Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझलकारांच्या नजरेतून पन्हाळा संमेलन Kolhapur Gazal Sammelan

 ● संमेलन विशेष ●


🌹गझलकारांच्या नजरेतून पन्हाळा संमेलन🌹 


    गझल मंथन साहित्य संस्थेचे कोल्हापूर विभागीय एक दिवसीय गझल संमेलन रविवारी पन्हाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गझलकारा स्नेहलताई कुलकर्णी होत्या. हे संमेलन अत्यंत यशस्वी ठरले. या संमेलनाला आलेल्या गझलकारांनी संमेलना सोबतच पर्यटनाचाही मनमुराद आनंद लुटला. या संमेलनाविषयी गझलकारांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...


निसर्गरम्य वातावरणात झालेला गझलमय सोहळा....

     गझलमंथन साहित्य संस्था, शाखा कोल्हापूर आयोजित पन्हाळा येथील एक दिवसीय गझल संमेलन अनेक बाबतीत अविस्मरणीय ठरले. 

संनेलनाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे गझलरसिकांसाठी पर्वणीच होती. उद्घाटक एजाजभाई शेख यांचे दिलखुलास मनोगत आणि प्रमुख अतिथी डॉ. राज रणधीर यांचे उत्कृष्ट भाष्य सोहळ्यात रंग भरणारे ठरले. स्वागताध्यक्ष आणि संजीवन संस्थेचे सचिव श्री. भोसले सर यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व संमेलनावर छाप पाडून गेले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यस्तरीय संमेलनाच्या आयोजनाची तयारी दर्शवली तसेच कालच्या आयोजनात त्यांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची रसिकताही यातून दिसून आली. 

     डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या दिशांतर या गझलसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते या संमेलनात प्रकाशन झाले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या संग्रहावर अभिजीत काळे यांनी उत्तम भाष्य केले. प्रकाशनाच्या निमित्ताने स्नेहलजींनी व्यक्त केलेले मनोगत भावूक करणारे होते.

     त्यानंतर झालेल्या सर्व दर्जेदार मुशायऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व गझलकारांनी खास माहोल तयार केला होता. उत्तम आणि योग्य ठिकाणी दिली गेलेली दाद हे कालच्या संमेलनाचे वैशिष्ट्य होते. मुशायऱ्यांचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी सर, अभिदा, श्रीराम पचींद्रे सर आणि नरहर कुलकर्णी सर यांची मनोगते अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक होती. राज रणधीर, प्रदीप तळेकर, मुग्धा कुळये आणि मनीषा रायजादे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. 

    संपूर्ण संमेलनाचा भार एकट्याच्या खांद्यावर पेलून दिवसरात्र राबून संमेलन यशस्वी करणारे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. सचिनजी इनामदार यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मनापासून अभिनंदन सचिनजी ! तसेच स्वतः संमेलनाध्यक्षा असून त्यांना अहोरात्र मदत करणाऱ्या डॉ. स्नेहल कुलकर्णी आणि संमेलन समिती समन्वयक प्रदिपजी तळेकर यांचेही विशेष कौतुक. त्याचप्रमाणे इतर सर्व आघाड्या ऑनलाईन सांभाळणारे अनिलजी, जयवंत सर, देवकुमारजी, मुकुंदराव आणि भरत माळी सर यांचेही अभिनंदन.

     गझल मंथनच्या पुणे आणि सांगली कार्यकारिणीचीही सचिनजींना खूप मदत झाली .

     काल दिवसभर न कंटाळता मदत करण्यासाठी थांबलेल्या संजीवन शाळेतील छोट्या दोस्तांचे विशेष आभार.

     तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन करणारे श्री. महेंद्र कुलकर्णी सर यांचे खूप खूप आभार !

     गझल मंथन साहित्य संस्थेच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमात सहभागी झालेल्या, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि कोल्हापूर येथील सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने मन:पूर्वक आभार🌹🙏🏻

खास कोल्हापुरी पाहुणचारासाठी (विशेषतः तांबडा पांढरा रस्सा)

कोल्हापूरकरांचे पुन्हा एकदा आभार आणि अभिनंदन 😊🌹🙏🏻


डाॅ. शिवाजी काळे 





गझलमंथन विद्यमान मराठी गझलेच्या प्रसारप्रवाहातील एक सशक्त चळवळ.

        आदरणीय गझलसम्राट सुरेश भटांनी मराठीत प्रस्थापित केलेल्या गझलविधेचा भटसाहेबांनंतर प्रसार करण्याचे कार्य अनेक छोट्यामोठ्या संस्था आणि समुहांनी केले आहे. गेल्या चारेक वर्षांपासून मराठी गझलेच्या प्रसाराचे हेच कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहाने पोहचविण्यात गझलमंथन संस्थेला यश आले आहे. याच मालिकेतील एक पुष्प म्हणून ८ डिसेंबर रोजी कोल्हापूरजवळील छत्रपती शिवभूपांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या वास्तव्याने  पुनीत झलेल्या पन्हाळा किल्ल्याजवळ पार पडलेल्या मराठी गझल संमेलनाकडे पाहता येईल. मान्यवर गझलकारा डॉ. स्नेहलताई कुलकर्णी यांच्या 'दिशांतर' ह्या गझलसंग्रहाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून गझल गझलमंथन संस्थेच्या कोल्हापूर विभागीय गझल संमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला. पिंपरीचिंचवडहून संदीप जाधव, प्रशांत पोरे, प्रदीप तळेकर या गझलकार मित्रांबरोबर पन्हाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात ह्या सहलीचा आनंदही लुटता आला.

