🌹 पुस्तक परिचय 🌹
🌹मौनात एकट्याशी 🌹
रसिक हो नमस्कार,
ज्यांना साक्षात गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांचा स्नेह लाभला, परिसस्पर्श झाला, ज्यांच्या गझलेला सुवर्णाची झळाळी लाभली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष भट साहेबांचे मार्गदर्शन लाभले आहे अशा एका 'अति संवेदनशील' गझलकार मित्राच्या संग्रहाचा परिचय मी करुन देत आहे.
माणसांवर उपचार करणा-या गझलकार डॉक्टर मित्राच्या संग्रहाचा परिचय यापूर्वी करुन दिलेला आहेच. आज ज्यांच्या संग्रहाचा परिचय करुन देत आहे ते सुध्दा आहेत एक डॉक्टरच, ते सुध्दा उपचारच करतात पण "मुक्या जनावरांवर" आणि म्हणूनच लेखाच्या सुरुवातीसच शब्दरचना केली आहे की, "अति संवेदनशील" आणि अशा या मित्राचे नाव आहे गझलकार प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी.
"पशु शरीरक्रिया" शास्त्रात "विद्यावाचस्पती" म्हणजेच पी. एच्. डी. ही सर्वोच्च पदवी मिळविणा-या डॉ. संतोष कुलकर्णी यांनी जनावरा बरोबरच माणसांचाही चांगलाच अभ्यास केलेला दिसतो कारण एका ठिकाणी ते म्हणतात - -
चेहरे जनावरात मानवी किती,
माणसांत अंतरंग पाशवी किती ...
आणि अशा प्रकारची नेमकी शब्दरचना करुन माणसामध्ये असलेला क्रूरपणा, पाशवीपणा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून येते तर त्याचवेळी निसर्गाबाबत बोलत असताना ....
कोणता आला ॠतू हा ... वाळती झाडे,
आसवे पाना-फुलांची ... ढाळती झाडे ....
पाखरांच्याही घरांचे सानुले ओझे,
होऊनी आई जणू सांभाळती झाडे ....
असे ते अतिशय हळवे होऊन सांगतात मात्र त्याचवेळी या संग्रहाचा शीर्षक शेर असलेल्या गझलेत ते म्हणतात - -
साती समुद्र भवती लेवून अंग व्हावे,
लाटांपरी जिण्याचे अवघे तरंग व्हावे ....
सृष्टीतले निराळे निरखून रंग सारे,
सर्वात वेगळासा अलवार रंग व्हावे ....
वाटे, नको कुणाशी वाचाळ वाद आता,
मौनात एकट्याशी जगण्यात दंग व्हावे ...
साधारणपणे सन १९८५ पासून कविता तसेच गझल लेखन करणा-या प्रा. डॉ. संतोष सुधाकरराव कुलकर्णी यांचा "मौनात एकट्याशी"हा पहिला-वहिला कविता-गझल संग्रह, ज्यात सुमारे ५० गझलांचा समावेश आहे, त्या मानाने जरा ऊशीराच म्हणजे २००४ साली ज्येष्ठ मराठी गझलकार मा. ईलाहीदादा जमादार यांचे हस्ते प्रकाशित झाला. संग्रह प्रकाशित होण्यासाठी ऊशीर का झाला? या प्रश्नाचे उत्तर देतांना ते स्वत:च सांगतात की, त्याची कारणे देखील तशीच आहेत आणि त्यापैकीच एक कारण म्हणजे 'गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट यांचे फेब्रुवारी १९९४ मध्ये आलेले पुढील मजकुराचे पत्र ...!'
या पत्रात गझलसम्राट दादासाहेब सुरेश भट त्यांना लिहितात की," तुमचे पत्र व गझला मिळाल्या, या पत्रासोबत त्या परत पाठवीत आहे. सावध राहिला आणि थांबायची तयारी असेल तरच तुम्हाला गझल वश होऊ शकेल." 'सहज, जसे बोलतो तसे लिहावे, स्पष्ट लिहावे, वाटते व जाणवते तेच लिहावे, 'यमक' वापरता यावेत म्हणून लिहू नयेत, शब्दांच्या मोहात पडू नये, उसने अवसान नसावे, केवळ form उपयोगाचा नसतो spirit हवे," आणि मंडळी दादासाहेब सुरेश भट यांचा हा सल्ला डॉ. संतोष कुलकर्णी यांनी त्यांची "आज्ञा" समजून पाळला देखील. अर्थात याच पत्रात दादासाहेब पुढे असेही लिहितात की, " कुणीही संपूर्ण नाही, मी गेली अडतीस वर्षे मराठीत गझल लिहित आहे, पण अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मला कळायच्या आहेत ......!"
