🌹 अध्यक्षीय मनोगत 🌹
🌹गझल, गझलीयत, जिव्हाळा... पन्हाळ्यातील ८ डिसेंबरचा गझल सोहळा🌹
ओल्या पापण्यांखाली आपण एखादं तरल स्वप्न पहावं. लौकिकापासून दूर असलेलं...गझलेचं एक बेट चहुबाजुनी धुक्याने वेढलेलं असावं,पानाफुलांनी सजलेलं असावं.गंधाने भारलेलं, दवाने माळलेलं असावं.दऱ्या, डोंगर यांच्या कुशीत पक्षांचा किलबिलाट ऐकत,काळाचा कानोसा घेत ते... शांत पहुडलेलं असावं.वाटा धूसर दिसाव्यात सूर्य कोवळा अन् परिसर हळवा!! अशा भारावलेल्या जगी एकेका गझलकाराचचं आगमन व्हावं, त्याच्या गझलेचं अवगुंठण हलकेच दूर व्हावं...शब्द आणि निसर्ग तदाकार व्हावा अन् व्हावी बरसात शेरांची, खयालांची. त्यात वाहत जाऊन आपणही अनुभवावी पुन्हा पुन्हा गझलेची अतृप्त तृप्ती....,!!
हे स्वप्न जणू ८ डिसेंबरला सत्यात उतरलं आणि ओल्या पापणीखालच्या डोळ्यांचं तळं झालं.जरासा धक्का लागून ते हेंडकळतय का काय असं दिवसभर वाटत राहिलं.कोल्हापूर विभाग गझलमंथन साहित्य संस्था आयोजित पन्हाळ्यातील गझलसोहळ्यात ही अनुभूती आली अन् भरून पावले.माझ्या 'दिशांतर' या दुसऱ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन अशा स्वप्नसत्याच्या सीमेवर, गझलकार मित्रमैत्रिणींच्या सानिध्यात व्हावं .. ह्याला मी पूर्वजन्मीचे संचित आणि गझलेचा आशीर्वाद मानते.
हॉलमधील अतिशय सुंदर अशी सरस्वतीची मूर्ती पाहून मनात एकाच वेळी भक्ती, शांती, मुक्ती.. असे विविधरंग दाटून आले.तिचे पूजन...दीपप्रज्वलन भाग्याचा क्षण होता.
सूत्रसंचालक आ. महेंद्र कुलकर्णी यांनी शाब्दिक कोट्या करत कार्यक्रमाला सुरवात केली अन् मग दिवस उत्तरोत्तर रंगतच गेला.सूर्याची निघायची वेळ आली तरी आम्ही सर्व गझलकार मंडळी त्या जादूभऱ्या दुनियेतून बाहेर पडायला तयार नव्हतो.
उद्घाटक एजाजभाई शेख यांचे गझलेवरील अतिशय प्रांजळ, विनम्र मनोगत हा गझलकार खरोखरच इतक्या उत्कृष्ट गझल कशा लिहू शकतो.. याचे उत्तर होते. प्रमुख उपस्थिती डॉ. शिवाजी काळे सर यांची उपस्थितीच संमेलनासाठी आश्वासक ठरली जशी ती नेहमीच जाणवते. त्यांचे अल्प मनोगत बरंच काही सांगून गेलं. प्रमुख अतिथी डॉ. राज रणधीर यांचे उत्कृष्ट भाष्य गझलसोहळा रंगवून गेले. आपल्या नर्मविनोदी बोलण्याने त्यांनी माहोल आणखी चैतन्यमय केला. स्वागताध्यक्ष आणि संजीवन संस्थेचे सचिव श्री. एन. आर.भोसले सर यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व संमेलनाला आणखी उंचीवर घेऊन गेले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यस्तरीय गझलसंमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवली.आपली गझल तळमळ गझलकार सोडून इतर कुणीतरी समजून घेतली ही गोष्टच आंतरिक समाधान देऊन गेली.या संमेलन आयोजनात त्यांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानणे अत्यन्त गरजेचे आहे.अध्यक्षपदावरून सर्वांशी गझलसंवाद साधणे इतका अस्सल गझलअनुभव होता की त्यावेळी मी नक्की काय काय बोलले हे आता मलाही आठवत नाही.
