Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आशयघन गझलांची पर्वणी: 'हो' 'नाही'च्या उंबरठ्यावर Badiujjama Birajdar

🌹 पुस्तक परिचय 🌹



आशयघन गझलांची पर्वणी: 'हो' 'नाही'च्या उंबरठ्यावर


    माणूस बहुदा द्विधा मनस्थितीत असतो. डोक्यात वाढत जाणाऱ्या गोंधळाच्या चक्रात तो सापडलेला असतो. धड त्याला 'हो' ही म्हणता नाही येत अन् 'नाही' ही म्हणता नाही येत. तो आतला ऐकत नसल्यामुळे त्याच्या मनाची कैफियत सतत हेलकावे खात राहते. शेवटी तो 'हो' 'नाही'च्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकतो. अशा भांबावलेल्या मनुष्य समूहाला मुळातून समजून घेणं मोठं जिकरीचं काम असतं. वर्ध्याचे चिंतनशील गझलकार रुपेश देशमुख यांचा नुकताच प्रकाशित झालेला 'हो' 'नाही' च्या उंबरठ्यावर हा गझलसंग्रह माणसांच्या गोंधळेपणावर झगझगीत प्रकाशझोत टाकतो. गझलेच्या प्रांतात वेगळी वाट चोखाळणारे देशमुख हे निरीक्षण शक्तीचा अफाट पट असणारे प्रतिभावंत गझलकार आहेत.'हो' 'नाही' च्या उंबरठ्यावर या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच त्यांचा वेगळेपणा दिसून येतो.


      रुपेश देशमुख यांची गझलशैली सहज संवादी स्वरूपाची आहे. ते वाचकांशी शेरांमधून वेगवेगळ्या पातळ्यांवर बोलत राहतात. लोकभावना अन् लोकजाणिवा त्यांच्या शेरांतून प्रतिबिंबित होतात. शेर लोकभावनेला सर्वांगानं भिडणारे असले की ते लोकांचे होऊन जातात. त्याला सुभाषिताचं रूप येतं. त्याला चिरकालत्व प्राप्त होतं. प्रस्तुत गझलसंग्रहात असे कितीतरी शेर पानोपानी आहेत. जे अविस्मरणीय आहेत. हे गझलकाराच्या लेखणीचं सामर्थ्य आहे. प्रत्ययकारी शब्दात अनुभव मांडण्याची, निरीक्षण नोंदविण्याची त्यांची शैली रसिकांना भावणारी आहे. एखादा अनुभव, एखादी गोष्ट वा घटना सरधोपटपणे मांडण्यापेक्षा ती उपहासानं, उपरोधानं सांगितली तर पटकन समजते. त्यातली वेदना काळजाला भिडते. वेदना जीवघेणी असली तरी ती जीव लावणारीही असते. आईसारखी माया देणारी असते. वेदनेचा हा आगळावेगळा मायाळू पैलू देशमुख त्यांच्या शैलीत उलगडतात तेव्हा शेर आशयाचं शिखर गाठल्याशिवाय नाही राहात. हा शेर याचा पुरावा आहे.


मला वेदना जीव लावे किती

तिला वाटतो मी मुलासारखा!


     नाट्यात्म परिणामकारकतेच्या दृष्टीनं मांडणीत असलेला रोखठोकपणा अन् अंतर्मुखताही देशमुख यांच्या लेखणीत आहे. स्वतःला गोंजारत प्रश्नांच्या सरबत्तीपासून पळ काढण्यात पुरुषार्थ नसतो. हे त्यांना ठाऊक असल्यानं प्रश्न आतले असो वा बाहेरचे त्यांना ते भिडत राहतात. त्यात पक्षपात नाही करत. अंतर्बाह्य प्रश्नांच्या संघर्षाला सामोरं जाता आलं की आत्मतेज झळाळून येतं. आंतरिक शक्ती विराटाचं रूप घेते. म्हणून देशमुख स्वतःलाही प्रश्न विचारायला अजिबात नाही कचरत. आपल्या मनात डोकावून पाहण्याचा प्रांजळपणा, निर्भीडपणा असला की पश्चातापाचे प्रश्नही समोर येतात. जसे की...