रसिक हो, हा सल्ला दादासाहेब सुरेश भट साहेबांनी पत्र पाठवून गझलकार डॉ. संतोष कुलकर्णी यांना दिलेला असला तरी तो 'विजा घेऊन येणा-या पिढीतील' सगळ्यांनीच समजून घ्यायला पाहिजे व त्याप्रमाणे वागले तरच गझल क्षेत्रात लेखन करणा-या या नवीन पिढीवर दादासाहेब सुरेश भट यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरु शकेल असे वाटते.
आपले वडील व कर्तव्यदक्ष शिक्षण अधिकारी श्री सुधाकरराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या 'सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान' मार्फत ग्रामीण भागात शिक्षण व जनजागृती क्षेत्रात काम करणा-या संस्थेची उभारणी संतोष कुलकर्णी यांनी केली असून तिचे संस्थापक सचिव म्हणून ते काम करतात. तसेच याच संस्थे मार्फत 'गझलमाला' या उपक्रमाव्दारे गझलमैफील, गझल स्पर्धांचे आयोजन व मराठी गझले संदर्भात वातावरण निर्मितीचा सातत्याने प्रयत्न करणारे डाॅ संतोष कुलकर्णी 'मराठी गझल समिधा' या नावाचा महाराष्ट्रातील नव्या व जुन्या गझलकारांच्या गझलांचा डिजिटल अंक गेल्या पाच वर्षांपासून प्रकाशित करत आहेत. तसेच ते 'गझल मंथन साहित्य समूहाच्या मार्गदर्शक समितीवर एक सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
आणि म्हणूनच "जगावे तसे लिहावे" हा आदर्श मानणा-या प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी यांना जिथे "मौनात एकट्याशी" जगण्यात तसेच दंग होण्यात आनंद वाटतो तिथेच ....
आसवे तुझी मुकाट आवरुन घे,
चेह-यावरी फुलेच पांघरुन घे ....
दाटला फुलाफुलात गंध येथल्या,
बाव-या मनातही जरा भरून घे ....
राहिलेच रे कितीक राहणे तुझे,
तेवढेच माणसात वावरुन घे ....
असेही ते स्वत:ला समजावून सांगताना, बजावतांना दिसून येतात.
'लोकमत ललित लेखन पुरस्कार', 'महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण विभागाचा गीत लेखन पुरस्कार', 'दै. लोकमत देशभक्तीपर गीत लेखन पुरस्कार व यासारखे अनेक पुरस्कार मिळवणारे प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी मात्र ...
शिक्षा सुनावण्याची केली उगीच घाई,
ऐकून घेतली ना त्याची कुणी सफाई ...
पूर्वी लिहित होतो अश्रूत चिंब गाणी,
आता न कोणतीही माझ्या उरात शाई ...
अशी खंतही व्यक्त करतात, आपले दु:ख मांडून जातांना दिसतात.
अशा या गझलकार डॉ. संतोष कुलकर्णी यांची आणि माझी ओळख छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), येथे गझलेचे अभ्यासक, ज्येष्ठ गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी " मराठवाडा गझल मंच " व्दारा आजोजित एका मुशाय-याचे वेळी झाली. बाहेरगावाहून आलेल्या गझलकारांचे स्वागत करण्याचे वेळी त्यांनी त्यांना मिळालेला हा मान प्रथम मला दिला कारण मी धुळे येथून म्हणजेच खानदेशातून हजर राहिलो होतो तर ते उदगीर येथून म्हणजेच मराठवाड्यातूनच हजर राहिलेले होते, तसेच मुशाय-यासाठी आलेले इतर गझलकार हे स्थानिकच होते किंवा औरंगाबादच्या जवळपासचेच होते.
"ज्या सौम्य, मध्यमवर्गीय जीवन शैलीने मी अपरिहार्यपणे जगतो आहे, त्या शैलीचे अगदी त्या अपरिहार्यतेसकटचे प्रतिबिंब माझ्या कवितेत, गझलेतही उमटत असावे" असे प्रांजळपणे सांगणारा हा 'शांत' स्वभावाचा गझलकार लवकरच " (अ)शांत ओळी " नावाचा गझल संग्रह प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या या आगामी संग्रहासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत....!
संग्रहाचे नाव : मौनात एकट्याशी
मुखपृष्ठ : शशिकांत डोंगरे
प्रकाशक : स्वयम् प्रकाशन, उदगीर
किंमत : रु. १२०/=
दिवाकर चौकेकर,
गांधीनगर (गुजरात)
0 Comments