🌹पुस्तक परिचय 🌹
🌹माणुसकीचा ठाव शोधणाऱ्या गझला: अविनाशपासष्टी🌹
गेल्या चार दशकांहून अधिक काळ गझलेचं चिंतन, गझलेची साधना, गझलेची सेवा करणारे अविनाश सांगोलेकर याचं तब्बल बेचाळीस नंतर 'अविनाशपासष्टी' हा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झालाय्. गझलेच्या प्रांतात अविनाश सांगोलेकर यांची गझल समीक्षक, अभ्यासक म्हणून ठळक ओळख आहे. प्रारंभीच्या काळात प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या संपादनात मौलिक योगदान देणारे सांगोलेकर हे तंत्रशुद्ध गझल लिहिणारे गझलकारही आहेत. गझल संमेलन, मुशायरा, कार्यशाळा, चर्चासत्र गझल संबंधीच्या अनेक कार्यक्रमातून मार्गदर्शनाबरोबरच ते गझल वेचत, वाचत आलेत.
त्यांनी खूप उशिरा गझलसंग्रह काढलाय्. असं अनेकांना वाटतं. काही चांगलं घडायचं असेल तर त्यासाठी काही कालावधी जावा लागतो. 'ताजमहल' काय एका दिवसात उभं राहिलं नाही. लिहिणाऱ्यांकडंही संयम असावा लागतो. थांबण्याची तयारी असावी लागते. उत्तमोत्तम शेर लिहिण्यासाठी दीर्घ काळ थांबावं लागतं. गझल हा घाईगडबडीत लिहिण्याचा प्रकार नाही. असला प्रकार गझलेनं कधीच खपवून घेतलेला नाही. एकेक शेर अंतरात खोलवर रूजावा लागतो. त्याला सर्वार्थानं परिपक्वता यावी लागते. पोकळ शब्दांच्या फुलोऱ्यानं गझलेचा प्रदेशात पादाक्रांत नाही करता येत. अशी चलाखी केली तरी तो गझलेचा प्रवास होऊ नाही शकत. नुसती पायपीट ठरते. आशयाची मंझील नाही गवसत. गझलेचे अभ्यासक म्हणून सांगलेकर यांना याची पूर्ण जाणीव असणारच. यात शंका नाही.
त्यांनी गझलसंग्रह छापण्याची अजिबात घाई गडबड केलेली नाही. आजकालच्या शीघ्र गझलकारांच्या भाऊगर्दीत ही बाब महत्त्वाची आहे. स्वागतार्ह आहे. गझल लिहिणारा हा ताकतीचा कवी असावाच लागतो. तसंच त्याला गझल आकृतिबंधाची, शुद्ध तंत्राची सांगोपांग माहितीही असावी लागते. कारण हा काव्यप्रकार वृत्तांनी, नियमांनी बांधलेला आहे. त्याचे कडक निर्बंध काटेकोरपणे पाळूनच गझल लिहावी लागते. गझलेत तांत्रिक कारागिरी बरोबरच अर्थभावही अत्यंत जरुरीचा असतो. या दोन्हींची यथायोग्य सांगड घालता आली की शेर दाद घेतल्याशिवाय नाही राहात. अविनाश सांगोलेकर याच्याकडं गझलेच्या सर्वांगीण तंत्राची माहिती अन् प्रतिभा या दोन्ही बाबी आहेत. याची प्रचिती त्यांचा प्रस्तुत गझलसंग्रह वाचताना येते.
गझलसम्राट सुरेश भट नेहमी म्हणत असत की, गझल 'करियर' साठी लिहायची नसते. सांगोलेकर यांनी ती गोष्ट पक्की ध्यानात ठेवलेली दिसते. ही चांगली गोष्ट आहे. 'मला गझलकार म्हणून करियर करण्याची असोशी नसल्यानं शिक्षकीपेशातून जसा वेळ मिळेल तसं मी लिहीत राहिलो'. अशी त्यांनी मनोगतातून प्रांजळ कबुली दिलीय्. त्यांना प्रसिद्धीचा सोस नाही. मोजक्या दिवाळी अंकातून, दैनिकांच्या रविवार पुरवण्यांमधून त्यांच्या काही गझला वाचण्यात येत होत्या. आता त्यांचा संपूर्ण गझलसंग्रहच रसिकांना वाचायला मिळतोय. ही आनंददायी बाब आहे.
