🌹‘दिवसांची पाने’ उलटताना…🌹
आयुष्याच्या पुस्तकातील ‘दिवसांची पाने’ फार महत्त्वाची असतात. दिवसांची ही पाने आपण उलटत जातो तसे आयुष्य पुढे सरकत जाते. दिवस हे जिंदगीच्या किनाऱ्यावर चमचमणारे जणू मोतीच असतात. प्रत्येक मोसमाचे, घटनांचे दिवस ठराविक असतात. गेलेला दिवस पुन्हा परत मिळवता येत नाही, की येणारा दिवस टाळता येत नाही. म्हणूनच दिवसांचे मोठे मोल आहे. हरेक दिवस माणसाला अढळ आहे. माणूस दिवसांच्या परिघात जगतो आणि दिवसाच्या परीघाताचच मरतो. दिवसा इतके सुंदर आणि कुरूप कुणीही असू शकत नाही याचा प्रत्यय गझलकारा सुनीति लिमये यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘दिवसांची पाने’ हा गझलसंग्रह वाचताना पानोपानी येत राहतो.
‘दिवसांची पाने’ उलटताना भवती कोलाहल दाटला तरी गीतेची गीताई होते. पापणीच्या आत पानवठ्याला दुःख होते. मोडके घरटे पाहायला कुणीच फिरकत नाही. दिव्या मागून येते काजळी अंधाराचे चित्र काढते, चांदणे देहभर पसरू देची साद येते. अशी कितीतरी शब्दचित्रे गझलेतून साकार होत जातात. माणसाचे आयुष्य एका रेषेसारखे सरळ कधीच नसते. त्यात चढ-उतार असतात, खाच खळगे असतात. माणसाचे मन सुख दुःख, प्रेम-विरह, आनंद नैराश्य, शीतलता, दाहकता, सफलता, विफलता अशा व्यमिश्र भावभावनांची ओतप्रोत भरलेले असते. या वेगवेगळ्या भावना जेव्हा शेरांमधून उमटतात. तेव्हा त्याची गझल बनते. ती रसिक मनाला भुरळ घालते. अशा प्रकारच्या कितीतरी विविधांगी गझला सुनीति लिमये ताई यांच्या ‘दिवसांची पाने’ मधून वाचताना भेटतात.
दिवसाचे उगवणे, रात्रीचे ढळणे हे कालचक्र अनादी काळापासून अव्याहतपणे सुरूच आहे. नभाचे पंख लेवून दिवस चिमटीत धरता धरता कधी एकदाचे निसटून जातात, काही समजत नाही. ‘दिवसांची पाने’ उलटताना माथ्यावरून नभ सरकत जाते. कित्येकवेळा दिवसाचे रंग मात्र मनाला लागतात. आणि आपण पुढच्या अनेक सुंदर दिवसांच्या आशेवर जगत राहतो. दिवस माणसाला झुरवतात आणि फुलवतातही. दिवस हसवतात, रडवतात. दिवस भुलवतात आणि झुलवतात. दिवस जगणे शिकवतात. दिवसाचे अदृश्य धागे माणसाला कठपुतळ्यासारखे वागवतात. तसेच आपण जगत राहतो. ‘दिवसांची पाने’ उलटताना अंतर्मनात काय काय दाटत राहते, वाटत राहते, याची हळवी मांडणी लिमये ताई यांच्या शेरातून पाहावयास मिळते.
दिवसांची पाने उलटत जाते कितीदा
नभ माझ्यावरुनी सरकत जाते कितीदा
रस्ता माणसांच्या पावलांबरोबर वाहनांचा भार देखील वाहक राहतो. रस्ता सोशीक असतो. तो कधी तक्रार करत नाही. रस्ता माणसाच्या पावलाखाली आपले अस्तित्व पूर्णपणे झोकून देतो. रस्ता त्रासून गेला तरी त्रागा करत नाही. त्याच्या वेदना तो कुणालाच दिसू देत नाही. त्याचे कण्हणे कोणाला ऐकू येऊ नये म्हणून तो मध्यरात्री कण्हतो. रस्ता वेगाने पळतो. प्रवाशांना मार्ग दाखवतो लिमयेताई यांनी रस्त्याच्या वेदनेला त्यांच्या शेरातून बोलके केले आहे.