तुझा षंढपणा प्रसिद्ध आहे

कशास झालो तुझी ढाल मी!


    मानवी जीवनात सगळ्यात वाईट कोणती गोष्ट असेल तर ती भूक होय. पोटाची खळगी भरण्यासाठी भूक माणसाला इच्छा नसतानाही काय काय करायला लावते. जन्मापासून त्याच्याकडून काय काय करून घेते. भूक माणसाला हतबल करून टाकते. त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेते. माणूस भुकेचा गुलाम होतो. ती त्याला नाचवेल तसं नाचावं लागतं. भूक खोटं बोलायला, लबाड्या करायला शिकवते. नीतिमत्ता विकायला लावते. हरामखोरी करायला लावते. भूक माणसाला भूमिका बदलायला भाग पाडते. या दुनियादारीत भुकेसारखं काहीच अघोरी नाही. हे सनातन सत्य आहे. उपाशी माणूस विधायक विचार करूच नाही शकत. भूक भीषण, भयावह आहे. तिच्यामुळेच अनाचार घडतो. ही जगण्याची खरी खंत आहे. ही खंत रुपेश देशमुख तितक्याच पोटतिडकीनं व्यक्त करतात.


काय काय ही करून घेते माणसाकडुन

जन्मापासून भूक अघोरी प्रसिद्ध आहे


      अंतरंगातील वेदना वाहती, फुलती, दर्वळती असली की जगण्याला अंकुर फुटतात. अन् त्याचेच शेर होऊन जातात. गझलेला जगण्यापासून दूर नाही लोटता येतं. जसे ज्याच्या जगण्याचा रंग तसाच त्याचा गझलरंग असतो. जगणं अंतरंगात रंगल्याशिवाय शेराला आशयाचा रंग नाही चढत. अस्सल शेर लिहिणं ही काही मामुली गोष्ट नसते. त्याला तशा जगण्याची किंमत अदा करावी लागते. सल अन् अस्सल यांचा संबंध अपरिहार्य असतो. रुपेश देशमुख म्हणतात त्याप्रमाणे.


अंतरंगी दरवळावा लागतो

शेर जगण्यातून यावा लागतो


   भुकेनं गांजलेली माणसं तडफडत असतात. भूकबळींची संख्या रोज फुगत जाते. परंतु त्या भुकेल्यांची तडफडत कुणालाच नाही दिसत. निर्मिकांचा फालतू चंद्र-ताऱ्यांच्या सोबतीचा सोस कमी नाही होत. त्याच्यासाठी परदुःख शीतल असते. दुसर्‍याची दुःखं आपल्या ओंजळीत घेणाऱ्या संवेदनशील गझलकारला याचीच चीड येते. 'नाही रे' वर्गाच्या बाजूनं उभं राहणं, त्यांच्या वेदनेला उद्गार देणं हे लिहिणाऱ्याचं आद्य कर्तव्य असतं. झाडाझुडपांच्या, पानाफुलांच्या चंद्र ताऱ्यांच्या भोवती फेर धरून आपण किती काळ फिरणार आहोत. हे ठरविण्याची वेळ आता येऊन ठेपलीय्. निर्मिकानं सामाजिक जाणिवेनं सजगतेनं व्यक्त व्हायला हवं. हीच माणुसकीची मागणी आहे. स्वतःची भूमिका देशमुख त्यांच्या शेरातून अशा पद्धतीनं मांडतात.