या पार्श्वभूमीवर..वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते माझ्या 'दिशांतर' चा प्रकाशन सोहळा...सर्व उपस्थितांनी चिरंतन अविस्मरणीय केला, इतकंच म्हणेन! आ. अभिदांचे, अभिजीत काळे यांचे 'दिशांतर' वरील भाष्य एक उत्कृष्ट गझलभाष्य होते ज्याच्यातून त्यांचे शब्दप्रभूत्व आणि शब्दलालित्य जाणवले.
त्यानंतर झालेल्या चार दर्जेदार मुशायऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व गझलकारांनी खास गझलरंग तयार केला. इर्शाद, मुकर्रर... अशा शब्दांनी मुशायरे अधिकाधिक गहिरे होत गेले.मुशायऱ्यांचे अध्यक्ष आ.प्रसाद कुलकर्णी सर, आ.अभिजीत काळे ,आ.श्रीराम पचींद्रे सर आणि आ.नरहर कुलकर्णी सर यांची मनोगते अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक होती जी मनाला भिडली. आ राज रणधीर, आ.प्रदीप तळेकर, आ.मुग्धा कुळये आणि आ.मनीषा रायजादे यांनी उत्तम सूत्रसंचालन करत मुशायरे उंचीवर नेले, यशस्वी केले.
या संपूर्ण संमेलनात मदत करणारे शाळेतील दोन विध्यार्थी आणि दोन विध्यार्थीनी यांचे कौतुक तर करावे तेवढे थोडे आहे. दिवसभर आपल्या जागेवरून न हलता alert राहून सचिन सरांच्या हाकेला ओ देणारी इतकंच नव्हे तर आम्हाला अगदी भोजनस्थळी सुद्धा घेऊन जाणारी ही मंडळी..त्यांचं भारी कौतुक वाटलं!
भोजनातही
खास कोल्हापुरी पाहुणचार होता.( तांबडा पांढरा रस्सा....)आणि नंतर मसाला पान!!
या सोहळ्यात गझल मंथन संस्थेने मला अध्यक्षपदाचा बहुमान दिला त्याबद्दल त्यांची सदैव स्नेहांकित आहे.
उत्कृष्ट आयोजन, नियोजन, शिस्त,आदरातिथ्य या सर्वच अंगाने एक वस्तुपाठ म्हणून बघता येईल असे हे गझलसंमेलन..!ह्याचे श्रेय एक हाती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन इनामदार सर यांच्याकडे जाते.त्यांचे प्रचंड कौतुक..!!!संमेलन समन्वयक प्रदिपजी तळेकर यांनीही वेळोवेळी मदत केली त्यांचेही विशेष कौतुक.पुणे आणि सांगली जिल्हा कार्यकारिणीचीही खूप मदत झाली त्यांचे मनापासून कौतुक आणि आभार!!
कार्यक्रमाचे खरे सूत्रधार संस्थेचे अध्यक्ष मा.अनिलजी कांबळे,
मा.जयवंतजी वानखडे, मा.देवकुमारजी,मा.उमाताई पाटील, मा. प्रशांतजी रामगिरवार यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार!!
इतर महत्वाच्या सर्व आघाड्या ऑनलाईन सांभाळणारे आणि कायम मदतीचा हात देणारे मा.ॲड.मुकुंदराव जाधव सर आणि आ.भरत माळी सर यांचेही अभिनंदन!
माझ्या प्रेमापोटी, माझ्या शब्दाखातर दूरवरून आलेल्या, गझल मंथन साहित्यसंस्थेच्या विनंतीला मान देऊन आलेल्या उपस्थित असलेल्या आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि कोल्हापूर येथील सर्व गझलकार मित्रमैत्रिणींची,सर्व रसिकांची मी सदैव स्नेहांकित आहे. तुमचा हा लोभ माझ्यासाठी अनमोल आहे..गरजेचा आहे.तो कायम राहू दे .
😊🌹🙏🏻
अजाणतेपणे कुणाचा, कुठला उल्लेख राहिला असला तरी सर्वांप्रती मनात स्नेहभाव आहे 🙏🏼
... या सोहळ्यात चार पाच महिन्यापूर्वीच मला सोडून गेलेल्या वडिलांची सोबत सदैव जाणवत होती... याला काय म्हणू??
मी एकमेव भारी मुलगी जगात होते
होते वडील माझे जोवर हयात होते
... डॉ. स्नेहल कुलकर्णी


0 Comments