे पायदळी तुडविण्याऱ्या मस्तवाल नेत्यांना रोखठोक जाब विचारते... भोंदूगिरीला आरसा दाखवते... वारकऱ्यांचं विठ्ठलाशी युगानयुगे दृढ असलेलं नातं प्रकट करते... मातीशी इमान राखते... शिवरायांचा सार्थ अभिमान बाळगते... तुकोबारायाशी संवाद करता करता अनेक गंभीर प्रश्न वेशीवर टांगते... विद्रोहाचा अंगार फुलवताना प्रेमाचा नाजूक विषय आला की ती तितकीच हळवी अन् तरल बनत जाते... तिला पालवी फुटते... शेवटी हा तुकोबाच्या कुळाच्या वंशाचा परिणामच म्हणावा लागेल. एकूण दुनियादारी डोळसपणे पाहायची असेल तर संतोषचा हा वास्तववादी पारदर्शी गझलसंग्रह मुळातूनच वाचायला हवा.


    इथली समाजरचना एकांगी, शोषणाच्या सूत्रावर आधारित आहे. शोषण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला कोणतंही धरबंद नाही. धनदांडगे दुर्बलाचं वाटेल तसं शोषण करतच असतात. दुर्बल राहिला काय अन् मेला काय याच्याशी त्यांना काही देणंघेणं नसतं. दुर्बल दुर्बलच राहातात अन् श्रीमंताचे बंगल्यावर बंगले वाढतच जातात. तेव्हा शोषणासंबंधीची साक्ष मनाला पटत जाते. फक्त शोषणाच्या तऱ्हा कूस बदलत राहातात पण शोषण टळत नाही. त्याचं प्रारूप ठरलेलं असतं. इथून तिथून ते सारखचं असतं. भारत अन् इंडियातली दरी संतोषला अस्वस्थ करून जाते. या अस्वस्थतेतून त्याचा प्रश्न येतो.


दुर्बलांचे एवढे करता कसे शोषण तुम्ही?

मुंडक्यांचे बंगल्यांना लावता तोरण तुम्ही?


     कुणब्याची कहाणी ही गझल तर डोळ्यात टचकन पाणी आणणारी आहे. पाऊस असो, वा नसो कुणब्यांचं भोग मात्र नाही सरत. दरसाल ही कहाणी नव्या रूपात समोर येते. दुष्काळ असो की महापूर, गारपीट असो कुणब्याचं तेवढ्यापुरतंच सांत्वन केलं जातं. पॅकेजचं गाजर दाखवलं जातं. पुढची आपत्ती येईपर्यंत सारेच विसरून जातात. इकडं एकरावर बोजा कितीदा चढत जातो. कुणबी नुसता रडत बसतो. नेमेचि येतो पावसाळा... या प्रमाणंच सार काही घडत राहातं. त्यांचं जगणं कठीण होत जातं.


तीच ती दरसाल कर्माची कहाणी

पावसाळा आणतो डोळ्यात पाणी


     कुणब्याची ही दैन्यावस्था संपली पाहिजे. दारिद्र्यात जर्जर झालेली त्याची परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी तुकोबांनीच त्यांना क्रांतीची तुतारी द्यायला हवी. म्हणून संतोष तुकोबांना साद घालतो.


झेंडे, बुक्का, प्रसाद ठेवू नको दुकानी

दे क्रांतीचे कुणब्याला सामान तुकोबा


       वाट्याला आलेलं दुःख गाठीला बांधून बाई मुकेपणानं जगत असते. यातून तिची कधीच सुटका नसते. सोसलेल्या यातनाचा पाऊस पापण्याच्या आत साचलेला असतो. त्यामुळे तिची आंतरिक घालमेल सुरूच असते. ती क्षणाक्षणानं आतून जळतच असते. तिचं करपून जाणं कुणालाच नाही दिसत. म्हणून तिच्या दुःखाचा पाऊस कोसळला पाहिजे. तिला अंतर्बाह्य मोकळीक मिळायला हवी असं संतोषला मनापासून वाटतं.


एवढे दुःख गाठीला नको बांधूस बाई

कोसळू दे पापण्यांच्या आतला पाऊस बाई


      कुणी तोडून, खुडून नेण्याची फुलांना कधीच चिंता नसते. झाडाशी नातं तुटल्याचं त्यांना पराकोटीचं शल्य होत असलं तरी दुसऱ्याचं आयुष्य सुगंधित करणं, त्यांना प्रसन्न ठेवणं ही फुलांची खरी दानत असते. अंतःकरण विशाल असल्याशिवाय औदार्य निर्माण नाही होत. फुलांची ही दानत माणसानंही अंगीकारावी असंही संतोष सूचित करतो.


