🌹पुस्तक परिचय 🌹
🌹नव्या कवींसाठी दीपस्तंभ🌹
अलीकडच्या काळात कवितेतील छंदोबद्धता, वृत्तबद्धता लोप पावत चालली आहे. मुक्तछंदाच्या म्हणजेच ‘मॉर्डन पोएट्री’च्या नावाखाली आज विपुल प्रमाणात कविता लिहिल्या जात आहेत. उभे लिहिण्यापेक्षा आडवे लिहिले की झाली कविता असा अनेकांचा गोड गैरसमज आहे. निबंधाला कविता म्हणता येत नाही. अशा कविता म्हणजे रस ना चोथा असाच प्रकार असतो. या कारणानेच रसिक कवितेकडे पाठ फिरवतो. गझलेच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. गझलेचे तंत्र आणि मंत्र नीटसे समजून न घेताच काहीजण गझल लिहिण्याचा अट्टाहास करताना दिसून येतात. अशा प्रकारच्या गझला फसल्याशिवाय राहत नाहीत. ना त्या तंत्रशुद्ध असतात ना त्यात आशय असतो.
नव्याने व्यक्त होणाऱ्या कवींनी सर्वप्रथम वृत्तबद्ध कवितेचे शास्त्र मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. जुन्या जाणकार कवींनी लिहिलेल्या वृत्तबद्ध कवितांमधील रस, गंध आणि अर्थपूर्ण शब्दरचनांचा बारकाईने अभ्यास करावा. वेगवेगळ्या काव्य प्रकारांचा म्हणजे ओवी, अभंग, षष्ठाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी, बाराक्षरी आदी काव्य प्रकार कसोशीने जाणून घ्यावेत. नुसत्यास यमकाला यमक जोडल्याने कविता साकार होत नाही. तसेच नवोदित गझलकारांनी गझलेच्या बाराखडीसह तिच्या आकृतिबंधाचा रदीफ, काफियांचा तांत्रिकदृष्ट्या विचार करावा. गझलेच्या निरनिराळ्या वृत्तांची, छंदांची पुरेपूर माहिती आत्मसात करावी, आणि खरीखुरी तंत्रशुद्ध गझल लिहावी. आपल्या प्रतिभेला खऱ्या अर्थाने निखार आणावा. या व्यापक उद्देशाने डोंबिवलीचे प्रतिभासंपन्न कवी, गीतकार, गझलकार विजय जोशी उर्फ ‘विजो’ यांचा ‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ हा मौलिक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. विजोचे या अगोदर ओंजळ, मनतरंग, अंत:स्थ मनात आणि अंतरंगाचे तरंग हे चार बहुचर्चित कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र) हा ग्रंथ अतिशय वेगळा, उपयुक्त असा संदर्भग्रंथ आहे. ‘विजो’ची ही फार मोठी उपलब्धी आहे.
लांबलचक मुक्तछंदाच्या कवितेतल्या काही ओळी सुद्धा धड रसिकांच्या स्मरणात राहत नाहीत. या उलट जुन्या जाणत्या कवींच्या कविता आजही कित्येकांना मुखोद्गत आहेत. हा छंदाचा, वृत्ताचा, आशयाचा इष्ट परिणाम असतो. कवितेतून कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त होणे अभिप्रेत आहे. तहान लागलेल्या माणसाला एवढेच पाणी द्यावी की, त्याची तहान भागेल, तरच त्या पाण्याचे महत्व उच्चतम असते. खूप कमी वा खूप जास्त पाणी दिले तर उच्चतम समाधान मिळणार नाही. तसेच कवितेचेही आहे. याची खूणगाठ नवोदित कवींनी मनाशी बांधली पाहिजे. याकरिता ‘विजो’नी वेगवेगळ्या वृत्तात लिहिलेल्या कवितांची उदाहरणेही या ग्रंथात दिलेली आहेत. ती नवोदिकांनी जरूर अभ्यासण्यासारखी आहेत. यातून कोणता काव्यप्रकार कशा तऱ्हेने लिहावा, हे सहजतेने लक्षात येते.
कवितेच्या तुलनेत गझल हा काहीसा अवघड काव्य प्रकार आहे. तो कष्टाने, चिकाटीने, सततच्या प्रयत्नाने, सरावाने साध्य होऊ शकतो. अभिव्यक्तीच्या प्रकटीकरणासाठी गझल हा एक सशक्त काव्य प्रकार आहे. गझल लिहिणारी व्यक्ती आधी उत्तम कवी असली पाहिजे. आणि तिला कोणत्याही वृत्तात बिनचूक लिहिता आले पाहिजे. हे गझल शिकू इच्छिणाऱ्या कवींनी आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. यमक (काफिया) अंत्ययमक (रदीफ) आणि अलामत सांभाळत एकाच वृत्तामधील दोन-दोन ओळींच्या कमीत कमी पाच किंवा जास्तीत जास्त शेरांची वृत्तबद्ध बांधणी म्हणजे गझल होय. गझलेत वृत्त (बहर) यमक (काफिया) अंत्ययमक (रदीफ) अलामत शेर या घटकांमुळे गझलेचा आकृतिबंध (जमीन) निश्चित होतो. ‘विजो’नी वेगवेगळ्या वृत्तामधील स्वरचित गझला देऊन गझलेमधील अन्य संकल्पना ही स्पष्ट केल्या आहेत. गझल तंत्राच्या अनुषंगाने देण्यात आलेली ही ठळक माहितीसुद्धा नवोदिकांसाठी दीपस्तंभ ठरणारी आहे.