        सकाळी नऊलाच आम्ही संमेलनस्थळी पोहोचलो. अल्पोपहार उरकल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आयोजकांनी केलेल्या सुंदर आयोजनाचा प्रत्यय वेळोवेळी येत गेला. उद्घटनापासून शेवटच्या मुशायऱ्यापर्यंत यशस्वी आणि सुसुत्रीत नियोजन संजीवन संस्थेच्या माध्यमातून श्री. सचिन इनामदार आणि त्यांच्या संस्थेतील सहकाऱ्यांनी केले. संस्थेच्या पन्हाळा किल्ल्याच्या तटबंदीलगत असणाऱ्या शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणामधील प्रशस्त ऐसपैस सभागृहात गझल मुशायरे छान रंगले. संस्थेचे सचिन आणि संस्थापक मा.श्री.एन्.आर्.भोसले सरांनी आपल्या मनोगतातून आपले उर्जादायी विचार मांडले. संमेलनाध्यक्ष मा.डॉ.स्नेहलताई कुलकर्णी, उद्घाटक मा.एजाज शेख, प्रमुख पाहुणे मा.डॉ.शिवाजी काळे सर, प्रमुख उपस्थिती मा.डॉ.राज रणधीर ह्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष मा.डॉ.स्नेहलताई कुलकर्णी यांनी गझलविधेवरील आपल्या अतिशय प्रवाही, अभ्यासपूर्ण मनोगतातून माहोल गझलाभिमंत्रित केला. उद्घाटनानंतर मा.डॉ.स्नेहलताई कुलकर्णी यांच्या दिशांतर ह्या दुसऱ्या गझलसंग्रहाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले. दिवसभर ज्येष्ठ आणि मान्यवर गझलकारांच्या सादरीकरणाने गझल मुशायऱ्यांना रंगत चढवली. मराठी गझल जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन होणे गरजेचे आहे. 

    संजीवन संस्थेतील शिक्षक आणि गझलमंथनक्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष मा. सचिन इनामदार सरांनी ह्या आयोजनाचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य सांभाळले आणि नेटके संयोजन करून एका सुनियोजित संमेलन कसे असावे याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले. त्यांच्या ह्या कार्याची वाखाणणी तर करायलाच हवी. याकरिता त्यांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!


अभिजीत काळे






सुंदर आयोजन 

    ग़ज़ल मंथन समुहाचे हे ग़ज़ल संमेलन आज यशस्वीपणे पार पडले खूप सुंदर आयोजन , सचिन सर आपल्या मेहनतीला सलाम , सूत्रसंचालक कुलकर्णी सरांनी वातावरण खेळते ठेवले,  भाऊंच्या व स्नेहल ताईच्या नियोजनाला सलाम , पुन्हा एकदा दिशांतर चे अभिनंदन , विश्वास कुलकर्णी सरांचे आभार , 

तांबडा पांढ-या साठी विशेष आभार 

पुन्हा केव्हातरी योग आला तर आयुष्याच्या कुठल्या तरी पानावर नक्की भेटूच

"स्वच्छ हृदयाचे झरे आहोत आपण"


एजाज शेख 





यशस्वी परंपरा कायम 

यशस्वी गझलसंमेलनांची परंपरा कायम राखत ८ डिसेंबरला,

पन्हाळा,कोल्हापूर येथील,गझल मंथनचे एक दिवसीय गझल संमेलन अत्यंत उत्साहात साजरे झाले.


निसर्गरम्य परिसर,प्रशस्त हॉल,

उत्तम नियोजन आणि मोजक्या पण दर्दी गझल रसिकांची उपस्थिती ही वैशिष्ठ्ये काल प्रकर्षाने जाणवली.

दीप प्रज्वलन,शारदा मातेचे,भट साहेबांचे पूजन आणि उद्घाटनानंतर मान्यवरांची मनोगते झाली.

मा.एन आर भोसले सर

मा.डॉ राज रणधीर 

मा.डॉ शिवाजी काळे

मा.एजाज शेख

मा.डॉ स्नेहलताई कुलकर्णी

या सर्वांचे मार्गदर्शनपर विचार अतिशय श्रवणीय होते.


"संजीवन" संस्थेच्या वतीने भोसले सरांनी राज्यस्तरीय संमेलन सुद्धा आयोजित करू असं जाहीर केलं तेव्हा खरंच खूप आनंद वाटला.


"दिशांतर" या डॉ स्नेहलताईंच्या

२ ऱ्या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला.

ताईंचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.


संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार,

खुमासदार सूत्र संचालन करणारे मा.महेंद्र कुलकर्णी सरांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. सर्वांनी त्यांना भरभरून दाद दिली.


आणि सुरू झाली एका पाठोपाठ ४ 

गझल मुशायऱ्यांची शाही मेजवानी.

राज्याच्या विविध भागांतून आलेले सर्व मान्यवर गझलकार/ गझलकारा यांनी आपापल्या सादरीकरणाने उपस्थितांचे कान अक्षरशः तृप्त केले.

रंगात आलेली क्रिकेटची लाईव्ह मॅच बघताना जसं आपण भान हरपून बघत बसतो अगदी तशीच अनुभूती सर्वांनी घेतली.

मा.प्रसादजी कुलकर्णी,मा.अभिजितजी काळे,मा.श्रीरामजी पचिंद्रे,मा.नरहरजी

कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ४ बहारदार मुशायरे झाले.

अनुक्रमे डॉ राज रणधीर, मी, मुग्धाताई कुळये आणि मनिषाताई रायजादे यांनी सूत्र संचालन केले.

दरम्यान केवळ "नाईलाज" म्हणून भोजन सत्र पार पडलं.

तांबडा - पांढरा नको नको म्हणत 

दोनचार वाट्या चापला.

व्हेजवाल्यांनी सुद्धा असंच काहीसं केलं असणार (just अंदाज)

आणि हे कमी म्हणून की काय चवदार मसाला पान सुद्धा..

(खूपच लाड केले हो)

एकही मिनिट कंटाळवाणा झाला नाही.

संमेलनाचे शिल्पकार अर्थातच

कोल्हापूर जिल्हाध्यक्ष 

मा. सचिनजी इनामदार सर आणि त्यांची संपूर्ण टीम, मार्गदर्शन करणाऱ्या डॉ स्नेहलताई आणि "संजीवन" संस्था.

एक पूर्ण दिवस गझलेच्या सहवासात आनंदात पार पडला.

जुन्या नव्या गाठीभेटी झाल्या.

गझलमंथन परिवार दिवसेंदिवस

अधिक समृध्द होत आहे.

ऋणानुबंध अधिक घट्ट होत आहेत.

संस्थेच्या कोल्हापूर आणि सांगली कार्यकारिणीचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

संस्थेचे अध्यक्ष मा.अनिलजी कांबळे,

मा.जयवंतजी वानखडे, मा.देवकुमारजी, मा. उमाताई पाटील, मा. प्रशांतजी रामगिरवार,

मा.ॲड.मुकुंदराव जाधव,मा. भरतजी माळी या सर्वांच्या पडद्यामागच्या परिश्रमासाठी खूप खूप धन्यवाद.