हवी माणसे गांजलेली भुकेली

मला चंद्र-तारे नको सोबतीला


    सत्य अंधारातच राहावं, ते लोकांना कळता कामा नये, सत्य उघड झाले तर आपली मक्तेदारी संपुष्टात येईल. या स्वार्थापायीच खरा इतिहास गुलदस्त्यात ठेवण्यासाठी काही खोडसाळ मंडळीकडून वेळोवेळी नवा इतिहास रचण्याचा घाट घालण्यात येतो. त्यांना त्यांच्या सोयीचा इतिहास हवा असतो. हा आजवरचा इतिहास आहे. खरं तर इतिहास प्रेरणादायी असतो. इतिहासापासून माणसाला बरंच काही शिकता येतं. इतिहासापासूनच उर्मी अन् स्फूर्ती मिळते. परंतु अनेक वेळा इतिहासाचं विकृतीकरण करण्यात येतं. खोटेनाटे, कपोलकल्पित दाखले देऊन लोकांमध्ये गैरसमजही पसरविण्यात येतात. अशी प्रकरणे अधूनमधून वर्तमान काळात घडताना दिसून येतात. हा कुटील कारस्थानाचा भाग असतो. सत्य समजून घेऊन त्यावर ठाम राहण्यासाठी अखंडपणे जागृत राहावं लागतं. अन्यथा फसगत ठरलेलीच असते. या षडयंत्राकडं देशमुख लक्ष वेधतात.


नवा इतिहास रचला जात आहे

(खरे तर सत्य गुलदस्त्यात आहे)


   शेती हा आपल्याकडं बेभरवशाचा व्यवसाय आहे. पावसावरचा जुगार आहे. कधी चुकूनमाकून पिकं तरारली, शेती चांगली बहरली तरी नैसर्गिक आपत्तीचा फेरा काही चुकत नाही. हातातोंडाशी आलेलं उभं पिकं अतिवृष्टीत वाहून जातात. तर कधी भीषण दुष्काळात करपून जातात. पिकं आली अन् ती सहीसलामत राहिली तरी शेतकऱ्यांना मनासारखा भाव नाही मिळत. त्याचे स्वप्न करपून जाते. महाराष्ट्रात हापूस असो वा कापूस. सल सारखीच आहे. अपार कष्टानं पिकविलेली पिकं डोळ्यात जिवंत राहतात अन् शेतकरी मात्र मरणासन्न होतो. वर्षानुवर्षे हेच विदारक चित्र पाहावयास मिळते. यावर काही ठोस उपाययोजना करता नाही येत. मंत्र्यांचे बांधावरील सुग्रास दौरे मात्र होत असतात. ही कृषिप्रधान देशाची शोकांतिका देशमुख त्यांच्या शेरातून समोर ठेवतात.


मनासारखा भाव मिळेना, स्वप्न करपले

डोळ्यांमध्ये हाताश कापुस जिवंत आहे


     गझलकार रुपेश देशमुख यांच्या निरीक्षण शक्तीचा आवाका मोठा आहे. रोजच्या जगण्यातील बारीक सारीक घडामोडींची विचित्र विसंगतीची त्यांनी अतिशय सहजतेनं शेरातून मांडणी केलीय्. प्रत्येक गझल मनाची पकड घेते. कौटुंबिक भावविश्वाबरोबरच देशमुखांनी सामाजिक जाणिवाही आपल्या अर्थपूर्ण गझलांमध्ये प्रगल्भतेनं उतरविल्या आहेत. प्रस्तुत संग्रहातील गझल म्हणजे उत्तम गझलेचा परिपाक ठरावा. प्रत्येक गझलेच्या तळाशी स्वतंत्र एकेक शेर ठळकपणे अधोरेखित करण्यात आलाय्. ही नावीन्यपूर्ण पद्धत आहे. वेगळा प्रयोगही आहे. याचाही रसिक स्वतंत्रपणे आस्वाद घेऊ शकतात. त्यांनी वापरलेले निरनिराळे रदीफ, काफिये त्यांच्या कल्पकतेची, प्रतिभेची चमक दाखविणारे आहेत.


'हो' 'नाही' च्या उंबरठ्यावर: गझलसंग्रह

गझलकार: रुपेश देशमुख

स्वयं प्रकाशन, पुणे

पृष्ठे: ९५ मूल्य: रुपये १५०




बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी) 



Post a Comment

0 Comments