नव्या दमाच्या कवींनी काव्य लेखनाचा सर्वांगीण अभ्यास कशा पद्धतीने करावा, काळाच्या ओघातही टिकून राहणारी वृत्तातली कविता कशी लिहावी. प्रतिभेला आव्हान देणारा गझल हा काव्यप्रकार त्याच्या बारकाव्यानिशी सफाईदारपणे कसा आविष्कृत करावा, याचे तंत्र आणि मंत्र काय आहे. याचे ज्ञान आणि भान देणारा, हातचे काहीच राखून न ठेवता, नवोदितांना भरभरून मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाने वाटाड्यांची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली आहे. ज्याला उत्तम कवी वा गझलकार व्हायचे असेल अशा प्रत्येकाने हा ग्रंथ वाचावा. संग्रहित ठेवावा. इतका हा मौल्यवान ग्रंथ आहे. हा कविता आणि गझल शिकण्याचा मामला असल्याने कुठे गडबड होणार नाही. शंकेला वाव मिळणार नाही, याची लेखकाने जागरूकतेने काळजी घेतली आहे. नवोदितांना याचे व्यवस्थितपणे आकलन व्हावे याकरिता प्रस्तुत ग्रंथाची मांडणी सुलभपणे, सुटसुटीत पणे करण्यात आली आहे. हा ग्रंथ म्हणजे कविता आणि गझलेवरील ‘विजो’चे आत्मीय प्रेम, अपार मेहनत आणि त्यांच्या विशाल, निर्मळ मनाची साक्ष देणारा आहे.
या ग्रंथात ३१ प्रकरणे असून त्यात प्रामुख्याने कविता आणि कविताचा अभ्यास, मात्रा म्हणजे काय, त्या कशा मोजाव्यात, जोडाक्षरापूर्वीचे लघु अक्षरांचे स्पष्टीकरण, वृत्तविषयक संकल्पना, ओळींच्या मांडणी प्रमाणे वृत्तबद्ध कवितेचे प्रकार, वृत्तात लिहिताना घ्यावयाची काळजी, मात्रा वृत्तातील सराव प्रश्न आणि त्याची तक्त्यासह महत्त्वाची उदाहरणेही देण्यात आली आहेत. त्याचबरोबरीने अक्षरछंद, अक्षरगण वृत्त, गझल तंत्र आणि गझले संबंधीचे मुद्दे विशद करण्यात आले आहेत. कवितेमध्ये विरामचिन्हे आणि इतर चिन्हांचा अचूक वापर कसा करावा हे समजून सांगण्यात आले आहे. मुक्तछंद काव्यरचनेवरही प्रकाशझोत टाकण्यात आले आहे. कविता आणि गझलेचे सादरीकरण कसे करावे याचे काही हातखंडे सांगण्यात आले आहेत. कविता आणि गझलेचा सोशल मीडियावर कसा वापर करावा याच्या यथोचित सूचना देण्यात आल्या आहेत. कवीने स्वतःला कसे विकसित करावे, ‘अपडेट’ ठेवावे, या संबंधाचे अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. सरतेशेवटी काही दुर्लभ आणि प्रचलित वृत्तांची यादीही देण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व प्रकरणे नुसतीच मांडण्यात आलेली नाहीत तर त्या त्या प्रकरणासोबत ‘विजो’ने अभ्यासपूर्ण संशोधनात्मक, प्रबंधनात्मक स्वतंत्र निवेदनही केले आहे. हे निवेदन प्रासादिक भाषा शैलीत आहे. त्यामुळे नवा कवींना, वाचकांना कोणतेही प्रकरण कठीण व बोजड वाटत नाही. कोणतेही प्रकरण समजून घेण्यात अडचण येत नाही. उलटपक्षी वाचक त्याचा आस्वाद घेत हा ग्रंथ वाचत राहतात. वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र या अनोख्या ग्रंथाचा महाविद्यालयीन स्तरापासूनच प्रसार आणि प्रचार व्हायला हवा. याकरिता सदर ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास विद्यार्थ्यांना वृत्तबद्ध कविता ते गझल या विषयाची गोडी निर्माण होईल. यातूनच उद्याचे उद्याचे सक्षम, परिपूर्ण कवी, गझलकार घडणार आहेत. शासनाने याचा जरूर विचार करावा. असे वाटल्याखेरीज राहत नाही.
वृत्तबद्ध कविता ते गझल: माहितीपर ग्रंथ
लेखक: विजय जोशी उर्फ (विजो)
अथर्व प्रकाशन, डोंबिवली
पृष्ठे: १०४ मूल्य: २००₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३


0 Comments