प्रदीप तळेकर 

चिंचवड,पुणे




 चैतन्याचे वातावरण

     कोल्हापूर कार्यकारिणी आणि टीम आयोजन आणि नियोजन खूप छान. आम्हाला रस्ता खराब असल्याने यायला थोडा उशीर झाला. पण मा. स्नेहलताईचे  मनोगत आणि पुस्तक प्रकाशनाला हजर राहता आले. सगळे मुशायरे अतिशय सुंदर झालेत. दिग्गज गझलकारांच्या सोबत आम्हाला पण गझल सादरीकरण करायला मिळते हा गझल मंथनचा खरोखर खूप सुंदर उपक्रम असतो. शिवाय त्यांचा मुशायरा झाल्यावर ते निघून न जाता नवोदितांच्या गझल ऐकायला पूर्ण वेळ थांबतात इतकेच नव्हे तर योग्य ठिकाणी दाद देऊन गझलकारांना प्रोत्साहन देतात. हे खूप कौतुकास्पद वाटते. गझलकार मा. प्रसाद कुलकर्णी सरांनी व्यासपीठावरून उतरल्यावर तुमची गझल आवडली सांगितले तेव्हा खूप छान वाटले. मोठ्या जाणकारांनी केलेले कौतुक हे पुरस्कारासारखेच किंबहुना पुरस्कारापेक्षा मोठे वाटते. जेवणाचे नियोजन उत्तम. एकूणच कोल्हापूरकरांचे कौतुक करायला हवेच हे नक्की.काल मा. विजया नवले आणि मा. शीला टाकळकर यांचा पण जवळून परिचय झाला पण फोटो काढायचा राहिला. 🙆 मा. स्नेहलताईचा आणि मा. शिवाजी सरांचा स्नेह आणि मार्गदर्शन असेच राहो. तसेच त्यांचे तिथे असणे हे वातावरण चैतन्याने भारून टाकते. गझल मंथन चे सगळेच आयोजन गझलकारांसाठी खूप काही उपक्रम करून सतत प्रेरणा देत राहते त्यासाठी मा. अनिल सर.. मा. जयवंत सर आणि पदाधिकाऱ्यांचे पुनश्च कौतुक आणि आभार...कुणाचा उल्लेख कदाचित नजरचुकीने राहिला असेल तर क्षमस्व. गैरसमज नसावा. 


सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी





 खूप सुंदर नियोजन 

अतिशय देखणा असा कार्यक्रम झाला.


     स्नेहल ,राज दादा ,शिवाजी सर यांची भेट झाली. त्यांना ऐकता आलं खूप खूप भारी वाटलं. 

सर्वच गझलकरांच्या गझला अप्रतिम होत्या.

     सचिन सर यांच्या कामाला तर सॅल्यूट करावा वाटतो अतिशय सुंदर नियोजन सर तुम्ही केलं होतं. 

     स्नेहलताई तुझं खूप खूप आभार इतक्या मोठ्या मुशाहरामध्ये मला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली त्याबद्दल.

     ४थ्या मुशायऱ्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गझकारांनीसुद्धा खूप चांगली साथ दिली त्यामुळे त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

     असे सतत मुशायरे व्हायला हवेत म्हणजे इतरांचे ऐकायला आपले त्यांना  ऐकवायला संधी मिळते .सादरीकरण कसं करावं  कसे असावे त्याची सुद्धा अगदी छान अशी कल्पना येते 🙏🙏🙏🙏


मनिषा रायजादे




दिवस रंगतदार झाला 

     डॉक्टर स्नेहल कुलकर्णीच्या *'दिशांतर'* या गजल संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूर ज्योतिबा पन्हाळा अशी छान ट्रीप झाल आमच्या सहा मैत्रिणींची (यात तीन रेखा-येळमकर कुलकर्णी देशमुख+तरूजा, शिला आणि विजया) छान ट्रिप झाली प्रवासात गाण्याच्या भेंड्या कविता आणि खूप सार्‍या गप्पा धमाल मस्ती चालूच होत सगळ्याजणींचे स्वभाव खूप ऍडजेस्टेबल होते छोट्या छोट्या गोष्टीत सगळ्या एकमेकींना सांभाळून घेत होत्या.

     एक दिवस आधीच कोल्हापूरला पोहोचलो त्यामुळे शाहू पॅलेस, आणि कणेरी मठ पाहून 

     संध्याकाळी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्याचा योग आला मार्गशीर्ष महिना असल्याने या दर्शनाने विशेष आनंद झाला लक्ष्मीला साडी चोळीची ओटी देता आली मन समाधानी झाले 

     रात्री लॉजवर यायला 12 वाजले पण तरी प्रत्येकीने दुसऱ्या दिवशी सादर करावयाची गझल 

     सादर केली एकमेकांना सादरीकरणाच्या टिप्स दिल्या त्यातून प्रत्येकीचे सादरीकरण छान व्हावे ही सगळ्या सख्यांची तळमळ समजत होती.

     रात्री दोन अडीच वाजता झोपूनही पहाटे पाचला उठून तयार होऊन सहा ला लॉज सोडले आणि 

ज्योतिबाचे दर्शन घेतले 

     योगायोगाने रविवार मार्गशीर्ष महिना आणि फक्त अर्ध्या तासात दर्शन झाले या साऱ्याचा आनंद सगळ्या सख्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

     नऊ पर्यंत आम्ही संमेलन स्थळी हजर झालो. पन्हाळ्याच्या निसर्गरम्य पवित्र आणि पावन परिसरात हे गझल मंथनचे गझल संमेलन 'दिशांतर 'चे प्रकाशन आणि गझल मुशायरे अशी साहित्यिक परवणीच होती काल !

     कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सचिन इनामदार यांनी या कार्यक्रमाचे चोख नियोजन मोठ्या हौसेने केलेले दिसत होते. दिवसभर त्यांची लगबग चालू होती

     संजीवन संस्थेचा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आणि अतिशय देखणा होता. तिथेही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही .

सर्व वरिष्ठांच्या गाठीभेटी

     गझलकार मित्र-मैत्रिणींशी गप्पागोष्टी ने दिवस रंगतदार झाला ' दिशांतर ' चे प्रकाशन 

     डॉ स्नेहल चे अध्यक्षीय भाषण खूपच मौलिक विचार देणारे होते तसेच वडिलांबद्दलच्या तिने व्यक्त केलेल्या भावनांनी जवळपास सगळ्या हॉलचे डोळे पाणावले. गझल विषयक विचार, गझल विधा पुढे नेण्याची तळमळ हे सगळे प्रत्येकाच्या भाषणातून डोकावून गेलेले विषय मनात पक्के झाले 

     सर्व मुशायऱ्यातील सगळ्याच गझलकरांच्या गझल व गझल सादरीकरण अप्रतिम असेच झाले.