ही फुलांची कोणती दानत म्हणावी?

तोडणारे हात गंधाळून गेले


      मातीशी इमान राखणारी गझलही संतोषनं लिहिलीय् मातीवर ठाम पाय रोवून असणाऱ्या मातीची ही गाथा आहे. आजन्म माणसाचं नातं मातीशी जोडलं गेलंय. माती मायाळू असते. ती आपल्या लेकरांना उपाशी राहू नाही देत. एक दाण्याचे हजार दाणे देते. माती लेकरांशी कधी छक्केपंजे करत नाही. तिचं वागणं प्रांजळ असतं. ती माणसासारखं कधीच नाही बदलत. लेकरांना प्राणवायू पुरविण्यासाठी मातृत्व व त्याला समजूतदार करण्यासाठी लागणारं पितृत्व दोन्ही तिच्याकडंच आहेत. युगे लोटली तरीही सृजन ऊर्जेच्या हा हिरवा स्त्रोत अजूनही नाही आटला. लेकरांवरील तिचं थोर उपकार अन् तिची प्रांजळता प्रकट करताना संतोष म्हणतो.


एक कणाचे हजार दाणे देते माती,

तिचे वागणे प्रांजळ होते, प्रांजळ आहे


    मातीचा कणा नेहमीच ताठ असतो. तिला वाकणं ठाऊक नसतं. स्वाभिमान तिच्या कणाकणात ठासून भरलेला असतो. या मातीचा टीळा भाळी लावून कितीतरी महापुरुषांची जीवने घडली. मातीला साक्षी ठेवून त्यांनी अजोड इतिहास घडविला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर याच मातीतून जन्माला आला अन् त्यांनी देदिप्यमान पराक्रम गाजविला. याचा संतोषला सार्थ अभिमान वाटतो.


वाकणे मातीस या ठाऊक नाही

जन्मला मातीत या शिवराय माझा


      पंढरीच्या विठ्ठलावरही संतोषची निस्सीम श्रद्धा आहे. ज्या ठिकाणी तो वास्तव्य करतो त्या घराचं नावही 'श्री विठ्ठल' आहे. हे विशेष. विठ्ठल चराचराला व्यापून राहिलाय्. आत बाहेर वर-खाली ठायीठायी त्याचं अस्तित्व आहे. नुसते पंढरी हे विठ्ठलाचं गाव नाही. भक्तानं जिथं त्याला साद घातली तिथं त्याला विठ्ठलाचा ठाव  गवसतो. यासाठी फार पायपीट करायची आवश्यकता नसते. असं एकही घर नाही की ज्या घरात विठ्ठल नाही. मनोमनी विठ्ठल, घरोघरी विठ्ठल पाहावयास मिळतो. अशी ही संतोषी मनोभावना आहे. म्हणूनच तो म्हणतो.


दाखवा घर एक; विठ्ठल ज्या घरी नाही

विठ्ठलाचे गाव नुसते पंढरी नाही


      सामाजिक प्रखर भान व्यक्त करताना अत्यंत पोटतिडकीनं, त्वेषानं परजाणारी संतोषची लेखणी प्रेमाचा विषय आला की आत्यंतिक हळवी बनते. तिला अंकुर फुटतात. आतला धगधगता निखारा तेवढ्यापुरता थंड होतो. त्याच्या लेखणीला फुलांचं अंतःकरण प्राप्त होतं. ती कुसुमकोमल होते. तिच्या सहवासात तिला टवटवी प्राप्त होते. भावनांचा होतो पिसारा. प्रियेच्या भोवती मन कृष्णमेघ होऊन थुईथुई नाचू लागते.


तुझा सहवास माझ्या जिंदगीला टवटवी देतो

जसा पाऊस वठल्या रोपट्याला पालवी देतो


किंवा


फुल सुकलेले वही मधले सुचवते

एक दबलेली कथा अव्यक्त आहे


      असे किती तरी मनाला स्पर्श करणारे हळुवार शेर संतोषनं लिहिलेत. विषयांमधील विभिन्नता, नावीन्यपूर्णता, परिपूर्णता, परिपक्वता हे या गझलसंग्रहाचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.


तुकोबाच्या कुळाचा वंश: गझलसंग्रह

गझलकार: संतोष कांबळे

प्रकाशक: ऋषी प्रकाशन, पुणे

पृष्ठे: ९६, मूल्य: १०० रुपये.




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी) 



Post a Comment

0 Comments