अविनाश सांगोलेकर यांच्या बहुतांशी गझलांना आत्मभानाबरोबरच समाजचिंतनाची डूब आहे. पानं फुलं, चंद्र तारे या कविकल्पनेच्या गझला लिहिण्यापेक्षा समाजचिंतनाची वास्तववादी गझल लिहिणं ते अधिक पसंत करतात. आजूबाजूला जे घडतं, डोळ्यांना जे चित्र दिसतं. जे आतून अस्वस्थ करतं तेच चित्रण त्यांच्या गझलांमधून येत राहतं. संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्य, बंधुता, समता या आत्यंतिक गरजेच्या मूल्यांवर त्यांचे अधिकाधिक शेर येतात. परिवर्तन अन् प्रबोधनाच्या वळणानं जाणाऱ्या त्यांच्या बऱ्याचशा गझला आहेत. निव्वळ पाना-फुलात रमामाण होणारा त्यांचा पिंड नाही. 'फुल मजला एकही माहीत नाही' असा ते स्पष्ट निर्वाळा देतात. माणूस अन् त्याचं जगणं महत्त्वाचं आहे. पण माणूसच माणसाला छळतो आहे, पिळतो आहे. गटातटानं माणसात फूट पडलीय्. एकात्मता लोप पावत चाललीय्. 'सारा समाज हल्ली एकात्म आढळेना' यांची गझलकारस खंत वाटते. माणुसकीचा स्त्रोत काळजात झिरपावा. आजच्या घडीला माणसाला तोडणं नाही तर जोडणं अगत्याचं आहे. 'माणसाने माणसाला एकात्मभावाने जोडणारे गीत गावे' असं त्यांचं कळकळीचं सांगणं आहे.
राजकारण हा सर्वव्यापी विषय आहे. यावर मार्मिक टिप्पणी करणारे अनेक शेर सांगोलेकर यांनी लिहिलेत. आज-काल राजकारणाची व्याख्याच पार बदलून गेलीय्. त्यातलं समाजकारण हद्दपार झालंय्. सगळीकडंच राजकारण सुरू आहे. या क्षेत्राला गैरव्यवहाराची, अनाचाराची अधिक लागण झाल्याचं दिसून येतं. आश्वासन सोडलं तर राजकारणात कोणतीच गोष्ट निश्चित नाही. गोड बोलून जनतेला वारेमाप आश्वासनं देऊन झुलवत ठेवण्यात नेते प्रख्यात आहेत. सारं काही लोकांना कळण्याच्या पलीकडं गेलंय्. वाह्यात राजकारण हीच लोकशाहीची शोकांतिका ठरतेय. या वस्तुस्थितीकडं ते लक्ष वेधतात.
बोलून गोड सारे, कापायचा गळा हो
नाही कळायचे हे प्रख्यात राजकारण
समाजाची बधिरता वाढविणारे वाद राजकारणात झडत असतात. ऊठसूट वाचाळवीर काहीबाही बरळत राहतात. अन् वादाचे पूर वाहत असतात. समाजाला विचलित करणं, बधीर करणं हाच त्यामागील डाव असतो. जनतेनं हा कावा समजून घ्यायला हवा. अशी गझलकाराची माफक अपेक्षा आहे.