     या देखण्या सोहळ्याचे साक्षीदार होता आले आणि एक आनंदी दिवस मनात कायम घर करून राहिला याचा खूप खूप आनंद आहे.

     शेवटी सरप्राईज लकी ड्रॉ  काढण्यात आला आणि आमच्या सहा जणांपैकी दोघींना ते बक्षीस मिळाले. याचा विशेष आनंद झाला. त्या दोघींकडून वापसीच्या प्रवासातच पिच्छा करून आम्ही पार्टी घेण्यातली मजा काही औरच होती.

     आपण पुन्हा पुन्हा भेटायचे.. आपल्यातच हुशार आहे आणि काव्यसमेलन करायचे 

     असा ठराव पास करून आम्ही तीन साडेतीनला पुण्यात आपापल्या घरी सुखरूप पोहोचलो

धन्यवाद डॉक्टर स्नेहल

     प्रत्येकाला वैयक्तिक कॉल करून निमंत्रण दिल्याने खूप छान वाटले तुझ्या या स्नेहल स्वभावाचा पुन्हा प्रत्यय आला !

     या साऱ्या मागे उभ्या असलेल्या गझल मंथन संस्थेचे आणि मुख्य कार्यकारणीचे अभिनंदन आणि आभार 🙏🏻


रेखा कुलकर्णी 


_______________________

 सुरेख व्यवस्थापन

     आम्ही सहा जणी पुण्याहुन एकत्र पन्हाळ्याला आलो व खुप समाधान, गझलमंथन समुहा मधील निरनिराळ्या शहरातुन आलेल्या  कार्यकारिणींमधील   

सहकार्यांच्या भेटीगाठी व वैचारिक   देवाण घेवाण व उच्च खयाल असलेल्या गझलामृतानी मनात संप्रृक्त समाधान घेऊन परतलो .  

आयोजन संयोजन व त्याचे व्यवस्थापन सुरेख झाले .

पुणे कार्यकारिणी सभासदांनीही  सहकार्य सहभाग  आपलेपणानी  दिला.

विद््यार्थी प्रतिनिधींनी छान मदत केली व सुरूवातीच्या  गीतगायनानी प्रसन्नता वाढली* ...

त्यांचे सहकार्यही गझल संमेलनाला मिळाले 

*दिशांतर* या  डाॅ.स्नेहलताईंच्या  दुसर्या गझलसंग्रहाचे दिमाखदार प्रकाशन गझलमंथन समुहाच्या च्या दिग्गज गझलकारांच्या हस्ते झाले 

मी ते फेसबुक लाईव्ह करायचा प्रयत्न केला पण सिग्नल स्टाॅंग नव्हता.

आता लक्षात आले की काॅलेज पासवर्ड संजीवन institution reps कडून मागायला हवा होता.. 

just an afterthought

but imp lesson learned...  

स्वत:  भोसले सरच होते तिथे ,सहज मिळु शकला असता .. 

असो

एक सर्वांगसुंदर मुशायरा झाला . गझलमंथन कोल्हापुर  व जवळच्या परिसरातील   काही  सदस्यांशी जेवतांना ओळखी झाल्या .

कोल्हापुरकरांनी भोजन आयोजन खास सामिष  तेही कमी तिखट ठेवल्यानी त्याचा आस्वाद घेता आला.

मला स्वत:ला हे काॅलेज कॅम्पस फार आवडले .वेगळ्या प्रकारची झाडे सरस्वतीचा पुतळा व Stone installations व इतर आर्किटेक्चरल marvels इथे भरपूर होते. बरीच फुलपाखरे व कीटक प्रजाती हिंडतांना दिसल्या .

पन्हाळा बघायला वेळ अपुरा ठरला .

     परत संजीवन संस्थेच्या भोसले सरांच्या   आश्वासनानुसार इथे भविष्यात खास  राज्यस्तरीय गझल मुशायरा झाला तर छानच पर्वणी होईल परत यायला..


रेखा देशमुख 



______________________

पन्हाळा संमेलनाच्या गोड स्मृती

     पन्हाळा संमेलनातून परत जाताना गोड स्मृती सोबत घेऊन गेलो.. पन्हाळाच काय आमच्या स्नेहताईने कुठेही बोलावले असते तरी तिच्या प्रेमाखातर तिथेही आम्ही आलोच असतो . 

     परतायला उशीर होत होता, तरी पाच मिनिटे, पाच मिनिटे करता पूर्ण कार्यक्रम पाहुनच तिथून निघू शकलो, इतके आम्ही तिथे रमलो, गुंगलो. आणि नंतर घड्याळाकडे बघितले.. आणि भानावर आलो. घाटाचा रस्ता, रविवारची ट्रॅफिक, घर वगैरे सगळं सगळं आठवलं

(काय हे गझलेचे वेड!!..)

 आहे त्या परिस्थितीत गाडीत बसलो. कपडे न बदलता..

     घरी पोहचलो तेव्हा रात्र उलटून गेली होती. पूर्ण रस्ताभर मुशायऱ्याच्या गप्पा होत्या. त्यामळे प्रवास जाणवलाच नाही. सुखरूप पोहचलो.

     सकाळचा नाश्ता,जेवण आणि सर्व सोयी उत्तम होत्या. कानाकोपऱ्यातून आलेल्या रसिकांचे अगदी भोसले घराण्याला शोभेल असेच स्वागत झाले..

     त्याबद्दल संयोजक (जिल्हाअध्यक्ष) श्री सचीन इनामदार सरांचे आभार.. खूप खूप परीश्रम घेतले. 

     खास कोल्हापुरी बेत आणि वर विडा खाऊन सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला..

     दुपारच्या सत्रात खात्रीने झोप येणार अशी भीती वाटत होती.. झोप येऊ नये, हा प्रयत्न वारंवार फसत होता.. पण मंचावरच्या गझलकारांनी आणि सुत्रसंचलकांनी श्रोत्यांना झोप न येऊ देण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली..

कुलकर्णी सर जेव्हा सुत्रसंचलन करत होते, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, आणि त्यांचं एखाद वाक्य  निसटुन जात होते.. 

आणि मग टाळ्यांचा सुद्धा व्यत्यय व्हायला लागला.