दिवसभर वेगात पळतो एक रस्ता
वेदनांनी रोज कण्हतो मध्यरात्री
इथून तिथून माणसे अहंभाव बाळगून तोऱ्यात मिरवत असतात. ‘मी’पणाला, मालकीपणाचा भाव सदैव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. तो घरावर, पाण्यावर, हवेवरही मालकी सांगू लागतो. जगातली प्रत्येक गोष्ट त्याला मालकी स्वरूपात हवी असते. हा त्याचा अप्पलपोटीपणा कधीच भरणारा नसतो. इथे शाश्वत काहीच नसते. माणसाची श्वासावर तरी कुठे मालकी असते. त्याचे जगणे क्षणभंगूर आहे याची त्याला बऱ्याच वेळा जाणीव होत नाही. तो मालकाच्या भूमिकेत ताठरपणाने जगण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या घरावर तो मालकी सांगतो तो उंबरातरी त्या घराच्या ओळखीचा असतो का? माणसाच्या स्वार्थीपणावर. मगरूरपणावर प्रकाशझोत टाकणारा एक नितांत सुंदर आशयघन शेर लिमयेताई लिहितात.
प्रश्न आहे ‘तो’ कुणाच्या मालकीच्या
उंबरा नाही घराच्या ओळखीचा
आधुनिक युगात माणसाला हवी ती भौतिक सुखसाधने सहजतेने उपलब्ध झाली. मुक्त संवादासाठी मोबाईल आला, मनोरंजनासाठी टीव्ही आला. पण माणूस आज कुणाशी किती मोकळेपणाने बोलतो. संवादाच्या जमान्यात संवादच हरवत चालला आहे. जगण्याभवती गर्दी दाटलेली आहे. तरी माणूस एकटा फिरतो आहे. तो दिवसेंदिवस एकलकोंडा बनत चालला आहे. आपल्याच कोषात तो स्वतःला बंद करत आहे. मग त्याला मोकळेपणा कसा प्राप्त होईल, माणूस एकारलेपणाचा शिकार होऊ लागला आहे. एकटेपणा ही त्याच्यासाठी समस्या बनत आहे. या धोकादायक परिस्थितीकडे गझलकारा हा लक्ष वेधतात.
भोवती एवढी माणसे
केवढी एकटी माणसे
एक एकटे फिरतो आपण
स्वतःपासुनी पळतो आपण
सुनीति लिमये यांनी मानवी मनातील अनेक कंगोरे सामाजिक जाणिवेसह अनेक गझलांमधून प्रभावीपणे टिपले आहेत. तसेच स्त्रीजाणिवेच्या गझलांमधून त्यांनी स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे. परिस्थिती कशीही असली, प्रसंग कोणताही असला तरी असंख्य दुःखे अंतरात घेऊन बाई निर्धाराने जगत असते. पापण्याच्या आड लपलेल्या आसवांनी तिची घालमेल सुरू असते. ती दिवसागणित पिचत जाते. तिच्या जिण्याला लक्तराचे रूप येते परंतु तिचे हे लक्तराचे जिणे कुणालाच दिसत नाही. तिचा अंतर्नाद कुणालाच ऐकू येत नाही. तिच्या भावविश्वाबद्दल इच्छा-अभिलाषा याबद्दल कुणी बोलत नाही. दुःख गाठिला बांधून मुकेपणाने जगणाऱ्या बाईचे यथार्थ वर्णन या शेरांमधून येते.
जिणे तुझे, हे लक्तर लक्तर कुणास कळते बाई
युद्ध असो की असो शांतता सदैव पिचते बाई
चूल मांडते, दुःख परतते
आयुष्याचे सरपण करते
स्त्रियांमध्ये काळानुरूप बदलण्याची शक्ती असते. सक्षमता हा तिचा स्थायीभाव आहे. हे खरे! परंतु तिला तिचेही आयुष्य आहे. तिलाही स्वतंत्रपणे भरारी घेता येते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. तिच्या कर्तृत्वाचे उदात्तीकरण करून तिच्यावर नाना तऱ्हेच्या जबाबदाऱ्याचे ओझे लादून तिला घरातच जेरबंद करण्यात येते. धर्माच्या बंधनाची भीती घालण्यात येते. त्यामुळे एकाच वेळी तिला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. घराची आणि नात्यांची सारी जबाबदारी तिला पार पडावी लागते. यावर व्यवस्थेला अंतर्मुख करणारा प्रश्न लिमये ताई विचारतात.
कधी बाप होते, कधी माय ती
तिच्यातील स्त्रीने कुठे जायचे?
लिमये ताई यांच्या गझलांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. सामाजिक जाणिवेबरोबरच त्यांनी प्रीतीच्या नाजूक हळुवार गझलाही लिहिल्या आहेत. सहज साध्या सोप्या शब्दात त्या व्यक्त होतात. अनुभवांना शांत संयतपणे मांडणारी त्यांच्या अभिव्यक्तीची शैली आहे. त्यात कुठेही आक्रमकता किंवा विद्रोहाचा सूर उमटत नाही.
दिवसांची पाने: गझलसंग्रह
गझलकारा: सुनीति लिमये
स्वयं प्रकाशन, पुणे
पृष्ठे: ११९ मूल्य: २००₹
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
भ्रमणध्वनी: ९८९०१७१७०३


0 Comments