सारा समाज आता, झाला बधीर आहे
जो तो परंतु येथे वाचाळवीर आहे
सांगोलेकर यांच्या अनेक शेरांमधून विद्रोहाचा स्वाभाविक सूर उमटतो. पण त्यात उरबडवेपणा नाही. जे काही सांगायचं आहे ते थेटपणे, निर्भीडपणे सांगतात. त्यात मोहकतेपेक्षा दाहकताच अधिक असणार हे गृहीतच आहे. सभोवताली भयावह काळोख माजल्यानंतर केवळ वाती पेटवून चालणार नाही तर हाती मशालीच घ्याव्या लागणार हे सांगायलाही ते विसरत नाहीत. व्यवस्थेला साधी सरळ भाषा कळत नसेल तर शेवटी बंड अपरिहार्य ठरतं. तेजाळणारी माणसं शोधावीच लागणार तरच समाजमन प्रकाशमान होईल असं गझलकारास वाटतं.
ठेवून दूर वाती
घेऊ मशाल हाती
पूर्वी राज्यकर्त्यांवर चळवळींचा धाक होता. सामान्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले जायचे. परंतु आजच्या संक्रमणाच्या काळात चळवळीतील मलईखाऊ नेत्यांनी चळवळीची वाट लावली. बुलंद नारे विरून गेलेत. चळवळीतला अस्सलपणा लोप पावला. लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या चळवळींना मरगळ आली. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. ती चळवळीतल्या जुन्या-जाणत्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ऐकावी, यासाठी सांगोलेकर प्रश्न उपस्थित करतात.
कुठे लोपली अस्सल चळवळ
ऐकू येते केवळ खळखळ
आसवं ढाळत बसण्याची ही वेळ नाही. वाढत चाललेल्या अनाचाराचा, अत्याचाराचा नायनाट करून रोगजर्जर झालेल्या लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मरगळ झटकून नव्यानं चळवळ उभारण्याची खरी निकड आहे. नव्या चळवळीत प्रत्येकानं सामील व्हावं असं आवाहनही सांगोलेकर करतात.
झटकून आता सारी मरगळ
चला उभारू नवीन चळवळ
शिक्षक हाच विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांना देशाचा सुजाण नागरिक बनवतो. नीतिमूल्यांचा तो रक्षक असतो. ज्ञानप्रकाशाची वाट दाखवणारा वाटाड्या असतो. त्याला कमी लेखू नका. त्याच्याप्रति आदरभाव असायलाच हवा. ते शिक्षकाची भूमिका मांडतात.
नकात समजू नगण्य शिक्षक
मूल्यांचे तर ते तटरक्षक
कोरोना सारख्या जीवघेण्या वैश्विक महामारीवरही त्यांनी गझला लिहिल्यात. अविनाश सांगोलेकर हे नितळ माणुसकीनं झपाटलेले गझलकार आहेत. वास्तवतेचा स्पर्श असलेला कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाही. ते जगाकडं केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहात नाहीत. ते बुरसटलेल्या विचारांचा रोखठोक निषेध करतात, अंधश्रद्धेवर प्रहार करतात. दुर्जनांचा धिक्कार करतात तर सज्जनांचं कौतुकही करतात. स्त्रीसन्मान, सभ्यता, संस्कृती, मांगल्य चांगल्या म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं मनःपूत स्वागत करतात. 'संतुलनाची कास धरू या' अशी त्यांची हाक आहे.
म. ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांवर गझला लिहून त्यांच्या विषयीची त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय्. तसंच सध्या होत चाललेल्या भीषण अध:पतनाची कैफियतही त्यांच्या समोर मांडलीय्.
वंचितांना काळजी ना
नष्ट केला त्रास भीमा!
येत नाही का कुणाला वास बापू?
देश फिरुनी होत आहे दास बापू!
माणुसकीचा ठाव शोधणाऱ्या या गझलसंग्रहाचं रसिक स्वागत करतील असे वाटते.
अविनाशपासष्टी: गझलसंग्रह
गझलकार: अविनाश सांगोलेकर
ग्रंथाली प्रकाशन: मुंबई
पृष्ठे:९६ मूल्य:१००₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी ९८९०१७१७०३
sabirsolapuri@gmail.com


0 Comments