मा.भोसले सर, एजाज शेख,डाॅ. शिवाजी काळे, , डाॅ. राज रणधीर आणि इतर मान्यवरांचे मनोगत खूप आवडले.

डाॅ. स्नेहलताईचे अध्यक्षीय भाषण अप्रतिम झाले.

     दोन छोट्या विद्यार्थीनीं,मदत करता करता आणि दोन विद्यार्थी जे, सांऊंड सिस्टीम सांभाळता सांभाळता, मन लाऊन गझल मुशायरा ऐकत होते, दादही देत होते..

हे उद्याचे गझलकार असतील..

मा.अभिजीत काळे सरांनी दिशांतरचे अंतरंग खूपच संक्षिप्त सांगितले..

त्यातले काही शेर ऐकायला मिळणार असे वाटत असतानाच, ते थांबले..

आमच्या पैकी दोघिंना लकी ड्रॉ मधे बक्षीस मिळाले.. खूप आनंद झाला.

धन्यवाद गझल मंथन

कोल्हापूर कार्यकारिणी 🙏


शीला टाकळकर

पुणे

______________________________

पन्हाळा संमेलन - एक पर्वणी


हे संमेलन म्हणजे खरोखर आनंदोत्सव होता. उद्घाटन ते समारोप सगळ्या सत्रातून खूप शिकायला मिळाले. गझलांच्या पावसात आम्ही चिंब भिजलो.


कोल्हापुरचे अध्यक्ष सचिन इनामदारने  ( हा माझ्या देवगड कॉलेजचा विद्यार्थी आहे)सर्वांच्या सहकार्याने नेटके नियोजन केले होते. संस्थाचालक शिक्षणप्रेमी तसेच  उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारे असल्याने त्यांनी दिलेली मोलाची साथ जाणवत होती. अशी माणसे दुर्मीळ असतात. सूत्रसंचालक कुलकर्णी सर तसेच  सतत मदतीला सज्ज असणारे चार विद्यार्थी स्मरणात राहिले.


गझलमंथनचे सर्व पदाधिकारी यांनी नियोजन केल्याप्रमाणे दिवसभरचे सर्व उपक्रम छान पार पडले. त्यांची मेहनत जाणवत होती.


डॉ. स्नेहलच्या आपुलकीने आम्हाला संमेलनात ओढून नेलं हेही तितकंच खरं. तिच्या पुस्तक प्रकाशनाला जाणं हे गौरवाचं वाटलं.


नाष्टा, भोजन खूपच आवडले.आम्ही तृप्त झालो.


प्रशस्त हॉल, शांत वातावरण गझलला पोषक होते. विविधांगी विचारस्त्रोतांनी वैचारिक भूकही भागवली. 


या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही महालक्ष्मीचे तसेच ज्योतीबाचे दर्शन घेतले. न्यू पॅलेस,कणेरी मठ, महाद्वारची खरेदी असा आनंद आम्ही घेतला. आम्ही खूप उमेद आणि उत्साह घेऊन परतलो. आता पुढच्या संमेलनाची प्रतिक्षा आहे.

धन्यवाद !


डॉ. तरुजा भोसले

वळसंगकर, पुणे

______________________________

गझलानंदाची पर्वणी

     गझल मंथन साहित्य संस्था कोपरना , आयोजित  एकदिवसीय कोल्हापूर गझल संमेलन सोहळा आणि आ . डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या  "दिशांतर " या दुसऱ्या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा अतिशय दिमाखात व आनंदाने पार पडला . याबाबत गझल मंथन साहित्य संस्था , कोपरनाचे अध्यक्ष आ . अनिलजी कांबळे तसेच  कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे  तसेच गझल मंथन साहित्य संस्थेच्या कोल्हापूर विभागीय  कार्यकारिणीचे   आ .इनामदार तर व सदस्यांचे खूप खूप आभार . 💐🌹💐🌹💐🙏


      तसेच संमेलनास वेळात वेळ काढून आत्मिययतेने उपस्थित राहुन राज्यस्तरिय गझल संमेलन आयोजन व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करणारे संजीवन  ज्ञानसमुहचे सहसचीव आ . एन . आर . भोसले सर यांचे विशेष आभार 💐💐🙏  


    सारे सारे कसे छान छान , मनभावन  🤗 . 

कॉलेजचा मन प्रसंन्न करणारा  हिरवागार परिसर,

 मा गुरुवर्यांच्या , दिग्गज गझलकारांच्या गाठीभेटी ,  अध्यक्षिय भाषणे , अप्रतिम गझलां , भरगगच्च  चार मुशायऱ्यांच्या गझल स्नेहिंच्या गझलांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणाचा आनंद ,  इनामदार सरांनी केलेले आपुलकीचे आदरतिथ्य , सर्वच मुशायऱ्यांच्या अध्यक्षांची भाषणे , मनोगते आणि  श्री . महेंद्र कुलकर्णी यांचेसह   सर्वच सूत्रसंचालकांची खुमासदार सूत्रसंचालने , शालेय किशोरवयीन  विद्यार्थी विद्यार्थिनींने शॉल , श्रीफळ , सर्टिफिकेट्स देण्यापासून उद्घाटन ते समारोपा पर्यंत  साऊंड सिस्टिम व्यवस्था सांभाळत   अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ,   विनम्रतेने अख्खा दिवस केलेली मदत खरेच प्रशंसनिय , मस्त नाश्ता - भोजन ,  आणि आणि ...

       सोने पे सुहागा म्हणजे  गझल सख्यांच्या बरोबर कोल्हापूर पन्हाळा एक दिवसीय झकास छोटेखानी मस्त ट्रीपचा आनंद  - देवीचे दर्शन , ज्योतीबाचे दर्शन , म्युझीयम भेट...  हास्य विनोद आणि बरच कांही - सारे सारे कसे आनंददायी😊  याबाबत बेस्ट ग्रुप लिडर गझल सखी तरुजा भोसले, 

" तीन " रेखा, शीला सख्यांचे आभार नव्हे पर उनको दिलसे प्यारभरी झप्पी ❤️ 

आणि आश्चर्य 

म्हणजे  लकी ड्रॉ मधे मला व रेखाला मिळालेली प्रेमळ भेट वस्तू 💃😊 . 

      अरे हो एक महत्वाचं राहिलच की - हे सारे सुंदर क्षण  ( आम्हा सगळ्या जणींचे नsss खरे सांभाळत अज्जिब्बात कंटाळा व रागराग न करता )  कौशल्यपूर्णरित्या कैमेरॉत कैद करणाऱ्या सखी रेखा कुलकर्णीला तर  प्यारभरी  डबल झप्पी ❤️


डाॅ. विजया नवले



______________________________

आनंदाची पर्वणी

           छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गझल मंथन संस्थेतर्फे आयोजित गझल मुशायरा अतिशय थाटात संपन्न झाला. संजीवनी शिक्षण संस्थेचा विस्तीर्ण निसर्गरम्य परिसर पाहताक्षणी आवडून गेला.संमेलनासाठी आदल्या दिवशीच आम्ही पुण्याहून कोल्हापूरला मुक्कामी आलोत.  दुपारी शाहू महाराजांचा पॅलेस ,कनेरी मठ हे करून संध्याकाळी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले.  त्यानंतर सकाळी सहाला ज्योतिबाचे दर्शन घेऊन ठीक आठ वाजताच कार्यक्रम स्थळी आलो. तिथल्या निसर्गासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. कोल्हापूरचे गझल मंथनचे अध्यक्ष सचिन इनामदार यांनी आमचे स्वागत केले. मग आ.डॉ. राज सर,डाॅ. शिवाजी सर,डाॅ. डॉ. स्नेहलताई  आलेत.संमेलनासाठी लोक येत होते . नाष्टा, चहा आटोपल्यावर सभागृहात आलो.कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर झाला पण संयोजकाने सगळे वेळेत जमवून घेतले.मा. कुलकर्णी सरांचे सूत्रसंचालन अतिशय बहारदार होते. कार्यक्रमात संजीवन शिक्षण संस्थेचे योगदान फार मोलाचे वाटले. प्रारंभी उदघाटनानंतर डाॅ. स्नेहलताई त्यांच्या दिशांतर या दुसऱ्या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. डॉ. स्नेहल ताईंचे प्रास्ताविक अतिशय उद्बोधक होते. याप्रसंगी वडिलांच्या आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला. सगळेच लोक थोडेसे भावूक झाले. त्यानंतर अतिशय बहारदार मुशायरे झालेत. अतिशय सुंदर, सुंदर गझलांचा आस्वाद घेता आला. मध्यंतरात रुचकर भोजन,वर विड्याचे पान भारीच अनुभूती. त्यानंतर दोन मुशायरे झाले. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते तसे तसे परतीचे वेध लागले पण कार्यक्रम अर्धवट सोडून निघावे वाटत नव्हते. शेवटच्या मुशायऱ्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला व अनपेक्षित पणे माझे आणि विजयाताई नवले यांचे नाव अनाऊन्स झाले आणि आम्हाला छानसं गिफ्ट मिळालं. हातात नेहमी लेखणी असावी म्हणून आणि गझल लिहावी म्हणून एक सुंदरसा पेन गिफ्ट मिळाला. शेवटी दिशांतर ची एक प्रत घेऊन परतीचा प्रवास चालू झाला. दिवस मावळू लागला निघायला सहा वाजले. घरचे फोन येऊ लागले .जवळपास रात्रभर प्रवास करून शेवटी पहाटे चार वाजता घरी पोहोचलो. रस्त्यात गप्पा ,गाणी ,कविता ,कथा,यामुळे प्रवास सुसह्य झाला. पन्हाळ्याचा हा परिसर अतिशय रमणीय आहे. तिथे जर राज्यस्तरीय संमेलन झालेच तर पुन्हा यायला नक्कीच आवडेल. गझल मंथन च्या मित्रपरिवाराच्या भेटीगाठी म्हणजे आनंदाची पर्वणी असते. वेळेअभावी इच्छा असूनही काही जणांशी बोलणे राहून गेले काही जणांशी नुसतेच हाय, हॅलो इतकेच. सर्वच मुशायर्‍याचे सूत्रसंचालन सुरेख होते. गझल अतिशय बहारदार होत्या. त्यामुळे कार्यक्रम अतिशय रंजक  झाला. कोल्हापूर कार्यकारिणीचे अध्यक्ष सचिन इनामदार यांचे मनापासून आभार. कार्यक्रम अतिशय सुंदर घडवून आणला यासाठी संजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भोसले सरांचे आभार मानायलाच हवेत. स्नेहलताईचे विशेष आभार त्यांनी वैयक्तिक फोन करून निमंत्रण दिले. पुन्हा एकदा गझल मंथनच्या सर्व कार्यकारणीचे मनापासून आभार .असेच पुन्हा, पुन्हा भेटत राहूत आणि अशाच नवनव्या गझलांचा आस्वाद घेत राहूत.

   *विशेष कौतूक साउन्ड सिस्टिम सांभाळणारे दोन बालक व सत्कार सोहळ्यात हातभार लावणार्‍या दोन बालिका सकाळी नऊ पासून हसत,हसत कार्यरत होत्या.नक्कीत हे चौघेही मोठे झाल्यावर गझलकार होतील*.  धन्यवाद


रेखा येळंबकर


________


______________________

 मंत्रमुग्ध करणारे क्षण

          कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या गझल संमेलनाच्या निमित्ताने सर्व आदरणीय... जिव्हाळ्याच्या.... आपल्या माणसांच्या गाठीभेटी झाल्या याचा आनंद खूप मोठा आहे. स्नेहल ताईंच्या स्नेहामुळे... मायेच्या ओढीमुळे दूरवरूनही लोकं आली होती. स्नेहाच्या अतूट बंधात जुळलेली ही अतूट नाती जन्मभरासाठी जोडली गेली आहेत. गझल माणसं जोडते हेच खरं.... गझलेच्या सानिध्यात राहिल्यावर मी पण गळून जाते... नम्रता... हळवेपण आपल्या नकळत आपल्यात उतरत जाते.ही किमया गझलची आहे तितकीच या स्नेहभरल्या माणसांच्या भेटीगाठीमुळे जास्त आहे असं मनापासून वाटतं. या भेटीची जी ओढ लागते ती खरंच अनाकलनीय अशीच म्हणावी लागेल.

              कुलकर्णी सरांच्या मधुर रसाळ वाणीतून बहरणाऱ्या निवेदनाने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला हे मात्र नक्कीच. संध्याकाळपर्यंत प्रेक्षागृहातील प्रसन्नता त्यांच्या खुमासदार शैलीमुळे मस्त टिकून राहिली.

           समोर... अवती भवती फक्त आपली माणसं म्हंटल्यावर दिवस अक्षरशः भारवल्यासारखा गेला. खूप दिवसांनी भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहल ताईंच्या दिशांतर पुस्तकाचे नेत्रदीपक प्रकाशनाचे क्षण मंत्रमुग्ध करणारे होते. स्नेहल ताईंच्या अलौकिक प्रतिभेतून स्त्रवणाऱ्या अशा असंख्य गझला... त्यांची असंख्य पुस्तकं प्रकाशित होवोत आणि भावी पिढीला संदर्भ म्हणून मौल्यवान ठेवा ठरोत... अजरामर होवोत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशात हा साहित्यिक वारसाही आजीवन... चिरंतन स्मरणात राहो. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा ताई 💐💐💐🌹🌹🌹👍👍👍

                संमेलनाच्या निमित्ताने आदरणीय काळे सर, रणधीर सर, स्नेहल ताई यांना भेटण्याची ऐकण्याची सुवर्ण पर्वणीच.मुशायरे तर अप्रतिमच.आयोजन,संयोजन,व्यवस्थापन कार्यक्रमाला साजेसं... खूप सुंदर लक्षात राहील असं. 🙏🙏🙏

            सर्वांच्या सहवासात एक अविस्मरणीय रविवार.सर्वांचा निरोप घेऊन निघणं खरंच अवघड झालं होतं... भारावलेल्या मनाने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.... पुन्हा कधी होईल भेट या विचारातच....

            खूप सुंदर अनुभूती... स्नेहल मनापासून थँक्स 🙏🙏💐


मुग्धा कुळये

______________________________

एक अमृतानुभव 

पन्हाळा येथील इंजोळेचे गझलसंमेलन..!


  येताना मी रत्नागिरी मधून येणार होते पण कोल्हापूर मधे एक दिवस आधीच आले त्यामुळे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन ओटी भरता आले.रंकाळा तलावाच्या जवळ लेडीज हॉस्टेल मधे उतरल्याने रंकाळा परिसर पाहता आला.आणि गझलसंमएलन साठी येताना आदरणीय गझलकार श्रीराम पचिंद्रे सर आणि सरांच्या सौभाग्यवती यांच्या बरोबर गाडीतून येता आले.त्यांनी येताना गाडीमधेच मला सुवर्ण पर्वणी मिळाली ती म्हणजे गझलसम्राट सुरेश भट यांच्या आठवणी दोघांनीही सांगितल्या यामधे सरांच्या सौभाग्यवती कडे सुध्दा भटांच्या आठवणींचा खजिनाच मिळाला.त्यामुळे या गझलमंथन मला संमेलनाच्या निमित्ताने नवा जन्म,नवी ओळख,नवीन नाते, नवीन भेटी,घडवणारा अमृत कलश हातात देत आहे..! याची अविस्मरणीय आठवण दिली.

 आल्यावर उत्तम नियोजनामधे चहा ,नाष्टा,आणि सर्व नवीन ओळखी झाल्या.मोजकेच पण उत्साहाचे वातावरण तेवढेच निर्माण हळूहळू वाढत गेले.

आणि कार्यक्रमाला दीप प्रज्वलन,शारदा देवीचे आणि भटांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांची मनोगते खुपचं मार्गदर्शन करणारी होती.

   तर गझलप्रेमींनो निमित्त आहे..! दि.८/१२/२०२४ या दिवशी सुप्रसिद्ध गझलकारा आदरणीय डॉ.स्नेहलताई कुलकर्णी यांच्या "दिशांतर " या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि चार गझल मुशायरे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील इंजोळे या गावात स्नेह इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग कॉलेजमधे खुपचं सुंदर प्रकारे संपन्न झाला.स्नेहलताईंचे खुप खुप मनापासून अभिनंदन!

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना या.महेंद्र कुलकर्णी सरांनी सर्वांच्या मनोगत व गझलेवर अतिशय सुंदर दाद दिली.

    कोल्हापूर जिल्ह्यातील गझलमंथन समूहाच्या कार्यकारिणी आणि मोठे दिग्गज गझलकारांची ओळख आणि परिचय झाले.निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवी आणि ज्येष्ठ मान्यवर गझलकारांचा परिचय झाला.

     या सर्वात स्नेहलताईंचे मनोगतामधून नेहमीच गझलेच्या विश्वात जगण्यसाठी नव्याने भर पडते त्यामुळे गझलमधे टिकुन राहण्यासाठी उर्जा मिळते.

      एकूण सोहळ्याला लाभलेले सर्वच मुशायराचे सर्वच मान्यवर अध्यक्षांकडून मनोगतांनी गझलेत स्थान टिकवून ठेवण्यासाठी कान मंत्र मिळाले.

या संमेलनाच्या निमित्ताने सुंदर पर्वणीच मिळाली. 

   पहिल्या दोन मुशायरा नंतर भोजनाच्या आस्वादाने गझलेचा आनंद वाढवला.

   कॉलेजचा आकर्षक असा परिसर स्वच्छ सुंदर आणि पन्हाळ्याच्या सौंदर्यात भर घालणारा आहे.

  कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष मा.सचिन इनामदार सरांनी घेतलेल्या या सुंदर मेहनतीला मनापासून सलाम.!

  मी खरेतर तिसऱ्या मुशायरा नंतर निघणार होते.पण तुमच्या सर्वांच्या गझलेने चौथ्या मुशायरा ऐकल्याशिवाय निरोप घेण्यासाठी पायच निघाला नाही.

  हे अनमोल आणि अविस्मरणीय क्षण सोबतीला घेऊन पुढच्या गझलमंथन समूहाच्या मुशायरा साठी मी तयारीला लागले आहे.

मला येथे एक सांगायला नक्कीच आवडेल.

   सर्व जुन्याला नव्याची जोड देऊन पण मला म्हणजेच स्मिता ढोनसळे या नावाचे सरिता गोखले मधे रुपांतर झाले तरीही तेवढ्याच उत्साहाने आणि प्रेरणेने घडवायला सदा सज्ज आणि सुसंस्कारित गझलपिढी निर्माण करायला गझलमंथन ने मला सामावून घेतले याच्या ऋणात राहायला मला कायम आवडेल.

   गझलेचा प्रवास करणे कठीण असला तरी अशक्य मुळीच नाही.हे गझलमंथन परिवाराकडून आणि परिवारात भेटलेल्या प्रत्येकाकडून नेहमीच नव्याने शिकायला मिळते.

   या गझल प्रवासाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!

 मनात सुंदर आठवणी आणि ओळखी घेऊन निघताना खुप आनंद झाला.

   गझलमंथन समूहाचे आणि सर्व कार्यकारिणीचे मनापासून आभार!


(स्मिता ढोनसळे)

सरिता प्रशांत गोखले

रत्नागिरी




______________________________

दिमाखदार सोहळा

     ८ डिसेंबर, २०२४ रोजी अतिशय दिमाखदारपणे संपन्न झालेल्या गझल संमेलनात सहभागी होण्याचा योग आला यासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. या कार्यक्रमाचे कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यकारिणीने केलेले संमेलन-पूर्व आणि प्रत्यक्ष संमेलनाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन अतिशय छान होते. त्यासाठी संजीवन इंजिनिअरिंग कॉलेज व्यवस्थापन, मा. सचिन इनामदार सर व त्यांची समस्त टीम यांचे व कोल्हापूर व सांगली जिल्हा कार्यकारिणी यांचे मनःपूर्वक आभार !  पन्हाळ्याच्या अल्हाददायक वातावरणात गझल संमेलनाने बहार आणली. 


स्नेहलताईंच्या गझल जशा  आमच्या भावविश्वाशी  एकरूप होतात तसेच त्यांचे मनोगतही मनाला खोलवर स्पर्शून गेले. 'दिशांतर'च्या प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार व्हायला मिळाल्यामुळे खूप धन्यता वाटली. 


आ. स्नेहल मॅडम, डॉ. काळे सर , डॉ. राज सर या गुरुवरांच्या प्रत्यक्ष भेटीची मनाला लागलेली आस या निमित्ताने पूर्ण झाली. समस्त मान्यवरांच्या भेटीचा हा अपूर्व योग उत्साहवर्धक होता. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपापल्या अप्रतिम शब्दकलेने संमेलनाची रंगत वाढवली. गुरुवरांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या उत्कृष्ट गझल श्रवणाने आम्हा नवोदितांना नेहमीप्रमाणेच प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले.


संपूर्ण कार्यक्रमाचे व मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन गझल संमेलनाचे सेतुबंधन करणारे होते, तसेच आपल्या खुमासदार व हजरजबाबी निवेदनाने श्रोत्यांना खिळवून ठेवणारे होते. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमात आपण सहभागी झाल्यामुळे मला अतिशय कृतार्थ वाटले. या अपूर्व अनुभवासाठी मी आपणा सर्वांची ऋणी आहे ! 

धन्यवाद ! 🙏🙏


विशाखा विजय पाटोळे

रत्नागिरी

       ______________________________

सुंदर अनुभुती

 गझलेच्या दैदिप्यमान तारांगणात माझ्या सारख्या टिमटिमणाऱ्या ताऱ्याला सामावून घेतलं त्याबद्दल गझलमंथन संस्था आणि सर्व गुरुजनांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो..आणि सर्व रसिक मनाच्या कवि गझलकारांचे ही आभार मानतो की त्यांनी शेवटपर्यंत हा कार्यक्रम अविरत चालू ठेवला.. माझ्या तोडक्या मोडक्या खयालांना अशीच दाद मिळत रहावी हीच अपेक्षा... एकंदरीत सर्व कार्यक्रम सुंदर अनुभुती देऊन गेला... फक्त माॅर्निंग वॉक सहभाग चुकला याची खंत वाटत आहे..


जमीर शेरखान 

______________

उत्तम नियोजन  

गझल संमेलन आशयसंपन्न झाले.डॉ.स्नेहल, सचिन आणि सर्व टीमचे नियोजन उत्तम होते... मन:पूर्वक अभिनंदन 🌹🌹दिवसभरात अनेकांच्या भेटी झाल्या...उत्तम ऐकता आले याचा मोठा आनंद झाला....बऱ्याच दिवसांनी पूर्ण दिवस गझलमय झाला .. सर्वाँना मनापासून धन्यवाद 🙏


प्रसाद कुलकर्णी 


__________________________________


  उत्कृष्ट सोहळा


     छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेली आणि बाजीप्रभूंच्या शौर्याने पावन झालेली पन्हाळगडावरची पन्हाळा ही नगरी, हाच वारसा जपत भावी पिढी घडवणारी संजीवन संस्था. येथे 8 डिसेंबर 2024 रोजी, गझलमंथन संस्था कोरपना जि. चंद्रपूर, शाखा कोल्हापूर यांच्या वतीने गझल संमेलन घेण्यात आले. सारस्वतांचा मेळा जमला.

      संजीवन संस्थेत ज्ञानदान करणारे शिक्षक, गझलकार आदरणीय सचिन इनामदार सर यांनी गझल साहित्यसंमेलनाचे शिवधनुष्य एकहाती यशस्वीपणे पेलले. महाराष्ट्रातील नामवंत गझलकारांनी येथे हजेरी लावली आणि आपल्या दर्जेदार, गझल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अतिशय भावस्पर्शी गझल सादर केल्या. सुरुवातीला डॉ. स्नेहल कुलकर्णी यांच्या "दिशांतर" या गझल संग्रहाचे प्रकाशन झाले आणि त्यानंतर चार मुशायरे झाले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. चारही सत्र सुरेख झाले. प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद हेच गझलेच्या उत्कृष्टतेची आणि कौतुकाची, शाब्बासकीची थाप होती.

     पन्हाळा येथील निसर्गरम्य वातावरणात कोल्हापूरची खासियत असलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.  कोल्हापूरकरांच्या दिलदार अगत्याने सारस्वत आनंदून गेले.

     गझलमंथन ग्रुप मधील, फक्त ग्रुप मध्ये भेटलेल्या गझलकारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी झाल्या त्यामुळे छान वाटले.

     सचिन इनामदार सर यांचे मनःपूर्वक आणि नेटके नियोजन तसेच त्यांच्या उत्साही सहकाऱ्यांची टीम यांनी हा सोहळा अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पाडला. अर्थात गझल मंथन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांना उत्तम साथ होती, हेही तेवढेच खरे. येथे झालेल्या बहारदार गझल संमेलनात मला माझी हजल सादर करण्याची संधी लाभली. गझलमंथन संस्थेचे आणि गझल मंथन संस्था शाखा कोल्हापूर यांचे मनःपूर्वक आभार...


सौ. प्रतिभा जगदाळे

सांगली



Post a Comment

0 Comments